Ads 468x60px

Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Wednesday, November 26, 2025

प्रवाहपतित सेलेब्रिटी

                        क्रिकेट, राजकारण आणि सिनेसृष्टीचे भारतीय समाजाला प्रचंड आकर्षण आहे. या क्षेत्रात यशस्वी होणाऱ्या व्यक्तींचे भरपूर कट्टर अनुयायी तयार होत असतात विशेषतः सिनेसृष्टी आणि क्रिकेट. या सेलिब्रिटी सिनेकलावंत आणि क्रिकेटपटूंचे चाहते सेलिब्रिटींच्या अनेक बऱ्यावाईट गोष्टींचे समर्थन आणि अनुकरण करत असतात. आवडत्या सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी ते अनेक दिव्य पार करत असतात, त्यांच्यासाठी वेळ आणि पैसे खर्च करत असतात तर काहीजण त्यांच्यासाठी जीव द्यायला मागे पुढे पाहत नाही. त्यांना अगदी देवत्व बहाल करतात. अशा पाठीराख्यांमुळे सिनेमा किंवा क्रिकेटमध्ये यशस्वी होणाऱ्याला त्याच्या प्रतिभेच्या कित्येक पटीने मोबदला आणि नावलौकिक मिळत असतो. या सेलिब्रिटींच्या जीवनशैलीचा प्रभाव त्यांच्या चाहत्यांवर पडत असतो, ते त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते त्यांचे दिसणे असो, ते वापरत असलेली उत्पादने असो. प्रसिद्ध व्यक्तींनी अंगिकारलेल्या चांगल्या वाईट सवयींना, कृतींना सामाजिक प्रतिष्ठा मिळत असते. त्यांच्या कृतींचे सर्वसामान्य व्यक्तींकडून अनुकरण केले जाते. त्यामुळे सेलिब्रिटींच्या प्रसिद्धीचा वापर करून उद्योजकाने आपली उत्पादनांची जाहिरात न केली तरच नवल. त्यामुळे पाण्यासारखा पैसा ओतून व्यावसायिक लोकं सेलिब्रिटी कडून आपल्या मालाची जाहिरात करत असतात. गडगंज श्रीमंत असलेला सेलिब्रिटी त्याच्यादृष्टीने क्षुल्लक असलेल्या रकमेपायी लोकांच्या आरोग्यास हानिकारक असलेल्या एखाद्या गोष्टीची जाहिरात करताना त्याच्या चाहत्यांचा, सामाजिक बांधिलकीचा विचार करत नाही. मग ती जाहिरात पान मसाल्याच्या नावाखाली गुटख्याची असो, सोड्याचा नावाखाली दारूची असो, खेळाच्या नावाखाली जुगाराची असो, श्रमपरिहार, उत्साहवर्धकपेयांच्या नावाखाली हानिकारक शीतपेयांची असो. आपल्या मुळे किती कुटुंबे उद्ध्वस्त होईल याचा सारासार विचार सेलिब्रिटी करत नाही. सर्वसामान्य लोकं आपला चरितार्थ चालवण्यासाठी नोकरीधंदा करतात, तो करताना काही तडजोडी करतात, प्रसंगी मानापमान सहन करतात पण एका मर्यादेपलीकडे आत्मसन्मान विकून पैसे कमवत नाही. पण या गडगंज सेलिब्रिटींची नेमकी काय अगतिकता असते की ती असली अनैतिक कामे करायला सहज तयार होतात.                    
                        खरंतर कोणताही सिनेअभिनेता सिनेरसिकांशिवाय मोठा होऊ शकत नाही, कोणताही खेळाडू , क्रिकेटपटू क्रिडा चाहत्यांशिवाय, प्रेक्षकांशिवाय मोठा होऊ शकत नाही. कोणताही राजकीय नेता कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्याशिवाय मोठा होऊ शकत नाही. आपण ह्या लोकांना देवत्व प्राप्त करून देतो.त्यांची लार्जर दॅन लाइफ अशी आभासी प्रतिमा निर्माण करतो. कधी ही व्यक्ती राजकीय नेता, प्रसिद्ध अभिनेता, खेळाडू, प्रशासकीय अधिकारी किंवा तथाकथित सामाजिक कार्यकर्ता असू शकतो. कलेचा, कलाकाराचा सन्मान करता करता त्या कलाकारांमधील माणसाचा सन्मान करू लागतो पण आपण हा विचार करत नाही की तो माणूस सन्मान करण्याच्या योग्यतेचा आहे की नाही. पडद्यावर नायकाची भूमिका साकारणारा, भ्रष्ट, अन्याय व्यवस्थेला नडणारा, आपल्या चतुरस्त्र अभिनयाने भूमिका जिवंत करणारा चांगला कलाकार, चांगला माणूस असेलच असे नाही. आपल्या कौशल्याने आपल्या संघाला जिंकून देणारा चांगला खेळाडू माणूस म्हणून चांगला असेलच असे नाही. सातत्याने निवडून येणारा, लोकांना आपण त्यांचा तारणहार आहोत असा भासवणारा लोकप्रिय नेता चांगला माणूस असेल असे नाही. खरंतर नेत्यांनी धर्माचा, अभिनेत्यांनी नशेचा अन् खेळाडूंनी जुगाराचा बाजार मांडला आहे.अभिनय, खेळ, राजकारण हा त्या लोकांचा व्यवसाय, पेशा आहे. कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी त्या व्यवसायाला गरजेची असणाऱ्या कौशल्यात निपुण, निष्णात असणे ही त्या व्यवसायात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे आणि ती साध्य करण्यासाठी काही लोकं जीवतोड मेहनत करतात तर काही लोकांना ती कला अंगभूत जन्मजात स्वरूपात लाभते. ज्यावेळी कलेची देणगी अंगभूत, जन्मजात स्वरूपात लाभते त्यावेळी तिचा दर्जा(क्लास) हा वेगळाच असतो आणि अशा जन्मजात कलाकौशल्याची देणगी लाभलेल्या कलाकाराला, खेळाडूला सर्वसामान्य लोकं देवत्व बहाल करतात.
                     सिनेमाच्या माध्यमातून भ्रष्ट, अन्याय्य व्यवस्थेशी, सरकारशी दोन हात करणारा, सत्यासाठी, न्यायासाठी लढणारा, गुंडांशी दोन हात करणारा, निरपेक्षपणे दीन दुबळ्यांची बाजू घेणारा, त्यांना मदत करणारा, नैतिकची चाड असणारा आणि त्यासाठी प्रसंगी आपल्या प्रियजनांशी उभा दावा मांडणारा (पंगा घेणारा) एखादा अभिनयसम्राट, अँग्री यंग मॅन प्रत्यक्ष जीवनात व्यवस्थेला शरण गेलेला, कुठल्यातरी प्रकरणात अडकलेला आणि त्यातून सुटका व्हावी म्हणून सत्ताधाऱ्यांची तळी उचलणारा एक कणाहीन, लाचार व्यक्ती असतो. दैवी प्रतिभा लाभलेला खेळाडू, गायक, गायिका, साहित्यिक कधीही आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी करत नाही मात्र स्वतःच्या फायद्यासाठी नैतिकता गुंडाळून अधिकचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतो. कधी टॅक्स भरण्यातून सूट मिळवण्यासाठी, कधी सरकारी भूखंड मिळवण्यासाठी, स्वतःच्या संस्थेसाठी निधी मिळवण्यासाठी, पुरस्कार मिळवण्यासाठी, तर कधी आपले अपराध लपविण्यासाठी करत असतो. सत्तेविरुद्ध, व्यवस्थेविरुद्ध बोलून अडचणीत येऊ नये, आपली रोजीरोटी संकटात येऊन नये म्हणून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर, अडचणीवर मूग गिळून गप्प बसणारे सेलिब्रिटी सरकार अडचणीत आल्यावर मात्र सरकारची वकिली आणि जनतेला उपदेशाचे डोस द्यायला तत्पर असतात. सेलिब्रिटींना जर देशातल्या अराजकतेवर एक चकार शब्द उच्चारणारता येत नसेल तर त्यांनी लोकांना उपदेशाचे डोस देऊ नये आणि शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीतही पडू नये. जनता त्यांचा लढा स्वतः लढेल.           
                          खरंतर जनमाणसावर प्रभाव पाडणाऱ्या क्षेत्रातील सेलिब्रिटींनी (प्रभावशाली लोकांनी),समाजात वावरताना किमान नैतिकता बाळगावी अशी अपेक्षा असते. जेणेकरून त्यांना आदर्श मानणारी लोकं त्यांच्या वागण्याचा आदर्श घेतील. सरसकट सर्वच सेलिब्रिटी नाही पण किमान ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे आणि त्यांच्या आणि इतरही क्षेत्रातील लोक त्यांना आपला आदर्श मानतात, त्यांची कोणाशी स्पर्धा नाही अशा अद्वितीय प्रतिभा असलेल्या सेलिब्रिटींकडून समाजहिताची भूमिका घेणे अपेक्षित असते. एवढेच काय सरकारचा एखादा चुकीचा निर्णय बदलण्याचा, सरकारची ध्येय-धोरणे सुधारण्याची ताकद अशा सेलिब्रिटींमध्ये असते कारण त्यांना मोठ्या जनसमुदायचे पाठबळ असते पण भारतातील बहुतांश सेलिब्रिटींनी आपआपल्याला क्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलेले असले तरी प्रत्यक्ष राजकीय- सामाजिक जीवनात हे सेलिब्रिटी भयंकर खुजे आहेत. सर्वसामान्य जनता स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध आपापल्या परीने लढत असते पण हे सेलिब्रिटी जनतेसाठी सोडा स्वतःच्या आत्मसन्मासाठी देखील भूमिका घेत नाही एवढे हे लाचार आणि असहाय्य आहेत. त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे, व्यवस्थेला गोत्यात आणू शकणारी आपली भूमिका, आपले विचार जाहिर केले तर होणाऱ्या परिणामाची जाण त्यांना आहे. व्यवस्थेच्या, सत्तेच्या विरोधात गेलो तर प्रवाहाच्या बाहेर पडण्याची भीती आहे कारण सत्तेच्या अन् व्यवस्थेच्या अव्यवस्थेची भलामण करणाऱ्यालाच सत्ता, व्यवस्था पुरस्कृत करते. जे सत्तेची, व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना सत्ता अन् व्यवस्था बहिष्कृत करते. आपण प्रवाहाच्या बाहेर पडू, एकटे पडू अडचणीत येऊ, सगळी प्रतिष्ठा, प्रसिध्दी, पैसा धुळीस मिळू नये म्हणून कायम हा ही चांगला तो ही चांगला अशी सोईस्कर भूमिका घेण्याचा अभिनय ते लीलया पार पाडतात. अमाप पैसा, प्रसिद्धी, लोकांचे पाठबळ, नैतिकतेचे पाठबळ असताना चुकीला चूक म्हणता येत नसेल, अन्यायाला विरोध करता येत नसेल अन् न्यायाची बाजू घेता येत नसेल तर या सेलिब्रिटींची अलौकिक प्रतिभा व्यर्थ आहे. 
                      चित्रपटातून, खेळामधून, गाण्यांमधून आपल्याला क्षणिक आनंददायी अनुभव(फिलगुड फॅक्टर) मिळतो, पण हा क्षणिक आनंददायी अनुभव आपल्या मूलभूत अडचणी सोडवत नाही. ज्या महापुरुषांमुळे आपल्या आयुष्यात चांगला बदल घडला आहे त्यांना आपण कवडीची किंमत देत नाही पण शेळपट सेलिब्रिटींना आपण देवत्व बहाल करतो. कायम चर्चेत, बातम्यात असणारे, चित्रपटगृहाच्या आणि टीव्हीच्या पडद्यावर कायम दिसणारे लोक हळूहळू सेलेब्रिटी बनतात. सध्या त्यात इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्यांची भर पडलेली आहे. ज्या लोकांच्या प्रेमामुळे आपल्याला मानसन्मान, प्रसिद्धी पैसा मिळाला आहे, ज्यांच्यामुळे सगळ्या सुख सुविधा असलेले विशेष जीवन उपभोगतोय त्या लोकांच्या गरजेपोटी ठाम भूमिका घेण्याएवढी हिंमत सेलिब्रिटींमध्ये नसेल आणि ते केवळ प्रवाहाबरोबर वाहवत जाणारे असतील तर अशा शेंदूर लावून देवत्व बहाल केलेल्या सेलिब्रिटी दगडांचा शेंदूर आपण खरवडून त्यांचे पाय मातीचेच आहेत हे सत्य स्विकारला हवे. हे सेलिब्रिटी म्हणजे कोणी दुसरे तिसरे कोणी परग्रहावरची लोकं नसून तुमच्या आमच्या सारखेच सर्वसामान्य लोकं आहेत. त्यांच्याशी आपण आपला संबंध हा त्यांच्या कलेपुरता मर्यादित ठेवावा. त्यांना खास वागणूक देऊन व्हीआयपी संस्कृती वाढू देऊ नये. त्यांच्यासाठी कायदे नियम धाब्यावर बसवून अतिरिक्त लाभ मिळू देऊ नका. या व्हीआयपी संस्कृतीचा आणि त्यांना मिळणाऱ्या विशेषाधिकारांचा, अतिरिक्त लाभांचा त्रास आपल्यालाच होणार आहे, नुकसान आपलेच होणार आहे. या दिखाऊ, कचाकड्याच्या बाहुल्या आपल्यासाठी सेलेब्रिटी नाहीत. आपल्यासाठी लढणारा, अन्याय्य व्यवस्थेला नडणारा, स्वातंत्र्याची, समतेची, न्यायाची चाड असणारा, विवेकवादी समाज घडवणारा व्यक्तीच आपला खरा सेलेब्रिटी आहे.
                                                          संतोबा (संतोष गांजुरे).

Sunday, May 4, 2025

पुरंदर विमानतळ - शासन प्रशासनाची मनमानी

             या लोकांच्या हातात तलवारी, बंदूका नाहीत, या लोकांनी कोणावरही आक्रमण केलेले नाही. मग एवढा फौजफाटा कशासाठी?. एवढा फौजफाटा त्यांना रोखण्यासाठी तैनात करावा लागण्याइतपत हे लोक डेंजर - धोकादायक आहेत का?. हे लोक आपल्या अस्तित्वासाठी हक्कासाठी एकत्र आले आहेत. आपली मालकी हक्काची घरे, शेतजमीन, संसार वाचवण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देणे गुन्हा आहे का?. दुपारच्या रखरखत्या उन्हात वृद्ध, महिला, असाह्य शेतकऱ्यांवर आपण गुन्हेगारांवर कारवाई करतोय अशा प्रकारे अमानुष लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने केला गेला?. आपल्या हक्काची जाणीव असलेला व्यक्ती सत्ताधाऱ्यांसाठी धोकादायक असतो. सत्ताधारी एकवेळ गुन्हेगारांना सोडतील पण आपल्या हक्काची जाणीव असलेल्या व्यक्तीला कदापी सोडणार नाहीत. सात-आठ वर्षापासून चाललेल्या या संकटाच्या धसक्याने बाधीत गावातील काही व्यक्ती दगावल्या आहे. थोडाबहुत शिल्लक असलेला निसर्ग ओरबाडून, भूमिपुत्रांवर जबरदस्तीने परागंदा व्हायला भाग पाडण्याच्या प्रयत्न करणारी ही मोगलाई कोणाच्या भल्यासाठी आहे. भांडवलदारांचे हितसंबंध आणि दलालांचे लागेबांधे कष्टकरी बळीराजाच्या जीवावर बेतले आहेत. हा प्रकल्प करण्याची निकड आणि तो इथेच करण्याचा हट्ट का आहे?.

                    गेल्या सात-आठ वर्षात एकदाही कोणाला निर्हेतुकपणे येथील भूमिपुत्रांशी सल्लामसलत करायची गरज वाटली नाही. जे आले ते केवळ प्रकल्पाची वकिली करण्यासाठी आले. कोणीही आम्हाला विकासाचे गाजर दाखवू नका, बळीराजाची, भूमिपुत्रांची कोणाला किती फिकीर आहे त्याचे कौतुक आम्हाला सांगू नका आणि आमच्या भल्याचा बाजारगप्पाही मारू नका, तुम्हाला आमची किती काळजी आहे ते आम्ही जाणतो. शेतीमाल परदेशी निर्यात करता येईल ही थाप मारण्यापूर्वी शेतीसाठी मुबलक वीज,पाणी याची व्यवस्था केली आहे का? बोगस बियाणे, बोगस रासायनिक खते, बोगस तणनाशक, बोगस कीटकनाशके यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय प्रयत्न केले आहेत का?. आणि सर्वात महत्वाचे आम्ही भूमिहीन झाल्यावर शेती कुठे आणि कशी करणार? अंतराळात शेती करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे का?. तुमच्या पोकळ आश्वासनाने आमच्या पुढील जगण्याची कठीण आव्हाने संपणार नाहीत. ज्यांचा शेती हा धर्म अन् कर्म आहे त्यांच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. त्याचबरोबर अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर घटकांचाही हा प्रश्न आहे. या संकटाची जाणीव त्यांनाही होणे गरजेचे आहे आणि हा लढा त्यांचाही व्हायला हवा. 

