Ads 468x60px

Monday, February 12, 2024

भाषण - ०२

माझ्यादृष्टीने राजकारण हे दैवी कार्य आहे, आपल्या दूरदृष्टीने लोकोपयोगी निर्णय घेऊन गोर-गरीब, दिन-दुबळ्या, शोषित-वंचित लोकांच्या जीवनात बदल घडवण्याची ताकद राजकारणात आहे. सगळ्यांना न्याय देण्याचे, सगळ्यांची सुरक्षितता, स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे कार्य राज्यसत्ता करू शकते. राजकारणात येण्याचा उद्देश राजकीयदृष्ट्या मोठ्या पदावर जाऊन ठराविक लोकांना झुकते माफ देऊन त्यांची आणि स्वतःची भरभराट करायची हा नाही. माझ्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याइतपत कमाईचे नैतिक मार्ग माझ्याकडे आहेत, राजकारणावर माझी रोजीरोटी अवलंबून नाही. मला कोणावर वर्चस्व गाजवायचे नाही किंवा कोणाला संपवायचे, उद्ध्वस्त करायचे नाही. मला सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे आजपर्यंत जात्याधारित विषमता निर्माण करण्यात आली पण मी जात्याधारित समता निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. समाजातील प्रत्येक घटकाला योग्य तो न्याय, सन्मान, सुरक्षितता, स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेन, मग तो माळी, मराठा, महार , मांग, चांभार, सुतार, लोहार, सोनार, धनगर, साळी, कोळी, तेली, वाणी, वंजारी कोणत्याही जातीचा असो. तो गरीब, श्रीमंत, नोकरदार, उद्योजक कोणीही असो. जी प्रस्थापित व्यवस्था आहे ती नाकारून काही साध्य होणार नाही, जे आहे ते स्वीकारून त्यातील दोष दूर करून, सकारात्मक बदल घडवून आपल्याला सर्वांची आर्थिक, सामजिक, शैक्षणिक प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या सर्वांना एकमेकांना मदत करायची आहे. आपल्याला एकमेकांचा तिरस्कार आणि द्वेष करायचा नाही. आपल्याला एकमेकांच्या सुखात आनंद मानायचा आहे, एकमेकांच्या दुःखात नाही. आज हे दैवी राजकारण बदनाम झालेले आहे. राजकारणी म्हणजे भ्रष्टाचारी, गुंड, दलाल, गर्भश्रीमंत अशी व्याख्या झाली आहे बहुतांश राजकारणी ही सत्ता वडिलोपार्जित संपत्ती असल्यासारखे पुढील पिढीकडे इकडे हस्तांतरित करत आहेत आणि राजकारणाची संस्थाने दिवसेंदिवस मजबूत होत आहेत. या मूठभर लोकांच्या हाती सत्ता आणि ढीगभर संपत्ती एकवटलेली आहे, या संपत्तीच्या रखवालीसाठी राजसत्तेला दावणीला बांधले आहे.एका बाजूला कुबेराला लाजवेल अशी संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला पोटाची खळगी भरण्यासाठी पाठीला पोट लागेल एवढे प्रचंड कष्ट. ही अशी भयानक असमानता आणि गरीब श्रीमंतीची फार मोठी दरी. सुदैवाने गरिबांच्या आणि श्रीमंताच्या मताची किंमत एकसमान आहे. याच शक्तिशाली मतांच्या आधारे सर्वसामान्य जनतेने आपणांस अनुकूल अशा उमेदवारास निवडून देणे गरजेचे आहे, त्यासाठी आपल्या मताचे मूल्य जाणून योग्य उमेदवारास मतदान करणे गरजेचे आहे. निरंकुश राजसत्ता ज्यावेळेस अनिर्बंधपणे कारभार करते त्यावेळेस अराजकता माजते. सर्वसामान्य जनतेच्या स्वातंत्र्यावर अनेक बंधने येतात, त्यांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असते. उद्योगधंदे उद्ध्वस्त होतात, बेरोजगारीची कुऱ्हाड सर्वसामान्य जनतेवर कोसळते. श्रमजीवी वर्ग देशोधडीला लागतो. त्याचवेळेस गर्भश्रीमंत, विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती अशा राजसत्तेचे गुणगान गात असतात कारण एकतर त्यांना कशाचीही झळ बसलेली नसते आणि लाळघोटेपणा करून आपले ईप्सित साध्य करता येते. राजसत्तेलाही त्यांच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन लोकांची दिशाभूल करायची असते. मूलभूत प्रश्न बाजूला सोडून उन्मादी वातावरण निर्माण करायला हे नामांकित लोक जबाबदार असतात अशा लोकांना त्यांच्या कलेपर्यंत मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. आज राजकारणातील नैतिकता, नितीमत्ता लयास गेली आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा मागे पडला आहे. आजचे राजकारणी राज्याच्या, सर्वसामान्य