माई, आज १० मार्च २०१९. तू आम्हाला पोरकं करून आज १२२ वर्षे पूर्ण झालीत. पण तू दिलेला ज्ञानाचा, संघर्षाचा वारसा आजही आम्हाला प्रेरणा देत आहे. ज्या काळात जाती-पाती, भेदभाव यांचाच बोलाबाला होता. गोरगरिबांना, स्त्रियांना समाजात दुय्यम दर्जाचे स्थान होते. त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जात असे, त्यांचे माणूस म्हणून जगणे ही मान्य नव्हते. त्या काळात तात्यासाहेबांना केवळ शिक्षणच या पीडितांना तारेल याची जाणीव होती. म्हणूनच त्यांनी म्हणले आहे,
"विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
म्हणून त्यांनी शिक्षणाची सुरुवात स्वतःच्या घरापासूनच करत माई पहिल्यांदा तुला शिक्षण दिले. एवढेच नव्हे तर त्या शिक्षणाचा उपयोग, पीडित समाजाला सुशिक्षित करण्यासाठी तुला प्रोत्साहन दिले. त्या काळातील एकंदरीत परिस्थिती पाहता तुझ्या कार्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
माई, तुम्ही हे कार्य केले नसते तर आज शिक्षण मिळालेच नसते, अशातला भाग नाही. पण आपण पाहतो एखाद्या कुटुंबात एक जरी व्यक्ती शिकली तर त्या कुटुंबाचा उत्कर्ष होतो, पण एखादी व्यक्ती दुर्गुणी निघाली तर ते संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. केवळ एका व्यक्तीचा त्या कुटुंबावर समाजावर बरा वाईट प्रभाव पडत असतो.तुम्ही तर सामाजिक सुधारणांची व शिक्षणाची ज्ञानगंगा कित्येक पिढ्या आधी आणली आणि ती सर्वसामान्य गरजू लोकांपर्यंत पोहोचवली. केवळ तुमच्यामुळे कित्येक पिढ्यांचा उत्कर्ष झाला. कोट्यवधी लोकांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडला. बहुतांश सर्वच थोर कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या समाजातूनच टोकाचा विरोध सहन करावा लागला कारण त्या समाजावर पिढ्यानपिढ्या कित्येक रूढी परंपरा लादलेल्या होत्या व कालांतराने त्या रुढी परंपरा त्यांच्या अस्मितेचा भाग झालेला होत्या. त्याच अस्मितेतून "आमच्यात लग्नाची हळद निघायच्या आत जरी एखादी मुलगी विधवा झाली तरी तिला पुन्हा लग्न करता येत नाही" असे मोठ्या तोऱ्यात सांगितले जायचे. तात्यासाहेबांनी असल्या अनेक क्रूर रूढी परंपरावर आसूड ओढले, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार, केशवपन, सती प्रथेस विरोध केला. चूल आणि मुल एवढ्याशा विश्वात बंदिस्त केलेल्या स्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला, त्यामुळे बहुसंख्य समाज, स्वजातीय अगदी कुटुंबातील व्यक्तीही विरोधात गेल्या. मात्र आपण प्रत्येक गोष्टीत तात्यासाहेबांना सोबत केलीत, त्यांच्याबरोरीने कार्य केलंत. त्यांच्या पश्चात ही आपण हे कार्य मोठ्या हिरीरीने पुढे नेले. म्हणूनच तात्यासाहेबांच्या कार्यासमोर माई तुझे कार्य कधी झाकळले गेले नाही तर ते अधिक प्रखरतेने उजळून निघाले.
थोर व्यक्तींनी जात,धर्म न बघता कार्य केले. मात्र त्यांच्या पश्चात आज त्यांना त्या त्या जातीतील लोकांनी त्या थोर व्यक्तींना आपले स्वतःचे मतलब साध्य करण्यासाठी जातीत बंदिस्त केले आहे. ज्यांना जयंती,पुण्यतिथीतला फरक कळत नाही. ज्यांना ना त्या थोर व्यक्तीची पूर्ण माहीत आहे ना त्यांच्या कार्याची ओळख ना आत्मीयता आहे ते लोक आपले इप्सित साध्य करताना, फुक्या अस्मितेपायी जाती-जातींचे कळप निर्माण करत आहेत. केवळ आपल्या जातीत कोणी थोर व्यक्ती जन्माला आला होता म्हणून एकाच जातीचे म्हणून कोणी त्यांचे वारस ठरत नाही. आपण एकाच मातीत,जातीत,गावात जन्माला आलो म्हणून मी तुझा वारस ठरत नाही, अगदी मी तुझ्या पोटी जन्माला आलो असतो आणि आपले विचार, कार्य मला झेपले नसते तरी मी आपला वारस ठरलो नसतो पण हे काही स्वतःला वारस म्हणवणाऱ्या निर्बुद्ध वारसांना हे कळत नाही. त्यातूनच मग त्या त्या जातीची संघटना स्थापन होते, त्या थोर व्यक्तीला पुरस्कार देण्याची, पुतळा उभारण्याची, एखाद्या मोठ्या प्रकल्पास नाव देण्याची मागणी केली जाते. याचाच परिपाक म्हणजे प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर आम्ही यांना हा पुरस्कार देऊ, त्यांचा पुतळा उभारू, नामांतरण करू अशी अनेक पोकळ आश्वासने दिली जातात. थोर व्यक्तींनी कार्य पुरस्कारासाठी, पुतळ्यासाठी वा नावांसाठी केलेले नसते. खरंतर थोर व्यक्तींना पुरस्कार देणे हा त्या पुरस्काराचा गौरव असतो.
माई, तू हे पवित्र कार्य करताना प्रसंगी समाजाचा विरोध पत्करला, दगडगोटे, शेणाच्या गोळ्यांचा मार खाल्ला. त्यावेळेसचा समाज अज्ञानी होता. त्याला वर्षानुवर्ष काल्पनिक गोष्टींची भीती घालून अनेक रूढी परंपरांच्या जोखडाखाली दाबले गेले होते. पण आज इतक्या वर्षांनंतर समाज सुशिक्षित होऊन देखील जातीय अस्मितेतून बाहेर पडू शकला नाही. त्यामुळे आपल्याच जातीतील व्यक्ती कशा थोर आहेत आपलीच जात कशी श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी इतर जातींमध्ये थोर व्यक्तींची बदनामी करणे अद्यापही अव्याहत चालू आहे. माई, आजही नानाविविध प्रकारे तुम्हां उभयंताची बदनामी केली जाते. त्यांना सडेतोड उत्तर देणे अवघड नाही पण असल्या पोकळ कार्यात वेळ आणि शक्ती खर्च करण्यापेक्षा आपले कार्य पुढे नेण्यास कणभर जरी हातभार लागला तर कुठे आपला वारस म्हणून घेण्यात अभिमान वाटेल.
माई, कोणी तुला क्रांतीज्योती म्हणत असेल तर कोणी पहिली मुख्याध्यपिका म्हणत असेल अर्थात हे सर्व सत्य असले तरी तू आमच्यासाठी आमची आई आहेस. म्हणूनच आज जेव्हा, अनेक मुली अनेक क्षेत्रात नाव कमावत आहेत त्या "आम्ही, सावित्रीच्या लेकी" असे अभिमानाने सांगत असतात, त्यावेळी निश्चित तुझा ऊर अभिमानाने भरून येत असेल!!!
माई तुझ्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
संतोबा...
0 प्रतिक्रिया:
Post a Comment