                   या ब्रह्म राक्षसापुढे निसर्ग मूक आहे आणि भूमिपुत्र हतबल आहे. निसर्गावर बुलडोझर चालवून तुम्ही तो उद्ध्वस्त कराल पण निसर्ग सर्वशक्तिमान आहे तो तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. निसर्गाचा आणि भूमिपुत्रांचा तळतळाट तुमच्या सर्वनाशास कारणीभूत ठरेल एवढा अन्याय करू नका. या प्रकल्पाची झळ फक्त बाधित भूमिपुत्रांना बसणार नाहीतर आजुबाजूच्या सर्वांनाच बसणार आहे. पैशाच्या जोरावर साऱ्याच गोष्टी विकत घेता येत नाही, नैसर्गिक साधनस्रोत मर्यादित आहेत. आधीच पाण्याची विजेची टंचाई आहे. पाणी आणि विजेसाठी उद्योगधंद्यांना प्राथमिकता दिली जाते आणि शिल्लक राहिल्यावर शेतीसाठी. त्याचप्रमाणे विकासाच्या पंचपक्वानांवर भांडवलदार आणि दलाल ताव मारतील आणि सर्वसामान्यांच्या वाट्याला उष्ट्या पत्रावळी येतील. या प्रकल्पाला संपूर्ण जिल्ह्यातील लोकांनी विरोध करणे गरजेचे आहे. आज शहरात रहदारीचा प्रश्न भेडसावत आहे, जगात रहदारीच्या बाबतीत पुणे चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्याबरोबरीने वर्षागणिक येथील प्रदूषण आणि तापमान वाढत आहे. शहरात लोकांनी कोटीमध्ये किंमत असलेले फ्लॅट घेतले आहेत पण पायभूत सुविधांचा बोजवारा वाजला आहे आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, निर्भेळ अन्न कितीही पैसे देऊन विकत मिळणार नाही आणि पर्यायाने निरोगी शरीर आणि आरोग्यही मिळणार नाही. 

                हा निसर्ग भकास करून होणारा विकास भांडवलदार आणि दलाल वगळता कोणाच्याही फायद्याचा नाही. त्यामुळे सर्वांनी आपआपल्यापरीने विरोध आणि घटनेचा निषेध करायला हवा. सध्या चाललेला भूमिपुत्रांचा तीव्र विरोध जर दुर्दैवाने शासनप्रशासनाने बळजबरीने चिरडला तर पुढे होणारा विध्वंस कोणालाही थांबवता येणार नाही. वेळ निघून गेल्यानंतर उपरती होऊन काहीही फायदा होणार नाही. आणि कोणी कितीही प्रामाणिक प्रयत्न केले तरी त्याची भरपाई होऊ शकणार नाही. आज जे हा प्रकल्प राबवण्यासाठी झटत आहेत तेही कोणाचे ना कोणाचे प्यादे आहेत, त्यांना तात्पुरता फायदा होईल पण कधी ना कधी त्यांनाही पश्चात्ताप करायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. जे प्रकल्पाचे समर्थन करत आहेत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा. त्यांनी तात्पुरता फायद्याच्या विचार न करता शाश्वत फायद्याचा विचार करायला हवा. परक्यांना आपल्या उरावर बसू देऊ नका, येणाऱ्या पिढ्यांचा विचार करा. त्यांच्यासाठी काहीतरी वारसा जपून ठेवा. आपल्याच गावात, तालुक्यात त्यांना उपरे म्हणून कोणाच्या हाताखाली हमाली करायची वेळ येऊ देऊ नका. 

                  शेवटी शासन प्रशासनाला विनंती आहे, हा भूमिपुत्रांवरचा जुलमी अत्याचार त्वरित थांबवावा. हा बळजबरीचा विकास त्यांच्या माथी मारू नका. तुमची विकासाची तळमळ ज्यांना अशा विकासाची आवड आहे त्या ठिकाणी दाखवा. या भूमिपुत्रांच्या स्वातंत्र्याची, सार्वभौमत्वाची, हक्काची, न्यायाची बूज राखा. त्यांच्या आत्मसन्माला, मानवीहक्कांना ठेच पोहचेल असे दुष्कृत्य करू नका. छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मभूमीचा दैदिप्यमान वारसा तसेच जी आय मानांकन असलेला अंजीर, सीताफळ, डाळिंब, वाटाणा इत्यादी दर्जेदार फळांची, माळव्याची निर्यात करणाऱ्या भूमीचा वारसा त्यांना जपू द्या. खरंतर या मातीच्या कर्तृत्वाचा दैदिप्यमान इतिहास अन् वारसा जपण्याचे कर्तव्य केवळ येतील भूमिपुत्रांचेच नाहीतर भारत देशातील सर्व विवेकवादी देशप्रेमींचे आहे, एवढा जाज्वल्य इतिहास असताना तुम्ही हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करून गद्दारीचा शिक्का तुमच्या भाळी लागण्याचे पाप घेऊ नका, तुमच्या येणाऱ्या शेकडो पिढ्यांना हा गद्दारीचा शिक्का नाईलाजाने मिरवावा लागल्यावर ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहतील काय?. 

                                  संतोबा (संतोष गांजुरे)...

Tuesday, January 14, 2025

संघटीत गुन्हेगारीचा फास

                सरकार कोणाचेही असले तरी गुन्हेगारी समूळ नष्ट होऊ शकत नाही. रागा-लोभातून घडणारे वैयक्तिक गुन्हे बऱ्याचदा उत्स्फूर्त(spontaneous) असतात. अशा गुन्हेगारीला शासन-प्रशासन कोणीच पूर्णपणे रोखू शकत नाही. गुन्हेगारांना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा देऊन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक ठेऊन अशा उत्स्फूर्त वैयक्तिक गुन्ह्यांवर सरकार काही अंशी नियंत्रण ठेवू शकते. अर्थात यासाठी सरकारचा कारभार समाजाभिमुख असायला हवा आणि सरकारची गुन्हे रोखण्याची इच्छाशक्ती असायला हवी. त्याचबरोबर सक्षम पोलिसयंत्रणा, स्वायत्त न्यायव्यवस्था असायला हवी म्हणजे गुन्हेगार कितीही मोठा असला, त्याचे कोणाशीही लागेबंध असले तरी प्रशासनाला तो डोईजड होणार नाही आणि त्यांना योग्य ती शिक्षा देता येईल. दुसऱ्या प्रकारची गुन्हेगारी संघटीत गुन्हेगारी आहे जी पूर्वनियोजित आणि समाजाला अत्यंत धोकादायक आहे.  Measure for Measure या शेक्सपियरच्या नाटकात एक वाक्य आहे  'काहींचा पापाने उत्कर्ष होतो, तर काहींचा पुण्याने ऱ्हास!' (Some rise by sin, and some by virtue fall). आजकाल पापाने उत्कर्ष होण्याचा काळ आहे. श्रीरामांनी म्हणले आहेच 'ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना तिनका कौआ मोती खाएगा'. 

                      नीतिमत्तेने आयुष्यभर कष्ट करणाऱ्याला त्याची कमाई दैनंदिन गरजा भागवण्यात खर्ची पडते, महिन्याचा खर्च भागत नाही अन् त्याचा हिशोब लागता लागत नाही त्यामुळे त्याच्याकडे अडीअडचणीला उपयोगी पडण्यासाठी काही ठेव शिल्लक उरत नाही. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला अनैतिक धंदे करणारे गैरमार्गाने खोऱ्याने पैसा ओढत असतात. बेहिशोबी उधळपट्टी करत असतात. ज्ञान तेथे मान अर्थात विद्वान सर्वत्र पूज्यते अशी उक्ती आहे पण सत्ता, संपत्ती ज्याचाकडे आहे त्यालाच मानमतराब, प्रतिष्ठा मिळतो भले ती संपत्ती, सत्ता वाममार्गाने मिळवलेली असो. आडमार्गाने अल्पकाळात कमावलेली संपत्ती त्यामुळे तिचा  झगमगाट अन छानछौकी ओघाने आलीच, सोशल  मीडियावर चिथावणीखोर व्हिडिओ व्हायरल करणे, दहशत निर्माण करण्यासाठी आणि तुरुंगातून सुटका झाल्यावर रॅली काढणे, वाढदिवसाचे परिसरात मोठमोठे फ्लेक्स लावणे, तलवारीने केक कापणे हा सगळा डामडौल पाहून नाही रे गटातील उपेक्षित तरुणांना, identity crisis असलेल्यांना त्याची भुरळ न पडली तरच नवल. गुन्हेगारीचा प्रभाव समाजातील तरुण वर्गावर पडतो आणि ते अशा टोळ्यांकडे आकर्षित होतात. गुन्हेगारांचे असे हे उदात्तीकरण समाजासाठी घातक आहे. नाही रे गटाच्या कोयता गँग, चड्डी गँग, अमुक ग्रुप, तमुक ग्रुप काही काळासाठी दहशत माजवतात, त्यांचा आवाका मर्यादित असतो अन् काही दिवसात अशा हंगामी गँग संपतात कारण त्यांच्यावर प्रशासकीय व्यवस्थेवर हुकूमत असलेल्या आकाचा वरदहस्त नसतो. वाटमारी, दरोडे, खंडणी, हत्या, लुबाडणूक एवढ्यापुरतीच संघटीत गुन्हेगारी मर्यादित नाही. 

                     समाजाला, पर्यावरणाला घातक असलेल्या गोष्टीवर कायदेशीर बंदी घातली जाते. अशा बंदी असलेल्या गोष्टींचा भाव मग कितीतरी पटीने वाढतो. अशाच बंदी घातलेल्या गोष्टीतून बेकायदेशीर गोष्टींचा काळाबाजार करून अमाप पैसा कमावला जातो. हा काळाबाजार रोखणे ज्यांच्या अधिकारात आहे त्यांच्याशी(प्रशासन) संगनमत आणि ज्यांना ते उत्तरदायी(जवाबदेही,answerable) असतात त्यांचा(शासन) वरदहस्त याच्या जोरावर असे अवैध, बेकायदेशीर धंदे फोफावतात. बऱ्याचदा राजकीय, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या वजनदार असलेल्या आणि समाजात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्यक्ती आपल्या एखाद्या विश्वासू व्यक्तीला हाताशी धरून असले घोटाळे करत असते जेणेकरून कधी घोटाळे उघड झालेच तर त्याचे बालंट आपल्यावर येऊ नये, करून सवरून आपण नामानिराळे रहावे व आपल्या प्रतिष्ठेस धक्का लागू नये. हळूहळू अशाप्रकारे एक समांतर परिसंस्था(ecosystem) निर्माण होते. ज्यांना हाताशी धरून असे घोटाळे केले जातात त्यांचा हव्यास वाढत जातो आणि ते शासन,प्रशासनाला इतके शिरजोर होतात की शासन, प्रशासन ही या परिसंस्थेच्या हातचे बाहुले बनून जाते. परस्पर हितसंबंध आणि साटंलोटं यामुळे गुन्हेगार अडकले तरी स्वतः चे हातच अडकले असल्यामुळे गुन्हेगारांना मुक्त करण्याच्या पळवाटा काढल्या जातात. कुंपणच शेत खायला लागल्यावर वचक तरी कोणाचा राहणार?.  

                    बरं एक दोन नव्हे तर शेकडो अवैध धंदे आहेत. अवैध सावकारी धंदा,अमली पदार्थ विक्री, रेशन धान्याचा काळाबाजार, अवैध लॉटरी-जुगार, अवैध वाळूउपसा, डोंगर-टेकड्या पोखरून अवैध उत्खनन करून मुरूम-खडीचा बेकायदेशीर धंदा, सार्वजनिक साधन संपत्तीचा अपहार, शाळा, बगीचे, मैदाने यांसाठी आरक्षित असलेल्या जागा हडपून अवैध बांधकामे, सार्वजनिक सरकारी, सहकारी, निमसरकारी उद्योगधंद्यातील दुय्यम उत्पादन(byproduct) जसे साखर कारखान्यातील मळी, औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील उत्सर्जित राख यांचे निविदा न काढता परस्पर विक्री अशी न संपणारी यादी आहे.  या अवैध, बेकायदेशीर धंद्यात निर्माण होणाऱ्या स्पर्धकांचा आणि निरपेक्षपणे अनैतिक, अवैध गोष्टींना विरोध करणाऱ्या पत्रकार,सामाजिक कार्यकर्ता, किंवा जो कोणी त्यांच्या धंद्याच्या आड येईल त्याचा बंदोबस्त निर्दयी, निर्घृणपणे हत्या करून केला जातो. त्यांना संपवण्यामागे केवळ वाटेतील काटा काढणे नसून आमच्या मार्गात आलात तर काय हाल होऊ शकतात याची दहशत बसावी हा उद्देश असतो. अमानुष, विकृत गुन्हे करून देखील गुन्हेगार सहीसलामत सुटतात, अगदीच प्रकरण अंगलट येऊ लागले तर एखाद्या प्यादाचा बळी देऊन प्रकरण शांत केले जाते. Justice delayed is justice denied अर्थात उशिरा मिळालेला न्यायही एकप्रकारचा अन्यायच असतो असे म्हणतात पण बऱ्याचदा उशिरा का होईना न्याय मिळण्याची शक्यता कमी असते. सर्वसामान्य जनता अशा प्रकारांकडे असहाय्य, हतबलपणे पहात असते.

                सर्वसामान्यांची ही हतबलता त्यांच्याच गाफीलपणाचा परिपाक आहे. येवढ्या- तेवढ्याने काय होते असे म्हणत छोट्या मोठ्या अनैतिक, बेकायदेशीर गोष्टींकडे कानाडोळा करून त्या खपवून घेतल्याने हळूहळू त्या गोष्टी  हाताबाहेर जातात. एकदा टोळीचा म्होरक्या गडगंज श्रीमंत झाला की मग तो समाजाचा मासिहा, तारणहार बनण्याचा प्रयत्न करतो. दानशूरपणाचा दिखावा करतो.  सामाजिक, धार्मिक उत्सवाचे आयोजन करतो, भरमसाट वर्गणी देतो, गरजूंना मदत करतो, लोकांना त्याचा आधार वाटू लागतो. खरंतर आपल्याला असल्या रॉबिनहूड टाईप संस्कृतीची गरज नाही. आपण असल्या गुन्हेगारांच्या उधळपट्टीचे लाभार्थी व्हायचं नाही आणि त्याची आपल्याला गरज नाही. आपल्याकडे लोकशाही आहे, ती सशक्त करणे आणि लोकशाही च्या माध्यमातून आपला उत्कर्ष करणे, आपले जीवन सुरक्षित करणे आपल्या हिताचे आहे. कोणतीही गोष्ट फुकट किंवा अनासाये भेटत नाही, अनैतिक व्यवहारातून आणि दुसऱ्याच्या हक्काचे लुबाडून त्यातला गुंजभर वाटा तुम्हाला देणारा हिंस्र गुन्हेगार त्या वाटणीचा मोबदला म्हणून तुम्हाला न मोजता येणारी किंमत कधी ना कधी वसूल करणारच. फुकट मिळणारी कोणतीही गोष्ट आवळा देऊन कोहळा काढण्याची क्लृप्ती असते हे कायम लक्षात ठेवायला हवे. वेळच्यावेळी शासन-प्रशासनाला बेकायदेशीर गोष्टी निदर्शनास आणून देऊन त्या बंद करण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. शासन, प्रशासन हे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आहे याचे भान शासन, प्रशासनाला असायला हवे आणि जनतेलाही त्याची जाण असायला हवी. आपण निरपेक्षपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. त्यांचा सन्मान केला पाहिजे म्हणजे बाकीचे अधिकारी ही निरपेक्षपणे, नैतिकतेने काम करण्यासाठी प्रेरित होतील. एक दिवस नक्की येईल ज्यावेळी समाज गुन्हेगारी कृत्य करणाऱ्याला आपल्या धर्माचा, जातीचा, भाषेचा, प्रांताचा म्हणून त्याला पाठीशी न घालता, त्याचा उदोउदो न करता त्याला विरोध करेन, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करेन. सत्य, न्याय, नितीमत्तेने काम करणाऱ्यांचा गौरव होईल, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. अर्थात यामध्ये आपल्या सर्वांचा आपआपल्यापरीने सातत्यपूर्ण सक्रिय सहभाग गरजेचा आहे.           


                                                               संतोबा..

