Ads 468x60px

Sunday, November 20, 2022

एक पत्र उद्धव ठाकरेसाहेबांना.

 प्रति, 
        
          श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरेसाहेब,
                माननीय माजी मुख्यमंत्री,
                महाराष्ट्र राज्य.

                     कोणाला शिवसेनेची विचारसरणी, कार्यपद्धती पटो वा न पटो, कोणी शिवसेनेला मतदान करो वा न करो तरीसुद्धा बऱ्याच लोकांच्या मनात शिवसेनेबद्दल एक हळवा कोपरा असतो. उमलत्या वयात बहुतेक मुलांचा शिवसेना हाच पक्ष असतो. बाळासाहेबांचा करिश्मा, त्यांची खुमासदार तितकीच आक्रमक भाषणे, शिवसैनिकांची आक्रमता याचे लहानपणापासून किशोरवयीन मुलांना प्रचंड आकर्षण वाटत आलंय. शिवसेनेचा भगवा झेंडा, डरकाळी फोडणाऱ्या वाघाचा जबडा आणि जोडीला धनुष्यबाण. कसलीही वैचारिक जडणघडण नसलेल्या आक्रमक, सळसळत्या रक्ताच्या किशोरवयीन मुलांना एखाद्या पक्षाच्या प्रेमात पडायला आणखी काय हवं?. शिवाय सोबतीला बाळासाहेबांची भावनिक साद होतीच. ज्याला स्वतःची ओळख नाही अशा आयडेंटीटी क्रायसिस असलेल्या वर्गाला शिवसैनिक, हिंदू म्हणून ओळख मिळाली तरी पुष्कळ होते. वर्ष १९९५ की ९९ मला नक्की आठवत नाही पण त्या निवडणुकीतील शिवसेनेची प्रचार गीते तर खूप भन्नाट होती. मी कशीबशी ती कॅसेट मिळवून चुलत भावाच्या टेपवर त्यातील वाघाची डरकाळी आणि काही स्पॅनिश, इंग्लिश गाण्यांच्या चालीवर असलेली प्रचारगीते सतत ऐकायचो. "उन दोस ट्रेस मारिया" या रिकी मार्टिनच्या स्पॅनिश गाण्याच्या चालीवर - शिवसैनिक आले आले, काँग्रेसचे धाबे दणाणले असे काहीसे ते गाणे होते. ऐकून-ऐकून ती कॅसेट खराब झाली नंतर काही वर्षानंतर इंटरनेटवर शोध घेतला पण ती प्रचारगीते कुठेच मिळाली नाही.

                     असा हा कट्टर शिवसेनेचा चाहता वर्ग जसा जसा शिकत जातो, तसा तो प्रगल्भ होत जातो. त्याला जगरहाटीचे ज्ञान मिळत जाते हळूहळू तो विवेकवादी बनू लागतो, त्याला भावनिक, धार्मिक राजकारणातला कट्टरपणातला फोलपणा लक्षात येत जातो. तसा हा किशोरवयीन वर्ग मतदार होईपर्यंत शिवसेनेपासून हळूहळू दूर होत जातो. एव्हाना तो संघर्ष करून स्व:कर्तृत्वावर, स्वतःच्या पायावर उभा राहिलेला असतो, त्याला शिवसेनेबद्दलच किंवा इतर दुसऱ्या पक्षाबद्दल वाटणारी ओढ, आपलेपणा कमी झालेला असतो. खरंतर अशी पक्ष निरपेक्षता प्रत्येक मतदाराकडे असेल तर जात - धर्म ,भावनेच्या आहारी न जाता तो मतदार उपलब्ध उमेदवारांपैकी बरा उमेदवार निवडून देऊ शकतो अशाने आपली लोकशाही अधिक प्रगल्भ, अधिक सशक्त होऊ शकते. मी आतापर्यंत मी शिवसेनेला, काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलेले आहे(पुरंदर विधानसभा, बारामती लोकसभा मतदारसंघ). आणि मी ज्यांना मतदान केले आहे ते त्या त्यावेळी निवडून आले आहेत या शिवाय मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्राथमिक सदस्यत्व घेतले होते अर्थात त्या प्राथमिक सदस्यत्वाला आता आपण तरुण वयात झालेलं बचपन का प्यार म्हणू शकतो. आज जरी सगळ्याच राजकीय पक्षांबद्दलचा भावनिक ओढा कमी झालेला असला तरी आजही शिवसेनेवर काही संकट आले की मन व्यथित होते.

                    आताही चारेक महिन्यापूर्वी जूनमध्ये शिवसेनेत उभी फूट पडली २/३ पेक्षा अधिक फुटीर नेते शिवसेना सोडून गेले. त्यांनी कोणत्यातरी एका अदृश्य महाशक्तीच्या दबावाखाली शरणागती पत्करून राजकीय आत्महत्या केली. तदनंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही तात्पुरत्या स्वरूपात गोठवले. आजकालचे एकंदरीत सुडाचे राजकारण पाहता पुढे ते परत मिळेल की न मिळेल याची शाश्वती नाही. शिवसेनेला फुटीनंतर गेल्या चार महिन्यांत एकापाठोपाठ एक अनेक अनपेक्षित धक्के पचवावे लागले आहेत. त्या प्रत्येक धक्क्याबरोबर शिवसेना हे पहिलं प्रेम असलेल्या पिढीसोबत, महाराष्ट्रातील सद्सदविवेकबुद्धी शाबूत असलेला प्रत्येक माणूस हळहळला आहे, भले मग तो कोणत्याही पक्षाचा, विचारसरणीचा असो. अर्थात अपवाद काही मंदबुद्धी आणि नीच विचारसरणी असलेले पक्षाचे कार्यकर्ते असू शकतात. २०१९ ला महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून तसेच आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यापासून आपणांस सभागृहाचा कसलाही अनुभव नसताना आपण ज्या प्रगल्भतेने राज्यकारभार चालवला, कोरोना व इतर संकटाचा चांगल्याप्रकारे सामना केला. त्याबरोबरच आपल्या या सर्वसमावेशक भूमिकेमुळे शिवसेनेपासून वैचारिक भूमिकेमुळे जे सर्वसामान्य लोक दुरावले होते ते पून्हा परत आले एवढेच काय ज्या ज्यावेळी शिवसेनेवर सूडबुद्धीने आरोप करण्यात आले त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसामन्य कार्यकर्त्यांनी आणि पक्षनिरपेक्ष तरुणांनी देखील शिवसेनेसाठी सोशल मीडियावर खिंड लढवली. ज्यांनी पूर्वी शिवसेनेवर कठोर टीका केली होती अशा कित्येक नेत्यांनी, विचारवंतांनी आपल्याला समर्थन दिले आहे ते त्यांना कुठेतरी आपण प्रबोधनकारांचा वारसा चालवत आहात याची खात्री वाटू लागल्यामुळे. आपण गेल्याकाही काळात घेतलेल्या भूमिकेतून ते दिसून येत आहे अर्थात त्याची फार मोठी किंमत आपणांस मोजावी लागली आहे. 

