Ads 468x60px

Sunday, October 13, 2019

नातीगोती-२

हा एवढा आक्रोश, हा विलाप कशासाठी,
अन कशासाठी ही सगळी ढोंगं.
आता मी मेलोय, मी मेलोय,
मी मरतच होतो आयुष्यभर.
तुमच्या अपेक्षांचे ओझं पेलत,
अन्‌ जबाबदारीचा डोंगर उचलत.
झुकत होतो तुमच्या मानपानासाठी,
अन्‌ झटत होतो कायम नात्यांसाठी.
तरी घोटतच होती नाती, गळा आयुष्यभर.
जे तुम्हाला भेटणार नाही ते देत होतो,
स्वतः मात्र तडजोडी करत होतो.
वाढत जात होत्या तुमच्या अटीशर्ती,
पण कधीच होत नव्हती अपेक्षापूर्ती.
खरंतर भिरकावून द्यायला हवी होती,
त्याचवेळी ही असली मतलबी नाती.
पण आता मी मेलोय, मेलोय कायमस्वरूपी,
सुखी जगू दिलं नाही,शांत मरु तरी द्या.
कशाला हे रडणं-पडणं, हे ढोंगच सगळं.
आयुष्यभर छळलं, तेव्हा का न कळलं.
मी देणं तुम्ही घेणं, हिशोब नाही ठेवले.
सारं लुटले, झालो जरी मी कफल्लक.
आता न कसली उधारी, न शिल्लक.
सारं माफ तुम्हाला, जा घरी निवांत,
जळू द्या शेवटचं मला, द्या थोडा एकांत
अन्यथा, उठेन या धगधगत्या चितेमधून,
अन्‌ देईन ही पेटती लाकडे तुम्हांवर भिरकावून.
                                                संतोबा...

Wednesday, October 9, 2019

नातीगोती

विसरुनी सारे हेवेदावे,
नातीगोती जपावी मनोभावे.
असावा त्यात मायेचा ओलावा,
राग,लोभ,मत्सर कधी नसावा.
सत्याची सदा कास धरावी,
स्वार्थाची ना आस असावी.
फायद्याची ना बात करावी,
कायद्याची ना साथ करावी.
नात्यात नसावे कसले बंधन,
केवळ असावे प्रेमाचे कोंदण.
संकटी व्हावे एकमेकां आधार,
नाही भरवसा, जीवन क्षणभंगुर,
देणंघेणं, व्यवहार असावा चोख,
कधी नसावी त्यात कसली मेख.
हिशोब असावा असा रोकडा,
त्याने कधी न व्हावा झगडा.
खावे,प्यावे सुखी रहावे,
सुखा-समाधानाने जगावे.
दोन क्षण निवांत बसावे,
मायेचे चार शब्द बोलावे.
कोण काय सोबत नेती,
सारे काही इथेच सोडती.
म्हणोनी कार्य ऐसें निर्मळ करावे,
मरूनी किर्तीरूपी निरंतर उरावे.
                                           संतोबा...

Wednesday, October 2, 2019

भाषण १- महाराष्ट्र विधानसभा - २०१९

               नमस्कार, २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला मी उभा आहे, मला माहित आहे मी पडणार आहे एवढेच काय माझं डिपॉझिटही जप्त होईल. कारण माझ्याकडे ना कसली राजकीय पार्श्वभूमी आहे, ना माझ्यावर कुणा गॉडफादरचा हात आहे. ना माझ्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे ना कोणी हक्काचा मतदार आहे.  मला ना भडकावून जातीपातीच्या अस्मिता सांभाळता येतात, ना कार्यकर्त्यांच्या उन्मादाला खतपाणी घालायला येते.  मी ना कोणाच्या जयंत्या साजऱ्या करतो ना कोणत्या जातींच्या मेळाव्याला जातो. मला ना कोणाची बदनामी करता येते ना कोणाचे उदात्तीकरण करता येते. मला ना ओघवते बोलता येते, ना मला फर्राटेदार भाषण करता येते. मला ना कुणा अनोळखी व्यक्तीच्या, ज्याचं नावसुद्धा माहिती नाही अशा व्यक्तीच्या मयतीला जाऊन त्याचे गुणगान गाता येते. ना कोणाच्याही लग्नात जाऊन वऱ्हाडी मंडळींना ताटकळत ठेवत वधूवरांस राजकीय आशीर्वाद देता येतो. 

