Ads 468x60px

Sunday, September 7, 2014

शरदाचं चांदण



       घर फिरले की, घराचे वासे फिरतात तसेच घडाळयाचा "काटा" गळफटला की वेळीच नव्या "वाटा" शोधाव्या लागतात. त्याचा अनुभव आम्हालाही येतोय असा बर्‍याच जणांचा भ्रम झाला आहे, कारण मध्यंतरी एका पराभवाच्या लाटेनंतर अनेक सरदार "आप"आपल्या वतनदार्‍या वाचवण्यासाठी थेट शत्रूच्या गोटाच सामील होऊ लागले आहेत.  त्या पराभवाची लाटच अशी आहे की पुढची लढाई सोपी नाही याची जाणीव आम्हांस आहे. त्यामुळे अजूनही आमचे अजून काही तालेवार सरदार शत्रू पक्षास जाऊन मिळतील नव्हे ते जाऊन मिळावेत अशीच आमची खेळी आहे. आता एवढे तालेवार सरदार सामील होणार म्हणजे त्यांना वतनदारीची बक्षिसी मिळणार आणि निष्ठावंत सरदार नाराज होणार हे ओघाने आलेच.
     आमचे अंदाज कधीच चुकत नाहीत, आम्ही जे बोलतो तेच आम्हाला बोलायचेय वा काही करायचेय तेच आम्ही करतो असे नाही, असा बहुतेक जणांचा समज आहे. अगदी भारताने क्रिकेट वर्ल्डकप जिंकला तो आमच्यामुळेच, अशी बर्‍याच जणांची पक्की समजूत आहे. त्यामुळे आम्ही त्याचे खंडन करत नाही, म्हणून काहीही घडले तरी आम्हीच बरोबर ठरतो. आताही प्रतिपक्षाच्या संस्थानात आमचे तालेवार सरदार घुसवून त्यांच्या निष्ठावंत सरदारांच्या तोडीस तोड आमच्या सरदारांना वतनदारी कशी मिळेल हे पाहायचे जेणेकरून पुढे आकड्यांचे गणित जुळले तर त्यांना स्वगृही परतताना काही कायदेशीर अडचण यायला नको. आम्ही जे काही करणार ते कायद्यानेच फक्त पळवाटेच्या शर्तीची "पुर्ती" करायची एवढ्यासाठीच काय ती धडपड.
     जे सोडून गेलेत ते पुन्हा आमच्याकडे येतीलच याची काय खात्री अशी शंका येणे सहाजिकच आहे. पण ज्यांचे अस्तित्वच माझ्यामुळे आहे तेच आम्हाला कात्रजचा घाट दाखवतील अशी शक्यता नाही कारण ही कला आमची आहे आणि ती आम्ही अद्याप कोणाकडेही हस्तांतरीत केलेली नाही. हे सर्वजण आम्हाला "बाप" समजतात आणि काही झाले तरी कोणी आपला बाप बदलत नाही.  असे असूनही कोणी तसा प्रयत्न केलाच तर ते ज्या शत्रूच्या गोटात गेलेत त्या शत्रूशी आमचे असलेले मित्रत्वही सर्वजण जाणून आहेत त्यामुळे 'सुख के सब साथी दुख मे न कोई' असे म्हणण्याची आमच्यावर वेळ येणार नाही याची खात्री आहे.

     ही माझी शेवटचीच खेळी असे म्हणायची ही शेवटची वेळ परिस्थितीनुसार बदलू शकते.........!!!!!
  
          (टीप:-परिस्थिती वास्तववादी वाटत असली तरी लेख काल्पनिक असू शकतो...!!!!!)

                                                                                                                          ........ संतोबा 
                                                                                                                              (संतोष गांजुरे)

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!