सरकार कोणाचेही असले तरी गुन्हेगारी समूळ नष्ट होऊ शकत नाही. रागा-लोभातून घडणारे वैयक्तिक गुन्हे बऱ्याचदा उत्स्फूर्त(spontaneous) असतात. अशा गुन्हेगारीला शासन-प्रशासन कोणीच पूर्णपणे रोखू शकत नाही. गुन्हेगारांना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा देऊन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक ठेऊन अशा उत्स्फूर्त वैयक्तिक गुन्ह्यांवर सरकार काही अंशी नियंत्रण ठेवू शकते. अर्थात यासाठी सरकारचा कारभार समाजाभिमुख असायला हवा आणि सरकारची गुन्हे रोखण्याची इच्छाशक्ती असायला हवी. त्याचबरोबर सक्षम पोलिसयंत्रणा, स्वायत्त न्यायव्यवस्था असायला हवी म्हणजे गुन्हेगार कितीही मोठा असला, त्याचे कोणाशीही लागेबंध असले तरी प्रशासनाला तो डोईजड होणार नाही आणि त्यांना योग्य ती शिक्षा देता येईल. दुसऱ्या प्रकारची गुन्हेगारी संघटीत गुन्हेगारी आहे जी पूर्वनियोजित आणि समाजाला अत्यंत धोकादायक आहे. Measure for Measure या शेक्सपियरच्या नाटकात एक वाक्य आहे 'काहींचा पापाने उत्कर्ष होतो, तर काहींचा पुण्याने ऱ्हास!' (Some rise by sin, and some by virtue fall). आजकाल पापाने उत्कर्ष होण्याचा काळ आहे. श्रीरामांनी म्हणले आहेच 'ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना तिनका कौआ मोती खाएगा'.
नीतिमत्तेने आयुष्यभर कष्ट करणाऱ्याला त्याची कमाई दैनंदिन गरजा भागवण्यात खर्ची पडते, महिन्याचा खर्च भागत नाही अन् त्याचा हिशोब लागता लागत नाही त्यामुळे त्याच्याकडे अडीअडचणीला उपयोगी पडण्यासाठी काही ठेव शिल्लक उरत नाही. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला अनैतिक धंदे करणारे गैरमार्गाने खोऱ्याने पैसा ओढत असतात. बेहिशोबी उधळपट्टी करत असतात. ज्ञान तेथे मान अर्थात विद्वान सर्वत्र पूज्यते अशी उक्ती आहे पण सत्ता, संपत्ती ज्याचाकडे आहे त्यालाच मानमतराब, प्रतिष्ठा मिळतो भले ती संपत्ती, सत्ता वाममार्गाने मिळवलेली असो. आडमार्गाने अल्पकाळात कमावलेली संपत्ती त्यामुळे तिचा झगमगाट अन छानछौकी ओघाने आलीच, सोशल मीडियावर चिथावणीखोर व्हिडिओ व्हायरल करणे, दहशत निर्माण करण्यासाठी आणि तुरुंगातून सुटका झाल्यावर रॅली काढणे, वाढदिवसाचे परिसरात मोठमोठे फ्लेक्स लावणे, तलवारीने केक कापणे हा सगळा डामडौल पाहून नाही रे गटातील उपेक्षित तरुणांना, identity crisis असलेल्यांना त्याची भुरळ न पडली तरच नवल. गुन्हेगारीचा प्रभाव समाजातील तरुण वर्गावर पडतो आणि ते अशा टोळ्यांकडे आकर्षित होतात. गुन्हेगारांचे असे हे उदात्तीकरण समाजासाठी घातक आहे. नाही रे गटाच्या कोयता गँग, चड्डी गँग, अमुक ग्रुप, तमुक ग्रुप काही काळासाठी दहशत माजवतात, त्यांचा आवाका मर्यादित असतो अन् काही दिवसात अशा हंगामी गँग संपतात कारण त्यांच्यावर प्रशासकीय व्यवस्थेवर हुकूमत असलेल्या आकाचा वरदहस्त नसतो. वाटमारी, दरोडे, खंडणी, हत्या, लुबाडणूक एवढ्यापुरतीच संघटीत गुन्हेगारी मर्यादित नाही.
समाजाला, पर्यावरणाला घातक असलेल्या गोष्टीवर कायदेशीर बंदी घातली जाते. अशा बंदी असलेल्या गोष्टींचा भाव मग कितीतरी पटीने वाढतो. अशाच बंदी घातलेल्या गोष्टीतून बेकायदेशीर गोष्टींचा काळाबाजार करून अमाप पैसा कमावला जातो. हा काळाबाजार रोखणे ज्यांच्या अधिकारात आहे त्यांच्याशी(प्रशासन) संगनमत आणि ज्यांना ते उत्तरदायी(जवाबदेही,answerable) असतात त्यांचा(शासन) वरदहस्त याच्या जोरावर असे अवैध, बेकायदेशीर धंदे फोफावतात. बऱ्याचदा राजकीय, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या वजनदार असलेल्या आणि समाजात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्यक्ती आपल्या एखाद्या विश्वासू व्यक्तीला हाताशी धरून असले घोटाळे करत असते जेणेकरून कधी घोटाळे उघड झालेच तर त्याचे बालंट आपल्यावर येऊ नये, करून सवरून आपण नामानिराळे रहावे व आपल्या प्रतिष्ठेस धक्का लागू नये. हळूहळू अशाप्रकारे एक समांतर परिसंस्था(ecosystem) निर्माण होते. ज्यांना हाताशी धरून असे घोटाळे केले जातात त्यांचा हव्यास वाढत जातो आणि ते शासन,प्रशासनाला इतके शिरजोर होतात की शासन, प्रशासन ही या परिसंस्थेच्या हातचे बाहुले बनून जाते. परस्पर हितसंबंध आणि साटंलोटं यामुळे गुन्हेगार अडकले तरी स्वतः चे हातच अडकले असल्यामुळे गुन्हेगारांना मुक्त करण्याच्या पळवाटा काढल्या जातात. कुंपणच शेत खायला लागल्यावर वचक तरी कोणाचा राहणार?.
