Ads 468x60px

Thursday, February 6, 2014

मी मुख्यमंत्री .....!

                उद्या माझा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. कसलीही पार्श्‍वभूमी नाही, मंत्रीपदाचा अनुभव नाही.आमदारकीची ही केवळ दुसरीच टर्म. आणि अचानक हा मुख्यमंत्रीपदाचा जॅकपॉट. त्यामुळे सगळीकडे माझाच उदोउदो चालू आहे. प्रत्येक न्यूज चॅनेलवर माझा कोणालाच माहीत नसलेला आतापर्यंतचा जीवनपट उलगडून दाखविण्याची अहमिका लागली आहे, काय करणार प्रश्‍न टीआरपी चा आहे. आणि मी या घडीला सर्वात जास्त  चर्चेचा विषय आहे. दररोज बातम्या मिळवणे, नाही मिळाल्या तर बातम्या तयार करणे हे मीडियाचे उद्योग.सगळी कशी भडक वर्णने, लोकांना बातम्या कळतात पण माहिती काहीच मिळत नाही. आज एवढ्या सहजासहजी एवढी मोठी लॉटरी लागली म्हणल्यावर कोण अशी सुवर्णसंधी विनाकारण सोडेल. मीही त्यांना नाराज न करता सकाळपासूनच विविध न्यूज चॅनेलसना मुलाखती देण्याचा आणि पत्रकार परिषदांचा सपाटा लावला होता, शेवटी जनतेच्या सेवेसाठीच तर आम्ही येथे आहोत.  
                पत्रकारांच्या, जनतेच्या विविध प्रश्नांना मुरब्बी राजकारण्याप्रमाणे उत्तरे देणे चालू होते, प्रश्न कितीही खोचक असला तरी शांत डोक्याने सर्व प्रश्नांची देत होतो. मला लहानपणापासूनच राजकारण्यांवर टीका करणार्‍यांचा प्रचंड राग येतो. आजकाल प्रत्येक बर्‍या-वाईट गोष्टींसाठी राजकारण्यांना जबाबदार धरण्याची (फॅशन) रीत जन्माला आली आहे. तशातच एका माथेफिरू पत्रकाराने प्रश्नांची सरबत्ती चालू केली. म्हणे आजकालचे राजकारणी वैचारिक दिवाळखोर झालेत. आपल्या पदाच्या जबाबदारीची जाण आणि कर्तव्याचे भान आजच्या राजकारण्यांना नाही. सर्व भ्रष्ट आहेत आणि त्यामुळे देशाची अधोगती होत आहे. उद्या मुख्यमंत्री झाल्यावर तुम्हाला वार्षिक ७ लाख रुपये पगार, अमाप सोयीसुविधा मिळणार त्या स्वीकारणे योग्य आहे का? त्याबरोबरच मी मुख्यमंत्रीपदासाठी किती पैसा ओतला याचाही हिशोब त्याला पाहिजे होता. काही अंशी त्याचे बरोबर असले तरी माझा पारा चढला, पण उद्याचा एक जबाबदार मुख्यमंत्री या नात्याने मह्त्प्रयासाने रागावर नियंत्रण ठेऊन मुत्सद्दीपणे जशी द्यावीत तशी उत्तरे देऊन पत्रकार परिषद आटोपती घेतली. पण तो पत्रकार आणि माझा राजकीय प्रवास काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हता.
                फार नाही दहा-पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट, माझा जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला. अनेक राजकारण्यांनी वर्षानुवर्षे शेतकर्‍यांच्या आत्महत्या,कर्जमाफी, कंगालपणाचे भांडवल करून आपआपले मतदारसंघ काबीज केले पण शेतकर्‍यांच्या नशिबी शेवटी आश्वासनाच्या उष्ट्या पत्रावळ्याच आल्या. खरे तर शेतकर्‍यांना कर्जमाफिची काही एक गरज नाहिये,आपला शेतकरी कष्टाळू आहे भिकारी नव्हे! त्यांना फ़क्त योग्य वीज,पाणी, बाजारपेठ द्या, कर्जमाफीच्या कुबड्यांची त्यांना बिल्कूल आवश्यकता नाही. बरं कर्जमाफी दिली तर ती पोहचते का त्यांचापर्यंत का मध्येच तिला पाय फुटतात.