                        आपणांस हे प्रेम आपण हिरव्या,भगव्या, निळ्या, पिवळ्याच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक कारभार केला म्हणून आहे. एवढेच काय ज्यावेळेस महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळेस तिला महाराष्ट्रातील जनतेने व काँग्रेस-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फारशी कुरबुर न करता स्वीकारले, अन्यथा जिथे समविचारी म्हणवल्या जाणाऱ्या भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सतत कुरघोडी चालू असतात तिथे हे काँग्रेस-शिवसेना हे भिन्न विचारधारा असणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही आघाडी केवळ महाराष्ट्रहित लक्षात घेऊन मनमोकळेपणाने स्वीकारली. काँग्रेसने शेवटपर्यंत अपेक्षेपेक्षा अधिक चांगली साथ दिली, त्याबद्दल काँग्रेस नेतृत्व आणि कार्यकर्ते यांचे आभार मानावेच लागतील. राष्ट्रवादीची एवढी अडचण नव्हती कारण त्यांचे नेते आणि कार्यकर्ते तसे लवचिक(flexible) आहेत. सध्या राहुल गांधीची "भारत जोडो यात्रा" चालू आहे तिला देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आदित्यजींनी देखील या यात्रेत सामील होऊन राहुल गांधींना पाठिंबा दिला हे चित्र निश्चितच आश्वासक आहे, त्याबद्दल आदित्यजींचे अभिनंदन आणि कौतुक. एका सभेत राहुल गांधींनी सावरकरांबद्दल एक वक्तव्य केल्यानंतर नुकतेच तुरुंगातून जामीनावर बाहेर आलेल्या खासदार श्री संजय राऊतसाहेबांनी थेट महाविकास आघाडीला तडा जाऊ शकतो असे विधान केले. काँग्रेस आणि शिवसेनेची विचारधारा, राजकीय प्रतीके वेगळी आहेत. महाविकास आघडीचे सरकार असताना, सरकारच्या काही  निर्णयांना अगदी ते काँग्रेसच्या विचारधारेच्या विरुद्ध असूनदेखील फारशी कुरबुर न करता पाठिंबा दिला होता. आपण एक लक्षात घ्यायला हवं राजकीय प्रतीके कालाऔघात दुसरी बाजू उघड पडू लागल्यास बदलूच शकतात. अगदीच ती नाकारली नाही तरी त्याकेंद्रित राजकारण नाही केले तरी ते पुरेसे आहे. 

                          आता आपली जबाबदारी आहे की आपण ही जी वाट आपण निवडलेली आहे तिच्यापासून ढळू नका. आपण हा मार्ग पत्करल्यानंतर आपणांस अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे त्यापायी बरेच काही गमवावे लागले आहे. जेवढे वाईट व्हायचं होतं तेवढे वाईट घडून गेले आहे, आता नव्याने सर्वांची सुरुवात होईल. खरंतर काही अघटित घडण्याची भीती ही जास्त त्रासदायक असते एकदा अघटित घडून गेले की त्याला सामोरं जाणं तितकेसे अवघड नसतं. आपणांस जिथे आयुष्यभर विरोध करणाऱ्यांनी निर्विवाद साथ दिली तिथे ज्यांची आयुष्य शिवसेनेमुळे घडली त्यांनी दगाफटका केला. आपणांस आणि आपल्या कुटुंबाला देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केले. ज्या दगडांना शेंदूर फासून त्यांचा देव केलात ते दगड दगडच राहिले. उलट आपलाच कपाळमोक्ष झाला किंबहुना माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखे त्यांनी सगळी उठाठेव चालवली आहे. हे सर्व बघता ते शिवसेना सोडून गेले म्हणून आपण सुटकेचा निःश्वास च सोडला असेल. पानगळ झाल्याशिवाय नवी पालवी फुटत नाही, त्यामुळे रोजच्या रोज फुटून जाणाऱ्या फुटिरांमुळे शिवसेना संपत चालली आहे असे न वाटता आम्हाला शिवसेना कात टाकतेय असे वाटतेय.  

                                    आपणांस संपवायला निघालेले फुटिरांचे हुजरे आता आपणाला मिळणाऱ्या समर्थनानंतर भविष्यात आम्ही परत एकत्र येऊ शकतो अशी भाषा करू लागलेत. ज्या फुटीरांनी धोका दिला त्यांना परत घेऊ नका, शिवाय सध्या पक्षात उपद्रवमूल्य असणाऱ्या आणि आडवळणाने ते दाखवून देणाऱ्यांना त्यांनी आपल्याला ब्लॅकमेल करण्यापूर्वीच त्यांना दूर करावे. शिवसेना तिकीट वाटप करताना उमेदवाराची जातपात, आर्थिक-सामजिक स्तर न पाहता तिकीट वाटप करते हे जे गृहितक रुजले आहे त्यात त्यामध्ये अजून एका गोष्टीची भर घालावी, केवळ निवडून येण्याच्या क्षमतेचा विचार न करता जे लोक निवडून आल्यानंतर त्या पदास न्याय देऊ शकतील अशा लोकांना उमेदवारी द्यावी. पक्षाच्या पुनर्बांधणीचे आव्हान आणि संधी आपल्यापुढे आहे, प्रबोधनकारांच्या विचारांनुरूप आणि आजच्या काळानुरुप पक्षाचा जाहीरनामा आणि हिंदुत्वाची पुनर्मांडणी करावी.बाळासाहेबांचा धडाडीचा आणि प्रबोधनकारांचा वैचारिकतेचा वारसा आपण चालवावा ही महाराष्ट्रातील जनतेची एक इच्छा आहे. सर्वसामान्य जनता जनार्दनाचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्या सोबत आहेत त्यांच्या विश्वासास तडा जाणार नाही असा विश्वास वाटतो आणि तो तडा जाऊ देऊ नका ही नम्र विनंती.


                                                     संतोबा....

    


Friday, October 21, 2022

एक पत्र गडकरीसाहेबांना.

 प्रति,

 मा. नितीन गडकरीसाहेब,

रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री भारत सरकार.

विषय - शहरातील वाहतूकव्यवस्थेचा बोजवारा.

               सर्वप्रथम मी आपली माफी मागतो की प्रबळ राजकीय इच्छशक्तीच्या जोरावर दोन शहरांमधील अंतर कमी करण्याचा धडाका लावणाऱ्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवनवीन योजना कार्यान्वित करून लोकांचा प्रवास सुखाचा करण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या कर्तृत्ववान मंत्री महोदयांना शहरातील, गल्लीबोळातील न फुटणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी मी पत्र लिहीत आहे. ही अडचण जरी चिल्लर वाटत असली तरी रस्त्यावरच्या खड्डयांनी आणि अगणित स्पिडब्रेकर्सनीं सर्वसामान्य जनतेची गाडी आणि बॉडी चिल्लर प्रमाणे खुळखुळी केली आहे. आज आपण दिल्ली-मुंबई प्रवास १२ तासांवर आणायचा प्रयत्न करत असताना शहरातल्या शहरात एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी १५-२० किलोमीटर अंतरासाठी दीड-दोन तास लागत आहेत. लोकांचा दिवसातील सरासरी दोन-तीन तासांचा वेळ प्रवासातच जातो. सद्या इतर कोणापेक्षाही आपल्याला  जास्त पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याची इच्छा आहे असे दिसत आहे, केवळ त्यामुळेच मध्यंतरी आपण पुण्यात हवाईबस आणण्याबद्दलचे सूतोवाच केले होते. आजपर्यंत जनतेला स्वप्न विकून सत्ता मिळवणारे भरपूर झालेत पण जनतेच्या स्वप्नांना पंख लावून देणारे नेते केवळ आपण आहात. आपली कामगिरी निश्चितच धडाकेबाज आहे त्यामुळे सर्वपक्षीयलोकांमध्ये आपल्याबद्दल आदर आहे.  आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे, स्पष्टवक्तेपणामुळे आणि सर्वांसोबत असलेल्या सलोख्याच्या संबंधामुळे आपल्या आणि दिल्ली मध्ये मात्र दुरावा वाढल्याचे चित्र आहे. नेहमी सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून जात असला तरी सह्याद्रीला सापत्न वागणूक मिळते हे काही नवीन नाही.

