Ads 468x60px

Saturday, March 14, 2020

३) माय लेकरं- जडणघडण

              माझ्यासाठी आई आणि बाप दोन्ही जबाबदाऱ्या आईलाच पार पाडाव्या लागत होत्या त्यामुळे माझ्यासाठी माझी आईच सारं जग होते. आम्ही मामांकडे रहायला होतो, त्यावेळी मामांचे कौलारू घर आणि समोर गव्हाच्या काड्यांची पडवी होती. मी साधारण आठेक वर्षांचा असेन, उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून आम्ही बाहेर पडवीमध्ये झोपलो होतो. अचानक मध्यरात्री छपरामधून माझ्या अंगावर विंचू पडला व दोन ठिकाणी चावला. त्यापूर्वी मला कधीही विंचू चावला नव्हता, मला असह्य वेदना होऊ लागल्या. चौगुलेवस्तीवरील अंकुश तात्या विष उतरवून देत असे पण सकाळ होईपर्यंत मला धीर धरवेल अशी शक्यताच नव्हती. बाहेर काळाकभिन्न अंधार, गुळवे वस्तीवर हाताच्या बोटावर मोजता येणारी घरे अन एवढ्या अपरात्री सोबत कोणी येण्याची शक्यता नव्हती. नांनाही एवढ्या अंधारात येणं शक्य नव्हते. शेवटी आईने मला पाठीवर उचलून घेतलं व ओढ्यातून, खाचखलग्यातून, काट्याकुट्यातून आम्ही अंकुश तात्याकडे निघालो. मी कमीतकमी पंचवीसेक किलोचा तरी नक्की असेन. धडपडत कसेबसे एक किलोमीटरहून अधिक अंतर चालत आम्ही तात्यांच्या घरी पोहोचलो. तात्यांना झोपेतून उठवलं तर आम्हां दोघांना बघून अंकुश तात्याही अचंबित झाले, "सखुबाई कमाल आहे तुझी, एवढ्या रात्री एकटी कशी काय आलीस?. रस्ता कसला, अंधार किती चार बाप्ये माणसं अशावेळी यायला घाबरतील". असे म्हणत तात्यांनी कसला तरी झाडपाला आणला आणि काहीतरी पुटपुटत विंचू चावलेल्या जागी लावला. मला बऱ्यापैकी आराम पडला.
                  आईच्या अंगात एवढं बळ कोठून आले असेल की एवढ्या अपरात्री, माझे पंचवीसेक किलोचे वजन घेऊन अंधारात ओढ्यातून, खाचखलग्यातून, काट्याकुट्यातून एक दिड किलोमीटर चालली असेल. आपल्या लेकरासाठी एक आई किती कणखर होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण होते. जसे माझ्यासाठी माझी आई हेच विश्व तसेच तिच्यासाठी मीच तिचे विश्व होतो. आईला त्रास देणारा प्रत्येकजण माझ्यादृष्टीने व्हिलन होता. मी लहान होतो पण आईचे कष्ट मला कळत होते. आम्ही ज्यावेळी वडिलांकडे असू त्यावेळी खूप कष्ट करूनसुद्धा संध्याकाळी नेहमीची भांडणे असायची आणि त्यात आई एकटी पडायची. अर्थात फार कमीवेळा आम्ही वडिलांकडे असायचो. दिवसभर मरमर काम कारायचे आणि संध्याकाळी काही ना काही कारणाने वाद व्हायचे, मी कधी काही बोलायचो नाही पण बाहेर जाऊन अंधारात हमसून रडायचो. हे निदान दिवसांआड तरी घडायचे. तसे तर व्यसनी व्यक्ती असलेल्या घरात वाद ठरलेलेच असतात, त्यात दोन बायकांची भर त्यामुळे रोजचा वाद साहजिकच असायचा. मात्र त्याचा खोलवर परिणाम माझ्या मनावर होत होता अन त्यामुळे मी जास्तच संवेदनशील होत गेलो. 
                  मी त्यावेळी साधारण आठ-दहा वर्षांचा असेन, या सगळ्यांचा मला फार राग यायचा. मी ज्यावेळी हा राग आई समोर व्यक्त करायचो त्यावेळेस आई मला समजावयाची भांडणं आमची आहेत, तुला तर कोणी काही बोलत नाही ना त्यामुळे तू भांडणाकडे लक्ष देऊ नकोस, आमचे आम्ही बघू.  मला नेहमी वाटायचं कधीतरी वडिलांनी आईची बाजू घ्यावी पण तसे कधी घडायचे नाही. त्यामुळे त्यांचाही खूप राग यायचा पण आई म्हणायची "बाप नावाला का होईना आहे ना, ही मोठी गोष्ट आहे ज्यांना बाप नाही त्यांच्याकडे बघ". तिथून पुढे थोडासा अंतर्मुख होत गेलो कारण ज्यांना वडील नव्हते असे त्यावेळी माझे एक दोन वर्गमित्र होते, कधी वडिलांचा विषय निघाला की त्यांचे दीनवाणे चेहरे पाहून त्यांच्या दुःखाची कल्पना येत होती. तेव्हापासून आजपर्यंत अनेकदा वडिलांमुळे बऱ्याचवेळा खूप त्रास झाला पण आजपर्यंत मी कधीही एका शब्दांनी वडिलांना बोललो नाही.
