Ads 468x60px

Wednesday, April 11, 2018

काल मला देव भेटला- २

               हिंजवडीला ऑफिसला जायला लागल्यापासून आयुष्य यंत्रवत झालं आहे. हडपसर-हिंजवडी प्रवासामुळे दिवसातील चौदा-पंधरा तास कामात आणि प्रवासात जात असतात. अर्थात त्यामुळे मुंबईत घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ऑफिसचे दिवस आठवतात. आपल्याला वैयक्तिक भूतकाळातील दिवस आठवून हळहळ व्यक्त करण्याचा तर सामाजिक भूतकाळ आठवून फुका अभिमान बाळगण्याचा आनुवंशिक, संसर्गजन्य रोग असल्यासारखे वाटते. आपण वर्तमानात कमी आणि भूतकाळातील इतिहासात आणि भविष्यकाळातील स्वप्नात जास्त रमत असतो. मुंबईत फक्त ऑफिसला जाण्याचेही ओझे वाटायचे त्यामुळे कधी पुढील शिक्षण पूर्ण करावे असा विचारही मनात आला नाही पण मे २०१४ मध्ये लग्नाच्या निमित्ताने मुंबई सोडावी लागली आणि अचानक जबाबदाऱ्याचा डोंगर आणि संकटांचे आभाळ कोसळले. विवाहानंतरच्या वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि नोकरीव्यतिरिक्त,  सुट्टीच्या दिवशी कोर्ट केसेस, कॉलेज, गावाकडे शेतीची कामे, तर कधी कौटुंबिक कार्यक्रम या सर्वांवर अपुरा असलेला वेळ आणि पैसा खर्च यांचा ताळमेळ घालण्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे शिवाय आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय गोष्टी पाहून प्रचंड अस्वस्थ व्हायला होते ते वेगळेच.
                 अशाच विचारातून न पटणारी गोष्ट करण्याचे ठरवले कारण कोठून न कोठून सुरुवात करण्याची गरज होती. ह्याच हेतूने मागच्या चार-आठ दिवसांपासून कार्यक्रमाच्या नियोजनाची तयारी चालू होती, या धावपळीमुळे आज लवकरच गाढ झोप लागली होती. गाढ झोपेत असतानाच अचानक कोणीतरी संतोबा म्हणून हाक मारल्याचा भास झाला, खरं तर संतोबा नावाने फार कोणी मला हाक मारत नाही. त्यामुळे अचानक दचकून जागा झालो तर समोर तात्यासाहेब व सावित्रीमाई!मी उठून दोघांना साष्टांग दंडवत घातला. सावित्रीमाई धीरगंभीर होत्या तात्यासाहेब मात्र भयंकर क्रोधीत दिसत होते. त्यांनी रागातच विचारलं संतोबा काय चाललंय हे? त्यांच्या आवाजात जरब होती.
  खरं तर मला घामच फुटला होता पण असं काही न दाखवता मोठया हिंमतीने बोलू लागलो, तात्यासाहेब, आपली जयंती साजरी करण्याचे नियोजन आहे. गावातून आपल्या पुतळ्याची वाजतगाजत मिरवणूक काढाणार आहोत, आणि बुलेट रॅली काढण्याचे देखिल नियोजन आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांना गोळा करून मोठया जोशात हा सोहळा पार पडणार आहोत आम्ही.
            पण हे सगळं कशासाठी आणि मोठ्या प्रमाणावर लोक का येतील? त्याच जरबेत तात्यासाहेबांनी प्रतिप्रश्न केला.
