Ads 468x60px

Thursday, December 20, 2018

प्राऊड फादर

काल मामांशी बोलत असताना त्यांनी ऋतुराज परवाच श्रीलंकेवरून परत आल्याचे सांगितले. ऋतुराजविषयी बोलताना त्यांचा मुलाबद्दलचा अभिमान जाणवत होता आणि त्याचे बॉण्डरी अडवतानाचे, विविध फटके मारत असतानाचे, विविध पोज मधील फोटो दाखवताना त्यांना गहिवरून येत होते. "प्राऊड फादर" म्हणजे यापेक्षा वेगळं काय असते. मी म्हणलं मामा  ऋतुराजची आयपीएल मध्ये निवड व्हायला हवी. शंभर टक्के होणार मामांना विश्वास होता, आणि रात्रीच कळलं की त्याची चेन्नई सुपर किंग्ज टीम मध्ये निवड झाल्याचे समजले.

              वयाच्या एकविसाव्या वर्षी महाराष्ट्राच्या संघात, भारत 'ब' संघात निवड होणं ही खुप मोठी गोष्ट आहे, ती सुद्धा क्रिकेटची कोणतीही पार्श्वभूमी नसताना. पण यामागे खूप मेहनत आहे, वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून सुरू केलेलं क्रिकेटचे प्रशिक्षण आहे. तो चार एक वर्षाचा असताना सर्व प्रकारचे फटके लीलया मारायचा पण त्यावेळी तो इथपर्यंत जाईल असं मला वाटलं नव्हतं. सर्वांनाच आपल्याला लहानग्या मुलांच्या छोट्या मोठ्या गोष्टीचेही कौतुक वाटते तसेच हे काहीतरी असेल असे वाटले होते पण आता निश्चितपणे वाटतंय की तो भारताच्या संघात स्थान मिळवेल व सलामीचा तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवेल. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनीही त्याचे कौतूक केले आहे व त्याला लवकर भारताच्या संघात स्थान मिळेल अशी अपेक्षा आहे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून दिलीप वेंगसरकर यांच्या क्रिकेट अकॅडमी मध्ये तो प्रशिक्षण घेत आहे. ऋतुराजची फलंदाजी कलात्मक आहे, विशेषतः त्याचे कव्हर ड्राइव्ह आणि पूलचे फटके अनेक दिगग्ज फलंदाजीची आठवण करून देतात. याच कलात्मक फलंदाजीच्या जोरावर त्याने ओडिशा विरुद्ध महाराष्ट्राला बिकट अवस्थेतून बाहेर काढताना त्याने षटकार मारून शतक पूर्ण करत १२६ धावांची झुंजार खेळी केली होती.

               रणजी,देवधर चषकात त्याने आपली छाप पाडली आहे, आता आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याची, कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळाली आहे ज्यावेळी त्याला प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी मिळेल त्या-त्यावेळी तो त्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. ही ऋतुराजच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात आहे. त्याला पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा!. मुलगा एवढ्या कमी वयात इतकी प्रगती करत आहेत त्याबद्दल मामांचे अभिनंदन. मामा स्वतः डीआरडीओ मध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यांचा आम्हाला लहानपणापासूनच अभिमान आहे आणि म्हणूनच आतापर्यंत अनेकांनी मला वेळोवेळी टोप्या घातल्या आहेत, पण पहिल्यांदाच फेटा बांधण्याचा मामांचा प्रेमळ आग्रह काल मोडवला नाही.
                                                       संतोबा.
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!