            असो, आपल्याला रोज भेडसावणाऱ्या समस्या बाजूला ठेवून जिथे आपल्या हातात काहीही नाही अशा राष्ट्रीय स्तरावरच्या समस्यांबद्दल आपल्याला तावातावाने वाद घालण्याची वाईट खोड आहे. आपण जो ज्वलंत आणि त्रासदायक मुद्दा आहे त्याबद्दल बोलू. प्रत्येकजण दररोजच्या वाहतूकोंडीमुळे त्रस्त आहे, त्यातून काही मार्ग निघण्याची चिन्हे नाहीत आणि त्यादिशेने कोणी प्रयत्न करत आहे असेही दिसत नाही. वाहतूककोंडीसाठी सगळ्यात जबाबदार आहे ते खड्ड्यांनी खिळखिळे झालेले, अतिक्रमणाने वेढलेले रस्ते, पहिल्या पावसाच्या केवळ चाहुलीने बंद पडणारे सिग्नल्स आणि जोडीला विविधतेने नटलेले गतिरोधक. ज्याप्रमाणे जगात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीप्रमाणे नसतो त्याप्रमाणे रस्त्यावरचे गतिरोधक एकसारखे नसतात हे स्पीडबेकर्स  कमी आणि गाडी-बॉडी ब्रेकर जास्त  वाटतात. शिवाय लोकं हवे तिथे हवे तसे गतिरोधक बनवत असतात. घरापासून मला पाचशे मीटर अंतरावर असलेल्या पुणे सोलापूर रोडला जाईपर्यंत दहा गतिरोधक लागत, काही गतिरोधक रेडिमेड आहेत तरी ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. गतिरोधक वेग कमी करण्यासाठी असतात, वेग कमी नाही केला तर गाडी रस्त्यावर थोडी आदळेल व वेग कमी केला तर आदळणार नाही अशा पद्धतीने गतिरोधक बनवायला हवेत पण कितीही वेग कमी केला तरी गाडी गतिरोधकांवरून आदळतेच. कित्येक अवजड वाहने खड्डेयुक्त रस्त्यांमुळे रस्त्याच्या मधोमध बंद पडून वाहतुककोंडीत भर घालत असतात. याशिवाय बेशिस्त वाहनचालक त्यात भर घालत असतात, त्यात दुचाकीस्वार आणि रिक्षावाले आघाडीवर असतात, सर्वात जास्त घाई त्यांनाच असते. बहुतेक चौकात सिग्नलच्या लगतच बस आणि रिक्षा थांबा असतो त्यात भरीस भर आपला अमूल्य वेळ वाचवण्यासाठी रिक्षावाले राँगसाईडने येतात त्यामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते अजून निमुळते होत जातात त्यामुळे सिग्नल सुटला तरी निमुळते रस्ते आणि खड्ड्यांमुळे वाहने कासवगतीने पुढे सरकत राहतात.

                      मुंढवा ब्रिजवर तर हे नेहमीचेच आहे. मुंढवा ब्रीज आणि चौकातील सिग्नल पार करण्यासाठी अर्धा किलोमीटरहून कमी अंतरासाठी  जाताना सरासरी अर्धा तास आणि येताना तेवढाच वेळ लागतो. रोज ऑफिसला जाण्यासाठी पंधरा किलोमीटर अंतरासाठी रोज दीड तास लागतो. गाडी कोणतीही असली तरी सरासरी दहाच्यावार स्पीड जात नाही. हे रोजच असलेले तरी लोकं नाईलाजाने अंगवळणी पडल्याप्रमाणे रडत कढत ये-जा करत असतात पण असल्या कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिका आणि रुग्णांचे काय, कित्येक जीव या जीवघेण्याकोंडीत तडफडून गेले असतील , कित्येक संसार या वाहतूक कोंडी मुळे उघड्यावर पडले असतील. पुनर्जन्मावर काही लोकांचा विश्वास असेल नसेल पण खड्ड्यांचा पुनर्जन्म यावर बहुतांश लोकांचा विश्वास नक्कीच असेल कारण एकदा मलमपट्टी केलेले खड्डे चार दोन दिवसात हळूहळू मूळ रूपात दिसू लागतात आणि काही दिवसातच परत जसे होते तसे मूळ रूप धारण करतात. थोडाजरी पाऊस सुरू झाला की महाराष्ट्रातील कोणत्याही भागातले रस्त्यावरील खड्डयांचे फोटो पाहिले की ते आपल्याच रस्त्यावरचे आहेत काही असे वाटावे, इतकी त्या खड्ड्यांच्या विविधेत एकता असते आणि ट्रॅफिक सिग्नलचे तर बोलायलाच नको इतके ते हवामान खात्यापेक्षा बिनचूक अंदाजाने , अगदी पावसाळी वातावरण जरी निर्माण झाले  तरी झाले तरी ते बंद पडतात.या वाहतूककोंडी आणि फुटफुटांवर ठिगळं लावलेल्या रस्त्यावरून प्रवास करायचा म्हणला तरी अंगावर अक्षरशः काटा येतो, अनेकांना त्यामुळे पाठ आणि मणक्याचे दुखणे चालू झाले आहेत त्यातील मी एक आहे.   

                    वाहतूक कोंडीसाठी वाहतूक पोलिसांना जबाबदार ठरवणे त्यांच्यावर अन्यायकारक आहे.  बिचारे  भरचौकात, कधी भरपावसात तर कधी उन्हातान्हात, कर्णकर्कश गोंगाटात, श्वास गुदमरणाऱ्या प्रदूषित हवेत उभे राहून त्यांच्यापरीने कर्तव्ये बजावत असतात. खरंतर ते हुकुमाचे ताबेदार आहेत शासन - प्रशासन त्यांना जे आदेश देईल त्याचे ते पालन करतात. आपणच त्यांना दंड वसुलीचे टार्गेट देत असू तर त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे. वाहतूक पोलिसांची कार्यक्षमता आपण त्यांनी गोळा केलेल्या दंडाच्या रकमेवरून ठरवतो की त्यांनी वाहतूक किती चांगल्या प्रकारे सुरळीत ठेवली यावर ठरवतो हे महत्वाचे आहे. जर त्यांच्या कामाचे मूल्यमापन त्यांनी जमा केलेल्या दंडाच्या रकमेवर ठरवत असू तर पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न का करतील?.त्यामुळे एका बाजूलाट्रॅफिकचा बोजवारा उडत असताना वाहतूक पोलीस वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आहेत की फक्त दंड गोळा करण्यासाठी आहेत असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला न पडला तर नवलच. वाहतूक सुरळीत चालावी म्हणून दंड वसुलीचे टार्गेट न ठेवता, कोण किती चांगल्याप्रकारे वाहतूककोंडीची परिस्थिती हाताळतोय, ती न होण्यासाठी प्रयत्न करतोय यावरून त्यांच्या कामाचे मूल्यमापन करावे आणि त्यानुसार त्यांना योग्य तो प्रोत्साहन भत्ता द्यावा असे केल्याने अधिकारी,कर्मचारीवर्गाची वाहतूककोंडीकडे आणि वाहतूकनियंत्रणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि मानसिकता बदलायला मदत होईल.