             घरात कितीही वाद असले तरी आईने मला कधी सख्खा-सावत्र असा भेदभाव करू दिला नाही. थोरल्या आईला पण मी आईच म्हणायचो. तिचाही माझ्यावर फार जीव होता. माझं पूढे खूप चांगले होईल असे तिला फार मनापासून वाटायचे. मी डिप्लोमाला असताना दुर्दैवाने दुर्धर आजाराने ती आम्हांस सोडून गेली. प्रचंड दुष्काळ पडला होता, परिस्थिती अतिशय बिकट होती. माझा डिप्लोमाचा खर्च भागावा म्हणून आई मामांकडे सहजपूरला रहात होती. मी सुट्टीला आलो होतो त्यातील एक दिवस पारगांवला आलो थोरल्या आईची अवस्था पहावत नव्हती पण काही पर्याय नव्हता. मला फार असहाय्य वाटतं होते, काहीच पर्याय नसला तरी आपण काहीच करू शकत नाही याची सल आणि वैषम्य वाटतं होते, ती सल आणि वैषम्य वाटते अजूनही मला वाटते.  कॉलेज केव्हाच सुरू झाले होते, मी सहजपूरवरून कोल्हापूरला निघायची तयारी करत होतो, तेवढ्यात थोरली आई गेल्याचा फोन आला. आई आणि मी तात्काळ पारगांवकडे निघालो. त्यावेळी माझ्याकडे मोबाईल फोन नव्हता, मी कदाचित काही वेळ आधी कोल्हापूरला निघालो असतो तर मी कोल्हापूरला पोहचेपर्यंत मला हे कळलेही नसते व कदाचित तिचे अंत्यदर्शन घेता आले नसते. थोरल्या आईलाही आयुष्यात काही सुख उपभोगता आले नाही, संघर्ष आणि कष्ट तिच्याही वाटेला होतेच कारण दोन्ही आईंच्या वरचढ त्यांची तिसरी सवत दारू होती. आयुष्यभर विविध कारणांनी चिंताग्रस्त असलेला चेहरा आज निष्प्राण असूनही निश्चिंत दिसत होता. छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधणारी थोरली आई आज ह्यात असती तर निश्चितच फार खुश आणि निश्चिंत जीवन जगली असती.  
            माझा डिप्लोमाच्या आसपासचा काळ फार खडतर गेला, मोठा दुष्काळ, त्यामुळे दयनीय झालेली आर्थिक परिस्थिती. शिवाय त्याच चारपाच वर्षाच्या कालावधीत आजी-आजोबा, थोरल्या आईचा मृत्यू झाला होता. या प्रत्येक गोष्टींमुळे मी अंतर्मुख होत गेलो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही बदलत गेला. गरीबी, अन्याय ही क्रांतीची आणि गुन्हेगारीची जननी आहे असे म्हणतात. माझ्या आयुष्याची वाटचाल दोन्हीपैंकी कोणत्याही बाजूला होऊ शकली असती. आईचा एकाकी संघर्ष मी जवळून पाहिला होता शिवाय मला आईच्या कष्टाची जाण होतीच. आईचा संघर्ष हीच माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा होती. मी जर चुकीच्या मार्गाची पळवाट निवडली असती तर तो आईचा फार मोठा पराभव ठरला असता आणि मला तसे काही होऊ द्यायचे नव्हते. आणि म्हणूनच आयुष्यात मला काही करता नाही आले तरी चालेल पण आपल्या हातून काही वाईट घडू न देण्याचा प्रयत्न करायचा असा मनोमन निश्चय केला होता. अर्थात काहीवेळा अजाणतेपणी माझ्याकडून काही चुका घडल्याही पण मी त्यातून तात्काळ सावरत गेलो आणि शिकतही गेलो. खरंतर बिघडण्यासाठी फार पोषक वातावरण होते पण मी घडत गेलो. 

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!