या लोकांच्या हातात तलवारी, बंदूका नाहीत, या लोकांनी कोणावरही आक्रमण केलेले नाही. मग एवढा फौजफाटा कशासाठी?. एवढा फौजफाटा त्यांना रोखण्यासाठी तैनात करावा लागण्याइतपत हे लोक डेंजर - धोकादायक आहेत का?. हे लोक आपल्या अस्तित्वासाठी हक्कासाठी एकत्र आले आहेत. आपली मालकी हक्काची घरे, शेतजमीन, संसार वाचवण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देणे गुन्हा आहे का?. दुपारच्या रखरखत्या उन्हात वृद्ध, महिला, असाह्य शेतकऱ्यांवर आपण गुन्हेगारांवर कारवाई करतोय अशा प्रकारे अमानुष लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने केला गेला?. आपल्या हक्काची जाणीव असलेला व्यक्ती सत्ताधाऱ्यांसाठी धोकादायक असतो. सत्ताधारी एकवेळ गुन्हेगारांना सोडतील पण आपल्या हक्काची जाणीव असलेल्या व्यक्तीला कदापी सोडणार नाहीत. सात-आठ वर्षापासून चाललेल्या या संकटाच्या धसक्याने बाधीत गावातील काही व्यक्ती दगावल्या आहे. थोडाबहुत शिल्लक असलेला निसर्ग ओरबाडून, भूमिपुत्रांवर जबरदस्तीने परागंदा व्हायला भाग पाडण्याच्या प्रयत्न करणारी ही मोगलाई कोणाच्या भल्यासाठी आहे. भांडवलदारांचे हितसंबंध आणि दलालांचे लागेबांधे कष्टकरी बळीराजाच्या जीवावर बेतले आहेत. हा प्रकल्प करण्याची निकड आणि तो इथेच करण्याचा हट्ट का आहे?.
गेल्या सात-आठ वर्षात एकदाही कोणाला निर्हेतुकपणे येथील भूमिपुत्रांशी सल्लामसलत करायची गरज वाटली नाही. जे आले ते केवळ प्रकल्पाची वकिली करण्यासाठी आले. कोणीही आम्हाला विकासाचे गाजर दाखवू नका, बळीराजाची, भूमिपुत्रांची कोणाला किती फिकीर आहे त्याचे कौतुक आम्हाला सांगू नका आणि आमच्या भल्याचा बाजारगप्पाही मारू नका, तुम्हाला आमची किती काळजी आहे ते आम्ही जाणतो. शेतीमाल परदेशी निर्यात करता येईल ही थाप मारण्यापूर्वी शेतीसाठी मुबलक वीज,पाणी याची व्यवस्था केली आहे का? बोगस बियाणे, बोगस रासायनिक खते, बोगस तणनाशक, बोगस कीटकनाशके यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय प्रयत्न केले आहेत का?. आणि सर्वात महत्वाचे आम्ही भूमिहीन झाल्यावर शेती कुठे आणि कशी करणार? अंतराळात शेती करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे का?. तुमच्या पोकळ आश्वासनाने आमच्या पुढील जगण्याची कठीण आव्हाने संपणार नाहीत. ज्यांचा शेती हा धर्म अन् कर्म आहे त्यांच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. त्याचबरोबर अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर घटकांचाही हा प्रश्न आहे. या संकटाची जाणीव त्यांनाही होणे गरजेचे आहे आणि हा लढा त्यांचाही व्हायला हवा.
