Ads 468x60px

Friday, February 3, 2017

शिक्षण - सर्वांगीण विकासाचा पाया-२

हृषीकेश शिंदे २००१ साली कोल्हापूरला पदवीकेसाठी(डिप्लोमा) प्रवेश घेतला त्यावेळेपासूनचा माझा जिवलग मित्र. कालच त्याचा कॉल आला होता. यावर्षी डिग्रीला(बी. .) प्रवेश घेता आल्याची खंत होती त्याबरोबरच पुढील वर्षी तरी प्रवेश घेता येईल की नाही या विवंचनेत होता. त्याचे पदविकेचे (डिप्लोमाचे) चार-एक पेपर बाकी आहेत त्यापैकी एम-१ चा पेपर देण्यासाठी कोल्हापूरला चालला होता. गेल्या पंधरा वर्षात साधारणपणे दहा-पंधरा वेळा तरी  त्याने एम१ चा पेपर दिला असेल पण अजूनही पेपरला जाताना तोच उत्साह आहे. एवढ्यावेळा अपयश आले असताना,पास होण्याची खात्री नसताना, पुण्यावरून कोल्हापूरला जाण्यासाठी त्याला कोठून उर्जा मिळत असेल काय माहीत. त्याचा आदर्श ठेऊन मी सुद्धा जवळपास दहा वर्षानंतर बीसीए ला प्रवेश घेतला आहे, कॉलेज घराजवळ असूनसुद्धा मागच्या तीन परिक्षांपैकी एकच देता आली आहे, अर्थात इतरही जबाबदाऱ्या वाढल्या आहेत.
हृषीकेशला पहिल्यांदा भेटलो ते त्याच्या भल्या-मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनी भरलेल्या ट्रंकेसोबत. कुतुहलापोटी नेहमी चार-दोन मुले त्याच्या भोवती असायची. मी माहिती- तंत्रज्ञान तर तो विद्युत अभियांत्रिकी शाखेत पण केवळ पुण्याचा म्हणून त्याच्याशी मैत्री झाली. पुण्याचे दहा-पंधरा जण असल्याने आमचा एक ग्रुप झाला होता. ग्रुपचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यावर्षी सगळे विषय सुटले असा कोणीच नव्हता. एवढेच काय आम्हाला जे सिनियर होते ते अजूनही हृषीकेश बरोबर परीक्षेसाठी जात असतात. एकीकडे जिवलग मित्र म्हणून दुसरीकडे असा अपमान करतोय असा गैरसमज होऊ शकतो पण तसे काही नाही. मी स्वत: मला आठवतंय तेव्हापासून मी गणितात नापास होत आलोय, मला डिप्लोमाला तर कित्येकदा भोपळाही फोडता आला नाही. नापास होणे आम्हाला कधीच अपमानास्पद वाटले नाही. प्रत्येकाचे काही ना काही वेड होते आणि कोणाच्या तरी जबरदस्तीने डिप्लोमाची वाट धरावी लागली होती.
हृषीकेशला मात्र इलेक्टरीकल, इलेक्ट्रॉनिक्सची प्रचंड  आवड होती आणि भरपूर माहिती ही होती. कोणतेही सर्किटबोर्ड , डायग्रॅम बनविण्यासाठी त्याला कुठल्या संदर्भाची गरज पडायची नाही. नेहमी काहीतरी भन्नाट कल्पना असायच्या त्याचा डोक्यात. कायम तो त्याची सोल्डरींग गन घेऊन सर्किट बोर्डशी काहीना काही करत बसलेला असायचा. जुन्या बाजारातून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणून त्यावर काही ना काही संशोधन चालू असायचे. कधी रेडिओ स्टेशन बनवायचे असे तर कधी दुसरे काहीतरी. त्यामुळेच अगदी टॉपर्स म्हणवणारेही प्रॉजेक्टसाठी त्याची मदत घ्यायचे. एवढ असूनही ह्या विषयात सुद्धा पास होण त्याला जड जायचे. जे सहज कळतंय ते पेपरात उतरावयाला अवघड जायचे त्याला नापास करणार्‍या शिक्षकांनाही हे माहीत होते. एवढेच नव्हे तर भविष्यात हा काहीतरी इतरांपेक्षा वेगळ काहीतरी करेल अशी खात्री होती.
              आजच्या धक्का-धक्कीच्या जीवनात बहुतेक मित्रांशी असलेला संपर्क कमी झाला असला तरी हृषीकेश सोबत महिन्यातून एखादा दुसरा फोन, महिन्या-दोन  महिन्यातून एखादी भेट होत असते. प्रत्येक वेळी तो मला न विश्वास बसणाऱ्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सांगत असतो पण त्याचे लॉजिक ऐकून विश्वास ठेवावाच लागतो. पण असे असले तरी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रोजेक्टला मूर्त स्वरूप आलेली नाही. अजूनही पैसे कमवत नसल्याने लोकांच्या दृष्टीने तो अपयशीच आहे. पण एवढया हुशार, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या व्यक्तीला ओळखण्यात, संधी देण्यात आपली शिक्षण व्यवस्था, समाज कुठं तरी कमी पडतोय असे नेहमी वाटते अर्थात त्याचीही काही चुका आहेतच. पण असं हुशारी वाया घालवणे हे आपल्या सर्वांचेच अपयश आहे. शिक्षणाच्या बाजारात पैशात सहज उपलब्ध होणाऱ्या डिग्र्याच्या भेंडोळ्याना किती महत्व द्यायचे ह्याचा विचार करायला हवा. 
            दीर्घकाळ प्रयत्न करून देखील विशेष यश मिळत नसताना देखील तो कधी निराश झाला नाही किंवा त्याच्या उत्साहात कणभरही कमतरता आलेली नाही. अजूनही काहीतरी जगावेगळं करण्याची त्याची जिद्द तशीच आहे. निराश होऊन अजून त्याने त्याचा मार्ग बदलेला नाही. वेगवेगळ्या संकल्पना आणि स्वप्नांवर काम करणे चालूच आहे. कोणाला काहीही वाटो मला मात्र पूर्ण विश्वास आणि खात्री आहे एक ना एक दिवस हृषीकेश त्याच्या संघर्षात यशस्वी होईल. आज ना उद्या कोणासाठी का होईना तो आदर्श ठरल्याशिवाय राहणार नाही. आमच्या वांझोट्या शुभेच्छा सदैव त्याच्यासोबत असतील!!!  
                                                        ..... संतोबा   (संतोष गांजुरे)
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!