Ads 468x60px

Sunday, June 11, 2017

दाता

तो एक हुशार, बाकी साधीभोळी.
देता तयानेे, पारदर्शकतेची हाळी.
शब्दास तयाच्या, भुलली मंडळी.
राजमुकुट ठेविला, त्याच्या भाळी.
करनी-कथनी असे तयाची वेगळी.
सत्ता येता तया हाती, खुलली कळी.
आपल्याच दात्याची,काढली कुंडली.
असे तो अनपेक्षित, डाव सदा खेळी.
रोज जाती, कित्येक बळीबाचे बळी.
अन्नदात्याची बायको पांढऱ्या कपाळी.
अन् पोरं उपाशी, खाती भाकरी शिळी.
धनंदांडग्यास देई, पुरणाची पोळी.
गोरगरीबांस मिळे, बंदुकीची गोळी.
फायदा उचलती, दलालांची टोळी.
बळीराजाच्या हाती, रिकामी झोळी.
नजरा लागल्या, आता वर आभाळी.
वरुणराजा, भरून दे नदी,नाले,तळी.
धान्य पिकवू, असे सोन्याहूनी पिवळी.
देण्याची आमुची, रीतच ही आगळी.
खाऊनी-पिऊनी, तृप्त होती सगळी.
             संतोबा(संतोष गांजुरे)

Wednesday, June 7, 2017

बळीराजाचा बळी- ऐतिहासिक संप.

