Ads 468x60px

Sunday, May 27, 2018

पहिल्या पंचवार्षिकचा आढावा

              लोकशाही मार्गाने(अँरेंज मॅरेज) सत्ता स्थापन (संसार) केलेल्या सरकारला पहिल्या पंचवार्षिकमधील चार वर्षे आज पूर्ण झाली. ही सत्ता कोणत्याही अटी शर्तीविना(मानपान), तसेच कोणताही घोडेबाजार(हुंडा) न करता स्थापन झाली. २६ मे २०१४ रोजी दोघांचे मंत्रिमंडळ असलेल्या सरकारचा शपथविधी(विवाहसोहळा) मोठ्या थाटामाटात आणि सहस्रावधी जनतेच्या(पै-पाहुण्यांच्या) उपस्थितीत पार पडला.सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळाला ओढ असते ती अभ्यास दौऱ्याची(हनिमून) मात्र सरकारपुढील आव्हानांची जाणीव असल्याने कोणताही दौरा न काढता तात्काळ दैनंदिन कारभारास(नोकरी) प्रारंभ करावा लागला. अर्थव्यवस्था(पगार) आधीच नाजूक होती ती आता अगदीच डबघाईला आलेली त्यातच दोन्ही पक्षांकडेच्या फुटीर सदस्यांच्या(नातेवाईक), विरोधांमुळे(मालमत्ता वाद) यामुळे सरकार चालवणे म्हणजे अगदी तारेवरची कसरत करण्यासारखं होते. कोणत्याही सरकारचे पहिल्या पंचवार्षिक मधील ध्येय असते ते मंत्रिमंडळ विस्ताराचे(दोनाचे तीन-चार) आणि त्यावरच बहुदा सरकारचं यशापयश ठरवलं जाते कारण सगळ्यांच्या मनात लोकशाही असली तरी रक्तात घराणेशाहीच असते. आमचा मंत्रिमंडळ विस्तार ११ फेब्रुवारी २०१६ रोजी वरदाराजच्या रूपाने झाला साहजिकच दोन्हीकडची मंडळी प्रचंड खुश झाली. हीच ती काय ती सरकारची चार वर्षांची निर्भेळ कामगिरी. बाकी खूप मेहनत,संघर्ष करून इतर क्षेत्रात फारसं यश नाही भेटले.
             अनेक अडचणींचा सामना आणि प्रत्येक गोष्टीसाठी मोठा संघर्ष करावा लागत असताना देखील सरकारमध्ये फार कुरबुरी झाल्या नाहीत उलट आवश्यकतेनुसार अनेक जबाबदाऱ्या स्वतःहून घेतल्या गेल्या. दोन्हीकडच्या पक्षश्रेष्ठींचे(आई-वडील) योगदान मोलाचे ठरले. कोणत्याच बाबतीत अविश्वास, संशयाचे वातावरण कधीच निर्माण झाले नाही आणि अविश्वास ठराव कधीही मांडला गेला नाही.वाद अजिबातच झाले नाहीत असे नाही पण त्याची वाच्यता सभागृहाबाहेर(घराबाहेर) कधीही झाली नाही याचे श्रेय गृहमंत्र्यांचे (लाईफपार्टनर). कारण मी शीघ्रकोपी असल्याने बऱ्याचदा सभात्याग(गृहत्याग) करण्याचा धमक्या दिल्या. अर्थात सरकार स्थापन करण्याच्या आधीच ह्याची दिली होती की ज्यावेळी तीव्र इच्छा होईल त्यावेळी मी सर्वत्याग करून कायमचा तिच्याकडे जाईल(मुंबई मेरी जान). खरंतर माझ्यासोबत सरकार स्थापण्याची बऱ्याच पक्षश्रेष्ठींची इच्छा होती. पण मी असो वा नसो कशी ही परिस्थिती असो पण न डगमगता एकहाती सरकार ते ही तत्वाने आणि नितीमत्तेने चालवण्याची कुवत असणाऱ्या पक्षासोबत आघाडी करायची हे निश्चित होतं आणि म्हणूनच या पक्षाबरोबर आघाडी केली आणि चार वर्षांनंतर हा निर्णय मास्टरस्ट्रोक(योग्य) ठरला या प्रचिती आली.
