Ads 468x60px

Saturday, June 8, 2019

मी आणि माझी अहंकारीक वचने - १६

वर्तमानात मार्गक्रमण करत असताना, आपण भूतकाळात डोकावत असू तर भविष्यात आपण निश्चित अडखळणारच. जे होते, जे झालंय, त्यापेक्षा जे चाललं आहे आणि जे होणार आहे ते महत्वाचे.

##########################################
स्वकर्तुत्वाने यशस्वी होताना, बदनामीची भीती बाळगून चालत नाही. जे आपल्याशी बरोबरी करू शकत नाहीत, ते निश्चितपणे आपली बदनामी करतात.

##########################################
कधी कधी पात्रता नसणे ही एखाद्या पदाची पात्रता असू शकते. यामध्ये पात्र व्यक्तींवर अन्याय वगैरे नसून उच्चपदस्थाने आपल्या पदाला धोका होऊ नये म्हणून घेतलेली ती काळजी असते.

##########################################
अनायासे मिळालेल्या गोष्टींच्याप्रतीची (आई-वडील,देश,धर्म,वंश,भाषा,प्रांत इ.) जबाबदारी, आपण त्या गोष्टींचे उदात्तीकरण करून साळसूदपणे झटकत असतो.

##########################################
कितीही चांगली असो वा वाईट असो, कोणत्याही एकाच गोष्टीशी (विचारसरणी, व्यक्ती, आदर्श,पक्ष इ.) आपल्या निष्ठा बांधील नसाव्यात. अन्यथा ही एकनिष्ठता कट्टरवादाकडे झुकते आणि कोणताही कट्टरता वाद हा वाईटच असतो.
                                                                                                                                                             संतोबा...

मी आणि माझी अहंकारीक वचने - १५

राजकारणाला समाजकारणाची बाधा झाल्यापासून राजकारणाची वाताहत झाली आहे!

########################################
उन्माद आणि कट्टरता ही अशी दुधारी तलवार आहे जी विरोधकांसोबतच 
समर्थकांनादेखील घायाळ करते...

########################################
निवडणुका हा भारतीय लोकशाहीचा सर्वात पवित्र सण आहे. मतदानाचा हक्क बजावून त्यात मोठ्या उत्साहाने सामील होऊ. सर्वांगिण सार्वभौमत्व टिकवण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे.  द्वेषाचे आणि फुक्या अस्मितेचे राजकारण करणाऱ्यांना नाकारून सामाजिक भान असलेल्या, सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्यांना निवडून देऊया. तसेच वांझोटया अस्मितावाली दूतोंडी गांडूळ परत आढळ'णार नाहीत याची काळजी घेऊ .

########################################
फक्त प्रतीके बदलणे म्हणजे बदल नव्हे ही तर केवळ तडजोड.

########################################
लेकराने भोकाड पसरले की बालहट्ट पुरवावाच लागतो. पण बेरकी बाप त्यातूनही त्याला धडा शिकवतोच.

                                                                                                                                                  संतोबा...

मी आणि माझी अहंकारीक वचने - १४

तुम्ही सगळे चांगलेच आहात, पण फक्त तुम्हीच चांगले आहात हा गैरसमज तेवढा दूर करा!

########################################
तायडे खरंय, 
येवढ्याशा आघाताने तू उन्मळून पडली असतीस, मात्र माझ्यासाठी ही क्षुल्लक गोष्ट आहे. 
तुला जेवढा आनंद झालाय, तेवढं दुःख मला झालेलं नाहीये. आणि तुझा हा असला आनंद, मला पाहवतही नाही. 
त्यामुळे यापुढे तू नेहमी जळतच राहशील, याची काळजी मी घेईन!!!

########################################
सहानुभूती आणि कौतुकाच्या प्र'गतीरोधकावर कधीही अडखळू नये. तसेही अपयशी ठरल्यावर सहानुभूती आणि मेल्यावर कौतुक आपसूकच वाट्याला येते.

########################################
घडलेल्या बऱ्या-वाईट घटनांमधून योग्य तो धडा घेतला नाही तर निकाल नकोसाच लागतो!!!