             बऱ्याच जणांचे असे म्हणणे आहे की, रस्त्यांचे नियमित ऑडिट केले पाहिजे. पण सगळ्यांना माहिती आहे कोणाला कसे मॅनेज करता येते. खरंतर ऑडिटसाठी कोणा एजन्सीला नेमण्याची गरज नाही, आणि त्यासाठी पैसेही खर्च करण्याची गरज नाही. रस्त्याच्या ऑडिटसाठी पाऊसापेक्षा जास्त चांगला ऑडिटर दुसरा कोणीही नाही, शिवाय रस्त्याबरोबर तो ट्रॅफिक सिग्नलचेही ऑडिट चांगल्याप्रकारे करतो. रस्ते बनवणाऱ्या, दुरुस्त करणाऱ्या ठेकेदाराची किमान २०% रक्कम रस्त्यांचे पावसाने ऑडिट केल्यानंतर ते पास झाल्यानंतरच अदा करण्यात यावी अन्यथा पास न झाल्यास दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात यावी. सध्या पुण्यात पावसांमुळे रस्ते जलमय होऊन प्रचंड वाहतूककोंडी होत आहे, ज्याप्रमाणे आपण हवाईबसचा विचार करत आहात तसे आता जलवाहतूक करता येतेय का त्याची चाचपणी करा म्हणजे खड्डे पडायचा, ते बुजवण्याचा त्रास नको. सर्वसामान्य जनतेला पायभूत सुविधांसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे पण शासन प्रशासनाला त्याचे काही देणेघेणे आहे का तेच कळत नाही. हडपसर परिसरातील  स्वच्छतेची आणि छोटेमोठे खड्डे बुजवण्याची सिरम इन्स्टिट्यूटचा आदर पूनावला ग्रुप APCCI (Adar poonawalla Clean city initiative) जेवढी काळजी घेतो तेवढी काळजी महानगरपालिकेने घेतली तरी वेगळे चित्र दिसेल पण राजकारण्यांना एकमेकांची उणीधुनी काढण्यातून आणि स्वतःवर झालेल्या तथाकथित अन्यायाचे रडगाणे गाण्यातून जनतेच्या मूलभूत गरजा आणि अडचणींकडे लक्ष देण्यास वेळ तरी मिळायला हवा आणि तो वेळ जेव्हा मिळेल तो सुदिनच म्हणावा लागेल. 

                                                               संतोबा....

Saturday, July 9, 2022

मी उपमुख्यमंत्री.

                    साधारणपणे १९९३ ची घटना असेल, त्यावेळेस मी इयत्ता चौथीमध्ये शिकत होतो. आज पारगांवमध्ये ज्याठिकाणी तलाठी ऑफिस आहे त्याठिकाणी आमचा चौथीचा वर्ग भरत असे. आम्हांला शिकवायला भोसले गुरुजी होते, भोसले गुरुजींनी पवार सगळ्यात हुशार म्हणून मुख्यमंत्री, मनोज सहलमंत्री, काळूराम सफाईमंत्री अशी बहुतेक हुशारीवर आणि काहीअंशी आगाऊपणावर आधारित खातेवाटप केले होते. रोज सकाळी मुख्यमंत्री तुकाराम पवार सर्वांचा गृहपाठ तपासतील, वर्ग आणि व्हारांड्याच्या साफसफाईची जबाबदारी सफाईमंत्री काळूरामची. मडकी कशी बनवतात हे प्रत्यक्ष जाऊन पाहण्यासाठी चालत पाच मिनिटांच्या अंतरावर ठरलेल्या सहलीचे नेतृत्व सहलमंत्री मनोजकडे. अर्थात मला कोणतीही जबाबदारी दिली नव्हती. मला तशी अपेक्षाही नव्हती, किंबहुना ती तशी कोणालाच नव्हती.  हे असे मंत्रिमंडळ बनवण्याची संकल्पना अचानक ठरली व तात्काळ त्यांस मूर्तरूप दिले गेले, त्यामुळे कोणाच्या नाराजीचा प्रश्नच नव्हता. 

               अशाप्रकारे खातेवाटप सुरळीत पार पडले असे वाटत असताना मुलींच्या बाजूने गलका चालू झाला, माझ्या मैत्रिणींनी हट्टच धरला की संतोषला काही ना काही पद द्या.    ३५-४० पटसंख्या असलेल्या वर्गात काय आणि किती पदे देणार, गुरुजींनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्या  ऐकायलाच तयार नव्हत्या.  शेवटी नारीशक्तीपुढे गुरुजी हतबल झाले व थोडा विचार करून भोसले गुरुजींनी माझ्यासाठी उपमुख्यमंत्रीपद निर्माण केले व ज्यादिवशी तुकाराम सुट्टीवर असेल त्यादिवशी त्याची मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मी पार पाडायची असे ठरले. तुकाराम बहुदा कधीच गैरहजर नसायचा आणि माझे उपमुख्यमंत्रीपद हे कायमच नामधारी राहिले.गेल्या काही काळापासून उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्रीपदाला वरचढ ठरत असताना थोडाफार आनंद वाटतोय तो केवळ ह्याच एका नामधारीपणाच्या टोचणीमुळे.राज्याचा विचार करता उपमुख्यमंत्री पद घटनात्मक नाही आणि अनिवार्यही नाही,  केवळ खातेवाटपात समतोल राखण्यासाठी, मुख्यमंत्रीपदाची दावेदारी करणाऱ्याची नाराजी दूर करण्यासाठी आणि राजकीय स्थैर्य आणण्यासाठी त्याचा साधारणपणे उपयोग केला जातो.

              आजकाल लोकं पद मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात, बहुदा सामजिक प्रतिष्ठा,प्रसिद्धी, इतरांवर वर्चस्व गाजवण्याची संधी ह्यासाठी सगळा खटाटोप असतो आणि पदाचा मूळ उद्देश बाजूला पडतो. प्रतिष्ठा ही पदाला असते त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला तो त्या पदावर बसलेला आहे तोपर्यंतच ती प्रतिष्ठा, मानसन्मान मिळतो. प्रत्येक पदाचे काही अधिकार आणि कर्तव्ये असतात,  त्याला योग्य न्याय दिला तर त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला मानसन्मान मिळतो. अगदी ती व्यक्ती त्या पदावरून पायउतार झाल्यानंतर देखील आयुष्यभरासाठी त्यांस आदर मिळतो. पण ज्या व्यक्तीच्या कर्तुत्व आणि वर्तणुकीमुळे त्या पदाची प्रतिष्ठा वाढते अशा व्यक्तींबद्दलचा आदर आणि सन्मान पिढ्यानपिढ्या टिकतो. पण एखादी कुवत नसलेली व तडजोड किंवा अपरिहार्यता म्हणून पदावर बसवलेली व्यक्ती तिच्या वर्तणुकीने चेष्टेचा विषय होतो, अशा व्यक्तीची खिल्ली उडवली जाते मग तो मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो वा राष्ट्रपती. कोणाच्या तरी मर्जीने, मिंधे होऊन पद मिळवले तर त्या व्यक्तीच्या हातचे बाहुलं बनून राहावे लागते, सर्व काही दुसऱ्याचा इशाऱ्यावर करावे लागते. अशा व्यक्तीची नामधारी म्हणून केवळ रबर स्टॅम्प सारखी गत होते.अशावेळी ना त्या पदाचा उपभोग घेता येतो ना त्या पदाला योग्य न्याय देता येतो. 

          मला नक्की आठवत नाही कोणत्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात तो धडा होता पण त्या धड्याने मला आयुष्यभरासाठी जमिनीवर राहण्याचा धडा मात्र दिला. बहुधा तो पाठ एखाद्या सरकारी अधिकाऱ्यावर असावा, तो ज्यावेळी अधिकारीपदावर होता तेव्हा त्याच्या हाताखाली असलेला कर्मचारी त्याला रोज आदबीने सलाम करायचा, चहापाणी काही हवं नको ते सर्व पहायचा. एकेदिवशी तो अधिकारी निवृत झाल्यानंतर रस्त्यात त्याची गाठ समोरून सायकलवर येणाऱ्या त्या कर्मचाऱ्यासोबत होते, नेहमी अधिकारी समोर दिसल्यावर मोठया आदबीने सायकलवरून उतरून सलाम करणारा तोच कर्मचारी त्यादिवशी मोठ्या गुर्मीत सायकलवर उतरून त्याच्या समोर सिगारेट सुलगावीत मोठ्या तोऱ्यात निघून जातो याचे त्या अधिकाऱ्यास आश्चर्य व वाईट वाटते. या जिव्हारी लागलेल्या घटनेचे पुनरावलोकन करता त्यांच्या कार्यकाळात त्या कर्मचाऱ्याशी अधिकारी म्हणून केलेली वर्तणुक चुकीची असल्याची उपरती होते. ते अधिकारी आणि कर्मचारी असे नाते होते अधिकरपद जाताच ते संपुष्टात आले. व्यक्ती-व्यक्तींमध्ये कोणत्याही पदाच्या , आर्थिक,सामजिक स्तराच्या आधारे भेदभाव करू नये. मी आजही माझ्या कार्यालयीन मेल मध्ये माझ्या पदाचा उल्लेख कधीच करत नाही.