                 शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संप केला, संपादरम्यान थोडीफार माळव्याची, दुधाची नासधूस झाली आणि अनेकांच्या पोटात पोटशूळ उठला. सोशल मीडियावर शेतकऱ्यांवर आगपाखड केली गेली. शेतकरी कसा माजोरडा आहे, असंवेदनशील आहे, याचे दाखले देण्यात आले. शेती हा व्यवसाय आहे आणि शेती करणे कर्तव्यच आहे मग शेतकरी आमचा पोशिंदा कसा? अशा शंका उपस्थित केल्या. खरेतर काही लोकांना मुळातच शेतकऱ्यांबद्दल आकस आहे. शेतकऱ्यांबद्दल काही जरी बोललं तरी त्यांचा तिळपापड होतो. खरं तर शेतकऱ्यांना सहानुभूतीपेक्षा जास्त काही मिळत नाही. छटाक-पावशेर माळवं घेणाऱ्यांना, पोतीच्या पोती माळवं रस्त्यावर फेकलं जास्त असताना वाईट वाटणं सहाजिकच आहे. असे नासधूस करण्यापेक्षा आश्रमात, गोरगरिबांना दान करण्याचा सल्ला सुद्धा दिला गेला.असं नासधूस करणे चुकीचेच आहे अगदी स्वतःच्या कष्टाने पिकवले असले तरी.पण असंवेदनशील सरकारला जागे करण्यासाठी, समस्त कष्टकरी वर्गाबद्दल असलेल्या दुजाभावाबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी असं करणे गरजेचे होते. रोज डझनावारी होणाऱ्या आत्महत्या होत असताना जेवढी हळहळ वाटली नाही तेवढी हे नुकसान पाहून वाटलं हे ही काही कमी नाही. तसे तर ही नासधूस रोजच होत असते अगदी मोटारभाडे निघणार नाही म्हणून घाम गाळून पिकवलेलं उभं पीक जमिनीत गाडत असताना शेतकऱ्याला काय वाटत असेल याचा कोणी संवेदनशीलपणे विचार केलाय का?. त्यावेळेस कवडीमोल भावाने का होईना भाजीपाला खरेदी करुन कोणी आश्रमात वाटून पुण्य पदरात पाडून का घेत नाही?. शे-दिडशे रुपयांत आठवड्याचा भाजीपाला मिळतो म्हणून अच्छे दिन साजरे करणाऱ्यांना शेती करणाऱ्यांचे किती वाईट दिवस आले असतील याचा संवेदनशीलपणे विचार करावा वाटतो का?
                आंदोलनात नेहमीप्रमाणे सरकारकडून फूट पाडण्याचे प्रयत्न झाले. जातीय, पक्षीय राजकारण केलं गेले. संप उत्स्फूर्त होता कोणाचं असं एकहाती नेतृत्व नव्हते, त्यामुळे सरकारला फूट पाडता आली पण संप पूर्ण संपवता आला नाही. जातीय, पक्षीयवादा बरोबरच ग्रामीण-शहरी या निरर्थक वादाला विनाकारण फोडणी देण्यात आली. शहरातील बहुतांश मुले ही ग्रामीण भागातूनच आलेली आहेत जी सुट्टीच्या दिवशी गावी जाऊन शेती कामाला थोडा फार हातभार लावत असतात. पाच-पंचवीस टक्के लोक असतील ज्यांना शेतीतील काही कळत नाहीच शिवाय त्यांच्या व्यथासुद्धा कळत नाहीत. अशीच लोकं सोशल मीडियावर मुक्ताफळे उधळत होती. त्यांना याची कल्पनादेखील नाही की ते जे अन्न खातात , जे पाणी पितात ,जी वीज वापरतात त्याचा स्रोत एवढंच काय हे सगळं वापरून जो कचरा केला जातो त्यासाठी ह्याच शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातात. ते जिथे राहतात, काम करतात, ज्या रस्त्यांनी जातात तिथे कधीतरी शेती होती जी सरकारने विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून घेतली. आता जे पुरंदरचे विमानतळ वा समृद्धी महामार्गाचा प्रकल्प आहे त्याची शेतकऱ्यांना गरज नसताना, कोणाची मागणी नसताना सरकार जबरदस्तीने जमिनी बळकावायचा प्रयत्न करतच आहे ना? हे सगळं उद्योगपतींच्या, भांडवलंदारच्या फायद्यासाठी आणि पांढरपेशांच्या सुखसोईंसाठीच की शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहे ?
                शेतकऱ्याला असंवेदनशील, माजोरडा म्हणणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच आहे. जमिनीला आई मानणारा, स्वतःच्या मुलांसारखी पिकांची काळजी घेणारा, पाच-पंचवीस हजारांच्या कर्जापायी आत्महत्या करणारा पण शेती न विकणारा कसा असंवेदनशील, माजोरडा असू शकतो. २६ डिसेंबर २०१६ ला सासवडला पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.दिवसभर हटायचे नाही, शासन-प्रशासनाला विरोधाची दखल घ्यायला भाग पाडायचे हा निर्धार होता. दीड-दोन तासांत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या एक एक किलोमीटर रांगा लागल्या. काही नेत्यांनी रास्ता रोको मागे घेण्याचे आवाहन केलं पण लोकं ऐकायला तयार नव्हते कारण प्रश्न अस्तित्वाचा आणि अस्मितेचा होता.तेवढ्यात कोणीतरी ऍम्ब्युलन्स अडकलीय म्हणून सांगितले आणि लोकं पटापट बाजूला झाली. शेतकरी संवेदनशील आहे, साधा भोळा आहे त्याला कोणीही फसवंतय पण तो कोणाला नाही फसवत. गाडीने कधी रस्त्याने जाताना शेतात कशाची काढणी चालू असेल तर जे काही असेल ते मागून बघा तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल नक्कीच.
               बळीराजा फक्त नावापुरता राजा नाही तर राजसत्ता स्थापण्याची व अनिर्बंध सत्ता उलथवून टाकण्याची ताकद त्याच्यात आहे, म्हणूनच यावेळी जुनाट बैलजोड बदलून नवी खोंडं निवडली पण ही खोंडं औताला चालणं दूरची गोष्ट साधी शिवळाटीत यायला तयार नाहीत. आता यापुढे घरचीच माहितीतील खोंडे तयार करायची, कुठल्याही दिखाऊ खोंडांना भुलायचे नाही. आता शेतकऱ्यांबद्दल तळमळ असणारे नेते नकोत. आता शेतकरीच नेते व्हायला हवेत किती दिवस इतरांना मोठे करायचे व मोठे होऊन त्यांनी फक्त मांडवली करायची. किती दिवस, किती वेळा हा विश्वासघात सहन करायचा. खऱ्या अर्थाने बळीराजा राजा व्हायला हवा. फक्त कृषिच नव्हे तर शासन, प्रशासन व इतर क्षेत्रातही आपले वर्चस्व निर्माण करायला हवे तरच काहीतरी चांगला बदल होईल. .
          बदल घडवायचा असेल तर सुरवात आपल्यापासून करायला हवी. आपल्यालाही काही नियम पाळावे लागतील.शक्यतो जमिनीचे तुकडे पाडायचे नाही, विकायची तर अजिबात नाही. बांध कोरायचे नाहीत, एकच पीक घेण्यापेक्षा बहुपीक पद्धत अवलंबवायची, बांधावर जागेनुसार जांभुळ,शेवगा,हादगा अशी विविध झाडे लावायची. झाडांच्या ओलसावटीने पिकांच्या वाढीवर थोडाफार दुष्परिणाम होईल पण तेवढा सहन करावा कारण झाडांचे फायदे पण खूप जास्त आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईलच शिवाय अडीअडचणीत आर्थिक हातभार पण लागेल. पाण्याचा सुयोग्य वापर आणि रासायनिक खतांचा, औषधांचा कमीत कमी गरजेनुसार वापर. उत्पादनखर्च जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करायचा. जे मोठे बागायतदार शेतकरी आहेत त्यांनी फक्त निर्यातक्षम मालाचे उत्पादन घ्यायचे. अनावश्यक वाद,भाऊबंदकी तसेच कोर्ट-कचेरीपासून दूर रहावे. कालचक्र सतत फिरत असते. विश्वास ठेवा लवकरच एक दिवस असा येईल डॉक्टर,वकील,इंजिनिअर यापेक्षा शेतकऱ्याला आणि शेतीला जास्त ग्लॅमर येईल. आज शोभेची झाडे लावणाऱ्यांना गॅलरीत,टेरेसवर भाजीपाला लावावा लागेल आणि आज शेतकऱ्यांच्या कर्तृत्वावर, त्यागावर शंका घेणारे शेतकऱ्याला बळीराजा, पोशिंदा म्हणत गुणगाण गातील.
                                                                                                       संतोबा (संतोष गांजुरे)
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!