########################################
आयुष्य जगताना प्रत्येकाचा, प्रत्येक गोष्टींचा प्राधान्यक्रम वेगळा असू शकतो मात्र,
झालास का पास? किती टक्के?
भेटली का नोकरी, टेम्पररी की पर्मनंट?
घेतला का फ्लॅट, वन बीएचके की टू बीएचके ?
कोणती गाडी, टू व्हीलर की फोर व्हीलर?
कुठं जुळतंय का, अरेंज की लव्ह मॅरेज?
हलला का पाळणा, पेढा की बर्फी?
ऍडमिशन, स्कुल,पॅटर्न,प्रोमोशन,पगार अशी न संपणारी प्रश्नांची यादी.
या साचेबद्द प्रश्नांमुळे आयुष्य एकसुरी होते, आणि जगायचेच राहून जाते. अशा प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी रोज मरावं लागते. ज्याला खरोखर मनमुराद आयुष्य जगायचे त्याने अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या फार जास्त भानगडीत न पडता, रोज आपण जगतोय की मरतोय या प्रश्नांचे उत्तर शोधावं.

                                                                                                                                                        संतोबा...

माहेरवाशीण!!!

काय होतंय, काही कळत नाही.
रोजचा बेधुंद गंध, दरवळत नाही.
प्रेमाचा इंद्रधनु, रंग उधळत नाही.
रात्र सरत नाही,दिवस पुरत नाही.
तुझ्याविण बाकी काही उरत नाही.
काय होतंय, काही कळत नाही.
सारं काही शांत,शब्द बोलत नाही.
कोणी हसत नाही, कोणी रुसत नाही.
कोणी चिढत नाही, कोणी रागावत नाही.
तुझ्या आठवणीइतकं, कोणी छळत नाही.
काय होतंय, काही कळत नाही.
सगळं शोधातोय, काहीच मिळत नाही.
काही सुकत नाही, काही वाळत नाही.
काय हवं काय नको, कोणी विचारत नाही.
खरंय, तुझ्या वाचून माझं पान हलत नाही.
काय होतंय, काही कळत नाही.
सारेच साथीला, तुजसम ठाम सोबत नाही.
आहेत चिक्कार, तुजसम कोणी जगात नाही.
कितीदा खूणवावे, तुज काही समजत नाही.
कितीदा बोलवावे तुज, तू काही येत नाही.
काय होतंय, काही कळत नाही.
कितीदा पहावे तुज, मन तृप्त होत नाही.
तुझवीण एकटं मला, आता राहवत नाही.
तू आणि फक्त तू, बाकी काही आठवत नाही.
उद्या परत ये, म्हणू नको कोणी पाठवत नाही.
                                             संतोबा…

आई दादांच्या विवाह वर्धापनदिनाच्या निमित्ताने!!!

आई दादांच्या
सुखी सहजीवनास,
झाली वर्षे अडतीस.
म्हणूनी हा दिन खास,
जणू काय सुखाची रास.
एवढाची एक असे ध्यास,
सदा लाभो आपला सहवास.
आई-दादांनी,
सांभाळले घरदार.
केला सुखाचा संसार,
दिला सर्वांना आधार.
असा केला कारभार,
नावाजती लहान थोर.
आई-दादांनी,
असे दिले आम्हांस संस्कार,
न विसरू आम्ही ते क्षणभर.
आनंदाने बहरले सारे घरदार,
त्यात बागडती वरदराज, राजवीर.
आई दादांनी,
जपली नातीगोती,
पाळल्या रीतीभाती.
न सोडली तत्व, ना नीती,
सर्वांसमवेत साधली प्रगती.
आई दादा,
दीर्घायुष्य तुम्हा लाभू दे,
आरोग्य तुम्हांस लाभू दे.
आशीर्वाद आम्हांवरी राहू दे,
प्रेमवर्षावात आम्हां न्हाऊ दे.

                                     संतोबा...

लूट!!!