Saturday, January 11, 2025

भांडवलशाहीचे ठेकेदार -२

                          आम्हाला रविवारी कामाला बोलवता येत नाही याची तुम्हाला खंत वाटते. रविवारच्या सुट्टीमुळे आम्ही कितीवेळ बायकोकडे आणि बायको आमच्याकडे एकटक बघत बसणार याची तुम्हाला चिंता वाटते. तुमची ही चिंता आणि खंत बघून आम्हाला रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे यांचा अजूनच जास्त अभिमान वाटतो, ज्यांनी तुमच्या सारख्या नाठाळांना वठणीवर आणणारी, आणि आमच्यासारख्या कष्टकरी, शोषित कर्मचाऱ्यांना आठवड्याभराच्या ढोर मेहनतीनंतर एक दिवस सुटका म्हणून रविवारी आठवड्याची हक्काची सुट्टी मिळवून दिली. या हक्काच्या साप्ताहिक सुट्टीमुळे तुम्हाला कितीही वाटले की आठवड्याचे सातही दिवस रोज १२-१५ तास अन् आठवड्याचे ९० तास राबवून घ्यावे तर ते तुम्हाला किंवा तुमच्या आकाला शक्य नाही. सर्वसामान्य जनतेला त्यांच्या नैसर्गिक, मानवी हक्काची जाण आणि त्या हक्काचे संविधानाच्या माध्यमातून संरक्षण, सर्वांना ज्ञानाची कवाडे खुली करून सक्तीचे शिक्षण, वंशश्रेष्ठत्वाचा बागुलबुवा करून मलईदार क्षेत्रात प्रस्थापित कंपुशाहीच्या अघोषित मक्तेदारीला शह देण्यासाठी आरक्षण देऊन फुले, शाहू, आंबेडकरांनी देशातील सर्वसामान्य जनतेला मानवी अधिकार बहाल केले त्यामुळे भांडवलदारांना आणि वंशश्रेष्ठत्वाचा वांझोटा टेंबा मिरवणाऱ्यांना या तिघांचा द्वेष वाटणे साहजिक आहे. आता तिघांबरोबर कामगारांना रविवारी साप्ताहिक सुट्टी, कामाच्या वेळा मर्यादित करण्यास भाग पाडणाऱ्या रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे यांचा पण द्वेष वाटू शकतो. 

                    तुम्हाला सर्वसामान्य जनतेला हतबल, लाचार करायचे आहे. कर्मचाऱ्यांनी आपला चरितार्थ चालवण्यासाठी पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून राहावे, त्यांनी समाजापासून, कुटुंबापासून फारकत घ्यावी. त्यांनी हूं की चू न करता तुमच्यासाठी गुलामांसारखे रात्रंदिन राबावे. त्यांनी कसल्याही मागण्या करू नयेत. कर्मचाऱ्यांना एवढे जखडून ठेवायचे, त्यांची सतत एवढी मानहानी करायची की त्यांना आपण एकदम टाकाऊ, निरूपयोगी आहोत, आपला इथे सोडून कुठेच निभाव लागणार नाही अशी भावना त्यांच्या मनात निर्माण करायची. त्यांना टार्गेट, डेडलाईन्स यामध्ये इतके गुरफटून ठेवायचे की त्यांनी दुसरा कोणातच विचार करता कामा नये. त्यांच्या डोक्यावर कायम नोकरी जाईल की काय याची टांगती तलवार लटकवत ठेवायची, ज्यामुळे कुटुंबापेक्षा कर्मचारी कामाला प्राथमिकता देईल. आपण कर्मचाऱ्यांसाठी खूप काही करतोय हे दाखवण्यासाठी त्यांच्यासाठी वर्षातून एखाद दुसरा कार्यक्रम ठेवायचा, आरोग्य तपासणी करायची, प्रेरणादायी व्यक्तीची भाषणे ठेवायची. फारसा आर्थिक लाभ न देता केवळ प्रमाणपत्रे, ट्रॉफी वाटून कर्मचाऱ्यांना अजून उत्साहाने काम करण्याची प्रेरणा देऊन शक्य होईल तेवढी वेठबिगारी करायला लावायची. 

                      तुमच्या असल्या विकृत विचारसरणीमुळे लोक तुम्हाला विरोध करू लागले, तुम्ही अडचणीत येऊ लागलात की तुम्हाला राष्ट्रनिर्मिती, राष्ट्रवाद आठवतो. आतापर्यंत गोष्टी अंगलट आल्या की देव, देश, धर्माची ढाल पुढे करण्यात राजकारण्यांचा हातखंडा होता. आता तुम्ही राष्ट्रवादाची ढाल पुढे करून आपला बचाव करू लागला आहात, केवळ बचाव नाही तर तुमची उत्पादने गुणवत्तेच्या तराजूत तोलण्याऐवजी ' देश की/ देश का अमुक तमुक' म्हणत उत्पादने देशभक्तीच्या तराजूत तोलत जाहिरात करत असता. राष्ट्रनिर्मितीच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका अन् राष्ट्रवाद शिकवण्याचा प्रयत्नही करू नका. ज्या व्यक्तीकडे कपाळाला लावायला चिमुटभर माती नाही, देशातील कुठल्याच जमिनीच्या तुकड्याच्या सातबाऱ्यावर त्याचे नाव नाही त्यांनाही या देशावर तुमच्याहून अधिक प्रेम आहे आणि तुमच्या इतकाच त्यांचाही या देशावर आणि या देशातील नैसर्गिक स्त्रोत, साधनसंपत्तीवर हक्क आहे. राष्ट्रउभारणीसाठी उद्योगधंदे गरजेचे आहे म्हणून सरकारने तुम्हाला कवडीमोल दराने जमिनी दिल्या, सुविधा, सवलती दिल्या, कर्जे दिली. त्यातून रोजगारनिर्मिती करून तुम्ही केवळ स्वतःची भरभराट केली, गरज संपली की कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावले. तुम्ही इथली सार्वजनिक नैसर्गिक साधन संपत्ती ओरबाडून घेतली. एनजीओ, पीआर एजन्सीच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमासंवर्धन करून आपण सर्वसामान्य लोकांचे तारणहार आहात याचा आभास निर्माण केला.

                 तुम्ही स्वतःला कितीही कर्मचाऱ्यांचे तारणहार समजलात तरी तुमचे अस्तित्वच सर्वसामान्य कर्मचाऱ्यांमुळे आहे याची जाण ठेवा. तुम्ही ज्या कंपनीच्या शिखरपदावर आहात त्या कंपनीचा पाया तुमच्या कंपनीतील कर्मचारीवर्ग आहे, सर्वसामान्य माणूस जो तुमचा ग्राहक आहे तो तुमच्या कंपनीचा आत्मा आहे. हा पाया ढासला, आत्मा तुमच्यापासून दुरावला तर तुमच्या उद्योगाचा ढोलारा ढासाळायला वेळ लागणार नाही. जगभरात धोरणी, प्रागतिक विचारांच्या, देशहिताचा विचार करणाऱ्या उद्योगपतींनी आपापल्या देशाच्या प्रगतीला हातभार लावला. भारतातही काही प्रमाणात उद्योगपतींनी देशाच्या प्रगतीला हातभार लावला पण सध्या उद्योगपती टॅक्सचोरी, कर्जबुडवेगिरी करून, प्रस्थापित सार्वजनिक संस्था हडपून पुरेपूर धंदेवाईक झाले आहेत. ते राष्ट्रउभारणीचे नव्हे तर राष्ट्र, समाज उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहेत. धंदेवाईक उद्योगपती देशाची, लोकांची भरभराट नव्हे तर  लुबाडणूक करत आहेत. लुबाडणूक करता करता अर्धा भारत अशा मुठभर लोकांच्या मुठीत गेला आहे. त्यांच्याकडे असलेला अमाप पैसा, सत्तेचा वरदहस्त यामुळे देशातील सर्व सार्वजनिक व्यवस्था ज्या सर्वसामन्य लोकांच्या हितासाठी, रक्षणासाठी उभारल्या आहेत त्या सार्वजनिक व्यवस्था अशा बड्याधेंड्याच्या बटीक झाल्या आहेत.  त्यांना आपण काहीही करू शकतो हा आत्मविश्वास आला आहे, त्यामुळे अधूनमधून अशी विकृत विधाने हे लोक करत असतात. खरंतर कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही, सर्वसामान्यांच्या सहनशीलतेचा अंत झाल्यास क्रांती घडण्यास वेळ लागणार नाही.

                 आपल्याला स्वातंत्र्य मिळून फार काळ लोटलेला नाही, आपल्या पूर्वजांनी मोठ्या संघर्षाने आणि बलिदान देऊन स्वातंत्र्य आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवला आहे. आपल्याला आपले स्वातंत्र्य, आपले हक्क टिकवायचे असतील तर गाफील राहून चालणार नाही. आपल्या स्वातंत्र्यावर, नैसर्गिक मानवी हक्कावर गदा आणू पाहणाऱ्या विकृती आपण वेळच्या वेळी ठेचल्या पाहिजेत त्यासाठी आपल्याला संघटित होणे गरजेचे आहे. उद्योगपतींनी आणि नेत्यांनी त्यांना अडचणीच्या ठरणाऱ्या कामगार संघटना मोठ्या शिताफीने संपवल्या. आता पुन्हा कामगार संघटना पुनर्जीवित करण्याची वेळ आलेली आहे. असंघटित क्षेत्रात कामगारांची खूप पिळवणूक केली जाते. संघटित होऊन संघर्ष करून आपल्याला आपला उत्कर्ष करायचा आहे आपले स्वातंत्र्य टिकवायचे आहे. हा देश आपला आहे, या देशातील सर्व सार्वजनिक साधनसंपत्तीवर आपला हक्क आहे, ती कोणा एकाच्या मालकीची नाही. आपल्याला ही साधनसंपत्ती  आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी जतन करून ठेवायची आहे. आपल्याला स्वातंत्र्य, न्याय, समताधारीत, सर्वांना समान संधी देणारा भारत घडवायचा आहे. त्यासाठी वेळप्रसंगी सर्वस्वपणाला लावण्याची तयारी ठेवायला हवी. अंतिम विजय हा सत्याचा, न्यायाचा आणि सर्वसामान्य जनतेचाच होईल.

                                                      संतोबा...


Tuesday, December 31, 2024

कर्मवीर, अर्थवीर डॉ. मनमोहनसिंग

                            मानव हा टोळी करून राहणारा हिंसक प्राणी आहे. शेकडो वर्षापासून मानव जातीतील निवडक प्रगल्भ समाजधुरीणांनी रानटी मानवजातीचे नागरीकरण (civilization) करण्याचे प्रयत्न केले पण त्याला अद्याप पुरेसे यश आले नाही. मानवामध्ये जन्मजात वर्चस्ववादी गुण प्रबळ असतो, एखादा मनुष्य स्वतः अगदी शोषित असला तरी त्याच्यापेक्षा कमकुवत असणाऱ्यावर तो वर्चस्व गाजवण्याची मनीषा बाळगून असतो. मानवामध्ये हिंस्रपणाबरोबरच अनामिक भिती असते. मानवाला चमत्काराचे आकर्षण असते, काहीतरी चमत्कार होईल, कोणीतरी तारणहार येऊन आपला उद्धार करेल असा भाबडा पण ठाम विश्वास बहुतेक जणांना असतो. माणसाच्या या गोष्टींचा फायदा समाजातील भामटे लोकं उचलत असतात. बहुसंख्य लोक अशा भामट्या लोकांच्या भूलथापांना बळी पडून त्यांच्यामुळे आपले काहीतरी भले होईल म्हणून त्यांच्या नादी लागतात आणि त्यांच्या स्वतःकडे जे काही आहे तेही गमावून बसतात. 
                           समाजात एका बाजूला असे भूलथापा देऊन दिशाभूल करणारे भामटे असतात तसेच समाजाला योग्य दिशा दाखवणारे, त्यांच्या भल्यासाठी प्रयत्न करणारे, नवनवीन संशोधन करून, आपल्या दूरदृष्टीने नव्या योजना आखून, नव्या संकल्पना राबवून, लोकांना शहाणे करून, लोकांच्या जीवनाला दिशा देण्याचा प्रयत्न करणारे कुशाग्र बुद्धीमत्तेचे कर्मवीर असतात. त्यांच्या विद्वत्तेचा फायदा समाजाला व्हावा म्हणून ते सतत झटत असतात. अशा विद्वांनामुळे भामट्यांची दुकानदारी बंद पडण्याची शक्यता असते व त्यामुळे भामट्यांना विद्वांनाचा तिटकारा असतो, ते त्यांच्या द्वेष करतात, त्यांची बदनामी करतात, त्यांना देव,देश,धर्म विरोधी ठरवतात. त्यांची भाषा आक्रमक असते, सतत खोटं बोलतात पण रेटून बोलतात, ते कधीही मुद्द्यावर बोलत नाहीत. मुद्द्यावर बोलण्यासाठी लागणारी विद्वत्ता त्यांच्याकडे नसते त्यामुळे ते गुद्द्यावर येतात आणि गुद्द्यावर येणारे खरंतर खूप घाबरट असतात. ते कधीही आपल्या अनुयायांचे सुरक्षित कवच सोडून बाहेर पडत नाही. ते आपल्या अनुयायांना भडकावून विद्वांनांच्या विरोधात लढण्यास प्रोत्साहित करत असतात. या उलट विद्वांनाची भाषा मवाळ, प्रेमळ असते, ते वादविवाद, आरोपप्रत्यारोप अशा वांझोट्या गोष्टींपासून दूर असतात. आपल्या भल्यासाठी आपल्यालाच सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागणार आहेत याची शिकवण ते लोकांना देत असतात. अर्थात हे वास्तव लोकांच्या पचनी पडत नाही त्यामुळे जेवढे समर्थन भामट्यांना मिळते तेवढे विद्वानांना मिळत नाही. अशाच एका लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या विद्वान, कर्मवीर डॉ. मनमोहन सिंह यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना ते सक्रिय असताना अनेकदा अपमान, अवेहलना भोगावी लागली पण मनमोहनजी आम्हांला आपल्या आमच्यावरच्या उपकाराची जाण आहे.                 
                  मनमोहनजी आपण देशातील कोट्यावधी लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवला. आपण आम्हाला केवळ गरिबीच्या जोखडातून मुक्त केले नाही तर आम्ही कधी न पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यास हातभार लावला. आपल्या कार्याची दखल केवळ इतिहास नव्हे तर वर्तमान आणि येणारा भविष्यकाळही घेईनच पण आम्ही आपण घेतलेल्या सुधारणावादी निर्णयामुळे देशाच्या आणि पर्यायाने आम्हां साऱ्या जनतेच्या जीवनात घडलेल्या आमूलाग्र बदलांसाठी आम्ही आपल्याबद्दल कायमच कृतज्ञ असू. फाळणीची झळ सोसत जन्मभूमीतून परागंदा व्हायला लागून, बिकट आर्थिक परिस्थितीशी झगडून देखील तुमच्यात इतरांबद्दल कडवटपणा आला नाही. आपण त्या दुःखद आठवणींचे कड काढत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. स्थितप्रज्ञपणे आपण आपले कार्य निरपेक्षपणे पार पाडत राहिलात. 
                             तुम्ही सक्रिय असताना तुमच्यावर द्वेषाचा चिखल उडवणाऱ्या, अशाघ्य भाषेत टिकाटिपण्णी करणाऱ्यांचीही आपल्यामुळे भरभराट झाली, त्यांनी आपली कितीही मानहानी करण्याचा प्रयत्न केला तरी देशातच नव्हे तर जगात आपणांस मान आपल्या योगदानामुळे आहे त्याला कोणत्याही मेंदू गहाण ठेवलेल्या टोळधाडीमुळे बिल्कूल तडा जाणार नाही. सध्या सुमारांची सद्दी असल्यामुळे आणि वास्तवाची झळ बसू लागल्याने त्या टोळधाडीतील काहींची बुद्धी ताळ्यावर येऊ लागली आहे. त्यांना आता उथळ, बोगस, फेकाड तारणहारांच्या नादी लागून आपल्यावर केलेल्या टीकेची उपरती होऊन केलेल्या टिकेबद्दल निश्चित खंत वाटत असेल. कोणत्याही समाजहितासाठी निरपेक्ष कार्य केलेल्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात गरळ ओकण्याची प्रवृत्ती शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे. आपल्या मृत्यूपश्चातही असा अनुभव आला, अशा विकृतांची कीव करावी तेवढी कमीच आहे, हे लोक माणूस म्हणून घेण्याच्या योग्यतेचे सुद्धा नाहीत. असो.
                       देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारे भारतीय अर्थक्रांतीचे जनक, कुशल अर्थतज्ञ, कोणत्याही आर्थिक, राजकीय संकटाच्या काळात स्थितप्रज्ञ राहून मार्ग काढणारे. शांत, संयमी, मृदू तितकेच कर्तव्यकठोर. देशाला प्रगतीपथावर न्यायचे तर त्यात सर्व जनतेचा सहभाग आवश्यक आहे, सर्व जनतेची प्रगती झाली तरच देशाची खरी प्रगती होईल याची जाणीव असणारे आणि त्यामुळे चारदोन भांडवलदारांच्या हिताचा विचार न करता देशाच्या दूरगामी फायद्यासाठी तात्पुरत्या अप्रिय आणि राजकीय दृष्ट्याआत्मघातकी ठरू शकणाऱ्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, प्रधानमंत्री म्हणून कर्तव्यकठोर निर्णय घेणारे. ज्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांनी भूषविलेल्या विविध पदांचा मान, शोभा वाढली. अर्थशास्रासारख्या किचकट विषयावरचे ज्यांचे ग्रंथ, लेख मोठ्या आदराने जगभर अभ्यासले जातात त्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे परवा २६ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
संतोबा...