या ब्रह्म राक्षसापुढे निसर्ग मूक आहे आणि भूमिपुत्र हतबल आहे. निसर्गावर बुलडोझर चालवून तुम्ही तो उद्ध्वस्त कराल पण निसर्ग सर्वशक्तिमान आहे तो तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. निसर्गाचा आणि भूमिपुत्रांचा तळतळाट तुमच्या सर्वनाशास कारणीभूत ठरेल एवढा अन्याय करू नका. या प्रकल्पाची झळ फक्त बाधित भूमिपुत्रांना बसणार नाहीतर आजुबाजूच्या सर्वांनाच बसणार आहे. पैशाच्या जोरावर साऱ्याच गोष्टी विकत घेता येत नाही, नैसर्गिक साधनस्रोत मर्यादित आहेत. आधीच पाण्याची विजेची टंचाई आहे. पाणी आणि विजेसाठी उद्योगधंद्यांना प्राथमिकता दिली जाते आणि शिल्लक राहिल्यावर शेतीसाठी. त्याचप्रमाणे विकासाच्या पंचपक्वानांवर भांडवलदार आणि दलाल ताव मारतील आणि सर्वसामान्यांच्या वाट्याला उष्ट्या पत्रावळी येतील. या प्रकल्पाला संपूर्ण जिल्ह्यातील लोकांनी विरोध करणे गरजेचे आहे. आज शहरात रहदारीचा प्रश्न भेडसावत आहे, जगात रहदारीच्या बाबतीत पुणे चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्याबरोबरीने वर्षागणिक येथील प्रदूषण आणि तापमान वाढत आहे. शहरात लोकांनी कोटीमध्ये किंमत असलेले फ्लॅट घेतले आहेत पण पायभूत सुविधांचा बोजवारा वाजला आहे आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, निर्भेळ अन्न कितीही पैसे देऊन विकत मिळणार नाही आणि पर्यायाने निरोगी शरीर आणि आरोग्यही मिळणार नाही.
हा निसर्ग भकास करून होणारा विकास भांडवलदार आणि दलाल वगळता कोणाच्याही फायद्याचा नाही. त्यामुळे सर्वांनी आपआपल्यापरीने विरोध आणि घटनेचा निषेध करायला हवा. सध्या चाललेला भूमिपुत्रांचा तीव्र विरोध जर दुर्दैवाने शासनप्रशासनाने बळजबरीने चिरडला तर पुढे होणारा विध्वंस कोणालाही थांबवता येणार नाही. वेळ निघून गेल्यानंतर उपरती होऊन काहीही फायदा होणार नाही. आणि कोणी कितीही प्रामाणिक प्रयत्न केले तरी त्याची भरपाई होऊ शकणार नाही. आज जे हा प्रकल्प राबवण्यासाठी झटत आहेत तेही कोणाचे ना कोणाचे प्यादे आहेत, त्यांना तात्पुरता फायदा होईल पण कधी ना कधी त्यांनाही पश्चात्ताप करायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. जे प्रकल्पाचे समर्थन करत आहेत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा. त्यांनी तात्पुरता फायद्याच्या विचार न करता शाश्वत फायद्याचा विचार करायला हवा. परक्यांना आपल्या उरावर बसू देऊ नका, येणाऱ्या पिढ्यांचा विचार करा. त्यांच्यासाठी काहीतरी वारसा जपून ठेवा. आपल्याच गावात, तालुक्यात त्यांना उपरे म्हणून कोणाच्या हाताखाली हमाली करायची वेळ येऊ देऊ नका.
शेवटी शासन प्रशासनाला विनंती आहे, हा भूमिपुत्रांवरचा जुलमी अत्याचार त्वरित थांबवावा. हा बळजबरीचा विकास त्यांच्या माथी मारू नका. तुमची विकासाची तळमळ ज्यांना अशा विकासाची आवड आहे त्या ठिकाणी दाखवा. या भूमिपुत्रांच्या स्वातंत्र्याची, सार्वभौमत्वाची, हक्काची, न्यायाची बूज राखा. त्यांच्या आत्मसन्माला, मानवीहक्कांना ठेच पोहचेल असे दुष्कृत्य करू नका. छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मभूमीचा दैदिप्यमान वारसा तसेच जी आय मानांकन असलेला अंजीर, सीताफळ, डाळिंब, वाटाणा इत्यादी दर्जेदार फळांची, माळव्याची निर्यात करणाऱ्या भूमीचा वारसा त्यांना जपू द्या. खरंतर या मातीच्या कर्तृत्वाचा दैदिप्यमान इतिहास अन् वारसा जपण्याचे कर्तव्य केवळ येतील भूमिपुत्रांचेच नाहीतर भारत देशातील सर्व विवेकवादी देशप्रेमींचे आहे, एवढा जाज्वल्य इतिहास असताना तुम्ही हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करून गद्दारीचा शिक्का तुमच्या भाळी लागण्याचे पाप घेऊ नका, तुमच्या येणाऱ्या शेकडो पिढ्यांना हा गद्दारीचा शिक्का नाईलाजाने मिरवावा लागल्यावर ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहतील काय?.
संतोबा (संतोष गांजुरे)...