अरे भावड्या क्या बताऊँ,
कितना लुटा हैं जमानेने मुझे।
कुछ अपनों ने लुटा हैं,
कुछ गैरोंने लुटा हैं।
रिश्ते नाते के चक्कर में,
सब कुछ फटा हैं।
खून के रिश्ते सिलाते-सिलाते,
खून-पसीने की कमाई,
पानी जैसे बहाई हैं।
क्या कहे बेगाने दुश्मन को,
अपने तो दुश्मन से सवाई हैं।
अरे भावड्या अब तू बता,
मेहनत की कमाई से,
कुछ भी बचता नहीं।
बिना मेहनत के तो,
कुछ मिलता ही नहीं।
आखिर कमाऊँ तो कैसे कमाऊँ।
अप्राइजल की आस लगाऊँ तो,
रेटिंग्स के नियम बदल जाते हैं।
शेअर मार्केट मे पैसे लगाऊँ,
तो शेअर्स गिर जाते हैं|
ड्रीम इलेव्हन मे पैसे लगाऊँ,
तो प्लेअर्स बदल जाते हैं|
और अगर डर्बी मे पैसे लगाऊँ,
तो घोडे गधे बन जातें हैं|
                               - संतोबा

सावित्रीमाई!!!

              माई, आज १० मार्च २०१९. तू आम्हाला पोरकं करून आज १२२ वर्षे पूर्ण झालीत. पण तू दिलेला ज्ञानाचा, संघर्षाचा वारसा आजही आम्हाला प्रेरणा देत आहे. ज्या काळात जाती-पाती, भेदभाव यांचाच बोलाबाला होता. गोरगरिबांना, स्त्रियांना समाजात दुय्यम दर्जाचे स्थान होते. त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जात असे, त्यांचे माणूस म्हणून जगणे ही मान्य नव्हते. त्या काळात तात्यासाहेबांना केवळ शिक्षणच या पीडितांना तारेल याची जाणीव होती. म्हणूनच त्यांनी म्हणले आहे,
            "विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
            नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
            वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
म्हणून त्यांनी शिक्षणाची सुरुवात स्वतःच्या घरापासूनच करत माई पहिल्यांदा तुला शिक्षण दिले. एवढेच नव्हे तर त्या शिक्षणाचा उपयोग, पीडित समाजाला सुशिक्षित करण्यासाठी तुला प्रोत्साहन दिले. त्या काळातील एकंदरीत परिस्थिती पाहता तुझ्या कार्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
               माई, तुम्ही हे कार्य केले नसते तर आज शिक्षण मिळालेच नसते, अशातला भाग नाही. पण आपण पाहतो एखाद्या कुटुंबात एक जरी व्यक्ती शिकली तर त्या कुटुंबाचा उत्कर्ष होतो, पण एखादी व्यक्ती दुर्गुणी निघाली तर ते संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. केवळ एका व्यक्तीचा त्या कुटुंबावर समाजावर बरा वाईट प्रभाव पडत असतो.तुम्ही तर सामाजिक सुधारणांची व शिक्षणाची ज्ञानगंगा कित्येक पिढ्या आधी आणली आणि ती सर्वसामान्य गरजू लोकांपर्यंत पोहोचवली. केवळ तुमच्यामुळे कित्येक पिढ्यांचा उत्कर्ष झाला. कोट्यवधी लोकांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडला. बहुतांश सर्वच थोर कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या समाजातूनच टोकाचा विरोध सहन करावा लागला कारण त्या समाजावर पिढ्यानपिढ्या कित्येक रूढी परंपरा लादलेल्या होत्या व कालांतराने त्या रुढी परंपरा त्यांच्या अस्मितेचा भाग झालेला होत्या. त्याच अस्मितेतून "आमच्यात लग्नाची हळद निघायच्या आत जरी एखादी मुलगी विधवा झाली तरी तिला पुन्हा लग्न करता येत नाही" असे मोठ्या तोऱ्यात सांगितले जायचे. तात्यासाहेबांनी असल्या अनेक क्रूर रूढी परंपरावर आसूड ओढले, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार, केशवपन, सती प्रथेस विरोध केला. चूल आणि मुल एवढ्याशा विश्वात बंदिस्त केलेल्या स्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला, त्यामुळे बहुसंख्य समाज, स्वजातीय अगदी कुटुंबातील व्यक्तीही विरोधात गेल्या. मात्र आपण प्रत्येक गोष्टीत तात्यासाहेबांना सोबत केलीत, त्यांच्याबरोरीने कार्य केलंत. त्यांच्या पश्चात ही आपण हे कार्य मोठ्या हिरीरीने पुढे नेले. म्हणूनच तात्यासाहेबांच्या कार्यासमोर माई तुझे कार्य कधी झाकळले गेले नाही तर ते अधिक प्रखरतेने उजळून निघाले.