            तात्यासाहेब हा एक शक्तीप्रदर्शनाचाच सोहळा आहे, आणि लोक का येणार नाहीत! लोकं येण्यासाठी जे लागते ते सारं करणार आहोत आम्ही, डिजेच्या दणदणाटात शांता, शालू लावल्यावर आणि झिंगाट होण्याची सोय केल्यावर लोक का येणार नाहीत ! बुलेटवाल्यांच्या आणि त्यांच्या गाड्यांच्या टाक्या फुल करणार आहोत! शिवाय आपला माळीसमाजही बहुसंख्येने आहे इथे, त्यांनाही एका युगपुरुषाचे वारसदार असल्याचा अभिमानच आहेच  तुम्ही बघाच कशी गर्दी होतेय ते. गर्दी होणारच आहे त्यामुळे स्थानिक पुढारी सहभागी होणार आहेतच पण मोठे नेते येण्याची पण शक्यता आहे शिवाय पत्रकार पण येणार आहेत. आपणांस "भारतरत्न" देण्याची आमची पूर्वीपासूनची मागणी आहे त्याचा पुनरुच्चार या निमित्ताने केला जाईल आणि तशी वातावरणनिर्मिती केली जाईल आणि हे राज्यात ठीक ठिकाणी हे असं घडणार आहे त्यामुळे या मागणीला बळ मिळणार आहे. मोठ्या नेत्यांनी ही संसदेत आणि विधानसभेत मागणी केली आहे आणि अनेकांचा पाठिंबा पण आहे. तात्यासाहेब आपणांस भारतरत्न मिळवण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.
                      आता तात्यासाहेबांच्या चेहऱ्यावर क्रोधाबरोबरच, चीड आणि हतबलता ही दिसत होती. खुर्चीवर बसत तात्यासाहेब बोलले, माझ्याकडे काय नव्हते?  पैसा होता, ताकद होती, लोकांचा पाठिंबा होता मला शक्ती प्रदर्शन करता येत नव्हतं का? आम्ही दोघांनी आणि आमच्या सहकाऱ्यांनी आयुष्य खर्ची केले ते मान-सन्मान मिळवण्यासाठी की नाव कमावण्यासाठी. संतोबा, बहुसंख्य समाज गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा, जातपात, मानसिक,सामाजिक,राजकीय गुलामगिरीत खितपत पडला होता. प्रचंड कष्ट, दुःख, अपमान त्यांच्या वाट्याला आले होते त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी आम्ही कार्य केले त्यावेळी आम्ही जातपात पाहिली का? आणि पहिली असती तर हे कार्य आमच्याकडून झाले असते का? असे कोणते कार्य माळ्यांसाठी केले पण इतर समाजासाठी केले नाही. शाळा माळ्यांसाठी काढल्या का?हौद खुला केला की त्यांच्या विधवांचा सांभाळ केला, आजारपणं काढली? असं नाही तर माझा माळीसमाज असे कसे म्हणतोस? आम्ही ना जात मानली ना कोणाबरोबर भेदभाव केला, आम्ही हे मिटवण्यासाठी झटलो असे असताना मग फक्त माळी म्हणून तू माझा वारसदार कसा? अरे मला आणि इतरांनाही त्या त्या जातीतीलच लोकांनी जास्त त्रास दिला आणि त्या त्रास देणाऱ्यात तुझे पूर्वज नसतील आणि तू त्यांचा वारसा चालवत नसशील हे कशावरून? तुम्ही सारे ढोंगी, मतलबी, स्वार्थी आहात, आम्हाला जाती जातीत विभागून जातीच्या नावावर टोळ्या उभारायचे उद्योग चालवले आहेत. तुमचे हे उद्योग आमच्या कार्यासच नव्हे तर तुमच्याही कर्तव्यात आणि कर्तृत्ववात बाधा आणत आहेत याचे भान कधी येणार? भारतरत्न  म्हणशील तर तो माझ्याकाळात अस्तित्वात तरी होता का रे? काहीही मुद्दे काढून लोकांची माथी का भडकवत आहात?
