Ads 468x60px

Sunday, October 14, 2018

छगन भुजबळ आणि मी

   श्री. छगन भुजबळ आणि माझा कसलाही संबंध नाही. एकमात्र खरं आहे की ते ज्यावेळी उपमुख्यमंत्री झाले होते त्यावेळी आमच्या नातेवाईकांच्यात भुजबळ आमच्या अमुक अमुकचे,  तमुक तमुक आहेत अशी चर्चा ऐकायला मिळायची एवढंच. एखादी व्यक्ती मोठी झाली की तिला असणाऱ्या नातेवाईंकामध्ये शेकडो पटीने वाढ होते. सत्ता गेल्यानंतर, भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यानंतरच्या जेलवारीनंतर त्या सगळ्या नातेवाईकांचाही भुजबळांशी काही संबंध राहिला नाही. आता बऱ्याच नातेवाईकांचा दुसऱ्या आमदारांशी नातेसंबंध जुळू लागेलत. उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात. मग असे असताना एका मावळतीला निघालेल्या सुर्याबद्दल मी का लिहीत असावं?  खरंतर मी कधीही ना कोणत्या नेत्याचे कौतुक केले ना कोणावर कसले कौतुकाचे लेख लिहिले. अगदीच अती झाले तर टिकाच केली. उलटपक्षी सतत दिल्ली ते गल्ली-बोळातील नेत्यांची कायम तळी उचलणारी फ्लेक्सवाली, दुसऱ्याची हांजी हांजी करण्याव्यतिरिक्त काहीही न करणारी  तरुण पिढी बघितली तरी तळपायांची आग मस्तकात जाते. कोणतेही समव्यवसायिक एकमेकांचे कौतुक करत नाहीत. त्यामुळे कोणाची बाजू घेण्याचा, कोणाचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. हे सारे द्वेषाच्या,सूडाच्या  राजकारणाला विरोध म्ह्णून आहे. माझी राजकीय महत्वकांक्षा काही लपून राहिलेली नाही. उगीच ताकाला जायचं आणि भांडे लपवायचे असले प्रकार मला जमत नाहीत.
                   गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये भुजबळांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांच्या कारकिर्दीचा वरवरचा आढावा घेणारे एक खुले पत्र लिहिले होते. त्यानंतर  याविषयावर बऱ्याच वेळा अनेकांशी चर्चा झाली त्या प्रत्येकवेळी भुजबळ जूनच्या आत बाहेर येणार असे मी सांगितले होते. खरं तर ते बाहेर येतील याचीच शाश्वती कोणाला नव्हती, त्यामुळे केव्हा येणार हा प्रश्नच नव्हता. मे महिन्यात छगन भुजबळांना जामिन मिळाला आणि सोशल मिडियावर समर्थन आणि विरोधाच्या पोष्टींचा महापूर आला.पुढे जून मध्ये समीर भुजबळांनादेखील जामीन मिळाला आणि ते सुद्धा जामिनावर बाहेर आले. भुजबळांना अटक झाली म्हणून ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या त्यांचा आता जळफळाट होऊ लागला होता. जी व्यक्ती सर्वार्थाने निष्कांचन झालीये, ज्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचा सूर्य  अस्तंगत झाल्यात जमा आहे. सर्व समाज भ्रष्टाचारी म्हणून त्या व्यक्तीला शिव्या शाप देतोय. सगळीकडे त्या व्यक्तीची छिथू होतेय, त्या व्यक्तीची, तिच्याशी काही घेणेदेणे नसताना तिची बाजू घेणे म्हणजे स्वतःची नाहक बदनामी करण्यासारखं नाही का? पण तरीसुद्धा मी त्या मावळत्या सूर्याची बाजू घेतोय कारण न झालेल्या "महाराष्ट्र सदन घोटाळ्यात" भुजबळांचा राजकीय बळी दिला जात आहे हे जाणवत होते. हे सारे जाणीवपूर्वक आणि बदल्याच्या राजकारणातून होत आहे हे स्पष्ट होते.