                  थोर व्यक्तींनी जात,धर्म न बघता कार्य केले. मात्र त्यांच्या पश्चात आज त्यांना त्या त्या जातीतील लोकांनी त्या थोर व्यक्तींना आपले स्वतःचे मतलब साध्य करण्यासाठी जातीत बंदिस्त केले आहे. ज्यांना जयंती,पुण्यतिथीतला फरक कळत नाही. ज्यांना ना त्या थोर व्यक्तीची पूर्ण माहीत आहे ना त्यांच्या कार्याची ओळख ना आत्मीयता आहे ते लोक आपले इप्सित साध्य करताना, फुक्या अस्मितेपायी जाती-जातींचे कळप निर्माण करत आहेत. केवळ आपल्या जातीत कोणी थोर व्यक्ती जन्माला आला होता म्हणून एकाच जातीचे म्हणून कोणी त्यांचे वारस ठरत नाही. आपण एकाच मातीत,जातीत,गावात जन्माला आलो म्हणून मी तुझा वारस ठरत नाही, अगदी मी तुझ्या पोटी जन्माला आलो असतो आणि आपले विचार, कार्य मला झेपले नसते तरी मी आपला वारस ठरलो नसतो पण हे काही स्वतःला वारस म्हणवणाऱ्या निर्बुद्ध वारसांना हे कळत नाही. त्यातूनच मग त्या त्या जातीची संघटना स्थापन होते, त्या थोर व्यक्तीला पुरस्कार देण्याची, पुतळा उभारण्याची, एखाद्या मोठ्या प्रकल्पास नाव देण्याची मागणी केली जाते. याचाच परिपाक म्हणजे प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर आम्ही यांना हा पुरस्कार देऊ, त्यांचा पुतळा उभारू, नामांतरण करू अशी अनेक पोकळ आश्वासने दिली जातात. थोर व्यक्तींनी कार्य पुरस्कारासाठी, पुतळ्यासाठी वा नावांसाठी केलेले नसते. खरंतर थोर व्यक्तींना पुरस्कार देणे हा त्या पुरस्काराचा गौरव असतो.
            माई, तू हे पवित्र कार्य करताना प्रसंगी समाजाचा विरोध पत्करला, दगडगोटे, शेणाच्या गोळ्यांचा मार खाल्ला. त्यावेळेसचा समाज अज्ञानी होता. त्याला वर्षानुवर्ष काल्पनिक गोष्टींची भीती घालून अनेक रूढी परंपरांच्या जोखडाखाली दाबले गेले होते. पण आज इतक्या वर्षांनंतर समाज सुशिक्षित होऊन देखील जातीय अस्मितेतून बाहेर पडू शकला नाही. त्यामुळे आपल्याच जातीतील व्यक्ती कशा थोर आहेत आपलीच जात कशी श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी इतर जातींमध्ये थोर व्यक्तींची बदनामी करणे अद्यापही अव्याहत चालू आहे. माई, आजही नानाविविध प्रकारे तुम्हां उभयंताची बदनामी केली जाते. त्यांना सडेतोड उत्तर देणे अवघड नाही पण असल्या पोकळ कार्यात वेळ आणि शक्ती खर्च करण्यापेक्षा आपले कार्य पुढे नेण्यास कणभर जरी हातभार लागला तर कुठे आपला वारस म्हणून घेण्यात अभिमान वाटेल.
              माई, कोणी तुला क्रांतीज्योती म्हणत असेल तर कोणी पहिली मुख्याध्यपिका म्हणत असेल अर्थात हे सर्व सत्य असले तरी तू आमच्यासाठी आमची आई आहेस. म्हणूनच आज जेव्हा, अनेक मुली अनेक क्षेत्रात नाव कमावत आहेत त्या "आम्ही, सावित्रीच्या लेकी" असे अभिमानाने सांगत असतात, त्यावेळी निश्चित तुझा ऊर अभिमानाने भरून येत असेल!!!
                                       माई तुझ्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

                                                                                                      संतोबा...