                 मी संयमितपणे आजचे वास्तव सांगण्याचा प्रयत्न करू लागलो. तात्यासाहेब, तुम्ही म्हणता तसा समाज आजही तसाच आहे काही बदल निश्चित झालेत, काही गोष्टींचे प्रमाण कमी झाले असले तरी आजही, शिक्षणाची दुरवस्था, गोरगरिबांवरचा अन्याय, शेतकऱ्यांची पिळवणूक तसेच स्रियांना आजही इज्जतीच्या कोंदणात अडकवले आहे आणि विधवा विवाह नामंजूर आहे , आजही जातपात अस्तित्वात आहे  आणि शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणले की काही लोकांच्या मेंदूतून विखारी,जातीय विचारांच्या उलट्या होत असतात.  समाज अजूनही धर्म,जात,भाषा आणि प्रादेशिक अस्मितेत अडकला आहे. तुम्ही माणसांना माणसात आणलं याचा त्यांना राग आहे. कारण त्यांच्या  वर्चस्वाला तुम्ही सुरुंग लावलात, त्यांचे तथाकथित श्रेष्ठत्व तुम्ही नाकारलंत. तुम्ही समाजाच्या भल्यासाठी विद्रोह केलात म्हणून त्यांनी तुम्हाला देशद्रोही ठरवले. आपल्या थोर कार्याची जाण त्यांनाही आहे पण कोणता तरी एखादा मुद्दा घेऊन तुमच्या वर टीका करायची हे जातीच्या वर्चस्वातून नाही तर काय आहे अन्यथा आपण त्यांच्या जातीत जन्मास येता तर अद्यापपर्यंत आपणां उभयंताची अनेक पुस्तकेच काय एखादा धर्मग्रंथही लिहिला गेला असता व रोज त्याची पारायणे केली असती. मग त्याच जातीच्या दृष्टिकोनातून आम्ही आपली जयंती साजरी केली तर कुठं बिघडतंय.
              एकंदरीत अजून कार्य करण्यास बरीच संधी आहे तर , तात्यासाहेब मिश्किल हसत हसत म्हणाले. पूढे समजावणीच्या सुरात बोलू लागले, संतोबा आम्ही कमी का सहन केले आहे, आमचा मार्ग किती खडतर होता याची थोडी का होईना जाण तुम्हाला आहे. बदल एवढा सहज नसतो रे अगदी स्वतः मध्ये करायचा असेल तरी आणि समाजात असेल तरी. आपण कार्य करत असताना अनंत अडचणी येत असतील, त्या येणारच पण त्यांनी खचून न जाता मोठ्या धैर्याने पुढे वाटचाल करावी. जर तुमचे कार्य निस्वार्थ आणि तत्त्वनिष्ठ असेल तर टीका करणाऱ्याकडे कसल्याही बदल्याच्या भावनेने पाहू नये शिवाय त्या  टिकेला आपल्या कार्याची पोच समजावी, वाद घालण्यात वेळ व्यर्थ न दवडावा.
                 मला तात्यासाहेबांचे सारं काही पटत होते. ही एक अजाणतेपणी आणि प्रतिक्रियेतून झालेली चूक होती आणि त्याबद्दल मला माफी मागणे गरजेचे होते.  तात्यासाहेब मी असला थिल्लरपणा पुन्हा करणार नाही, निमुटपणे मी माझे कार्य करीत राहीन. कधी कधी वाईटातून ही चांगली गोष्ट घडते ती अशी. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला अपेक्षित असा जात आणि पक्षविरहीत समाज आपल्या खानवडी, पारगांव पंचक्रोशीत अस्तित्वासाठी लढा देण्यास एकत्र आला आहे, तात्यासाहेब सरकारने आपल्या खानवडी, पारगांव परिसरात शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता मोठं विमानतळ उभारणच्या घाट घातला आहे, विरोध कमी करण्यासाठी अनेक प्रलोभनाबरोबरच, अस्मितेचे ही राजकारण केले जात आहे. विमानतळाची घोषणा करतानाच त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा केली, कारण विमानतळाला विरोध म्हणजे धाकल्या छत्रपतींना विरोध असा समज व्हावा पण लोकांनी तेवढाच जोरदार विरोध केला म्हणून लोकांत फूट पाडण्यासाठी आम्ही फुलेंना भारतरत्न देऊ असे काही म्हणाले लोकांनी त्यांना हाकलून दिले, काहींनी विमानतळाला महात्मा फुलेंचे नाव देण्याची मागणी केली लोकांनी साधी दखल पण नाही घेतली. लोकांना दिखाऊ अस्मितेपेक्षा अस्तित्व महत्वाचे हे कळलंय हे ही खूप आहे, नाही का तात्यासाहेब.