Tuesday, October 8, 2024

नसानखवड्यांच्या फोकादाऱ्या

                     तुम्ही शाळा-कॉलेज उभारली नाहीत, शिक्षण संस्था स्थापन केल्या नाहीत. उद्योगधंदे उभारले नाहीत, सहकारी संस्था काढलेल्या नाहीत यामध्ये विशेष असे काही नाही. विधायक कार्य तुमच्या हातून घडणे शक्य नाही कारण विध्वंसकता, कावेबाजपणा तुमच्या डीएनए मध्येच खोलवर रुतून बसलेला आहे. सर्वसामान्य लोकांच्या हातात लेखणी आली, त्यांना अक्षर ओळख झाली, ज्ञान मिळवण्याची साधने उपलब्ध झाली तर आपले श्रेष्ठत्वाचे पितळ उघडे पडेल आणि आपले पिढ्याअन् पिढ्या मोक्याचा जागा मिळवण्याच्या अघोषित आरक्षणास धोका निर्माण होईल म्हणून तुम्ही शेकडो वर्षांपासून बहुसंख्याना शिक्षणापासून वंचित ठेवले. सर्वसामान्यांच्या हाताला रोजगार मिळाला तर ते स्वावलंबी होतील, तुमच्या फुकाच्या वर्चस्वाच्या पालख्या वाहायला फुकटचे भोई मिळणे दुरापास्त होईल. म्हणून कुठल्यातरी भीतीचा बागुलबुवा निर्माण करून, त्यांच्या मनात भीती आणि द्वेष निर्माण करून त्यांच्या हातात काठ्या-लाठ्या, दगडगोटे देणे तुमच्या फायद्याचे होते आणि तेच तुम्ही करत आला आहात. 

                        ज्या गोष्टींची लाज वाटायला पाहिजे ती अभिमानाने सांगताना केवळ कोडगेपणा असून भागत नाही तर कमालीचा नीचपणा अंगी असावा लागतो. हा नीचपणा तुमच्यात पिढ्याअन् पिढ्या वारश्याने चालत आला आहे आणि आता तो नीचपणाचा वारसा तुमच्या डीएनए मध्ये घट्ट रुतून बसला आहे त्यामुळे त्याला कितीही वेगळा करायचे म्हणलं तरी तसे करता येणार नाही. पाताळयंत्रीपणा, कावेबाजपणा करून संपूर्ण समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हातभार लावणाऱ्या अनेक थोर युगपुरुषांस संपविण्यात आपला हातखंडा आहे, शिवाय त्यांच्या मृत्यूंचे सोहळे करून त्यात युगपुरुषांच्या अनुयायांनाच आनंदाने ढोल बडवायला भाग पाडायचे याची पायाच्या अंगठ्याने गाठ मारायची कला आपल्याला चांगलीच अवगत आहे. आता कुठे तुमच्या काही अनुयायांना तुमचे नैतिक अधःपतन झालंय असे वाटतेय पण तुमच्या अंगी नैतिकता कधीच नव्हती. तुम्ही पोट फुगवून बैल बनण्याचा प्रयत्न करणारा अहंकारी बेडूक आहात याची जाणीव अनेकांना होतीच. खरंतर तुम्ही जेवढे स्वतःला अभिजन असल्याचे ढोल बडवता तेवढे तुम्ही बुद्धिमान नाहीत. केवळ कंपूशाहीच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला तुमच्या क्षेत्रात स्पर्धकच निर्माण होऊ न दिल्याने तुम्ही इतरांच्यापेक्षा वरचढ आहात हे बहुसंख्यांच्या मनावर बिंबवण्यात यशस्वी झालात, तुमचा कावा ओळखण्यात बहुसंख्य कमी पडले म्हणून तुमची चलती आहे.       

                        तुम्हां लोकांना दुसऱ्यांच्या भल्याचे काम करता येत नाही म्हणून तुम्ही चांगले काम करणाऱ्या लोकांची बदनामी करत त्यांच्या कामात उणेपणा आणण्याचा प्रयत्न करता. पिढ्यानपिढ्या तुम्ही अशी कटकारस्थाने करत अनेक थोर लोकांची खोट्या थापा मारून बदनामी केली पण तुमच्या खोट्या कांगाव्याने, कपटीपणामुळे त्यांची प्रतिमा अजूनच उजळली. तुम्हालाच त्यांची बदनामी करणे अंगलट आली. थुंकून चाटण्यात तुमच्या इतका तरबेज कोणी नाही. बदनामी करून त्यांना नामोहरम करता येत नाही म्हणून नाईलाजाने तुम्ही तुमच्या फायद्यासाठी वरकरणी त्यांचा उदोउदो करता. त्या थोर व्यक्तीविरोधात छुपी कुजबुज मोहीम राबवून, वादग्रस्त वक्तव्ये करून जनमाणसांच्या मनात संभ्रम निर्माण करता. कोणीतरी आपल्या जातकुळीतील त्या क्षेत्रातील बुजगावणे पुढे आणत व राईचा पर्वत करत त्या बुजगावण्यामुळेच ती व्यक्ती थोर होऊ शकली अशी आवई उठवता व त्या बुजगावण्याला थोर आदर्श म्हणून समाजच्या माथी मारण्याचे पातक करता. तुम्हाला तुमचे दिखाऊ धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय वर्चस्व अबाधित ठेवायचे असते त्यामुळे तुम्ही त्या वर्चस्वाला आव्हान निर्माण होऊ न देण्याची पुरेपूर काळजी घेता.  

                   कटकारस्थानाशिवाय तुम्हाला देशद्रोहाची, धर्मद्रोहाची वाटण्याचा प्रमाणपत्र वाटण्याचा छंद आहे पण खरे देशद्रोही समाजद्रोही, धर्मद्रोही तुम्ही आहात.देव, देश, धर्माच्या तुमच्या सोईच्या व्याख्या करून बहुसंख्य जनतेला मानसिक गुलामगिरीत ढकलण्याच्या दांडगा अनुभव तुम्हाला आहे. प्रत्येक पांढरपेशा क्षेत्रात कंपुशाही करत आपली मक्तेदारी अबाधित ठेवण्यासाठी बहुजनांना अज्ञान, अंधश्रध्देच्या जोखडाखाली पर्यायाने दारिद्र्यात ठेवण्याचा समाजद्रोहीपणा तुम्ही केला. जेव्हा परकीय सत्ता भारतावर राज्य करत होत्या तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी खर्डेघाशी केली, हेरगिरी केली एवढंच काय आताही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही हेरगिरी केल्याची उदाहरणे आहेत. देवाधर्माचेही तुम्हाला सोयरसुतक नाही, तुमच्या फायद्यासाठी आणि पोटापाण्यासाठी देवाधर्माचा वापर केला, बहुजनांना सेवा आणि स्वतःला मेवा अशी देवाधर्माची पद्धतशीर मांडणी केली. अपवादात्मक काही तरी चांगले कार्य तुमच्याकडून झाले असले तरी ते कधी निर्हेतुक, निरपेक्ष नव्हते, त्याआडून काहीतरी साध्य करण्याचा डाव होता. तुमच्या विकृत विचारसरणीमुळे जनभावनेचा उद्रेक होऊन तुमच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ नये म्हणून अपवादात्मक चांगले दिसणारे कार्य तो उद्रेक शमविण्यासाठी, रागाचा निचरा करण्यासाठी सेफ्टी व्हॉल्व म्हणून काम करण्यासाठी होते.

                  कंपुशाहीचा फायदा घेत प्रशासनाला हाताशी धरून, समाजावर प्रभाव पाडणाऱ्या माध्यमांना, व्यक्तींना कुठल्याशा गोष्टीचा लाभार्थी बनवून त्यांना आपल्या अंकित करून त्या कणाहीन, मिंध्या लोकांकडून स्वतः चे गुणगान गाऊन घेऊन स्वतःची प्रतिमा उजळवण्याची कला सोडली तर तुमच्याकडे उपद्रवमूल्याशिवाय दुसरं काही नाही. अगदी तुम्ही ज्यात स्वतःला निष्णात समजता त्या फोकादाऱ्या करताना देखील तुम्ही सेल्फ गोल करता आणि तुमचा मतलबी गोतावळा मास्टरस्ट्रोक म्हणून उर बडवून घेत असतो. तुमचे समाजाला देशोधडीला लावण्याचे ईप्सित साध्य करण्यासाठी तुम्ही सतत वादग्रस्त बोलून तुम्ही जनमाणसाचा मनाचा अंदाज घेता व त्यावर काही तीव्र प्रतिक्रिया आली तर दुसऱ्याची मेलेली मढी उकरून सारवासारव करण्याचा प्रयत्न करता. तुमचा दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ शोधताना स्वतःच्या  डोळ्यातील मुसळाचे मोठ्या तोऱ्यात समर्थन करण्याचा निर्लज्जपणा वादातीत आहे. तुम्ही स्वतः काहीही चांगले करणार नाही आणि दुसरा काहीतरी करत असेल तर त्याच्या कामात खोडा घालणार. तुमच्यासारखा नसानखवडा जगात सापडणार नाही. विरोधक सोडा स्वतःचा सहकारी तुम्हाला वरचढ ठरेल अशी शक्यता निर्माण झाली तरी तुम्ही त्यांचा पध्दतशीरपणे काटा काढता. लक्षात ठेवा जे जे तुम्ही इतरांसोबत बरं वाईट केलेय ते सारं उलटून तुमच्याकडे येणार हे निश्चित, हा कर्मसिद्धांत आहे आणि तो कोणालाही चुकला नाही. तुम्ही सुधारण्यापलीकडे गेला आहात त्यामुळे तुमच्या सुधारण्याची बिल्कूल अपेक्षा नाही. म्हणतात ना अति तेथे माती, तुम्ही वेगाने अति करण्याच्या टोकावर पोहचताय, सध्या आम्ही तुम्ही त्या टोकावर पोहचण्याची वाट पहातोय. बाकी कार्य तुमचे कर्मच करेल.

                                                            संतोबा...

Sunday, June 30, 2024

🎉 आपल्या रावल्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने🎉

                     गेल्या आठवड्यात १९ जूनला राहुल गांधींचा वाढदिवस होता आणि मी त्यांना मित्र म्हणून शुभेच्छा देणारे स्टेटस व्हॉट्सॲप आणि फेसबुकला ठेवले होते. त्यानंतर काहीजणांच्या विस्मयजनक तर काहीजणांच्या हेटाळणीयुक्त प्रतिक्रिया आल्या, मला त्या अपेक्षित होत्या कारण अशा प्रतिक्रियांचा अनुभव मला राहुल गांधीच काय राजीव गांधी, पंडित नेहरूंच्या बाबतीतही असाच आहे. समाजाची सामाजिक समज किती तकलादू आहे आणि राहुल गांधींबद्दलच्या चारित्र्यहननाच्या, बदनामीच्या अपप्रचाराला बळी पडून लोकांची बौद्धिक कार्यक्षमता किती कार्यक्षम राहिली आहे याची मला जाणीव होतीच. राहुल गांधींच्याबद्दल लोकांच्या मनात एवढा द्वेष का आहे? लोकं त्यांची एवढी खिल्ली का उडवतात. राहुल गांधी गुन्हेगार आहे का? भ्रष्टाचारी आहे का? घोटाळेबाज आहे का? देशद्रोही आहे का?. बहुतेकांना होय असे वाटते पण त्यांना हा प्रश्न पडत नाही की अनेक देशी, परदेशी गुप्तहेर यंत्रणा, पेगासस राहुल गांधीवर नजर ठेऊन असूनही त्यांची कोणत्याच बाबतीत त्यांना कोंडी करता आली नाही. निव्वळ राजकीय हेतूने केलेल्या आरोपांनुसार आज केवळ राहुल गांधीच नव्हे तर त्याचे संपूर्ण कुटुंब तुरुंगात असायला हवे होते. राहुलच्या संपूर्ण कुटुंबीयांची मग ते जिवंत असोत वा मृत कसलाही विधिनिषेध न बाळगता, त्यांच्या कार्याची जाण न ठेवता खूप खालच्या पातळीवर जाऊन बदनामी, हिणकस,हिडीस टीका, बेलगाम आरोप केले, त्यांचे विकृत फोटोशॉप करून विरोधकांनी आपआपल्या थोर खानदानी परंपरेचे दर्शन घडवले. काहीही करून त्यांना गुन्हेगार, देशद्रोही ठरवण्याचा घाट घातलेला दिसत असताना गांधी कुटुंबीयांपैकी कोणाचीही एखादी क्षुल्लक चूक जरी सापडली असती तर अमर्याद सत्ता हाती असल्याने राईचा पर्वत करून राहुल आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात डांबले असते, त्यांना राजकारणातून, सार्वजनिक जीवनातून हद्दपार केले असते पण जंगजंग पछाडून असे काही करता आले नाही.        

                       कोवळ्या वयापासून राहुलवर अनेक आघात झालेत, मात्र त्यातून त्याच्यात कसलाही कडवटपणा आलेला दिसत नाही. कोणाच्याबद्दल त्याच्या मनात द्वेष, आकस दिसत नाही. बेछूट गोळीबाराने पंतप्रधानपदी असलेल्या आजीच्या शरीराची चाळणी झालेला मृतदेह, बॉम्बस्फोटात पंतप्रधानपदी असलेल्या वडिलांच्या शरीराच्या चिंधड्या झालेला मृतदेह पाहण्याचे दुर्दैव त्याच्या वाट्याला आलेले, परदेशीत्वाच्या मुद्द्यावरून आईवर झालेली बोचरी टीका. त्यातून त्याला राजकारणाबद्दल निश्चित विरक्ती आलेली असेल किंबहुना त्यालाही राजकारणाची ओढ नसावी असे वाटत होते. पण म्हणतात ना जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. नाईलाजाने का होईना त्याला राजकारणात यावे लागले. त्याच्याकडे राजकारणात विरोधकांची जीवघेणी टीका, बेलगाम आरोप सहन करण्यासाठी लागणारी गेंड्याची कातडी नाही. अगदी वयाच्या पन्नाशीतही त्याच्यात निर्मळ, निखळ निरागसपणा दिसतो. शिवाय राहुल फार काही मुत्सद्दी राजकारणी आहे अशातला भाग नाही. त्यामुळे त्याची पप्पू अशी प्रतिमा निर्माण करण्यात भाड्याच्या ट्रोलर्स ना प्रचंड यश आले एवढे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनादेखील राहुल पप्पूच आहे असे वाटावे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना भाडेकरू ट्रोलर्सचा प्रतिवाद करणे कठीण झाले होते. काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट होत होती, संघटनेची पडझड होतच होती. भारत काँग्रेसमुक्त करण्याची सुडाची मोहीम यशस्वी होण्याच्या मार्गावर होती, काँग्रेस कधीच उभारी घेऊ शकणार नाही आणि राहुलच काँग्रेस संपवणार असा समज निर्माण करण्यात यश आलेलं होते आणि त्यावर विश्वास वाटण्यासारखी परिस्थिती होती. 

                     सर्व बाजूंनी निराशाजनक परिस्थिती होती, सारं काही संपल्यात जमा होते. ज्यांच्यासाठी लढायचे तेच खिल्ली उडवत होते. पिढ्यान् पिढ्या सत्ता असताना सोबत राहून आपापली संस्थाने निर्माण केलेले सरंजाम भीतीने वा फायदा बघून साथ सोडून गेले होते. सोबत फारसे कोणी नव्हते पण तीन चार पिढ्यांची पुण्याई राहुलच्या पाठीमागे होती, कित्येकांच्या वडिलांनी, आजोबा-पंजोबांनी त्यांच्यासाठी केले नसेल त्यापेक्षा जास्त राहुलच्या वडिलांनी, आजोबा-पंजोबांनी देशातील जनतेसाठी केले आहे. भारताच्या जडणघडणीत त्यांचे भरीव योगदान आहे. पक्षाची, स्वतःची राखरांगोळी झालेली असताना त्या राखेतून राहुल भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेपावला. तो जिद्दीने भारतभर चालत राहीला. कडाक्याच्या थंडीत, उन्हातान्हात, काश्मीर मधल्या बर्फात स्वतःचा मार्ग निर्माण करत राहिला. भारत, भारतातील जनता समजून घेत राहिला शेतकरी, कामगार, नोकरदार, कष्टकरी सगळ्यांशी संवाद साधला. त्यांचे म्हणणे आपुलकीने ऐकून घेतले. हळूहळू का होईना जनतेला त्याची गोरगरिबांविषयीची तळमळ जाणवू लागली. त्याच्या विरोधकांनी त्याला रोखण्यासाठी जे करता येईल ते केले खासदारकी रद्द केली, घर काढून घेतले, बँक खाती गोठवली त्याला अडचणीत आणायची एक संधी सोडली नाही. अनेक आघात सोसूनदेखील न डगमगता लढत राहिला पण कधी आपला तोल ढळू दिला नाही आपली खानदानी आदब त्याने राखली. चेहऱ्यावरचे हसू ओसरू दिले नाही, एकप्रकारे त्याने खात्रीच दिली की तुम्ही त्याच्यावर कितीही टीका केली तरी तो सुडभावनेने वागणार नाही. या सगळ्यातून तो आता ताऊन, सुलाखून निघाला आहे त्याची प्रतिमा त्याने मेहनतीने उजळवली आहे. त्याचे फळ म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीत सगळे काही विरोधात असताना चांगले यश मिळाले आहे. विरोधात असताना तो ताठ मानेने, नजरेला नजर भिडवून बोलत असतो या उलट सत्तेत असून त्याच्या विरोधकांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत आहे, माना झुकलेल्या आहेत. लोकसभेतील विरोधकांच्या वागण्यातील सहजता आणि सत्ताधाऱ्यांच्या वागण्यातील अवघडलेपण बरेच काही सांगून जाते. चेहऱ्यावर जे नीतिमत्तेचे तेज आहे ते पैशाने, सत्तेने, बळजबरीने विकत घेता येत नाही ते चांगल्या कर्तुत्वाने आणि निर्मळ मनाने कमवावे लागते. युवराज, शहजादे म्हणून त्याची हेटाळणी करणाऱ्यांना, युवराज शहाजादा कसा असतो याचा वस्तुपाठच त्याने घालून दिला आहे.