         अशा अनेक गोष्टी ज्या सध्याच्या राजकारणपूरक आहेत त्या माझ्याकडे नाहीत तरी मी लढणार आहे, संघर्ष करणार आहे. कदाचित माझ्याकडे नसलेल्या गोष्टीच मला सहाय्यभूत ठरतील. हा जो निवडणूक लढण्याचा निर्णय आहे तो पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विरोधातून आहे. त्याचबरोबर तो हा प्रकल्प राबवताना शासनाने जी स्थानिक भूमिपुत्रांची मुस्कटदाबी करून बळीराजाबरोबरच पर्यावरण उद्ध्वस्त करून भांडवलशाहीचा फायदा करून देण्याचा जो घाट घातला आहे त्याचा निषेध म्हणूनही आहे. अर्थात ही तत्कालिक कारणे असली तरी किती दिवस आपण दगडापेक्षा वीट मऊ म्हणून प्रस्थापितांच्या पिढ्यांनपिढ्यांचे नेतृत्व स्वीकारणार आहोत याचा विचार करण्याची गरज आहे. पिढ्यांनपिढ्यां नेतृत्व करणारे आज सरंजाम झाले आहेत. त्यांना सर्वसामान्य जनतेच्या हिताचे काहीही देणंघेणं नाही. त्यांना फक्त आपली संस्थाने मजबूत करायची आहेत, स्वतःच्या येणाऱ्या पिढ्यांची सोय करायची आहे. ही संस्थाने जेवढी मजबूत तेवढी लोकशाहीस हानिकारक. सर्वसामान्यांचे भले व्हायचे असेल तर सत्तेचे आणि संपत्तीचे विकेंद्रीकरण होणं गरजेचे आहे व यासाठी सर्वसामान्य जनतेने स्वतः शासन प्रशासनात कोणत्या न कोणत्या मार्गाने सहभागी होणे गरजेचे आहे.

            एक जागरूक मतदार म्हणून आपण एक सक्षम, कार्यक्षम सरकार निवडून देण्याचे कार्य पार पाडू शकतो. सरकार नेहमी आपले अपयश झाकण्यासाठी प्रादेशिक, भाषिक अशा विविध अस्मितांना खतपाणी घालत असते पण आपण त्यात वाहवत जाऊ नये. सरकार कोणाचे ही असू देत धार्मिक, जातीय, भाषिक, प्रादेशिक अस्मितेला बळी न पडता  मूलभूत गरजांसोबतच पायाभूत सुविधा, सामाजिक सुरक्षिततेची पूर्तता करून घेण्यासाठी सरकारवर सतत दबाव ठेवला पाहिजे.  दुबळा विरोधी पक्ष असेल आणि सरकार निरंकुश असेल तर त्याचे तात्काळ दुष्परिणाम नोकरदार आणि कष्टकरी वर्गाला भोगावे लागतात.बेरोजगारी,गुन्हेगारी वाढीस लागते, पर्यायाने सामाजिक स्वास्थ्य बिघडते, श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत जातो म्हणून जातपात-धर्म न पाहता ज्यांना आपल्या प्रश्नांची जाण आहे असे आपल्यातीलच लोकप्रतिनिधी विधानभवनात गेले पाहिजेत.

         माझा कोणत्याही पक्षाशी, संघटनेशी कसलाही संबंध नाही. माझी विचारसरणी जरी पुरोगामीत्वाकडे, समताधिष्ठित समाजव्यवस्थेकडे झुकणारी असली तरी मी कोणत्याही विचारसरणीचा कट्टर पुरस्कर्ता वा विरोधक नाही. मी फक्त प्रयत्नवादी आहे, इतर कोणताही वादी नाहीये. काम करण्याची माझी स्वतःची पद्धत आणि विचार करण्याची  स्वतंत्र विचारशैली आहे. माझा कोणताही छुपा अजेंडा नाहीये. आमचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक डी. के. सावंत सर यांच्याकडून मी राज्यशास्त्राचे धडे गिरवले आणि त्यातूनच राजकारणाबद्दल आकर्षण आणि आवड निर्माण झाली. राजकारण गलिच्छ आहे म्हणत किती दिवस हेटाळणी करत आपण राजकारणाप्रती अस्पृश्यता बाळगणार आहोत?.  खरंतर राजकारण हे दैवी कार्य आहे. आपल्या दूरदृष्टीने लोकोपयोगी निर्णय घेऊन गोर-गरीब, दिन-दुबळ्या, शोषित-वंचित लोकांच्या जीवनात बदल घडवण्याची ताकद राजकारणात आहे. सगळ्यांना न्याय देण्याचे, सगळ्यांची सुरक्षितता, स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे कार्य राजकारणाच्या माध्यमातून केलं जाऊ शकते. शाश्वत आणि सर्वांगीण बदल घडवायचा तर हाती सत्ता असणे गरजेचे आहे सत्तेशिवाय शहाणपण नाही असे म्हणतात ते उगीच नाही.

          हा लढा ,संघर्ष अगदी हत्ती आणि मुंगी सारखा एकदम विजोड, एकतर्फी वाटणारा आहे पण म्हणून तो लढायचा नाही का? हा लढा लढावाच लागेल अन्यथा सरंजामशाही, भांडवलशाही डोईजड होतील, लोकशाही धोक्यात येईल आणि आपण स्वातंत्र्य हरवून बसू. आज जर आपण लढण्यासाठी, हक्कांसाठी रस्त्यावर उतरलो नाही तर भविष्यात भीक मागण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. प्रस्थापित, संस्थानिकांच्या विरोधात आवाज उठवावा लागेल अन्यथा ते आपल्याला गृहीत धरतील आणि मनमानी कारभार करत राहतील. मी उभा राहतोय ते मत मागायला नाही तर मत मांडायला. मी कोणाच्या विरोधात नाही तर माझ्या स्वतःच्या बाजूने उभा राहतोय.मी कोणाचा बदला घ्यायला नाही तर बदल घडवायला उभा राहतोय. मला खात्री आहे आज ना उद्या मी यशस्वी होईल आणि हक्काने विधानभवनात जाईल.

                               🙏जय महाराष्ट्र🙏
       
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!