जाऊ द्या कार्यकर्ते तर गब्बर होतात ना!शेतकर्‍यांच्या आत्महत्तेशी आपले काय घेणे देणे अशीच राजकारण्यांची रीत! मुलभूत सोईसुविधाकडे लक्ष द्यायचे सोडून हे सणावाराला साड्या वाटणार, दिवाळीला साखर वाटणार, निवडणुका जवळ आला की सर्वांना फुकटात तीर्थयात्रेला नेणार.अहो ज्याचे हातावर पोट आहे अशी व्यक्तीसुद्धा  तीर्थयात्रेला जाणे शक्य नसेल तर जाणार्‍याजवळ स्वकमाईतून नारळासाठी पैसे देते. दुसर्‍याच्या कमाईचा नारळ पावणार नाही म्हणून. मग फुकटात तीर्थयात्रा करणार्‍यास देव कसा पावणार?
                दुसर्‍यांकडून बदलाची अपेक्षा करणे हा स्वत:च्या बुद्धीचा व कर्तुत्वाचा अपमान असतो, त्यामुळे न पटणार्‍या गोष्टींना विरोध करण्याचा सोडून मी त्यांच्याशी लढायचे ठरवले. विविध माध्यमांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्‍न केला, बदल घडवण्यासाठी जे शक्य होईल ते करण्याचा प्रयत्‍न केला शेवटी आमदाराकीची निवडणूकदेखील लढवली पण मला हजार मतेसुद्धा मिळाली नाहीत. शुद्ध हेतू असताना आणि एवढी मेहनत करूनदेखील एका गावगुंडासामोर झालेला माझा लाजिरवाणा पराभव माझ्या जिव्हारी लागला होता. ज्या लोकांसाठी लढतोय तेच आपल्यासोबत नाही, त्यांना काय चांगले काय वाईट हे कळत नाही म्हणल्यावर सगळे संपल्यासारखे होते, पण पराभव स्वीकारणे माझ्या रक्तातच नाही. पराभवाचे विश्लेषण केले आणि मग कुठे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचे, कुठे महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकरांचा उदोउदो करायचा हे शिकलो. कोणत्या गोष्टीला कधी पाठिंबा द्यायचा व कधी विरोध करायचा हेही शिकलो. हे सर्व करताना मला आतून वेदना व्हायच्या पण मी हेच करणार होतो कारण जिंकण्यासाठी मी तत्वांचे सत्व तात्पुरते बाजूला ठेवण्याचे ठरवले होते.
                मी विधानसभेला जिंकून येणे हे आपले लोक किती भावनाप्रधान आहेत याचा मूर्तीमंत उदाहरण. जिंकण्यासाठी मला माझ्याशीच किती तडजोड करावी लागली हे मात्र माझे मलाच माहीत. मला माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी खूप काही चांगले करायचेय आणि मी ते करणारच, त्यासाठी कायकाय पणाला लावलेय याची कल्पना देखील कोणी करू शकणार नाही. मी काही पैसा कमण्यासाठी राजकारण करत नाही त्यासाठी अनेक मार्ग आहेत त्यासाठी आयुष्य पणाला लावायची काय गरज?आणि तो दीडदमडीचा पत्रकार मला मुख्यमंत्री म्हणून मिळणार्‍या पगाराबद्दल प्रश्न विचारतो, यापेक्षा जास्त पगार तर पदवीधारकास बहुराष्ट्रीय कंपनीत सुरवातीलाच मिळतो, पण राजकारण्यांना दोष देणे हा आपण आपला मुलभूत हक्कच समजतो अगदी घरात बायको आपली ऐकत नाही त्याचा राग सुद्धा राजकारण्यांवर काढण्याची आपली मानसिकता. तो पत्रकार मला पैशांमध्ये मोजू पहात होता म्हणून मी जरा चिडलो होतो मात्र आता बर्‍यापैकी सावरलोय. पण मला एक कळत नाहीए आता जवळपास दोन तास होत आलेत त्या घटनेला, पण अद्याप त्या पत्रकाराच्या अपघाताची बातमी अजून कशी नाही आली बरे.

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!