                 राहुल गांधीच्या जागी आपण आपल्याला ठेऊन पहा, कित्येकांना आज ड्रीम इलेव्हन किंवा कुठल्यातरी एखाद्या प्लॅटफॉर्मवर दोन तीन कोटी भेटले तर तात्काळ नोकरीचा राजीनामा देऊन शांतेत जीवन जगायची इच्छा असेल. राहुलला हे सगळं करताच आले असते. सर्वच बाबतीत खानदानी श्रीमंती असताना त्याने हा काट्याचा मार्ग कशाला निवडला असता तो देखील कसली ओढ नसताना. राहुल किंवा त्याचे समर्थन करणाऱ्यांची हेटाळणी करणाऱ्यांना एवढे सांगायचे आहे की तुमच्या मनात रावल्याबद्दल एवढा द्वेष नसता तर आमच्याही मनात रावल्याबद्दल एवढे प्रेम नसते. तुम्ही ज्यांची भक्ती करता त्या नेत्यावर टीका करून बघा त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा अनुभव घेऊन बघा. राहुलशी कोणत्याही बाबतीत त्याची माझी बरोबरी नसली तरी मी त्याच्यावर टीका करू शकतो, त्याला रावल्या बोलू शकतो आणि आपण राहुलला प्रेमाने वा रागाने रावल्या म्हणले तरी तो आपल्याशी आदबीनेच बोलेल. मी त्याला रावल्या म्हणले तरी तो मला संतोषजी म्हणूनच बोलणार आणि म्हणून रावल्या आपला मित्र आहे. अर्थात राहुलचेही काही अंधभक्त असतील त्यांना हे असे रावल्या बोलणे आवडणार नाही पण त्यांच्या आवडण्या न आवडण्याचा आपल्याला काही फरक पडत नाही. अंधभक्त कोणाचेही असोत त्यांची फिकीर आपण करायची नाही. राहुल गांधी काही माझा नेता नाही किंवा मी काँग्रेस किंवा कोणत्याच पक्षाला बांधील नाही. मला ज्यावेळी जो योग्य वाटेल त्याला मी मतदान केले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार, सुप्रियाताई), काँग्रेस(संजय जगताप) आणि शिवसेना (विजय शिवतारे) या पक्षांना त्या त्यावेळी असलेल्या परिस्थिती नुसार मतदान केले आहे आणि मी ज्यांना मतदान केले आहे ते निवडून आलेच आहेत. निवडून दिलेल्यापैकी मी कोणाचाही समर्थक किंवा कार्यकर्ता नाही उलट त्यांनी जेव्हा काही समाजाच्या हितास बाधा आणणारी भूमिका त्यावेळी मी मला जमेल तसा विरोध केला आहे. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतची माझी भूमिका जगजाहीर आहेच आणि त्याचे परिणामही बघितले असतील. जेव्हा कधी काँग्रेस सत्तेत येईल तेव्हा मी काँग्रेस आणि राहुल गांधींचा पूर्वीपेक्षा तीव्र विरोधक असणार आहे, कारण पुन्हा 'अच्छे दिन' पाहणे परवडणार नाही आणि ते 'अच्छे दिन' पुन्हा पाहण्याची हिंमत सर्वसामान्य जनतेमध्ये राहिलेली नाही. राहुलला राजकारणाचा मोठा वारसा आहे, तो लढतोय, त्याच्यावर अन्याय होतोय म्हणून त्याला साथ देऊ नका. तो जे करतोय ते तुमच्या फायद्याचे, येणाऱ्या पिढ्यांच्या फायद्याचे पर्यायाने समाजाच्या, देशाच्या फायद्याचे असेल तरच समर्थन द्या अन्यथा त्याला प्राणपणाने विरोध करा, आपण काही कोणाचे मिंधे नाही आणि कोणी आपले घर चालवत नाही आपल्यालाच आपल्या आणि कुटुंबियांच्या भल्यासाठी कष्ट करायचे आहेत.          

                  यानिमित्ताने मला एकच गोष्ट अधोरेखित करायची आहे की कोणत्याही राजकीय पक्षाच्या चुकीच्या धोरणांची, नेत्यांच्या चुकीच्या गोष्टींची बाजू घेणे जनता म्हणून आपल्या सर्वांच्या अंगलट येऊ शकते. एखादया राजकीय पक्षाची विचारधारा कितीही आवडत असली म्हणून पक्षाच्या, नेत्याच्या चुकीच्या गोष्टींसाठी आपण कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळून नैतिक, न्याय बाजू असणाऱ्या कोणालाही अंगावर, शिंगावर घ्यायचे नाही. त्यात तो आपला लाडका पक्ष खुनशी, द्वेष पसरवणारा असेल, घातकी असेल तर तुम्ही किती त्यांचे समर्थक असाल, पक्षासाठी किती झटले असाल, त्याग केला असेल तरी पक्षनेतृत्व गरज पडली तर तुमचा बळी द्यायला बिलकुल कचरत नाही. जे पहिल्या फळीतील नेते आहेत, ज्यांनी पक्ष वाढीसाठी भरीव योगदान दिलेले आहे अशांना देखील पद्धतशीर पणे बाजूला करण्यात येते, कार्यकर्ते तर त्यांच्या खिजगणीतही नसतात त्यामुळे तुम्ही ज्यांना समर्थन देता ते खरोखर तुमचे नेते आहेत की तुमचे वापरकर्ते आहेत याची स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीने शहानिशा करणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडत्या नेत्याचा, पक्षाचा जरूर उदोउदो करा, भक्ती करा पण बुद्धी गहाण ठेऊन अंधभक्त बनू नका. चांगल्या चांगले आणि वाईटाला समजण्याइतकी बुद्धी शिल्लक ठेवा. तुमच्या अंधभक्तीचे वाईट परिणाम केवळ तुम्हालाच नव्हते तर तुमच्या येणाऱ्या पिढ्या , तुमचे आप्तेष्ट सर्वांच भोगावे लागणार याची जाण ठेवा. जो तुमच्या भल्याचा, तुमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याचा विचार करेल, तुम्हाला समाजात निर्भयपणे , स्वतंत्रपणे वावरता येईल असा समाज घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर कोणाच्याही कसल्याही भावनिक आवाहनांना बळी न पडता तुमच्या भल्यासाठी अशा नेत्यासोबत, पक्षासोबत ठामपणे उभे रहा. 

                                 संतोबा...

Monday, July 31, 2023

उषःकाल

                  मान्य आहे सगळीकडे अराजकता माजली आहे पण अशी कोणती परिस्थिती आहे जी शाश्वत आहे?. परिवर्तन अटळ आहे. सत्य, प्रेम, न्याय शाश्वत आहे. द्वेषाची, विषमतेची भयाण काळरात्र सरून समतेची सोनेरी पहाट नक्कीच उजाडेल. सतत द्वेषाची गरळ ओकणाऱ्या वैशाख वणव्यासारख्या या काळात परस्पर सौहार्द्रयाची पालवी बहरेल. स्वतःच्या डोळ्यातील मुसळ न बघता दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ शोधून झुंडीने येऊन निर्दयीपणे लचके तोडणाऱ्या हिंस्त्र श्वापदांचा निःपात होईल. दुसऱ्यांच्या आयुष्यात वांझोट्या अस्मितांची ठिणगी टाकून त्यांच्या आयुष्य-भविष्याची राखरांगोळी करणाऱ्या कारस्थानी लोकांना त्याच आगीच्या झळा सोसाव्या लागतील. आपल्या कुळातील व्यक्तीच्या राईएवढ्या कर्तुत्वाला पर्वताएवढे भासवून त्याचे उदात्तीकरण व दुसऱ्याच्या पर्वताएवढ्या कर्तुत्वात काहीना काही खुसपट काढून त्या व्यक्तीला बदनाम करणाऱ्या कपटी लोकांच्या वंशश्रेष्ठत्वाचा मुखवटा गळून पडेल.  

                    जेव्हा प्रत्येकाला आपआपले अंगभूत कलाकौशल्य दाखवण्याची संधी मिळेल आणि सृजशीलता ही कोणाची मक्तेदारी नाही याचे भान येईल तेव्हा चांगल्या गोष्टींची उचलेगिरी करून, जे श्रेष्ठ ते आम्हीच निर्माण करू शकतो असा संकेत प्रस्तापित करून इतरांमध्ये न्यूनगंड निर्माण करणाऱ्या कावेबाजांचा कावा उघडा पडेल. कर्तृत्वाचे, संस्कृतीचे, वर्तणुकीचे आपल्याला सोईस्कर असे मापदंड ठरवून बहुजनांमध्ये न्यूनगंड निर्माण करून ठेवणाऱ्या अभिजनांचे पितळ उघडे पडेल. पांढरपेशी क्षेत्रात आपले वर्चस्व अबाधित रहावे म्हणून कंपूशाहीच्या माध्यमातून इतरांना संधी नाकारून, येणकेन प्रकारे सर्व क्षेत्रातील धोरण ठरवण्याची अधिकारपदे ताब्यात ठेऊन इतरांच्या आयुष्याची धूळधाण करणाऱ्या धूर्त लोकांची मक्तेदारी संपुष्टात येईल. वैयक्तिक जीवनात सुधारणावादी असणाऱ्या पण सामाजिक जीवनात समाजविघातक रूढीपरंपरांचे समर्थन आणि साधनसुचीतेचे अवडंबर माजवून इतरांना कर्मकांडात गुंतवून अज्ञानाच्या, दारिद्र्याच्या अंधकारात खितपत ठेऊन आपल्याला स्पर्धा निर्माण होऊ न देण्याची काळजी घेणाऱ्या कलमकसायांचे मनसुबे धुळीस मिळतील.

                    हे सगळे होईल पण ते अनासाये होईल या भ्रमात राहुन चालणार नाही त्यासाठी निकराची लढाई लढावी लागेल आणि ती लढताना प्रसंगी स्वतःला धुळीस मिळायची तयारी ठेवावी लागेल. कारण ही लढाई तोलामोलाची नाही कारण एका बाजूला साम, दाम, दंड, भेद याचा पुरेपूर वापर करणारा समाजविघातक प्रतिस्पर्धी आणि दुसऱ्या बाजूला कोणत्याही परिस्थितीत नीतिमत्तेने, न्यायाने लढा लढण्याचा वसा घेतलेले समाजाभिमुख कार्य करणारे विवेकशील पुरोगामी. त्यात जरा जरी गफलत झाली तर क्षणात बाजू पलटायला वेळ लागणार नाही कारण शोषित, पीडित अर्थात फिर्यादीलाच गुन्हेगार ठरवून बाजू पलटवण्यात त्यांचा हातखंडा आहे. शिवाय हे मूठभर असून एवढे डोईजड कसे तर बुद्धीभेद करण्यात ते पटाईत आहेत. त्यासाठी देव, देश, धर्म, संस्कृती, इतिहास, महापुरुष या अस्मितेंच्या गोष्टींचा वापर केला जातो व त्यामागे या गोष्टींचे संवर्धन वा कोणताही उदात्त हेतू नसून किशोरवयीन पिढीचा बुद्धीभेद करून त्यांना झोंबी (स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला) बनवण्याचा व त्यांचा वापर त्यांचे ईप्सित साध्य करण्यासाठी करून घेणे हा असतो. हा झोंबी वर्ग सांख्यिकीयदृष्ट्या सर्वात मोठा आहे. समाजकंटकांनी चिथावणीखोर वक्तव्य करून, दुसऱ्यांबद्दल द्वेष, भिती निर्माण करून या तरुणांची माथी भडकवून, विचारशक्ती नियंत्रित केली आहे पण याची जाणीव या तरुणांना नाही. मार्क ट्वेन म्हणतो त्याप्रमाणे "लोकांना फसविणे सोपे आहे पण त्या लोकांना तुम्ही फसवले गेले आहात हे पटवून देणे कर्मकठीण असते. आपल्याला या तरुणांना विवेकवादाच्या सन्मार्गावर आणण्याचे शिवधनुष्य पेलावे लागेल.

                      आपला संघर्ष हा कोणाला संपविण्यासाठी नाही, कोणावर वर्चस्व गाजवण्यासाठी नाहीतर सगळ्यांना नैसर्गिक, मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी आहे आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी आहे. आज जरी हे बहुसंख्य बुद्धीभेद झालेले तरुण आपल्या विरोधात असले तरी त्यांना आपल्या विरोधात उभं करून हा संघर्ष लढता येणार नाही.  काहीतरी उदात्त, पुण्याचे दैवीकार्य त्यांचा हातून घडत आहे ह्या भ्रमात ही तरुण मंडळी आहेत. त्यांना जाणीव करून देणे गरजेचे आहे की तुमच्या आयुष्याची भविष्याची आहुती कोणत्या दैवी कार्यासाठी नसून समाजकंटकाचे विकृत मनसुबे तडीस नेण्यासाठी आहेत. सतत तुम्हांला काही न काही कृती आराखडा देऊन कट्टर बनवले जाणार, कोणतेही विध्वंसक कृत्य करताना तुम्ही आघाडीवर असणार आहात. प्रत्येक संकटात, अडचणीच्या वेळी तुमचाच बळी जाणार आणि ज्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या, तुमच्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याची राखरांगोळी केली ते लोक नामानिराळे राहणार. त्यांच्यासाठी लढताना तुम्ही त्यांच्यासाठी ढाल-तलवार आहात, तर त्यांच्या अधिकारांची,सत्तेची पालखी वाहताना तुम्ही त्यांच्या पालखीचे भोई आहात, तुम्ही सेवा करावी आणि त्यांनी मेवा खावा हीच खरी तजवीज आहे.  या वाट चुकलेल्या तरुणांची सद्सदविवेक बुद्धी जागृत करायला हवी. त्यांची हेटाळणी न करता त्यांना आपुलकीने जवळ करायला हवे, त्यांना भल्याबुऱ्याची जाणीव करून द्यायला हवी.समाजाभिमुख कार्य करणाऱ्या समूहाची ही मोठी जबाबदारी ही आहे की कोणत्याही वादग्रस्त वक्तव्याचा समचार घेताना, कोणत्याही बऱ्यावाईट घटनवेर टीका करताना वा बाजू घेताना ती निरपेक्षपणे करावी त्यात एका विशिष्ट जात,धर्म, समुहालाच लक्ष्य केले जातेय अशी भावना निर्माण होऊ देऊ नये अन्यथा आपली बाजू न्याय्य असतानादेखील समोरच्या व्यक्तीला ती पटवून देणे कठीण जाईल. 

                       या वाट चुकलेल्या तरुणांना हे पटवून द्यावे लागेल की तुम्ही प्रगत झालात तर देश प्रगत होईल, तुम्ही नीतिमत्तेने वागलात तर देव प्रसन्न होईल, तुम्ही अनिष्ट रूढी परंपरा नाकारल्या तर धर्म वाढेल. तुम्ही उच्चशिक्षित झालात, समता, स्वातंत्र्य, न्यायाच्या तत्वाने वागालात तर सर्व महापुरुषांचा सन्मान होईल, तुम्ही समाजातील सर्व घटकांचा सन्मान केलात तर आपली संस्कृती महान ठरेल. तुम्ही द्वेष, तिरस्कार, वर्चस्ववाद त्यागला तर स्वत:च्या आणि येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक निकोप, निरोगी, सुरक्षित समाज निर्माण होईल. जिथे प्रत्येकाला कसलेही ओझे न बाळगता मुक्तपणे वावरता येईल.प्रत्येकाच्या नैसर्गिक, मूलभूत हक्कांचे संवर्धन, संरक्षण होईल. समाजाची वर्चस्ववादी मानसिकता बदलून, समतावादी मानसिकता निर्माण होईल. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक अशा कोणत्याही क्षेत्रात कोणाचीही मक्तेदारी, कंपूशाही नसेल. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कौशल्यानुसार, आवडीनुसार त्या त्या क्षेत्रात प्रगती करण्याची समान संधी उपलब्ध होईल. प्रत्येकाला आपापल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल. एखादी अनिष्ट रुढी, परंपरा, समूहाचा सामाजिक संकेत पाळला नाहीतर सामाजिक बहिष्कार, वाळीत टाकणे असले प्रकार घडणार नाहीत. समाजात शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित होईल, प्रगतीशील दुष्टिकोन बाळगणारा समाज निर्माण होईल.                                                                                                    

                                                                                                                                              संतोबा...