             खरंतर एवढा संघर्ष, तडजोडी कराव्या लागल्या नसत्या पण तत्वाने, नितीमत्तेने वागायचे म्हणले की असे होणारच. जगासाठी चांगले असणे स्वतः साठी वाईट असते, पण आम्ही हे सारे स्वखुशीने स्वीकारलेलं आहे. नाहीतर तसे तर आमच्याकडे सगळं काही अगदी नजर लागण्यासारखे आहे पण आम्हांला काहीतरी शाश्वत आणि स्वतःच्या हिंमतीवर करून दाखवायचे आहे.  फक्त स्वतःचा स्वार्थ पहिला तर सगळा आनंदीआनंदच असता. त्यामुळेच दोघांचे सरकार आणि पक्षश्रेष्ठींचे कसलेही बंधन नाही त्यामुळे सर्वांना आमचे एकदम मस्त मजेत चाललेले असे वाटते आणि ते साहजिकच आहे. आमचे दुर्लक्ष होते असे वाटते असे बऱ्याच जणांना वाटते तर काहींचा जळफळाट होतो पण त्यांना हे कळत नाही की हे दोघांचे मंत्रिमंडळ असले तरी राज्यविस्तार मोठा आहे. भरीसभर म्हणून तिजोरीवर अनुदान(आहेर,गिफ्ट्स), बुडीत कर्जे(उधारी),  न्यायव्यवस्था(कोर्ट केसेस), शिक्षण(बीसीए), सभागृह भाडे(घरभाडे) इ. अनेक गोष्टींचा अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे कधीकधी नाईलाजाने पक्षश्रेष्ठींकडून(आई) फंड घ्यावा लागला पण क्राऊडफंडिंग(उधारी,उसणे) कधी केली नाही . याशिवाय दोन राजधान्या असल्याने थोडीफार ओढाताण होती ती वेगळीच. त्यामुळे यापुढे मंत्रिमंडळ विस्तार करायचा नाही, हम दो, हमारे दो हे तत्व न पाळता हम दो हमारा एक हे तत्व पाळणार आहोत त्यामुळे पुढे खातेवाटपचा (वाटण्या) घोळही होणार नाही.बऱ्याचदा मित्रपक्ष(अर्धांगिनी) आणि मी वेगवेगळ्या राजधानीत राहून राज्यकारभार करत असल्याने काहीतरी बिनसलं आहे असाही बऱ्याच जणांचा गैरसमज आहे पण वेगळे राहणे मंत्रिमंडळ विस्तारामुळे (वरदराज) आहे. बाकी काही मनभेद नाहीत.
          अगदी पुर्वीपासून आमचा फटकळपणा,तत्वनिष्ठपणा आणि अहंकारीपणामुळे मी कोणाबरोबरही सरकार स्थापन केले तरी ते टिकेल की नाही याची इतरांनाच काय मला स्वतःला पण शंकाच होती.  आमचे सरकार भरभक्कम स्थितीत आहे ते आमच्या मित्रपक्षाचा(अर्धांगिनी) समजूतदारपणा, त्यांच्या व आमच्या पक्षश्रेष्ठींचे, कार्यकर्त्यांचे(दोन्हीकडील आईवडील,भावंडे) फार मोठे सहकार्य आणि मार्गदर्शन व मित्रमंडळींचा पाठिंबा या जोरावरच हे शक्य झाले आहे. आमच्या मित्रपक्षाने जो समजूतदारपणा दाखवला आहे, जी तडजोड केली आहे त्याला तोडच नाही. हे जे काही आहे ते फक्त मित्रपक्षामुळेच. मागील चार वर्षाच्या कार्याचा आढावा घेताना हे सरकार यापुढे अजून चांगल्याप्रकारे कारभार करेल याची ग्वाही देतो. हे सरकार जसे चार वर्षे चांगल्या रीतीने चालले त्यापेक्षाही अजून उत्तम रीतीने पुढील पन्नास वर्षे कारभार करेल याबाबत कोणाच्या मनात शंका नसावी.      
                                                                                                               (संतोबा)संतोष गांजुरे.
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!