Ads 468x60px

Tuesday, August 18, 2015

शिक्षण - सर्वांगीण विकासाचा पाया.

             शिक्षण सोडून दहावर्षापेक्षा जास्त वर्ष उलटून गेलेली, भरीस भर म्हणजे बलदंड शरीरयष्टी त्यामुळे नियमीत प्रवेश घ्यायचा म्हणजे पोटात गोळा यायचा. हो नाही करता बायकोच्या पुढाकाराने(जबरदस्तीने म्हणा हवे तर!) राह्त्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालयात २२जून २०१५ रोजी प्रवेश घेतला खरा पण प्रत्यक्षात जाण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस ३१ जुलै उजाडावा लागला. तत्पूर्वी मनाची तयारी करण्यासाठी गदिमांच्या "एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख...." या गीताची शेकडो पारायणे करावी लागली. कारण एकतर माझ्या सोबतच्या मित्रामध्येच मी एवढा उठावदार दिसतो इथेतर माझ्यापेक्षा दहाएक वर्षानी लहान मुले म्हणजे आपला मुन्नाभाई होणार अशी धाकधूक होतीच आणि ती खरीही ठरली. विद्यार्थीच काय मला इतरही लोक प्राध्यापकच समजू लागले त्यामुळे मला अधिकच संकोचल्यासारखे व्हायचे. दूसरे असे की शाळा-कॉलेज असो वा ऑफिस माझी उपस्थिती जवळपास शंभर टक्के, त्यामुळे कॉलेजला आठवड्यातून एखाद-दुसरा दिवस जायचे अगदी जिवावर यायचे, त्यातही ऑफीस, घरगुती कामे, कोर्ट-कचेरी इत्यादीमुळे खंड पड़ायचा.
           असे सर्व असतानादेखिल शक्य असेल त्यावेळेस कॉलेजला जाऊ लागलो. खरं तर मी शिक्षणाचे महत्व जाणून असलो तरी माझ्या अशिक्षित असलेल्या आई इतपतदेखिल मला शिक्षणाची गोडी नव्हती . डिप्लोमानंतर आर्थिक कारणांमुळे शिक्षण सोडून नोकरीचा मार्ग धरावा लागला. मुंबईत आठ वर्षाच्या कालावधीत आईने तसेच अनेक मित्रांनी पदवीपर्यंतचे शिक्षण तरी पूर्ण करण्याचा अनेकदा सल्ला दिला मात्र आहे त्यात सर्व सुरळीत चालले होते त्यामुळे पुढील शिक्षण घ्यायची तसदी घ्यावी वाटली नाही आणि शिक्षण व्यवस्थेबद्दलही काहीशी नकारत्मक भावना होती.लग्न झाले आणि मुंबई सोडून पुण्यात परतावे लागले. जबाबदाऱ्या वाढल्या आणि त्याचबरोबर नात्यागोत्यातील अनावश्यक वाद वाढले. कोर्ट-कचेरी इत्यादी चालू झालं आणि महिन्यातून एकदा येणाऱ्या पगाराला अनेक पाय फुटले. महिन्याचा खर्च भागवताना तारांबळ उडू लागली आणि उशिरा का होईना शिक्षणाशिवाय प्रगती होणं अवघड आहे हे ध्यानात आले.
           खरेतर पदवी मला नावापुरतीच हवी होती कारण जवळपास दहा वर्षांचा कामाचा अनुभव असल्याने शिकून दुसरे काही करायचे नव्हते व त्यामुळेच काहींनी पदवी विकत घेण्याचाही सल्ला दिला होता. पण एकवेळेस पदवी  नाही मिळाली  आणि नोकरीत प्रगती नाही झाली तरी चालेल मात्र  पदवी विकत घेण्याचे पाप माझ्याकडून घडणे शक्य नव्हते. शिकायचे , पदवी मिळवायची तर ती स्वतः शिकून अन्यथा नाही हे नक्की होते. असे असून देखील कॉलेजला जाण्यासाठी मनाची  तयारी होत नव्हती आणि चालढकल करत दहा वर्षे उलटून गेली होती. मात्र रयत शिक्षण संस्थेसारख्या नामांकित आणि ज्ञानदानाचा समृद्ध वारसा लाभेल्या संस्थेत शिक्षण घेता येणार होते आणि केवळ त्यामुळेच कॉलेजला जाणे सुरु झाले.
             कॉलेजला जायला सुरु केल्यापासून शिक्षणाबाबत नवा दृष्टीकोण निर्माण झाला. आपण नेहमी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींबद्दल बोलत असतो मात्र आपल्या शिक्षण घेण्याचा त्रुटी बद्दल काहीच बोलत नाही. पदव्या आणि गुणांच्या नंबर गेम मध्ये अभ्यास फक्त परीक्षेपुरता आणि मार्क्स मिळवण्यापुरताच केला जातो. अभ्यासक्रमात अशाही काही गोष्टी असतात त्या परीक्षेनंतरही आपल्याला उपयोगी पडू शकतात. आपणं त्या दृष्टीने अभ्यास करतच नाही. सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण गरजेचे आहे याची जाणीव आपणां सर्वांना आहे तशीच जाणीव त्यासाठी सर्वांगीण अभ्यास आणि अभ्यासक्रमातील पाठ,कलाकौशल्य, तंत्र आत्मसात गरजेचे आहे याबाबत असायला हवी. मार्क्स तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी उपयोगी पडतील पण ध्येय साध्य करण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी घोकमपट्टी नव्हे तर आत्मसात केलेलं शिक्षण उपयोगी पडेल याचीही जाण आपणा सर्वांना असायला हवी.
            सध्याच्या या संघर्षाच्या काळात विद्येंच्या या पवित्र ज्ञानमंदिरात जेवढे आत्मिक समाधान लाभत आहे तेवढे अन्य कुठेही मिळत नाही. अनेकदा अनेक अडचणींमुळे शिक्षण पूर्ण होईल कि नाही याची नेहमीच धास्ती वाटते, कधी निराश व्हायला होते, मात्र कॉलेजमधील शिक्षकवृंद व सहकारी विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे उत्साह वाढण्यास नेहमीच मदत होत असते. एवढंच नव्हेतर बीसीएनंतर राज्यशास्रात पदवी करण्याची इच्छाही पुनः जागृत झाली आहे. माझ्यासारख्या शिक्षणाची  फारशी गोडी नसलेल्या इतर जबाबदाऱ्या पार पाडत असलेल्या विद्यार्थ्यास  सर्व शिक्षकवृंदाचे अमुल्य मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे. म्हणूनच स्वावलंबी शिक्षणाचे ब्रीद घेऊन समाजातील वंचित घटकांसाठी शिक्षणाचा वटवृक्ष  लावणाऱ्या कर्मवीरांस व त्यांचा वारसा जोपासणार्‍या शिक्षकवृंदास माझा मानाचा मुजरा!!!
                                                           ........ संतोबा  (संतोष गांजुरे)
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!