संतोबा तुझं काय मत त्यासंदर्भात सांग? तात्यासाहेब हसत हसत म्हणाले.
               तात्यासाहेब माझा आणि सर्व शेतकऱ्यांचा विमानतळास विरोधच आहे, माझा अप्रत्यक्ष सहभाग तर आहेच पण लेखनाच्या माध्यमातून देखील विरोध दर्शवण्याचा प्रयत्न आहे.
डोक्यावरून हात फिरवत तात्यासाहेबांनी प्रेमाने यशस्वी हो आशिर्वाद दिला आणि मोठं कार्य कर, जातीपातीत अडकू नको. असा संदेश दिला व त्यानंतर आम्ही निघतो असे म्हणत तात्यासाहेब व सावित्रीमाई निघून गेले.
                 मी तात्यासाहेबांशी बोललो, भांडलो, त्यांचा आशिर्वाद घेतला पण सावित्रीमाईंशी बोलण्याची हिंमत मात्र झाली नाही. त्यांच्या कार्याला आपण न्याय तर देऊच शकलो नाही पण आपला स्रियांबाबतचा दृष्टिकोनही फारसा बदललेला नाही. त्याबाबतीत आपल्याला अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. सगळे महापुरुष हे हाडामासांची माणसेच होती. त्यांचा एक जीवनकाळ होता मात्र त्यांच्या कार्याला कोणत्याही काळात बंदिस्त करता येते ना ते कोणत्यातरी जातीत ते जन्माला आले म्हणून त्या जातीत त्यांना बंदिस्त करता येते. आणि तसे करण्याचा कोणी प्रयत्नही करून नये. त्यांचे कार्य अखंड मानवजातीच्या उन्नतीसाठी होतं आणि म्हणूनच ते चिरकाल टिकणारे आहे. त्यांनी भरभक्कम पाया रचलेला आहे, त्यांचे कार्य ,विचार यांना त्याच निष्ठेने पुढे नेणे हे सर्वांचे कर्तव्यच आहे. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथी साजऱ्या कराव्यात मात्र ते करताना त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा ना की बदनामी व्हावी, सर्व समाज एकत्रित यावा ना की तो जातीत विभागला जावा, त्यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा सदैव एकदिलाने पुढे पुढेच न्यावा. कोणताही पुरस्कार त्यांच्या कार्यापेक्षा मोठा नाही म्हणून तो त्यांना मिळावा म्हणून कसलाही अट्टहास करू नये. त्यांना जर पुरस्कार भेटला तर तो त्यांचा नाही तर त्या पुरस्काराचा सन्मान असेल मग तो पुरस्कार भारतरत्न असो वा अन्य कोणताही. हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, महाराणी ताराबाई, क्रांतीज्योती सावित्रीमाई आणि ते सर्व ज्यांनी ज्यांनी राजकीय, सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्राबरोबरच सर्वच समाजाला प्रगतीच्या दिशेला नेले त्या सर्वांचा हा महाराष्ट्र आहे. आणि होय हा शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. पुरोगामी बनणे एवढे सोपे नाही पण समतेचे तत्व अंगीकारून त्या मार्गावर वाटचाल चालू आहे हे निश्चित!
             क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलें  यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस, कार्यास विनम्र अभिवादन.
                                                                                              संतोबा (संतोष गांजुरे)
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!