जनतेच्या हिताचा कसलाही विचार न करता एकमेकांची उणीधुनी काढण्यात धन्यता मानत आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याला राजकारण समजू लागले आहेत. मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी काहींना काही खुसपट काढून जातीय-धार्मिक तेढ वाढवून सामाजिक सलोखा बिघडवत आहेत. जे जाती-जातीचे नेते निर्माण झाले आहेत ते आपण आपल्या जातीचे उद्धारकर्ते आहोत असा आव आणतात. आपआपल्या जातीच्या महापुरुषांच्या जनमाणसांत रुजलेल्या प्रतिमेचा गैरवापर करत त्यांना जातीपातीत बंदिस्त करून, त्यांच्या विचारांशी, कार्याशी गद्दारी करून त्यांच्याबद्दल इतर समाज्यामध्ये परकेपणाची भावना निर्माण करतात. महापुरुष स्वजातीय असो वा परजातीय त्यांच्याबद्दल कोणाला फारसा आपलेपणा नसतो, त्यामुळे ते महापुरुषांचे केवळ प्रतिमापूजन करून एकप्रकारे प्रतिमाभंजन करण्याचेच कार्य करत असतात. कारण महापुरुषांची प्रतिभा आत्मसात करण्याची कुवत त्या नेत्यांमध्ये वा त्यांच्या अनुयायांमध्ये नसते. नेत्यांना महापुरुषांचा उदोउदो करत जातीसाठी माती खाण्यासाठी उन्मादी कळप निर्माण करायचा असतो आणि त्यातून केवळ मतांची बेगमी करायची असते. आज महाराष्ट्रात प्रादेशिक, भाषिक, सांस्कृतिक अस्मितेचे राजकारण करणारे ठेकेदार सत्तेवर असताना महाराष्ट्रात स्वतः च्याच राज्यात मराठी लोकांची , मराठी भाषेची हेळसांड होऊ लागली आहे. आपल्या करणीमुळे दगडाखाली अडकलेले हात सोडवण्यासाठी बिनकण्याचे नेते दिल्लीश्वरांची हुजेरेगिरी करत महाराष्ट्राला महाराष्ट्रद्रोह्यांच्या दावणीला बांधण्याचे पाप करत आहेत. स्वतः च्या घरात मराठी भाषा आणि मराठी माणूस दुय्यम ठरत आहे आणि उपरे शिरजोर होऊ लागले आहेत. थोडक्यात महाराष्ट्राची उपरे उरावर आणि घरातले वाऱ्यावर अशी गत झाली आहे. देशात सर्वच बाबतीत अग्रभागी असलेला महाराष्ट्र हळूहळू पिछाडीवर पडू लागला आहे. महाराष्ट्रातील उद्योग, प्रकल्प, वर्षानुवर्षे येथे वाढलेल्या संस्था परराज्यात जात आहेत आणि आपले नेते मूग गिळून दिल्लीश्वरांच्या हुकुमाचे ताबेदार झाले आहेत, आज नेता कितीही मोठ्या पदावर असला तरी त्याला राज्याचा हिताचा निर्णय घेण्याची, महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत नाही ते केंद्राच्या हातचे बाहुले बनले आहेत. थोडक्यात काम सोयऱ्याचे आणि नाव नवऱ्याचे अशा पद्धतीचा राज्यकारभार सध्या चालू आहे. राजकारणाबाबत आपण फार उदासीन आहोत, राजकारण वाईट आहे म्हणून आपण राजकीय प्रक्रियेत सहभागी होत नाही. आपल्या लक्षात येत नाही राजकारण ही व्यवस्था केवळ आपल्या सर्व पायाभूत गरजाच नाही तर आपल्या जगण्यामरण्याला कारणीभूत असते. शिक्षण, आरोग्य, वाहतुकव्यवस्था, पेयजल व्यवस्था, अन्नधान्य याची गुणवत्ता आणि उपलब्धता, पिठामिठाची, औषधांची एकूणच जगण्यामरण्याचे मोल राजकीय आणि प्रशासकीय पदावर असलेली लोकं विघातक की विधायक विचारसरणीची आहेत यावर आणि त्यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयांवर अवलंबून असते. राजकारणाचा द्वेष न करता आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे राजकीय प्रक्रियेत सहभागी व्हावी लागेल अन्यथा आपल्या आयुष्याचे निर्णय दूरदृष्टी नसलेले आणि भांडवलशाहीच्या हातचे बाहुले बनलेले लोकं घेतील आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागतील. झाले गेले विसरून चला आपण सर्व एकजूट होऊन एक नवा सशक्त मराठी महाराष्ट्र घडवूया, जिथे बालकांना चांगले शिक्षण मिळेल, तरुण-तरुणींना कौशल्यानुसार रोजगार आणि त्याचा योग्य मोबदला मिळेल. वृद्धांना आधार, सुरक्षितता देता येईल. आपले निर्णय आपल्या घेता येतील. जोपर्यंत लोकशाही अस्तित्वात आहे तो पर्यंत आपल्या बहुमूल्य मत वाया घालवू नका. स्वतः राजकीयदृष्ट्या साक्षर व्हा आणि इतरांनी साक्षर करा. आपल्या आणि एकूणच मानवजातीच्या कल्याणासाठी आपण सर्व लोकशाहीच्या माध्यमातून एकत्र येऊया!

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!