              आजकाल जिथेतिथे केवळ राजकारणच नाही तर प्रत्येक क्षेत्रात पदासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच खेळले जाते. ज्या गोष्टी साध्य करण्यासाठी त्या पदाचे प्रयोजन केलेले असते त्यालाच हरताळ फासला जातो. पदाची लालसा असणे वाईट नाही, पण त्यासाठी आपली त्या पदासाठी असलेली योग्यता - अयोग्यता विचारात न घेता घोडेबाजार, साठमारी, विश्वासघात करून या ना त्याप्रकारे पद हस्तगत केले जाते.  पदाचा गैरवापर करून आपला आणि समर्थकांचा फायदा करून घेतला जातो, प्रतिस्पर्धकांना नेस्तनाबूत केले जाते. काळाच्या परिपेक्षात पाचदहा वर्षे फार नाहीत आणि कोणतेही पद सार्वभौम नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट नीतीनियमाने, नैतिक अधिष्ठान असलेले डावपेच खेळून मिळवावे. कावेबाजपणे, पाताळयंत्रीपणे, कुटील डावपेच खेळून काही मिळवले आणि आपण कितीही नीतिमत्तेने वागल्याची भलामण केली तरी आपण कसे वागलो त्याचे प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर, वर्तणुकीवर उमटत असते.आपण कितीही लपवाछपवी, सारवासारव केली तरी कधी ना कधी सत्य समोर येतेच. सर्व काही हस्तगत करून इतरांच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत होत नसेल, चारचौघांत उजळ माथ्याने फिरता येत नसेल आणि आपल्या विजयापेक्षा प्रतिस्पर्ध्याच्या पराभवाची चर्चा होत असेल तर तो आपला पराभवच नाही का?.

                 संतोबा...

Thursday, July 7, 2022

लोकशाही

                    लोकशाही ही एक चांगली शासन व्यवस्था आहे पण ती सर्वोत्तम नाही. ज्ञात,प्रचलित शासनव्यवस्थेत निश्चित ती वरचढ आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हवे ते मिळण्याची संधी असते पण ते मिळेलच याची खात्री नसते. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असते त्यामुळे या आकड्यांच्या खेळांमुळे सर्वांना समान संधी द्यायची म्हणले तरी ती संधी अल्पसंख्याकातील बहुसंख्याला, गरीबातील श्रीमंताला मिळते. भारतासारख्या खंडप्राय देशात साक्षात लोकशाही अस्तित्वात येणे कठीण आहे, आता भारतात जी लोकशाही अस्तित्वात आहे तिला आपण प्रातिनिधिक लोकशाही असे म्हणू शकतो. सर्वसामान्य जनतेचा लोकशाही व्यवस्थेतील सहभाग हा मतदानापुरताच अर्थात लोकप्रतिनिधी निवडून देण्याइतपतच मर्यादित असतो. एकदा निवडून आलेला प्रतिनिधी काय काय उपद्व्याप करतो, सत्तेसाठी, स्वार्थासाठी कोणाच्या वळचणीला जातो ते हतबलपणे पाहण्याव्यतिरिक्त त्याच्या हातात काहीही राहत नाही. थोडक्यात जनतेला मतदानाचा हक्क असला तरी एकदा निवडून दिलेल्या प्रतिनिधीने कर्तव्यात कसूर केली तर वचक ठेवण्याचे कोणतेही प्रयोजन नाही.

            निवडून दिलेला लोकप्रतिनिधी एकदा निवडून गेल्यानंतर तो त्याची लोकप्रतिनिधी म्हणून असलेली कर्तव्ये पार पाडेल याची खात्री देता येत नाही. बऱ्याचदा जनतेला व अगदी लोकप्रतिनिधीलाही त्याच्या कर्तव्याची जाण नसते. त्यामुळे दूरदृष्टीने लोकोपयोगी निर्णय घेण्यापेक्षा जनमतावर प्रभाव पाडणाऱ्या लोकप्रिय घोषणा करण्याकडे त्यांचा कल असतो. लोकप्रिय घोषणाव्यतिरिक्त जनमतावर प्रभाव पाडणाऱ्या अनेक गोष्टी असतात. धार्मिक,वांशिक,प्रादेशिक, भाषिक अस्मितांचा बाजार मांडून जनमताचे केंद्रीकरण केले जाते. विरोधकांवर खोटेनाटे आरोप करून त्यांची प्रतिमा बदनाम केली जाते. सत्ता हाती असेल तर प्रसारमाध्यमे, सरकारी यंत्रणांना हाताशी धरून विरोधीपक्षाविरोधी नरेटिव्ह तयार केले जाते. तथाकथित सेलिब्रिटिंना हाताशी धरून जनमत इन्फ्लूअन्स् करण्याचा प्रयत्न केला जातो अशाने सर्वसामान्य मतदार भावनेचा भरात मतदान करतो आणि चुकीचे लोकप्रतिनधी विधानसभेत, लोकसभेत पाठवले जातात. कोणा एका पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आणि विरोधी पक्ष कमजोर झाला तर अनेक निर्णय घेताना मनमानी केली जाते, हे निर्णय लोकहितापेक्षा सत्ताधारी पक्षाच्या विचारसरणीला पूरक ठरतील असे, आणि ठराविक व्यक्ती, संस्थाच्या हिताचे असतात. ही एकाधिकारशाही एक प्रकारची हुकूशाहीच म्हणता येईल आणि म्हणूनच अशा प्रचंड बहुमताला बऱ्याचदा पाशवी बहुमत असेही म्हणतात.

            आज खूप साऱ्या लोकांना लोकशाही नकोशी वाटते त्यापेक्षा त्यांना हुकूमशाही आणि लष्करशाहीचे सुप्त आकर्षण आहे. लोकशाही शासनव्यवथेत  राज्य कारभार  लालफितीत अडकल्यामुळे, स्पष्ट बहुमताअभावी आघाडी,युती करण्याची अपरिहार्यता आणि कोणताही निर्णय घेण्यासाठी लागणारा विलंब, घटक पक्षात एकवाक्यता नसणे यामुळे देशाच्या प्रगतीस खीळ बसते अशी सर्वसामान्य जनतेची धारणा बनलेली असते. फॅसिस्ट विचारसरणीचे पक्ष प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या त्याची भलामण करत असतात. आत्यंतिक राष्ट्रवाद, काल्पनिक सोनेरी भूतकाळाचे गुणगान आणि तो प्रत्यक्षात उतरवण्याचे स्वप्न, मूठभर भांडवलदारांच्या हाती सर्व आर्थिक प्रगतीच्या चाव्या आणि त्यातून जीवघेणी विषमता,  विचारवंतांचे वावडे आणि सर्व प्रश्न सोडवणारा, बाह्य शक्तिपासून संरक्षण करणारा एकमेव सर्वशक्तीशाली नेता अशी फॅसिस्ट पक्षाची मांडणी असते आणि म्हणून ते लोकशाहीला दोष देत हुकूमशाही आणि लष्करशाहीसाठी आग्रही असतात. हुकूमशाही आणि लष्करशाहीत पहिला बळी सर्वसामन्य जनतेच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा जातो हे सर्वसामन्य लोकांच्या खिजगणीत नसते, एककल्ली  आणि अनियंत्रित कारभारामुळे सर्व स्तरांवर देशाची आर्थिक घडी इतकी बिघडते की जनतेला हुकुमशहाच्या मेहेरबानी वर जगल्या सारखे जगावे लागते. खरंतर प्रत्येक व्यवस्थेत काही ना काही गुण दोष असतातच एखादी व्यवस्था, संस्था, व्यक्ती कितीही चांगल्याप्रकारे कार्यरत असली तरी कालांतराने तिला विरोधाचा सामना करावा लागतो. अगदी तिच्या समर्थकांमध्येदेखील कुरबुरी वाढू लागतात. जगात अनेक शासनव्यवस्था, राज्ये, संस्कृती उदयास आल्या आणि लोप पावल्या. इतर शासनव्यवस्थेच्या मानाने लोकशाही शासनव्यवस्था लोकांच्या भावनांचा उद्रेक न होता दीर्घकाळ टिकून आहे.