अमोल कोल्हे - लोकसभा निवडणुक २०१९

                 साधारण सात वर्षांपूर्वी दादरला 'साहेब' चित्रपटाच्या प्रीमियरच्या निमित्ताने प्लाझाला अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (DrAmol Kolhe) यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली होती. अभिनेते संजय मोहिते(Sanjay Mohite) व मी शो टायमिंगच्या तास-दीड तास आधीच पोहचलो होतो, पुढच्या दहा-पंधरा मिनिटांत अमोल कोल्हे देखील पोहचले. जवळपास तासभर आम्हां तिघांना चर्चा करण्यासाठी वेळ मिळाला, अर्थात बहुतांश वेळ मी फक्त श्रोता म्हणूनच भूमिका पाडली. राजा शिवछत्रपती मालिकेत कोल्हेनीं छत्रपती शिवाजी महाराज तर संजूने बहिर्जी नाईकांची(दीड डझन वेगवेगळ्या रूपातील) अजरामर भूमिका पार पाडल्या होत्या. त्याचबरोबर ऑन ड्युटी चोवीस तास, राजमाता जिजाऊ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यातूनच त्यांची गट्ट मैत्री जुळली. अनेकदा सोबत अभिनय केल्याने दोघांकडे अनेक आठवणीचे भांडार होते. त्यामुळे चित्रीकरणावेळच्या आठवणी, चालू,आगामी प्रोजेक्ट्स इ. बद्दल सविस्तर चर्चा झाली.
                जवळपास चार वर्षे संजू सोबत रहात असल्याने, त्याची नाटक, सिनेमाबद्दलची आपुलकी आणि जीवतोड मेहनत पहात होतो. नाटक, सिनेमा हे त्याचे केवळ उदरभरणाचे साधन नव्हते तर ती त्याचा आत्मा तीच त्याची ओळख होती. प्रत्येक गोष्ट मनापासून करायची , आपले शंभर टक्के योगदान द्यायचे एवढंच त्याला माहित. कधी यश,प्रसिद्धी मिळाली म्हणून गर्व, अहंकाराची बाधा झाली नाही. परिस्थिती कशीही असो त्याची कायमच मातीशी,समाजाशी नाळ जुळलेली राहिली आहे आणि म्हणून आयुष्यात स्टेजवर दोन शब्दही न बोलू शकलेला मी त्याला फुकटचे सल्ले देऊ शकत होतो.
त्या चर्चेत अशाच मेहनती, मातीशी,समाजाशी नाळ जुळलेल्या, प्रत्येक गोष्टीत आपले शंभर टक्के योगदान देणाऱ्या अमोल कोल्हेचीं ओळख झाली. एकाचवेळी अनेक भूमिका करत असतानाच एका गोंडस परीचा पिता म्हणून कराव्या लागणाऱ्या कसरतीबद्दल ते सांगत होते. त्यांना अभिनयाबरोबर जिमची आवड असल्याने फक्त दुपारी वेळ मिळत असल्याने त्यांनी दुपारी १२ ते २ जिम केली पण त्यात खंड पडू दिला नव्हता.माणूस ध्येयवेडा असल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही.अमोल कोल्हे ध्येयवेडे आहेत म्हणून शैक्षणिक कारकिर्दीत गुणवत्ता यादीत झळकले, डॉक्टर झाले, यशस्वी अभिनेता झाले. .२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अमोल कोल्हेनां उमेदवारी मिळाली आणि मला या सर्व आठवणींची उजळणी झाली. आता नेते म्हणूनही निश्चितच ते यशस्वी होतील यात शंका नाही.
                 राजकारणात अमोल कोल्हे जरी आधीपासून असले तरी आणि त्यांनी पक्ष सोडल्याच्या आणि लगोलग लोकसभेची उमेदवारी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर टीका करण्यात येऊ लागली. नेत्यांपेक्षा समर्थक सोशल मीडियावर हीन पातळीवर जाऊन टीका करू लागलेत. कालपर्यंत वंदनीय असलेले आज अचानक गद्दार ठरवले गेले. आडनाव, व्यवसाय इत्यादींवरून टीका करण्यात आली. याचा दुसरा अर्थ असा की ते जर खरचं एवढे चांगले नसते तर त्यांना अनुल्लेखाने सुद्धा मारता आले असते पण घाव वर्मी बसला होता. एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर टीका करता येईना म्हणून आडनाव, व्यवसाय जातीचा आधार घ्यावा लागत आहे. कोल्हेनीं अभिनेता म्हणून अजरामर भूमिका साकारल्या. नेता, राजकारणी म्हणूनही ते शंभर टक्के आपले योगदान देतील आणि ते देता यावे म्हणून ते अभिनयातून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ते खात्रीपूर्वक पुरोगामी महाराष्ट्राला साजेल असे राजकारण करतील आणि दुर्दैवाने कधी वैचारिक तडजोड करण्याची वेळ आलीच तर राजकारण सोडण्यासाठी क्षणभराचा देखील विलंब लावणार नाहीत.
             अमोल कोल्हेनां समर्थन ते सुशिक्षित, सुसंस्कारी, सर्वसमावेशक आहेत म्हणून तर आहेच पण पक्ष सोडला म्हणून त्यांच्यावर अर्वाच्च भाषेत टीका करण्यात येत आहे म्हणून जास्त आहे. अनेकांना घराणेशाही,अशिक्षित, गुंड, भ्रष्टाचारी नेते, ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका वाटतेय त्यांना फार मोठी संधी आहे अमोल कोल्हेनसारख्या उच्चशिक्षित, गुणवत्ता यादीत झळकलेल्या हुशार, सर्वसामान्य कुटुंबातील, सामाजिक भान असलेल्या एका निर्मळ मनाच्या अभिनेत्याला नेता बनवण्याची. अमोल कोल्हेनां मत देऊ नये असे एकही कारण नाहीये. निवडणुका हा भारतीय लोकशाहीचा सर्वात पवित्र सण आहे त्यात द्वेषाचे, फुक्या अस्मितेचे राजकारण करणाऱ्यांना नाकारून, सामाजिक भान असलेल्या, सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्यांना निवडून देऊया.
                                                                                         