                  भुजबळांसारखा लढवय्या नेत्याचा बळी दिला म्हणजे आपल्या मार्गातील मोठा अडथळा दूर होईल, अर्थात हा बळी भुजबळांचाच का ? यासाठी इतरही बरीच कारणे आहेत. भुजबळांसारख्या ताकदवान व्यक्तीला आवाज दाबला तर बाकीचे आवाज आपोआप बंद होतील, आपल्याला विरोध करण्याची हिंमत कोणी करणार नाही अशी सत्ताधाऱयांची समजूत झाली असावी. त्याच समजुतीतून हे द्वेषाचे , सुडाचे राजकारण खेळले असावे. असे हे द्वेषाचे, सुडाचे राजकारण फार काळ टिकत नाही. नेत्यांचा आवाज दाबला तरी जनतेचा आवाज आणि रोष कोणी दाबू शकत नाही म्ह्णूनच ज्या सत्ताधाऱयांना आता पुढील पन्नास वर्षे आपलीच सत्ता राहणार याची खात्री होती त्यांना पहिली पंचवार्षिक पूर्ण व्हायच्या आतच आपले सिंहासन ढळमळीत झाल्याचा साक्षात्कार होऊ लागलाय. ज्या तथाकथित सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या लोकांनी सुपारी घेऊन भुजबळांचा राजकीय खून करायचा प्रयत्न केला, त्यांच्या आजारपणाची खिल्ली उडवली, चांगले उपचार न मिळण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे सामाजिक कार्य भुजबळांना संपवण्याइतकेच होते कि काय असा प्रश्न पडतो कारण नंतर त्यांनी कोणाविरुद्ध आवाज उठवला नाही. त्यांनाही त्यांच्या या कामाची पोचपावती मिळेल. ज्या व्यक्तीला जनतेने निवडून दिले आहे तो फक्त भुजबळांवर सूड उगवण्यापुरता बोंब  ठोकत होता व इतरवेळी गोट्या आणि दांडिया खेळत होता  त्यालाही त्याच्या कामाची पोचपावती मिळेल. ढोंगी लोकांचे ढोंग फार काळ  टिकणार नाही. वेळ लागेल पण अंतिम विजय सत्याचाच होईल.
               शेवटी पुन्हा एकदा तेच सांगतोय भुजबळ चुकले असतील, कदाचित एखादा गुन्हा त्यांच्याकडून घडला असेल पण त्यासाठी न्यायालय पुराव्याच्या आधारे त्यांना दोषी किंवा निर्दोष ठरवेल. जोपर्यंत न्यायालय त्यांना दोषी ठरवत नाही  तोपर्यंत कोणत्याही भूलथापांना बळी  पडून साप साप करत  भुई धोपटत बसू नये.  हे तेच भुजबळ आहेत ज्यांनी जनतेसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एकहाती लढा दिलाय, तुरुंगवास भोगलाय , राजकीय कारकीर्द पणाला लावली आहे. महाराष्ट्रावर वेळोवेळी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाय. संधी मिळाली तेव्हा उदाहरण म्हणून दाखवता येतील अशी  कामे केली आहेत. अगदी महाराष्ट्र सरकारचा एकही पैसा , एकही गुंठा न वापरता महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे महाराष्ट्र सदन निर्माण केले. ज्याचे कौतुक त्यांच्या विरोधकांनाही करावे लागतेय, त्याच महाराष्ट्र सदनात घोटाळ्याचा आरोप केला जातोय ही  फार मोठी शोकांतिका आहे. भुजबळ चुकले असतील, त्यांच्याकडून एखादा गुन्हाही घडला असेल पण त्यांनी केलेला संघर्ष अतुलनीय आहे. त्यांची रोमांचकारी कारकीर्द इतरांना निश्चित मार्गदर्शक ठरेल, त्यांची जीवनाच्या धड्यातुन कोणी काय घ्यायचं आणि काय नाही हे ज्याचे त्यांनी ठरवायचे आहे. 
           मा. श्री. छगन भुजबळ यांस  एकाहत्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (उगीचच गैरसमज होऊ नये म्हणून लक्ष,कोटी,अनंत असे शब्द वापरले नाहीत).                                                                                                   
                  माझे राजकीय  गुरू, पॉलिटिक्सचे  प्राध्यापक. श्री. दशरथ सावंत सरांना शिरसाष्टांग दंडवत.
                                                                                  संतोबा (संतोष गांजुरे).

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!