      खरंतर लोकशाही स्वातंत्र्य,समतेची आई आहे असे म्हणता येईल. अर्थात परिपूर्ण स्वातंत्र्य आणि समता कदापी प्रस्तापित होऊ शकत नाही, एका छोट्या कुटुंबातही ते शक्य होत नाही पण लोकशाही मार्गाने विषमतेची दरी बुजवण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहते. लोकशाही आहे म्हणून समाजातील शेवटच्या घटकाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि प्रगती करण्याचे सप्न पाहण्याची आणि आर्थिक सामजिक उद्धार करण्याची संधी तरी मिळते. एखाद्या गोष्टीत काही त्रुटी असतील तर त्या आपण दुरुस्त करतो, तिला उध्वस्त करत नाही. घरात ढेकूण झाले तर आपण त्यांचा बंदोबस्त करतो ना की घर जाळतो. लोकशाहीचेही तसेच आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बदल हा लोकशाहीचा आत्मा आहे. सध्या तरी लोकशाहीला पर्याय नाही. जनता प्रगल्भ झाली तर लोकशाही आपोआप प्रगल्भ होत जाईल. लोकशाहीचे महत्व आणि उपयुक्तता प्रत्येक व्यक्तीने समजून घ्यायला हवी. कोणतही योजना, निर्णयाबाबत प्रत्येक जण खुश राहू शकत नाही पण हुकुमशाहीचे गुणागण गाणे घर जाळून कोळशाचा व्यापार करण्यासारखे आहे.

                     व्यक्ती, समाज व संस्कृती या जर लोकशाहीभिमुख नसतील, तर लोकशाही पद्धतीचे संविधान स्वीकारूनही त्या देशात लोकशाही रूजणे व टिकणे अवघड असते.लोकशाही ही केवळ शासनव्यवस्था न राहता ती एक जीवनपद्धती व्हायला हवी.  वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवनात प्रत्येक नागरिकाने तिचा अवलंब केला पाहिजे. गुलाम, मालक या संकल्पना कालबाह्य व्हायला हव्यात. प्रत्येक नागरिकाने स्वतः मध्ये असलेल्या सरंजामी, वर्चस्ववादी प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे. एखादी गोष्ट योग्य-अयोग्य, चांगली-वाईट असणे हे व्यक्ती सापेक्ष आहे. स्वतःला जे योग्य वाटतेय, चांगले वाटतेय त्याची जबरदस्ती इतर व्यक्तींवर करू नये अगदी त्या आपल्या कुटुंबाचा भाग असतील आणि सर्वांगीण दृष्ट्या आपल्यावर अवलंबून असतील तरी आपण त्या व्यक्तीच्या मतांचा आदर करणे हे प्रगल्भतेचे लक्षण आहे. लोकशाहीची अशी प्रगल्भता समाजाच्या प्रत्येक व्यक्तींच्या विचारांमध्ये भिनली तर एक सुदृढ समाज निर्माण होऊ शकतो व परिपूर्ण लोकशाही अस्तित्वात येऊ शकते. प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी संधी मिळण्यासाठी लोकशाही टिकली पाहिजे आणि दिवसेंदिवस ती जास्त निकोप व्हायला हवी.  सुजाण नागरिक म्हणून ती आपल्या सर्वांची गरज आणि जबादारी आहे.

                                                   संतोबा...

Wednesday, July 6, 2022

मानसिक आरोग्य

                आजकालच्या धक्काधक्कीच्या, धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य ही ढासळत चालले आहे. शारीरिक आरोग्याबाबत आपण फार सजग नसलो तरी एका ठराविक मर्यादेनंतर आपण शारीरिक आरोग्याची काळजी घेतो. पण मानसिक आरोग्याबाबत आपले नेहमीच दुर्लक्ष होते, किंबहुना मानसिक आरोग्य बिघडवणारी परिस्थिती कशी हाताळायची हेच कळत नाही. कौटुंबिक कलह, वडिलोपार्जित संपत्तीतील वाद नात्यातील क्लिष्टता, नोकरी धंद्यातील कामाचा दबाव, सामाजिक प्रतिष्ठेचा दबाव आपले मानसिक आरोग्य बिघडवत असतात आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर देखील पडत असतो. आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे मात्र बऱ्याचदा मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे बाह्य घटक/व्यक्ती असतात जे आपल्या नियंत्रणात नसतात. अशावेळी आपल्याला त्यांना व्यवस्थित हाताळायला आले पाहिजे. 

               कौटुंबिक कलह आणि नात्यातील क्लिष्टता हे मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे सगळ्यात प्रमुख घटक आहेत. त्यात प्रामुख्याने दोन पिढ्यांमधील विसंवाद.वडिलोपार्जित संपत्तीचे वाद, नात्यामधील कर्तव्ये आणि हक्क यांचा असमतोल,  बदलत्या परिस्थितीत दोन कुटुंबांमधील आर्थिक, सामाजिक स्थर रुंदावणारी दरी. स्वतःच्या व इतरांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे. जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग, विश्वासघात.  नात्यांमधील मानपान, गैरसमज या गोष्टींचा समावेश होतो. हे सगळं मिटवण्यासाठी आपण कितीही सामोपचाराची समजूतदारपणाची भूमिका घेतली तरी त्याला फारसं यश येत नाही. बहुतेकांना हक्काची जाण असते पण जबाबदारीचे भान नसते, त्यांना कर्तव्यामध्ये वाटा नको असतो पण हक्कांमध्ये दुसऱ्याचा वाटा असू शकतो याची समज नसते आणि त्याच गैरसमजापोटी बऱ्याचदा आडमुठेपणाची भूमिका घेतली जाते. काही वेळा कोर्टकचेऱ्या करण्याची वेळ येते, त्यामधून काहीच साध्य होत नाही याउलट वेळ, पैसा आणि मानसिक स्वास्थ्य धुळीस  मिळते. अशा कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात.