Wednesday, July 6, 2022

मानसिक आरोग्य

                आजकालच्या धक्काधक्कीच्या, धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही ढासळत चालले आहे. शारीरिक आरोग्याबाबत आपण फार सजग नसलो तरी एका ठराविक मर्यादेनंतर आपण शारीरिक आरोग्याची काळजी घेतो. पण मानसिक आरोग्याबाबत आपले नेहमीच दुर्लक्ष होते, किंबहुना मानसिक आरोग्य बिघडवणारी परिस्थिती कशी हाताळायची हेच आपल्याला कळत नाही. कौटुंबिक कलह, वडिलोपार्जित संपत्तीतील वाद, नात्यातील क्लिष्टता, नोकरी धंद्यातील कामाचा दबाव, सामाजिक प्रतिष्ठेचा दबाव असल्या गोष्टी आपले मानसिक आरोग्य बिघडवत असतात.  या गोष्टींचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर देखील होत असतो. खरंतर आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे पण बऱ्याचदा मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या बाह्य घटकांवर, व्यक्तीवर आपले नियंत्रण नसते.  अशावेळी ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या गोष्टी काहीतरी उपाययोजना करून व्यवस्थित हाताळायला शिकायला हवे. 

               कौटुंबिक कलह आणि नात्यातील क्लिष्टता हे मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे सगळ्यात प्रमुख घटक आहेत. त्यात प्रामुख्याने दोन पिढ्यांमधील विसंवाद.वडिलोपार्जित संपत्तीचे वाद, नात्यामधील कर्तव्ये आणि हक्क यांचा असमतोल,  बदलत्या परिस्थितीत दोन कुटुंबांमधील आर्थिक, सामाजिक स्तर रुंदावणारी दरी. स्वतःच्या व इतरांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे. जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग, विश्वासघात.  नात्यांमधील मानपान, गैरसमज या गोष्टींचा समावेश होतो. हे सगळं मिटवण्यासाठी आपण कितीही सामोपचाराची समजूतदारपणाची भूमिका घेतली तरी त्याला फारसं यश येत नाही. कारण बहुतेकांना हक्काची जाण असते पण जबाबदारीचे भान नसते, त्यांची कर्तव्यामध्ये स्वतःचा वाटा  आणि हक्कांमध्ये दुसऱ्याचा वाटा नको अशी आडमुठेपणाची भूमिका असते. त्यामुळे काही वेळा कोर्टकचेऱ्या करण्याची वेळ येते, बऱ्याचदा त्यामधून काहीच साध्य होत नाही याउलट वेळ, पैसा आणि मानसिक स्वास्थ्य धुळीस  मिळते. अशा कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात.

             नात्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे सोपे नसते, अशावेळी आपण स्वतः नात्यांमध्ये दुजाभाव करायचा नाही, सगळ्यांना आपले समजायचे, त्यांनी आपल्याला आपले समजायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, त्यासाठी आपण आपले मानसिक आरोग्य खराब करायचे नाही. त्यांनी आपल्याला आपले समजावे हा अट्टहास आपण सोडून द्यायचा. कारण स्वभावाला औषध नसते. आपण आयुष्यभर फक्त बेरीज करत राहायची आणि केवळ त्या बेरजेत अडथळा आणणाऱ्यांची वजाबाकी करायची. जेव्हा दोन पिढ्यांमध्ये विसंवाद होतो त्यावेळी आपण त्यांच्याजागी आपल्याला ठेऊन विचार करावा, त्यांचा संघर्ष, अनुभव हा वेगळ्या पातळीवरचा असतो. वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस जनरेशन गॅपची समस्या जटील बनत चालली आहे. आपले आचारविचार कोणावरही लादायचे नाही, नात्यांना बंधनात बंदिस्त करण्यापेक्षा त्यांना योग्य ती मोकळी दिली तर ती जास्त निरोगी राहतील. आपण कुटुंबाचा आधार बनून इतरांना परावलंबी बनवण्यापेक्षा, आपण आपल्या कुटुंबाचा पाया बनण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून सर्वाँना स्वकर्तृत्वावर भरारी घेता येईल. महत्वाचे म्हणजे जसे आहात तसे रहा, आदर्शवादाचा झेंडा मिरवत कोणाचा गॉडफादर बनण्याचा प्रयत्न करू नका. कोणालाही सदा सर्वकाळ खुश ठेवता येत नाही, कोणासाठी कितीही केलं तरी पलटायचे असते त्यावेळी ते पलटतातच शिवाय त्यासाठी बिनबुडाची कारणे देत सगळा दोष आपल्यालाच माथी मारून, आपली यथेच्छ बदनामी करून नामानिराळे होतात. त्यामुळे लोकांच्या मनातून उतरण्याची चिंता करू नका, स्वतःच्या मनातून उतरणार नाही याची दक्षता तेवढी घ्या.

              आजकाल पैसा, संपत्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. पैसा, संपत्ती नसेल तर आपल्यालाही समाजात काही किंमत राहत नाही. पैसा कमावण्यासाठी त्यासाठी लोकं वाट्टेल त्या थराला जातात. पैसा मिळवणे गरजेचेच आहे पण त्यासाठी वाट्टेल त्या थराला जायची वा काही धूर्त डावपेच खेळायची गरज नाही. पैशासाठी कोणाची लाचारी पत्करण्याची वा कोणाचे मिंधे होण्याचीही गरज नाही. कोणाच्या हातचे बाहुले बनण्यापेक्षा नितीनियमाने जेवढा कमवता येईल तेवढा पैसा कमवा व सुखासमाधानाने रहावे. फुकट मिळणारी झोपही पैशाने विकत घेता येत नाही म्हणून असे कोणते कृत्य करू नका ज्याने तुमची झोप उडेल. आयुष्यात अनेक प्रसंग येतात जिथे वादीवादातील आपल्याच हक्काच्या गोष्टी आपले जिवलग लांड्यालबाड्या करून लुबाडू पाहतात. अशावेळी जेवढे सामोपचाराने मिटवता येईल तेवढे मिटवण्याचा प्रयत्न करा नसेल मिटत तर इतर कायदेशीर मार्गाने मिटवण्याचा प्रयत्न करा. एवढं सगळं करून पदरी काही पडण्याची शक्यता नसेल किंवा जे मिळणार आहे त्याच्या तुलनेत जास्त वेळ आणि पैसा खर्च होणार असेल तर जे तर त्या गोष्टी मिळवण्याचा नाद सोडून द्यावा. तो वेळ आणि पैसा इतर ठिकाणी गुंतवा निश्चितच त्याचा परतावा जास्त आणि समाधन देणारा असेल. कधी कधी काही गोष्टी निर्व्याजपणे सोडता आल्या पाहिजेत, पानगळ झाल्याशिवाय नवी पालवी फुटत नाही.  त्या गोष्टी भले सांपत्तिक असो वा कौटुंबिक त्या निर्व्याजपणे सोडायला जमले तर मानसिक ताणतणाव आश्चर्यकाकरीत्या गायब होतो शिवाय तुम्ही त्यागले ते कोणत्या न कोणत्या रूपात सव्याज परत मिळेल.  आपण मानपान करायचा आणि त्यांनी मनमानी करायची हे जास्त काळ सहन करून चालत नाही, योग्यवेळी अशांना आपल्या आयुष्यातून बाद करणे जास्त योग्य असते, अशावेळी जास्त फायद्यातोट्याचा विचार करून चालत नाही. आपल्याशी वाईट वागणाऱ्यांबद्दल कुठलीही बदल्याची भावना मनात ठेऊ नये. बदल्याची भावना समोरच्यापेक्षा आपल्या स्वतःला जास्त त्रास देते. इतरांना त्रास नको म्हणून त्यांच्या चुकांना क्षमा करायचे नाही तर आपल्याला त्रास नको म्हणून त्यांच्या चुकांना माफ करायचे. माफ करून ते जर सुधारण्यासारखे नसतील तर त्यांना आयुष्यातून कायमस्वरूपी बाजूला करणे श्रेयस्कर समजायचे.

                      समाजात वावरताना, नोकरी धंद्यात अनेकदा आपण अडचणीत सापडतो, काही गोष्टीबद्दल आपल्या मनात एकप्रकारची भिती बसलेली असते. भित्या पाठी ब्रह्मराक्षस असे म्हणतात, त्याप्रमाणे त्या भितीमुळे आपला आत्मविश्वास डळमळीत होऊ लागतो, तो मानसिक ताण आपल्या पेलवत नाही ना कोणाला सांगताही येत नाही. त्यावेळी आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव असे ठरवून ज्या गोष्टींची भिती वाटतेय त्यांना सरळ भिडायचे. जी गोष्ट घडण्याची भिती वाटते ती घडली असे समजायचे. कसलेही ओझे घेऊन जगायचे नाही मग ती भिती असो कोणाचे उपकार तात्काळ त्यातून बाहेर पडायचे. कधीही कोणाची बरोबरी करण्याच्या भानगडीत पडू नये, कधीही कोणाशी तुलना करू नये. तुमच्याकडे काय नाही हे पाहताना तुमच्याकडे जे काही आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण तुमच्याकडे जे काय आहे ते मिळावं अशी ही कित्येक जणांची स्वप्न असतील. जे नाही ते मिळवण्याच्या नादात जे आहे त्याचा उपभोग घेण्यास विसरू नका. या जगात कोणीच सार्वभौम नाही प्रत्येक जण कोणाला न कोणाला बांधील आहे. प्रत्येकाला कोणती ना कोणती नियमावली पाळावीच लागते. या जगी सर्व सुखी असा कोणीही नाही, प्रत्येकाला तो ज्या पायरीवर आहे त्या प्रकारची सुख आणि दुःख त्याच्या आयुष्यात असतात त्यामुळे कोणाच्या सुखदुःखाचा आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ देऊ नये.  शेवटी कितीही मिळवले तरी कमीच आहे आपण कोण आहोत हे पाहण्यापेक्षा आणि इतर कोणाशी आपली तुलना करण्यापेक्षा या ब्रम्हांडात ही आपली अखंड पृथ्वी एक धुलिकणा एवढी आहे हे लक्षात घ्या. मी कधी हे मिळवायचे ते मिळवायचे असा विचार करतो त्यावेळी  "ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?" असं म्हणणारा प्यासा मधील गुरुदत्त डोळ्यांसमोरून तरळून जातो.


                                                संतोबा...

Thursday, November 25, 2021

एसटी कर्मचाऱ्यांचा संप.

प्रती,
महाराष्ट्र सरकार, कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी आणि एसटी महामंडळ कर्मचारी.
विषय : एसटी महामंडळ कर्मचारी संप आणि खाजगीकरणाबाबत.
शेतकऱ्यांच्या पाठोपाठ आता एसटी कर्मचाऱ्यांच्यावर आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे, गेल्या काही दिवसांत जवळपास ४२ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तुटपुंजा पगार, आणि तो ही नियमित नसेल तर कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांसमोर अर्थार्जनाचा दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नसेल तर आपण आपले कुटुंब सांभाळू शकत नाही या अपराधीपणाच्या भावनेतून त्यांनी आत्महत्येसारखा दुर्दैवी पर्याय निवडला तर त्यात त्यांचा काय दोष. शेवटी आपल्या रास्त मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांना संपाचे हत्यार उगारावे लागले, खरे तर ही संप करण्याची वेळ यायलाच नको होती. आत्महत्येचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन आधीच त्यांच्या अडचणी समजून उपाययोजना करायला हव्या होत्या. आज दोन आठवड्याहून अधिक काळ संप चालू असून त्यावर तोडगा निघत नसेल, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होत नसेल तर ते दुर्दैवी आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढणे बाजूला ठेऊन, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते, त्याशिवाय एसटीच्या खासगीकरणाच्या दिशेने पावले टाकली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. अशाने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन त्यांच्यातील खदखद वाढू शकते आणि संप अजून चिघळू शकतो. विलिनीकरणाबाबतचा निर्णय निश्चितच सोपा नाही, पण काल पत्रकार परिषदेत परिवहन मंत्र्यानी अडीच ते पाच हजार पगारवाढ करून, ४१ टक्के पगारवाढ दिली, ऐतिहासिक पगारवाढ दिली असे म्हणत आकड्यांचा खेळ मांडला. ४१ टक्के पगारवाढ ही काही सरसकट पगारवाढ नाही. आकड्यांची जुळवाजुळव करण्यापेक्षा कर्मचाऱ्यांच्या पगाराची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. वेतननिश्चिती आणि वेतनवृद्धीबाबत जर कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतले तर कदाचित विलीनीकरणाची मागणी तूर्तास मागे पडून संप मिटू शकतो. सरकारने ऊठसूट कामावर हजर न झाल्यास कारवाई करण्याची, निलंबन करण्याची धमकी न देता संप मिटवण्याचा प्रयत्न करायला हवा. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून संप सामोपचाराने, सुवर्णमध्य काढून मिटवावा. खाजगीकरणाबाबत केंद्रासरकारच्या पावलावर पाऊल ठेऊन एसटीचे खाजगीकरण करण्यासाचे पातक राज्य सरकारने करू नये कारण त्याचा फटका केवळ एसटी कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य गोरगरीब जनतेला बसणार आहे.
एसटी खाजगीकरणाबाबत चर्चा चालू आहे हे संपकऱ्यानां विचलित करण्यासाठी की खरोखर तशी हालचाल चालू आहे की काय हे माहीत नाही पण जर राज्यसरकार एसटीचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते दुर्दैवी असेल आणि सर्वसामान्य जनता तो प्रयत्न हाणून पाडेल. खरंतर एसटीचे खाजगीकरण व्हावे ही पांढरपेशावर्गाची सुप्त इच्छा आहे कारण काय तर ती कायम तोट्यात असते म्हणून. एसटी ही सर्वसामान्य जनतेच्या दळणवळणाच्या सेवेसाठी आहे. तिच्याकडून तिजोऱ्या भरण्याच्या अपेक्षा ठेऊ नयेत. गाव तिथे रस्ता ,रस्ता तिथे एसटी हे महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. आम्हांला तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त, शाळा, कॉलेजसला जाण्यासाठी एसटी शिवाय पर्याय नव्हता. एसटीच्या फेऱ्या कमी असल्यामुळे, एकदा एसटी चुकली की तासन तास ताटकळत थांबावे लागायचे पण तरी त्याबद्दल कोणाची तक्रार नसायची. कारण एसटी सारखा हक्काचा आणि परवडणारा दुसरा पर्याय नव्हता, ती केवळ एसटी नव्हती ती आमची जीवनवाहिनी होती. वर्ष ९९-२००० ची गोष्ट पारगांव ते सासवड ८० रुपये मासिक विद्यार्थी पास होता नंतर तो १०० व काही कालावधीनंतर तो १२० झाला आणि आम्ही आंदोलन केले, एवढी बिकट आर्थिक परिस्थिती बहुतेकांची होती, एसटी नसती तर आम्हाला कदाचित उच्चशिक्षण घेता आले नसते. पुण्यापासून केवळ ३५ किलोमीटरवर असणाऱ्या पारगांव सारख्या ठिकाणी अशी अवस्था असेल तर दुर्गम भागात किती बिकट अवस्था असेल याची कल्पना करवत नाही. एसटीला अर्धेअधिक पासवाले प्रवासी शिवाय प्रवासी असो वा नसो प्रत्येक गावात एसटी पोहचत होती, कित्येकदा घरासमोरून एखाददुसरा प्रवाशी घेऊन जाणारी सासवड-भोसलेवाडी ही एसटी बस दिसत असे. एसटीचे खाजगीकरण केले तर कदाचित ती फायद्यात येईलही पण मग एसटी ग्रामीण, दुर्गम भागात, कमी प्रवाशी संख्या असलेल्या भागात धावेल काय? विद्यार्थी, वृद्ध, अपंग यांना सवलत मिळेल का? तिकिटाचे दर आवाक्यात राहतील काय?. एसटीच्या पाससाठी अडीचशे-तीनशे रुपये नाहीत म्हणून आत्महत्या केल्याच्या घटना आपण ऐकल्या असतीलच. एसटीचे खाजगीकरण कित्येक गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेऊ शकते.
खरंतर आजही दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर एसटी फायद्यात ही आणता येईल. आजकाल शहरीभागात इ-कॉमर्सचे जाळे पसरलेले आहे त्या माध्यमातून सर्वकाही ऑनलाईन मिळते पण ग्रामीण, दुर्गमभागात अजून तसे जाळे पसरलेले नाही एसटीच्या माध्यमातून त्याचा विस्तार करून बसमध्ये पार्सलसाठी काही बंदिस्त जागा करून इ-कॉमर्स कंपन्याना सुविधा देण्याची शिवाय बसस्थानकाची काही जागा इ-कॉमर्स हब, पीकअप पॉईंट म्हणून त्यांना भाडेतत्त्वावर देता येईल का याची चाचपणी करून एक अतिरिक्त उत्पन्नाचा दीर्घकालीन मार्ग निघू शकतो. याशिवाय जाहिरातींच्या माध्यमातून देखील उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करता येईल. याव्यतिरिक्त प्रवाशी वाढीसाठी, उत्पन्नवाढीचे इतर मार्ग काढण्यासाठी शिवाय एसटी प्रशासनामध्ये काही अनियमितता असेल, काही गडबड, गोंधळ असेल तर प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असलेले व अनेक पदे भूषविलेल्या श्री. महेश झगडे यांच्यासारख्या काही सनदी अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी समिती नेमून एसटीच्या भल्यासाठी नियमित नाविन्यपूर्ण उपक्रम आखता येईल तसेच एसटी प्रशासन आणि राज्यशासन यामध्ये समन्वयही राखता येईल.
माझी सर्व संपकरी एसटी महामंडळ कर्मचारी वर्गाला विनंती आहे की त्यांनी संप जास्त ताणू नये. जे खरं दुखणं आहे त्यावर उपाययोजना राज्य सरकार करत असेल तर एखाद्या अवास्तव मागणीसाठी अडून बसू नये. शक्य तेवढ्या मागण्या मान्य करवून एसटी पूर्वपदावर आणावी. आवश्यकता भासल्यास संप पुन्हा करता येईल. सरकारविरोधक नेहमी जनतेच्या सोबत असतात, संप चिघळत ठेवणे, सर्वसामान्य जनतेत असंतोष, रोष निर्माण करणे त्यांच्या फायद्याचे असते. त्यांच्या कट-कारस्थानाला बळी पडू नये. संपाची सूत्र तुमच्या हातात राहतील याची काळजी घ्या त्यांच्या हाताचे बाहुले बनून उद्ध्वस्त होऊ नका. संघटीत आणि सावध रहा कारण आजकाल मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या आणि दुसऱ्याच्या चितेवर स्वार्थाच्या भाकरी भाजणाऱ्यांची कमी नाही, ते तुमच्या खांद्यावर बंदूक ठेऊन त्यांचा स्वार्थ साधून घेतील पण फासावर तुम्ही लटकले जाल. सन्माननीय तोडगा काढून संप लवकरात लवकर मिटवणे आणि एसटी वाहतूक सेवा पूर्वपदावर आणणे सरकार आणि एसटी कर्मचारी संघटनेचे दोघांचीही सामुदायिक जबाबदारी आहे आणि तेच एसटी कर्मचारी आणि तमाम सर्वसामान्य जनतेच्या हिताचे आहे. आशा आहे लवकरच संप लवकर मिटेल आणि सगळं सुरळीत होईल.
संतोष गांजुरे.
२५ नोव्हेंबर २०२१.