                                                                                          संतोबा...

पाऊस!!!

नको पाहू वेळ-काळ, नको पाहू मुहूर्त.
कसलीया जमीन, केलिया कष्टाची शर्त.
चातकापरी आस तुझी, हाक ऐक आर्त.
थेंब एकेक, आम्हांस जणू प्रसाद-तिर्थ.
बरसशील वेळेवर तू, विश्वास असे सार्थ.
                                        असे अपुले, जन्मोजन्मीचे ऋणानुबंध.
                                        लागू दे जीवा कळ, बरसुनी जा बेधुंद.
                                        दरवळू दे, मायमातीच्या तृप्तीचा सुगंध.
                                        नको मज अजूनी काही, सारं आता बंद.
                                        राबूनी शिवार फुलवतो, असा एक छंद.
तू बेभान, मनसोक्त बरसावं.
नदी-नाल्यातून पाणी खळखळावं.
शिवार फुलावं, माळवं पिकावं.
हिरवेगार पिकं ते, जोमाने यावं.
पानापानातूनी, नवचैतन्य बहरावं.
                                        मुक्या पशुपक्षांची तहानभूक भागावी.
                                       ओसाड माळरानी हिरवळ फुलावी.
                                        पाण्यासाठीची वणवण थांबावी.
                                        विहिरी-बारवा काठोकाठ भरावी.
                                        थकलेल्या बळी राजाची चिंता मिटावी.
दे एक वचन, न थांबवशील बरसणं
तू प्रसन्न हो एवढंच एक मागणं.
तूच आहे साऱ्या जगाचं जगणं.
तुझंवीण साऱ्यांचे होईल मरणं.
म्हणोनि सदा तुझ आम्ही शरण.
                                                                   संतोबा...
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!