             नात्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे सोपे नसते, अशावेळी आपण नात्यांमध्ये दुजाभाव करायचा नाही, सगळ्यांना आपले समजायचे, त्यांनी आपल्याला आपले समजायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, त्यासाठी आपण आपले मानसिक आरोग्य खराब करायचे नाही. त्यांनी आपल्याला आपले समजावे हा अट्टहास आपण सोडून द्यायचा. कारण स्वभावाला औषध नसते. जेव्हा दोन पिढ्यांमध्ये विसंवाद होतो त्यावेळी आपण त्यांच्याजागी आपल्याला ठेऊन विचार करावा, त्यांचा संघर्ष, अनुभव हा वेगळ्या पातळीवरचा असतो. वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस जनरेशन गॅपची समस्या जटील बनत चालली आहे. आपण आयुष्यभर फक्त बेरीज करत राहायची आणि केवळ त्या बेरजेत अडथळा आणणाऱ्यांची वजाबाकी करायची.  आपले आचारविचार कोणावरही लादायचे नाही, नात्यांना बंधनात बंदिस्त करण्यापेक्षा त्यांना योग्य ती मोकळी दिली तर ती जास्त निरोगी राहतील. आपण कुटुंबाचा आधार बनून इतरांना परावलंबी बनवण्यापेक्षा, कुटुंबाचा पाया बनण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सर्वाँना स्वकर्तृत्वावर भरारी घेता येईल. महत्वाचे म्हणजे जसे आहात तसे रहा, आदर्शवादाचा झेंडा मिरवत कोणाचा गॉडफादर बनण्याचा प्रयत्न करू नका. कोणालाही सदा सर्वकाळ खुश ठेवता येत नाही, कोणासाठी कितीही केलं तरी पलटायचे असते त्यावेळी ते पलटतातच शिवाय त्यासाठी बिनबुडाची कारणे देत सगळा दोष आपल्यालाच माथी मारून, यथेच्छ बदनामी करून नामानिराळे होतात. त्यामुळे लोकांच्या मनातून उतरण्याची चिंता करू नका, स्वतःच्या मनातून उतरणार नाही याची दक्षता तेवढी घ्या.

              आजकाल पैसा, संपत्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. पैसा, संपत्ती नसेल तर आपल्यालाही समाजात काही किंमत राहत नाही. पैसा कमावण्यासाठी त्यासाठी लोकं वाट्टेल त्या थराला जातात. पैसा मिळवणे गरजेचेच आहे पण त्यासाठी वाट्टेल त्या थराला जायची वा काही धूर्त डावपेच खेळायची गरज नाही. पैशासाठी कोणाची लाचारी पत्करण्याची वा कोणाचे मिंधे होण्याचीही गरज नाही. कोणाच्या हातचे बाहुले बनण्यापेक्षा नितीनियमाने जेवढा कमवता येईल तेवढा पैसा कमवा व सुखासमाधानाने रहा. फुकट मिळणारी झोपही पैशाने विकत घेता येत नाही म्हणून असे कोणते कृत्य करू नका ज्याने तुमची झोप उडेल. आयुष्यात अनेक प्रसंग येतात जिथे वादातील आपल्याच हक्काच्या गोष्टी आपले जिवलग लांड्यालबाड्या करून लुबाडू पाहतात. अशावेळी जेवढे सामोपचाराने मिटवता येईल तेवढे मिटवण्याचा प्रयत्न करा नसेल मिटत तर इतर कायदेशीर मार्गाने मिटवण्याचा प्रयत्न करा. एवढं सगळं करून पदरी काही पडण्याची शक्यता नसेल किंवा हे लढण्यात जे मिळणार आहे त्यापेक्षा जास्त  वेळ आणि पैसा खर्च होणार असेल तर  जे तर तो नाद सोडून द्यावा. तो वेळ आणि पैसा इतर ठिकाणी गुंतवा त्याचा परतावा निश्चित जास्त आणि समाधन देणारा असेल.पानगळ झाल्याशिवाय नवी पालवी फुटत नाही. कधी कधी काही गोष्टी निर्व्याजपणे सोडता आल्या पाहिजेत, मग ती संपत्ती असो वा नाती. हे जमलं तर मानसिक ताणतणाव आश्चर्यकाकरीत्या गायब होतो शिवाय तुम्ही त्यागले ते कोणत्या न कोणत्या रूपात सव्याज परत मिळेल.  आपण मानपान करायचा आणि त्यांनी मनमानी करायची हे जास्त काळ सहन करून चालत नाही, योग्यवेळी अशांना आपल्या आयुष्यातून बाद करणे जास्त योग्य असते, अशावेळी जास्त फायद्यातोट्याचा विचार करून चालत नाही. आपल्याशी वाईट वागणाऱ्यांबद्दल कुठलीही बदल्याची भावना मनात ठेऊ नये. बदल्याची भावना समोरच्यापेक्षा आपल्या स्वतःला जास्त त्रास देते इतरांना त्रास नको म्हणून त्यांच्या चुकांना क्षमा करायचे नाही तर आपल्याला त्रास नको म्हणून त्यांच्या चुकांना माफ करायचे. माफ करून ते जर सुधारण्यासारखे नसतील तर त्यांना आयुष्यातून कायमस्वरूपी बाजूला करणे श्रेयस्कर समजायचे.

          समाजात वावरताना, नोकरी धंद्यात अनेकदा आपण अडचणीत सापडतो, काही गोष्टीबद्दल आपल्या मनात एकप्रकारची भिती बसलेली असते. भित्या पाठी ब्रह्मराक्षस असे म्हणतात, त्याप्रमाणे त्या भितीमुळे आपला आत्मविश्वास डळमळीत होऊ लागतो, तो मानसिक ताण आपल्या पेलवत नाही ना कोणाला सांगताही येत नाही. त्यावेळी आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव असे ठरवून ज्या गोष्टींची भिती वाटतेय त्यांना सरळ भिडायचे. जी गोष्ट घडण्याची भिती वाटते ती घडली असे समजायचे. कसलेही ओझे घेऊन जगायचे नाही मग ती भिती असो कोणाचे उपकार तात्काळ त्यातून बाहेर पडायचे.  कधीही कोणाची बरोबरी करण्याच्या भानगडीत पडू नये कधीही कोणाशी तुलना करू नये. तुमच्याकडे काय नाही हे पाहताना तुमच्याकडे जे काही आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण तुमच्याकडे जे काय आहे ते मिळावं अशी ही कित्येक जणांची स्वप्न असतील. जे नाही ते मिळवण्याच्या नादात जे आहे त्याचा उपभोग घेण्यास विसरू नका. या जगात कोणीच सार्वभौम नाही प्रत्येक जण कोणाला न कोणाला बांधील आहे. प्रत्येकाला कोणती ना कोणती नियमावली पाळावीच लागते. या जगी सर्व सुखी असा कोणीही नाही, प्रत्येकाला तो ज्या पायरीवर आहे त्या प्रकारची सुख आणि दुःख त्याच्या आयुष्यात असतात त्यामुळे कोणाच्या सुखदुःखाचा आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ देऊ नये.  शेवटी कितीही मिळवले तरी कमीच आहे आपण कोण आहोत हे पाहण्यापेक्षा आणि इतर कोणाशी आपली तुलना करण्यापेक्षा या ब्रम्हांडात ही आपली अखंड पृथ्वी एक धुलिकणा एवढी आहे हे लक्षात घ्या. कधी हे मिळवायचे ते मिळवायचे असा विचार करताना  "ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?" असं म्हणणारा प्यासा मधील गुरुदत्त डोळ्यांसमोरून तरळून जातो.


                                                संतोबा...