Wednesday, December 30, 2020

गुलामगिरीची चौदा वर्षे!!!

             परिस्थिती अशी होती की, कधी एकदा शिक्षण पूर्ण करतोय आणि कुठेतरी एखादी नोकरी मिळवतोय एवढेच ध्येय होते. रडतकडत अर्धवट शिक्षण पूर्ण केलं, नोकरी भेटेल अशी पुसटशीही आशा नव्हती. कारण ना शिक्षणासाठी, ना नोकरीसाठी कोणाचे मार्गदर्शन होते. त्याचीच परिणीती म्हणजे बारावी आर्ट्स नंतर डिप्लोमाला गेलो आणि डिप्लोमानंतर काही दिवस शेतमजुरी, नंतर  एमआयडीसीमध्ये एका ऑटोमोबाईल युनिटमध्ये सहा महिन्यांत कामगारापासून मॅनेजर पर्यंतचा प्रवास करून तिथे रामराम ठोकला. पुढे एका फार्मा कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून सहा महिने काम केले, नंतर सहाएक महिने मित्राच्या कंप्युटर शॉप मध्ये काम केले. सरतेशेवटी डिप्लोमाच्या वर्गमित्राच्या रेफरन्सने(हवं तर वशिल्याने म्हणा) घोडं गंगेत न्हाले आणि आयटीत क्षेत्रात नोकरी भेटली त्यांस नुकतीच २९ नोव्हेंबर २०२० रोजी चौदा वर्षे पूर्ण झाली. 

                 बिकट आर्थिक, सामाजिक परिस्थिती पालटण्यासाठी  नोकरी हाच उपाय वाटत होता, मुंबईत एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी लागल्याने वाटलं आता दिवस पालटतील, तसे ते पालटले देखील पण तो बदल पोटापाण्यापुरतं आणि राहणीमानाइतपतच मर्यादित राहिला. ज्या वेगाने प्रगती व्हायला गावी ती झाली नाही, तुलनेने सुरुवातीला बेरोजगार असणारे काहीजण उद्योग-व्यवसाय करून इतकेच काय तर काहीजण छक्के-पंजे करून अनपेक्षितरीत्या जास्त लवकर प्रस्थापित झाले. नोकरी करणे चूक नव्हते, ती नसती तर कदाचित त्या बिकट परिस्थितीत मी पूर्णपणे उद्ध्वस्त ही होऊ शकलो असतो पण आयटी सारख्या अस्थिर क्षेत्रात, नोकरीत स्थिरावलो ही मात्र निश्चित चूक होती. बऱ्याचदा आपण बिकट परिस्थितीशी संघर्ष करून ती बदलतो मात्र एकदा ती सोईस्कर झाली की आपण तिच्या अधीन होऊन जातो आणि काही दिवसानंतर पहिले पाढे पंचावन्न होतात अन कधीकाळी आपल्याला रोल मॉडेल मानणारी लोकं आपल्या पाठीमागे आपल्याला नावे ठेऊ लागतात.

           केवळ नोकरीच्या जीवावर फार पुढे जाता येतच नाही, ती ना मरू देते ना जगू देते. एक प्रकारची गुलामीच ती, त्यात एकदा अडकलं त्यातून सुटका नाहीच. खरंतर उद्योजकतेचे बाळकडू आत्मसात करण्याची संधी पहिल्याच नोकरीत मिळाली होती. मी पहिल्यांदा जेव्हा धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीत प्रवेश केला तेव्हा समोर  "बी ब्लॉक" या बिल्डिंगवर पुरुषभर उंचीच्या अक्षरात धीरूभाईंचे वाक्य  लिहिले होते, ""Think big, think fast, think ahead. Ideas are no one's monopoly". जे अगदी पटण्यासारखेच होते, कारण सृजनशीलता कोणाचीही मक्तेदारी नसते.  पण आपल्या गुणसूत्रात ना उद्योजकता होती ना व्यवहारीकता होती. त्यामुळे दुसऱ्याची चाकरी करण्यातच धन्यता मानण्याशिवाय गत्यंतर नव्हते. धीरूभाई अंबानींचेच दुसरं वाक्य होते,  "If you don't build your dream, someone else will hire you to help them build theirs".  हे आम्ही त्यांच्याकडे काम करून सार्थकीच लावत होतो.  दुसरीकडे सव्वा दोन हजार वर्षांपूर्वीच राजकीय गुरू ॲरिस्टॉटल यांनी सांगितलेल्या  "All paid jobs absorb and degrade the mind"  या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो.  कारण टार्गेट्स आणि डेडलाईन्स चक्रव्यूहात सृजनशीलतेचा गळा घोटला जातोय हे जाणवत होतेच. सारं काही कळत होतं पण वळत नव्हते,  संघर्षमय का होईना पण एका कम्फर्ट झोन मध्ये मी स्थिरावलो होतो आणि त्यातून जोखीम पत्करण्याची तयारी नव्हती.

              त्यामुळेच आज चौदा वर्षे नोकरी करून देखील आईने चारचौघांत कौतुकाने सांगण्यासारखे माझ्या हातून काहीच घडले नाही. शेती, घर, गाडी, व्यवसाय यापैकी मला काहीच साध्य करता आले नाही. "ठेविले अनंते तैसेचि रहावे l चित्ती असो द्यावे समाधान ll" या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओवी प्रमाणे अगदी चाकोरीबद्ध जीवन जगणे चालू होते. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे कर्तव्य करत होतो. त्याचाच परिपाक म्हणजे वेळोवेळी वेतनवाढ, पदोन्नतीमध्ये डावलले गेले, अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावला जायचा मात्र तरी त्याचे मला कधी विशेष काही वाटले नाही, पण आज चौदा वर्षांनंतर हा मागचा आढावा घेताना आपण फार तत्त्वनिष्ठपणे वागून चूक केली की काय अशी शंका यावी इतका या व्यावहारिक दुनियेत मी मागे पडलोय. साधी राहणी उच्च विचारसरणी या वृत्तीने आजपर्यंत जगत आलोय.  आज मी इथपर्यंत पोहचूनही सोबतचे, हाताखालचे लोकं स्वतःच्या गाडीने ये जा करत असताना मी मात्र अजूनही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतो, तेच इतर गोष्टींबाबाबतही मग ते मोबाईल, घर, टीव्ही काहीही असो,  थोडक्यात मी म्हणजे जणूकाही डाऊन टू अर्थ चे मूर्तिमंत उदाहरणच. आज मात्र या सर्वाचे कौतुक वाटावे की लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. एकंदरीत काय तर सदासर्वकाळ आदर्शवादाचा झेंडा घेणंही अडचणीचे ठरू शकते. 

               प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी टर्निंग पॉईंट येतच असतो. माझ्या आयुष्यात तो कोरोनाचा रूपाने आला. अनपेक्षितपणे कोरोनासारखी जागतिक महामारी आली अन माझ्या पायाखाची जमीन हादरली, कोरोनाचे सुरुवातीचे रौद्ररूप पाहून आपण आणि बाकी सर्व कुटुंब सहीसलामत बाहेर पडू की नाही याची शाश्वती वाटेना. आतापर्यंत आज ना उदया होईल या सबबीखाली चाल ढकल चालू होती पण आता मागचा सर्व जीवनपट पुन्हा एकदा उलगडू लागला. कुटुंबाने केलेले कष्ट, पाहिलेली स्वप्ने नजरेसमोर येत होती. सहा महिन्यांहून अधिक काळ सगळं काही ठप्प झाले, सगळं सुरळीतपणे चालू झाल्यावर जोमाने प्रयत्न करून गेल्या१४ वर्षांचा अनुशेष या एका वर्षांत भरून काढायचा आहे. त्यासाठी केवळ बदल करून चालणार नाही तर कायापालट करावा लागेल. शेती, घर, गाडी, व्यवसाय, आरोग्य आणि राजकारण हे या वर्षीच करायचं आहे हाच वर्षीचा संकल्प आहे आणि त्या दृष्टीने आजच १ जानेवारी २०२१ पासून पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. हे सगळं याच वर्षी पूर्ण करायचे आहे, त्यासाठी शक्य तेवढा घाम गाळणार आहे आणि पुढे हे सारं टिकवण्यासाठी भले रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर. 

           हे असे सारे ठरवलं असले तरी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आई-वडिलांचे स्वप्न आहे की थोडी का होईना बागायती शेती असावी, स्वतःची विहीर, पाईपलाईन असावी. एखादी सीताफळाची का होईना बाग असावी. अपवाद वगळता सामाईक विहिरींचा वापर वीसेक वर्षांपासून बंदच आहे,  वयोमानानुसार पूर्वी सारखी धावपळ करणे आता जमत नाही त्यात भावकीचा आडमुठेपणा तर जगजाहीर आहे. त्यामुळे स्वतःची थोडी  का होईना बागायती शेती,बाग असावी जिथे वेळ घालवता येईल. पण नोकरी आणि जमिनीचा वाद एकाचवेळी सुरू झाला तो मिटवण्यासाठी गेली सात-आठ वर्षे हरतऱ्हेचे प्रयत्न करून पाहिले, दोन पावले माघार घेऊन समजूतदारपणे तोडगा काढायचा प्रयत्न केला, कोर्ट-कचेरीत पाण्यासारखा पैसे ओतला, स्वाभिमान गहाण ठेऊन उंबरठे झिजवले पण कशाचाही फायदा झाला नाही. आता एका स्वप्नासाठी इतर स्वप्नांचा बळी द्यायचा नाही. केवळ शेतीसाठी रोगट, स्वार्थी नात्यांचे ओझे वागवायचे नाही. या असल्या रोगट नात्यांनी माझे आर्थिक, मानसिक, सामाजिक खच्चीकरण केले, इतके की कधी कधी आपण अनाथ असतो तर बरे झाले असते इतपत या नातेवाईकांनी छळ केला आहे. नोकरी इतकीच ही असली नात्यांची गुलामी सहन केली आहे. आता मात्र या दोन्ही मधून बाहेर पडायचे आहे. आता दोन्ही बाबतीत सहनशीलतेची मर्यादा संपत आली आहे. नोकरी हा अर्थाजनाचा एकमेव स्रोत असल्यामुळे गुलामगिरीच्या चौदा वर्षांचे पंधरा-सोळा वर्ष होतील पण वीस होणार नाहीत. आता ऑफर लेटर, एक्सपिरिअन्स लेटर, प्रमोशन लेटर यांची होळी करायची वेळ आली आहे. गुलामगिरीचे जोखड भिरकावून देण्याची वेळ आली आहे. त्याच प्रमाणे स्वार्थी, रोगट नात्यांचा समारोप करण्याची वेळ आली आहे.आता एकदाचे परतीचे दोर कापायचे आहेत अन फक्त पुढची वाट चालायची आहे.

                                             संतोबा....

Thursday, September 26, 2019

श्रद्धांजली

       
              श्री. तानाजी किसन गायकवाड(दादा) वय ६३ वर्षे यांचे गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांचे मुळगाव पुरंदर तालुक्यातील पारगांव मेमाणे, पारगांवमध्ये त्यांचे वडिलोपार्जित घर व शेती आहे मात्र नोकरीनिमित्त जवळपास तीन पिढ्यापासून गायकवाड कुटूंब महादेवनगरमध्ये वास्तव्यास आहे.

         श्री तानाजी गायकवाड हे सिरम इन्स्टिट्यूट मध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून चाळीसहून अधिक वर्षे कार्यरत होते आणि सिरम इन्स्टिट्यूटमध्ये शेवटपर्यंत त्यांनी जबाबदारीने व निस्वार्थ भावनेने सेवा बजावली. त्यांचे वडील किसनराव गायकवाड हे कंपनीच्या स्थापनेपासून पुनावाला ग्रुप मध्ये कार्यरत होते. सध्या त्यांची मुले श्रीकांत व सनी हे दोघे अधिकारी म्हणून सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत. अशा प्रकारे तीन पिढ्यापासून हे कुटुंबीय पुनावाला ग्रुपशी जोडले गेले आहे. चोख आणि प्रामाणिक काम यामुळे मा. श्री. सायरस पुनावाला यांचा प्रचंड विश्वास या कुटुंबावर आहे. कामाप्रतीची गुणवत्ता, सचोटी आणि प्रामाणिकपणा या जोरावर श्री. पुनावाला कुटुंबीयांशी त्यांचे घनिष्ट संबंध निर्माण झाले.

           त्याबरोबरच श्री. तानाजी गायकवाड यांनी महादेवनगर नागरी पतसंस्थेचे चेअरमनपद भूषवले होते. पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गरजूंना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी अनेक गरजू तरुणांना रोजगार, नोकरी मिळवून देण्यासाठी हातभार लावला. त्याचबरोबर अनेक कौटुंबिक कार्यात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला व जबाबदारीने अनेक कार्ये पार पाडली. पै-पाहुण्यांना अडीअडचणीच्या काळात सढळ हस्ते मदत केली तसेच त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन केले.

       त्यांच्या पश्चात पत्नी छाया, मुले श्रीकांत व सनी, मुलगी माधुरी, तसेच वरदराज आणि राजवीर ही नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांनी दोन्ही मुले व मुलगी यांची लग्न कार्ये चांगल्या प्रकारे पार पाडली व तिघेही आपआपल्या संसारात सुखी आहेत. दादांनी  आयुष्यात सर्व जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडल्या, सर्वांनाच त्यांचा सहवास हवाहवासा वाटे मात्र आजाराचे निमित्त झाले, सर्वांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र दुर्दैवाने गुरुवारी दुपारी दोनच्या दरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. ईश्वरी सत्तेसमोर नाईलाज आहे. दादा नेहमी विचारांनी, तत्त्वांनी आणि संस्कारांनी आपल्यात असतील पण भौतिकदृष्ट्या आपणास त्यांचा सहवास लाभणार नाही हे कटू सत्य आपणास स्वीकारावेच लागेल.

     दादांच्या पुण्यआत्म्यास चिरशांती आणि सदगती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


Friday, September 20, 2019

बापमाणूस

       कोणत्याही पदापेक्षा काही लोक मोठे असतात त्यापैकीच दादा एक.  दादा भावकीच्या नात्याने मामा, मी शिक्षण आणि नोकरी निमित्त बाहेर असल्याने आणि त्यांचेही गावाकडे जास्त येणेंजाणे नसल्याने माझा त्यांच्यासोबत किंवा कुटुंबासोबत कधी संबंध आला नव्हता. माझे माधुरीशी लग्न झाल्यावर मामा-भाच्याच्या नात्याचे सासरे-जावयाच्या नात्यात रुपांतर झाले पण त्यांना सासरे किंवा मामा म्हणायला कधी माझी जीभ रेटली नाही. स्वतःच्या मुलांप्रमाणे किंबहुना जास्तच प्रेम त्यांनी माझ्यावर केले. आमची कसलीही अपेक्षा नव्हती त्यामुळे लग्नाच्यावेळी देण्याघेण्याबद्दल कसलीही बैठक झाली नाही तरी दादांनी सगळे आम्ही बघतो म्हणून सांगितले. इतर ठिकाणी पगार आणि प्रॉपर्टीचा पहिला प्रश्न विचारला जायचा मात्र दादांनी लग्नापूर्वी वा नंतरही ना माझ्या पगाराची ना प्रॉपर्टीची चौकशी केली. त्यावेळेसच मला त्यांचे वेगळेपण जाणवले. 
    
