Ads 468x60px

Tuesday, July 29, 2025

चांगभलं होता होता

चांगभलं होता होता, स्वप्ने सारी उद्ध्वस्त झाली.
अरे पुन्हा सत्तेतून हटवा, दलालांचे वाली. 

आम्ही दिल्या पोकळ आश्वासनांची, पालखी का वहावी.
जे कधी सिद्धीस जाणार नव्हते, त्याची आस का बाळगावी.
कशी जेलात जाणाऱ्यांची, मंत्रीमंडळात वर्णी लागली.

तेच जुने डाव पुन्हा टाकती, फिरुनी नवे सत्ताधारी.
तेच गळफास लावती, सिंहासनावरचे नाग विषारी.
आम्ही मात्र पोसत राहतो, त्याच त्या विषवल्ली.

अन्यायाच्या चिखलात, कशी द्वेषाची बाग फुलवती.
आम्हांवरी कारवाईची, तलवार सदा लटकती.
आम्ही ते विवेकी, ज्यांना शोषित ही ना वाली.

अशी कशी ज्याने त्याने ठेवली बुद्धी गहाण?
असा कसा जो तो जहागिरदार सत्तेस शरण?
ह्या लाचार शहेनशहांनी का पत्करली दलाली?.

उभा पक्ष झाला आता, भ्रष्टांची बंदिशाला
जिथे कलंकितांना, मंत्रिपदाचा प्रसाद मिळाला.
कसे निष्ठावंत दुर्देवी अन गद्दार भाग्यशाली.

मोकाट फिरतात अजुनी, हल्लेखोर दहशतवादी.
अजून उसवती समतेची वीण, सारे कट्टरतावादी.
आश्वासनेच जन सुरक्षतेची आम्हाला मिळाली !

                                       संतोबा ...

Wednesday, July 16, 2025

नतद्रष्ट

सारं आहे तोट्यात दाखवून, विका सर्व.
असा हा नवभारत, अन् असे हे विकासपर्व.
घोटाळेबाज दल्ले, राजरोस लुबाडती खर्व.
अन् आम्हाला केवळ, वांझोट्या गोष्टींचा गर्व.

दीन दुबळ्यांना झोडपणे, हे असे त्यांचे शौर्य.
अन् अन्यायाविरुद्धचा लढा वाटे त्यांना कौर्य.
जनतेस लावी देशोधडीला, एवढेच त्यांचे कार्य. 
कोहळा घेऊन आवळा देणे, हे त्यांचे औदार्य.

साऱ्या घोटाळ्यांचे, गाडीभर पुरावे यांच्या संग्रही.
नोटीशी पाठवून त्यांना, सोबत घेण्या हे आग्रही.
व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या संकल्पी हे निग्रही.
जे जे त्यांच्या विरोधात, ते सारे देव,धर्म,देशद्रोही.

कुबेरा श्रीमंत करण्या, ठेवती सारं काही गहाण.
काबाडकष्ट करणाऱ्याच्या वाट्यास, येई मरण. 
राक्षसी सत्ता, गडगंज संपत्तीपुढे होती सारे शरण.
पडद्या-मैदानावरचे सारे वाघही, घालती लोटांगण.

गतकाळाची ओढ यांना, नको भविष्याची पायाभरणी.
बेजबाबदार सारे,  फलद्रूप होईना यांची एकही करणी.
निष्फळता लपविती, गात गतअग्रणीच्या नावे रडगाणी.
कायदे बदलून नितीभ्रष्ट होती पावन, करण्या मनमानी.
                                       संतोबा ....

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!