Saturday, January 1, 2022

संकल्प - २०२२

                    गेल्यावर्षी अर्थात २०२१ ला गेल्या चौदा वर्षांचा अनुशेष भरून काढायचा हा संकल्प केला होता त्यात प्रामुख्याने घर, गाडी, शेती, नोकरी, व्यवसाय, आरोग्य, राजकारण आणि स्वार्थी रोगट नात्यांचा सोक्षमोक्ष या संबंधी संकल्प केला होता त्यापैकी काही संकल्प पूर्ण झाले आहेत तर काही पूर्ण व्हायचे आहेत. मुख्य संकल्पापैकी घर, गाडी (वेटिंगवर आहे), शेती हे संकल्प पूर्ण झालेत त्याबरोबरच नोकरीचा बऱ्यापैकी बॅकलॉग भरून निघालाय आणि स्वार्थी रोगट नात्यांचा सोक्षमोक्ष लावण्यात आला आहे. आरोग्याच्या बाबतीत पोट हाताबाहेर गेलेय ही एकमेव आणि मोठी समस्या आहे त्यादृष्टीने वर्षाच्या मध्यंतरापर्यंत १३ किलो वजन कमी केले पण त्यात सातत्य नसल्यानेच पुन्हा ते १५ किलोने वाढून पूर्ववत झाले. राजकारण आणि आरोग्य ही निरंतर प्रक्रिया आहे आणि त्यात सातत्य हवे असते, त्यामुळे ईथुनपुढे प्रत्येक गोष्टीत सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करीन. व्यवसायाबाबतचा विचार तूर्तास बाजूला ठेवलाय.
                  या वर्षी जे काही साध्य करता आले त्याला पूर्वाश्रमीच्या कार्याचे पाठबळ आणि बऱ्याच हितचिंतकांचा सक्रिय पाठींबा तसेच काही गोष्टी घडण्यासाठी अनुकूल परिस्थिती कारणीभूत ठरली. आतापर्यंत कोर्टकचेरी, हेवेदावे, मानपान यासारख्या वांझोट्या गोष्टीत खूप वेळ आणि पैसा वाया गेला. वडिलोपार्जित शेतीत माझा किती जीव गुंतला होता हे सर्वांनाच माहिती आहे, आजही कोणी हितचिंतक भेटले की ते त्याविषयीच चौकशी करतात त्यांना आता यानिमित्ताने एकच विनंती आहे की मी हा विषय माझ्यापुरता संपवला आहे, तेव्हा याविषयी चर्चा न करणे उत्तम. गेल्या आठदहा वर्षाच्या काळात केलेल्या सर्वप्रकारच्या प्रयत्नांना अपयशच आले आहे. ज्या लोकांना स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी कळत नाही किंवा कळत असूनही आडमुठेपणा करून समोरच्याला अडचणीत आणणे हे जास्त आनंददायक वाटते अशी लोकं कितीही तडजोडी केल्या तरी ते बदलणार नाहीत याची जाणीव मला झाली आहे, त्यामुळे हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही अन्यथा तेल ही गेले आणि तूपही गेले अशी अवस्था व्हायची हे मला कळून चुकले आहे. 
                 शेती मिळवण्यासाठीची ही तळमळ कोणत्याही आर्थिक कारणातून नव्हती कारण शेतीवर मी माझ्याकडे काहीही नसताना अवलंबून नव्हतो आणि आताही नाही. जन्मापासून आईने मोलमजुरी करून मला शिकवले, वाढवले आहे. शेतीतील कोणत्याही उत्पन्नाचा हिस्सा माझ्या उपयोगी पडला नाही एवढेच काय पण आई व्यतिरिक्त इतर कोणाही सग्यासोयऱ्यांचे  माझ्या जडणघडणीत एकतर्फी योगदान/उपकार नाहीत, जे काही देणंघेणं होते त्याची ज्या त्यावेळेस परतफेड केली आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाला शेतीची जी खानदानी ओढ असते ती आहेच शिवाय ज्या शेतीसाठी वारस हवा, वंशाला दिवा हवा म्हणून ज्यांनी वडिलांना दुसरे लग्न करावयास भाग पाडून माझ्यारुपाने शेतीस वारस मिळवून देण्यासाठी भरीस घातले. ज्या शेतीला,घरादाराला वारस मिळावा म्हणून नवससायास केले त्या वारसाला जन्मापासून बेवारशासारखं, उपऱ्यासारखं दुसऱ्याचा दारात वाढावे लागले आणि आता मोठेपणी फायद्यात आहे म्हणून कायद्याच्या आडून शेतीची लुबाडणूक केली, कोर्टकचेऱ्या करायला भाग पाडले, मला रस्त्यावर आणण्याची भाषा केली. सामोपचाराने, मोबदला देऊनही कोणताही तोडगा निघू न देता कवडीमोल किंमतीने शेती दुसऱ्याच्या घशात घातली. माझ्याच हक्काच्या शेतीसाठी मला लढावे लागणे दुर्दैवी होते पण ही माझ्या हक्काची, आत्मसन्माची लढाई होती म्हणून मी सर्वस्वपणाला लावून लढत होतो, तडजोडी, कमीपणा स्विकारत होतो पण त्यात यश आले नाही शेवटी सगळ्याचा सोक्षमोक्ष लावला. ईथुनपुढे ज्याला जे हवे ते करावे, जे मिळवता येईल ते मिळावावे परंतु माझ्या वळचणीस येऊ नये. एक लक्षात ठेवायचे, आज त्या शेतीची जी किंमत आहे, आज न उद्या त्याच्यापेक्षा जास्त किंमतीचा माझा एकेक शब्द असेल याची मी त्यांना खात्री देतो.
                    असे सगळे विरोधात असतानाही सातबाऱ्यावर माझं नाव लावता आले, त्यात माझं स्वतःच काही फारसं कर्तृत्व नसून माझ्या राहीआत्या आणि कुटुंबीयांचा मोठेपणा आहे. ही तीच आत्या आहे जी मला लहानपणापासून संतोबा म्हणते आणि म्हणून 'संतोबा' याच नावाने मी लेखन करतो. मी लहान असताना हट्ट करायचो म्हणून रक्षाबंधनला येताना आत्या माझ्यासाठी खास राखी घेऊन यायची त्यापैकी लाकडी हत्तीची, आणि मोरपंखांची राखी अजूनही आहे तशी आठवणीत आहे, तसेच त्यांनी आणलेले टाळ  अजूनही काही काळापूर्वी पर्यंत घरात होते. आत्यांनी निरपेक्षपणे विनाअट, विनामोबदला दिलेल्या त्या जमिनीची किंमत किती, तिचा किती फायदा होईल, किती उत्पन्न निघेल याच्याशी मला काही देणेघेणे नाही. त्यातून मला जे मानसिक समाधान मिळाले त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. माझ्या मनात जो अन्यायाचा लाव्हा धुसमत होता तो यामुळे शांत झाला आहे आणि त्याची राख झाली आहे त्या राखेतून हा फिनिक्स लवकरच झेपावेल अशी आशा आहे (डिप्लोमासाठी कोल्हापूरला असताना "हा फिनिक्स लवकरच झेपावेल" हे माझे एक पेटंट वाक्य होते) आता ज्यांनी मला त्रास दिला त्यांच्याबद्दल माझ्या मनात कसलीही द्वेष भावना नाही. याबद्दल त्यांनी आत्यांचे आभार मानायला हवेत.
                 गेल्यावर्षा प्रमाणेच यावर्षी  म्हणजे २०२२ या वर्षभरात पुढील गोष्टी साध्य करावयाचा मानस आहे. वर्षभरात कमीतकमी ५१ लेख लिहिणे, छत्तीस लाख एक्कावण हजार पावले चालणे( प्रतिदिन सरासरी दहा हजार पावले). आर्थिक शिस्तीचा अंगीकार करणे. आरोग्य आणि राजकारण यामध्ये सातत्य आणि जे काही करायचे, जे काही घ्यायचे ते सर्वोत्तम. असा संकल्प आहे त्याबरोबरच हे नेहमीचे संकल्पाचे गुऱ्हाळ बंद करून स्वप्नपूर्तीच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात करायची आहे. हे सर्व जगजाहीर यासाठी की मनातल्या मनात केलेल्या संकल्पनांना पळवाट काढता येते पण हे असं जगजाहीर केलं म्हणजे किमान संकल्पपुर्तीसाठी प्रयत्न केले जातील.  
                                                                 
                                                                                                           ...संतोबा.
  
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!