               कशाचीही अपेक्षा नसताना आणि काहीही न मागता दादांनी सारं काही दिले पण त्यांनी जे प्रेम,आपुलकी आणि मानपान दिला त्याला तोडच नाही. घरी चिकन,मटण काहीही जेवण बनवले की जेवायला घरी या म्हणून फोन येणार. मला एकवेळ दुष्मनाच्या घरी जेवायला काही वाटणार नाही पण नातेवाईकाच्या घरी जेवायचं म्हणजे दडपणच यायचं कारण नातेवाईक कधी काय उकरून काढतील त्याचा नेम नसतो. त्यामुळे सुरुवातीला माझा नकारच असायचा. मी काहीतरी कारण सांगून नाही म्हणलं की सनी, श्रीकांत आणि ते नसतील तर कोणीतरी पुढच्या दहा-पंधरा मिनिटांत माझ्यासाठी डबा घेऊन हजर असायचे आणि हे नेहमीच होऊ लागले शेवटी आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून मी स्वतःच जेवायला जाऊ लागलो, त्याच प्रमाण इतकं होते की बाकीच्या लोकांना मी घरजावई झालो की काय असा संशय यावा. जावयाची नेहमीची उठबस राहिली की दशमग्रह होतो असे म्हणतात पण मी रोज जरी घरी गेलो तरी माझी सर्व पद्धतशीरपणे उठबस व्हावी हा त्यांचा हट्टहास असे. 
   
            लग्नाच्या दीड वर्षांनंतर वरदराजचा जन्म झाला. त्याच्यावर तर त्यांचा खूप जीव होता आणि त्यांना त्याचे खूप कौतूक होते. थोरल्या मेहुण्यांचे(श्रीकांत) लग्न झाले त्यावेळेस ठरवलं की आता जाणे येणे कमी करायचे. नव्या पाहुण्यारावळ्यात हे सततचे येणेजाणे बरं दिसणार नाही शिवाय त्यांच्या नवीन सूनबाई कशा असतील याची कल्पना नाही. पण सर्व काही जसं आहे तसेच चालू राहिले. पुढे राजवीरचा जन्म झाला, धाकट्या मेहुण्यांचे(सनी)लग्न झाले पण त्यांच्या प्रेमात तसूभरही फरक पडला नाही उलट ते वाढत गेले. सुदैवाने त्यांच्या दोन्ही सुनबाई आणि त्यांच्या माहेरची मंडळी अतिशय सुसंस्कृत आणि माणुसकी असणारी आहेत त्यामुळे त्यांच्यात वावरताना मला कधी अवघडल्यासारखे झाले नाही.
       
           दादा एक निस्वार्थ, सामाजिक भान असलेले एक मनमिळावू व्यक्तिमत्त्व. ह्याच सामाजिक भानातून आणि निस्वार्थ भावनेतून दादांनी कित्येक गरजू तरुणांना नोकरी मिळवून देण्यास हातभार लावला, कित्येकांना निस्वार्थीपणे कसलीही अपेक्षा न करता सढळ हस्ते मदत केलीच शिवाय त्या मदतीचा कधी हिशोब ठेवला नाही. दादांची सामाजिक श्रीमंतीची ना तुलना होऊ शकते ना ती मोजता येऊ शकते. ह्या सामाजिक श्रीमंतीचा अनुभव मात्र वेळोवेळी आपण घेऊ शकतो. सिरम इन्स्टिट्यूटसारख्या जागतिक दर्जाच्या आणि आशियातील एक नंबर असलेल्या फार्मा कंपनीत कर्मचारी, अधिकारी  ते अगदी मालकापर्यंत सर्वांशी घनिष्ट संबंध असताना आणि अनेक अधिकार असताना गैरफायदा सोडाच पण फायदा घ्यायचाही विचार कधी दादांनी केला नाही. कर्म हाच त्यांचा धर्म होता, कंपनी हे त्यांचे दुसरे घरचं होते. स्वतः किती आजारी असले तरी विचार मात्र कंपनीचाच असायचा. शेवटच्या क्षणापर्यंत कंपनीच्या भरभराटीसाठी मोलाचा हातभार लावला.
           
               गेल्या काही दिवसांपासून दादांची प्रकृती बरी नव्हती. जवळपास आठवडाभर सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, दादांनीही आठवडाभर जिद्दीने लढा दिला पण दुर्दैवाने काल १९-०९-१९ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दादा भौतिक रूपाने आपल्याला सोडून गेले. दादांसारखा बापमाणसाचे छत्र हरवल्याचे दुःख शब्दात व्यक्त करता येत नाही. एखाद्याच्या जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला, जीवनात पोकळी निर्माण झाली म्हणजे नक्की काय याची जाणीव आता व्हायला लागली आहे. दादा शरीररूपाने जरी आपल्यात नसतील तरी त्यांचे संस्कार, तत्व, विचार हे आम्हांस कायम प्रेरणा देत राहतील. दादां नेहमीच प्रेमळ आठवणी रूपाने आपल्या हृदयात अजरामर असतील. 

💐दादांना गांजुरे,गायकवाड परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली💐

Sunday, July 14, 2019

मैत्र जिवाभावाचे!!!

                आजच्या धावपळीच्या युगात माणूस एकलकोंडा होत चालला आहे. तंत्रज्ञानामुळे जग मुठीत आलयं पण त्यातील माणसे, आठवणी, नाती निसटून गेलीत.  पण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कित्येक वर्षांपासून शिक्षणानंतर विविध कारणांनी दुरावलेली लोकं पुन्हा एकत्र येत आहेत. रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नातं फार जवळचे असते. नातेवाईकांकडे गेले की दुःखावरच्या खपल्या काढल्या जातात. शेतीचं काय,कोर्ट केसचा निकाल काय, फ्लॅट, गाडी, नोकरी नको ते विषय काढले जातात पण मैत्रीचं नाते टाईम मशीन सारखे असते, क्षणभरात ते तुम्हाला शाळा, कॉलेजात घेऊन जाते. परवा बऱ्याच दिवसांनी एका मित्राचा कॉल आला, पहिलाच प्रश्न होता काय रे ती आठवतेय का? पण सध्या मी काय करतोय हे महत्वाचे असल्याने, "सध्या ती काय करते" हे न विचारता विषयाला सराईतपणे कलाटणी दिली. मात्र तरी मन पस्तिशीतून विशीकडे क्षणभरात पोहचलेच.
            जीवनाच्या विविध टप्प्यावर अनेक मित्र व त्यांचे ग्रुप्स निर्माण झालेत. ज्यावेळी पारगांवातील, शाळेतील मित्रांसोबत असतो त्यावेळी ते दिवस आठवतात ज्यावेळेस चिंचा, बोरे, आंबा, जांभूळ, पेरू हे विकत घेऊन खायच्या गोष्टी आहेत याची कल्पनाही नसायची. दिवस दिवस क्रिकेट खेळणे, तासनतास पोहणे. पावसात चिंब भिजणे, पाऊस थांबल्याबरोबर माळरानावर खळखळणार पाणी पाहायला जाणे, त्या वाहत्या पाण्यावर धरणे बांधणे,  शाळेतील गंमती जमती, शिक्षक त्यांची विविध लकबी, त्यांच्या केलेल्या नकला सगळ्यांची उजळणी होऊन तो कधीही न येणारा काळ जिवंत होतो. कॉलेजात इतर गावांतील मुलांमुळे मित्र परिवार विस्तारला. तिथल्या वेगळ्याच गंमती, शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीपासून अगदी बसस्थानक नियंत्रकाच्या "सासवड-सुपा बस क्रमांक ४५१७ फलाट क्रमांक आठला लागलेली आहे". या उद्घघोषणेपर्यंत सारं काही मनाच्या एका कोपऱ्यात कोरलेलं आहेत. पुढे डिप्लोमासाठी कोल्हापूरला जावं लागल्यावर सगळ्याच गोष्टी सोबत जुळवून घ्यावं लागले पण आवडत्या राज्यशास्त्र, सहकार, शिक्षणशास्त्र सोडून अजिबात न उमगणाऱ्या फिजिक्स, मैथ्सशी कधीच जुळवून घेता आले नाही. पण ते सारं काही आयुष्याला कलाटणी देणारे होते.
               काळाच्या ओघात खूप काही बदललंय, खूप काही नष्ट झालंय. पण त्या आठवणी कुठे तरी खोलवर रुतून बसल्या आहेत. शाळा, कॉलेजात बेंच, हॉस्टेलच्या रूम्सच नाही तर त्यावेळेसचा काळही एकमेकांशी शेअर केला होता. आजकाल तंत्रज्ञानाच्या अविष्काराने सारं काही सहज शेअर करता येत असले तरी आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर  केलेल्या संघर्षाच्या,उपद्व्यापाच्या अनेक कडू गोड आठवणी असणारी आमची शेवटचीच पिढी असेल की काय असे वाटतंय. या आठवणी अशाच जपल्या पाहिजेत आणि जमेल त्यावेळेस एकत्र जमून त्याची उजळणी केली पाहिजे. आजच्या धक्काधक्कीच्या तेच क्षण तुम्हाला नवचैतन्य प्राप्त करून देतील आणि कोणत्याही बऱ्यावाईट काळात जगण्याचे बळही देतील. 
                                                                 संतोबा.....

Saturday, June 8, 2019

सावित्रीमाई!!!

              माई, आज १० मार्च २०१९. तू आम्हाला पोरकं करून आज १२२ वर्षे पूर्ण झालीत. पण तू दिलेला ज्ञानाचा, संघर्षाचा वारसा आजही आम्हाला प्रेरणा देत आहे. ज्या काळात जाती-पाती, भेदभाव यांचाच बोलाबाला होता. गोरगरिबांना, स्त्रियांना समाजात दुय्यम दर्जाचे स्थान होते. त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जात असे, त्यांचे माणूस म्हणून जगणे ही मान्य नव्हते. त्या काळात तात्यासाहेबांना केवळ शिक्षणच या पीडितांना तारेल याची जाणीव होती. म्हणूनच त्यांनी म्हणले आहे,
            "विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
            नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
            वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
म्हणून त्यांनी शिक्षणाची सुरुवात स्वतःच्या घरापासूनच करत माई पहिल्यांदा तुला शिक्षण दिले. एवढेच नव्हे तर त्या शिक्षणाचा उपयोग, पीडित समाजाला सुशिक्षित करण्यासाठी तुला प्रोत्साहन दिले. त्या काळातील एकंदरीत परिस्थिती पाहता तुझ्या कार्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
               माई, तुम्ही हे कार्य केले नसते तर आज शिक्षण मिळालेच नसते, अशातला भाग नाही. पण आपण पाहतो एखाद्या कुटुंबात एक जरी व्यक्ती शिकली तर त्या कुटुंबाचा उत्कर्ष होतो, पण एखादी व्यक्ती दुर्गुणी निघाली तर ते संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. केवळ एका व्यक्तीचा त्या कुटुंबावर समाजावर बरा वाईट प्रभाव पडत असतो.तुम्ही तर सामाजिक सुधारणांची व शिक्षणाची ज्ञानगंगा कित्येक पिढ्या आधी आणली आणि ती सर्वसामान्य गरजू लोकांपर्यंत पोहोचवली. केवळ तुमच्यामुळे कित्येक पिढ्यांचा उत्कर्ष झाला. कोट्यवधी लोकांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडला. बहुतांश सर्वच थोर कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या समाजातूनच टोकाचा विरोध सहन करावा लागला कारण त्या समाजावर पिढ्यानपिढ्या कित्येक रूढी परंपरा लादलेल्या होत्या व कालांतराने त्या रुढी परंपरा त्यांच्या अस्मितेचा भाग झालेला होत्या. त्याच अस्मितेतून "आमच्यात लग्नाची हळद निघायच्या आत जरी एखादी मुलगी विधवा झाली तरी तिला पुन्हा लग्न करता येत नाही" असे मोठ्या तोऱ्यात सांगितले जायचे. तात्यासाहेबांनी असल्या अनेक क्रूर रूढी परंपरावर आसूड ओढले, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार, केशवपन, सती प्रथेस विरोध केला. चूल आणि मुल एवढ्याशा विश्वात बंदिस्त केलेल्या स्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला, त्यामुळे बहुसंख्य समाज, स्वजातीय अगदी कुटुंबातील व्यक्तीही विरोधात गेल्या. मात्र आपण प्रत्येक गोष्टीत तात्यासाहेबांना सोबत केलीत, त्यांच्याबरोरीने कार्य केलंत. त्यांच्या पश्चात ही आपण हे कार्य मोठ्या हिरीरीने पुढे नेले. म्हणूनच तात्यासाहेबांच्या कार्यासमोर माई तुझे कार्य कधी झाकळले गेले नाही तर ते अधिक प्रखरतेने उजळून निघाले.
                  थोर व्यक्तींनी जात,धर्म न बघता कार्य केले. मात्र त्यांच्या पश्चात आज त्यांना त्या त्या जातीतील लोकांनी त्या थोर व्यक्तींना आपले स्वतःचे मतलब साध्य करण्यासाठी जातीत बंदिस्त केले आहे. ज्यांना जयंती,पुण्यतिथीतला फरक कळत नाही. ज्यांना ना त्या थोर व्यक्तीची पूर्ण माहीत आहे ना त्यांच्या कार्याची ओळख ना आत्मीयता आहे ते लोक आपले इप्सित साध्य करताना, फुक्या अस्मितेपायी जाती-जातींचे कळप निर्माण करत आहेत. केवळ आपल्या जातीत कोणी थोर व्यक्ती जन्माला आला होता म्हणून एकाच जातीचे म्हणून कोणी त्यांचे वारस ठरत नाही. आपण एकाच मातीत,जातीत,गावात जन्माला आलो म्हणून मी तुझा वारस ठरत नाही, अगदी मी तुझ्या पोटी जन्माला आलो असतो आणि आपले विचार, कार्य मला झेपले नसते तरी मी आपला वारस ठरलो नसतो पण हे काही स्वतःला वारस म्हणवणाऱ्या निर्बुद्ध वारसांना हे कळत नाही. त्यातूनच मग त्या त्या जातीची संघटना स्थापन होते, त्या थोर व्यक्तीला पुरस्कार देण्याची, पुतळा उभारण्याची, एखाद्या मोठ्या प्रकल्पास नाव देण्याची मागणी केली जाते. याचाच परिपाक म्हणजे प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर आम्ही यांना हा पुरस्कार देऊ, त्यांचा पुतळा उभारू, नामांतरण करू अशी अनेक पोकळ आश्वासने दिली जातात. थोर व्यक्तींनी कार्य पुरस्कारासाठी, पुतळ्यासाठी वा नावांसाठी केलेले नसते. खरंतर थोर व्यक्तींना पुरस्कार देणे हा त्या पुरस्काराचा गौरव असतो.
            माई, तू हे पवित्र कार्य करताना प्रसंगी समाजाचा विरोध पत्करला, दगडगोटे, शेणाच्या गोळ्यांचा मार खाल्ला. त्यावेळेसचा समाज अज्ञानी होता. त्याला वर्षानुवर्ष काल्पनिक गोष्टींची भीती घालून अनेक रूढी परंपरांच्या जोखडाखाली दाबले गेले होते. पण आज इतक्या वर्षांनंतर समाज सुशिक्षित होऊन देखील जातीय अस्मितेतून बाहेर पडू शकला नाही. त्यामुळे आपल्याच जातीतील व्यक्ती कशा थोर आहेत आपलीच जात कशी श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी इतर जातींमध्ये थोर व्यक्तींची बदनामी करणे अद्यापही अव्याहत चालू आहे. माई, आजही नानाविविध प्रकारे तुम्हां उभयंताची बदनामी केली जाते. त्यांना सडेतोड उत्तर देणे अवघड नाही पण असल्या पोकळ कार्यात वेळ आणि शक्ती खर्च करण्यापेक्षा आपले कार्य पुढे नेण्यास कणभर जरी हातभार लागला तर कुठे आपला वारस म्हणून घेण्यात अभिमान वाटेल.
              माई, कोणी तुला क्रांतीज्योती म्हणत असेल तर कोणी पहिली मुख्याध्यपिका म्हणत असेल अर्थात हे सर्व सत्य असले तरी तू आमच्यासाठी आमची आई आहेस. म्हणूनच आज जेव्हा, अनेक मुली अनेक क्षेत्रात नाव कमावत आहेत त्या "आम्ही, सावित्रीच्या लेकी" असे अभिमानाने सांगत असतात, त्यावेळी निश्चित तुझा ऊर अभिमानाने भरून येत असेल!!!
                                       माई तुझ्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

                                                                                                      संतोबा...
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!