बरं एक दोन नव्हे तर शेकडो अवैध धंदे आहेत. अवैध सावकारी धंदा,अमली पदार्थ विक्री, रेशन धान्याचा काळाबाजार, अवैध लॉटरी-जुगार, अवैध वाळूउपसा, डोंगर-टेकड्या पोखरून अवैध उत्खनन करून मुरूम-खडीचा बेकायदेशीर धंदा, सार्वजनिक साधन संपत्तीचा अपहार, शाळा, बगीचे, मैदाने यांसाठी आरक्षित असलेल्या जागा हडपून अवैध बांधकामे, सार्वजनिक सरकारी, सहकारी, निमसरकारी उद्योगधंद्यातील दुय्यम उत्पादन(byproduct) जसे साखर कारखान्यातील मळी, औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील उत्सर्जित राख यांचे निविदा न काढता परस्पर विक्री अशी न संपणारी यादी आहे. या अवैध, बेकायदेशीर धंद्यात निर्माण होणाऱ्या स्पर्धकांचा आणि निरपेक्षपणे अनैतिक, अवैध गोष्टींना विरोध करणाऱ्या पत्रकार,सामाजिक कार्यकर्ता, किंवा जो कोणी त्यांच्या धंद्याच्या आड येईल त्याचा बंदोबस्त निर्दयी, निर्घृणपणे हत्या करून केला जातो. त्यांना संपवण्यामागे केवळ वाटेतील काटा काढणे नसून आमच्या मार्गात आलात तर काय हाल होऊ शकतात याची दहशत बसावी हा उद्देश असतो. अमानुष, विकृत गुन्हे करून देखील गुन्हेगार सहीसलामत सुटतात, अगदीच प्रकरण अंगलट येऊ लागले तर एखाद्या प्यादाचा बळी देऊन प्रकरण शांत केले जाते. Justice delayed is justice denied अर्थात उशिरा मिळालेला न्यायही एकप्रकारचा अन्यायच असतो असे म्हणतात पण बऱ्याचदा उशिरा का होईना न्याय मिळण्याची शक्यता कमी असते. सर्वसामान्य जनता अशा प्रकारांकडे असहाय्य, हतबलपणे पहात असते.
सर्वसामान्यांची ही हतबलता त्यांच्याच गाफीलपणाचा परिपाक आहे. येवढ्या- तेवढ्याने काय होते असे म्हणत छोट्या मोठ्या अनैतिक, बेकायदेशीर गोष्टींकडे कानाडोळा करून त्या खपवून घेतल्याने हळूहळू त्या गोष्टी हाताबाहेर जातात. एकदा टोळीचा म्होरक्या गडगंज श्रीमंत झाला की मग तो समाजाचा मासिहा, तारणहार बनण्याचा प्रयत्न करतो. दानशूरपणाचा दिखावा करतो. सामाजिक, धार्मिक उत्सवाचे आयोजन करतो, भरमसाट वर्गणी देतो, गरजूंना मदत करतो, लोकांना त्याचा आधार वाटू लागतो. खरंतर आपल्याला असल्या रॉबिनहूड टाईप संस्कृतीची गरज नाही. आपण असल्या गुन्हेगारांच्या उधळपट्टीचे लाभार्थी व्हायचं नाही आणि त्याची आपल्याला गरज नाही. आपल्याकडे लोकशाही आहे, ती सशक्त करणे आणि लोकशाही च्या माध्यमातून आपला उत्कर्ष करणे, आपले जीवन सुरक्षित करणे आपल्या हिताचे आहे. कोणतीही गोष्ट फुकट किंवा अनासाये भेटत नाही, अनैतिक व्यवहारातून आणि दुसऱ्याच्या हक्काचे लुबाडून त्यातला गुंजभर वाटा तुम्हाला देणारा हिंस्र गुन्हेगार त्या वाटणीचा मोबदला म्हणून तुम्हाला न मोजता येणारी किंमत कधी ना कधी वसूल करणारच. फुकट मिळणारी कोणतीही गोष्ट आवळा देऊन कोहळा काढण्याची क्लृप्ती असते हे कायम लक्षात ठेवायला हवे. वेळच्यावेळी शासन-प्रशासनाला बेकायदेशीर गोष्टी निदर्शनास आणून देऊन त्या बंद करण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. शासन, प्रशासन हे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आहे याचे भान शासन, प्रशासनाला असायला हवे आणि जनतेलाही त्याची जाण असायला हवी. आपण निरपेक्षपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. त्यांचा सन्मान केला पाहिजे म्हणजे बाकीचे अधिकारी ही निरपेक्षपणे, नैतिकतेने काम करण्यासाठी प्रेरित होतील. एक दिवस नक्की येईल ज्यावेळी समाज गुन्हेगारी कृत्य करणाऱ्याला आपल्या धर्माचा, जातीचा, भाषेचा, प्रांताचा म्हणून त्याला पाठीशी न घालता, त्याचा उदोउदो न करता त्याला विरोध करेन, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करेन. सत्य, न्याय, नितीमत्तेने काम करणाऱ्यांचा गौरव होईल, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. अर्थात यामध्ये आपल्या सर्वांचा आपआपल्यापरीने सातत्यपूर्ण सक्रिय सहभाग गरजेचा आहे.
संतोबा..
0 प्रतिक्रिया:
Post a Comment