Ads 468x60px

Wednesday, December 30, 2020

गुलामगिरीची चौदा वर्षे!!!

             परिस्थिती अशी होती की, कधी एकदा शिक्षण पूर्ण करतोय आणि कुठेतरी एखादी नोकरी मिळवतोय एवढेच ध्येय होते. रडतकडत अर्धवट शिक्षण पूर्ण केलं, नोकरी भेटेल अशी पुसटशीही आशा नव्हती. कारण ना शिक्षणासाठी, ना नोकरीसाठी कोणाचे मार्गदर्शन होते. त्याचीच परिणीती म्हणजे बारावी आर्ट्स नंतर डिप्लोमाला गेलो आणि डिप्लोमानंतर काही दिवस शेतमजुरी, नंतर  एमआयडीसीमध्ये एका ऑटोमोबाईल युनिटमध्ये सहा महिन्यांत कामगारापासून मॅनेजर पर्यंतचा प्रवास करून तिथे रामराम ठोकला. पुढे एका फार्मा कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून सहा महिने काम केले, नंतर सहाएक महिने मित्राच्या कंप्युटर शॉप मध्ये काम केले. सरतेशेवटी डिप्लोमाच्या वर्गमित्राच्या रेफरन्सने(हवं तर वशिल्याने म्हणा) घोडं गंगेत न्हाले आणि आयटीत क्षेत्रात नोकरी भेटली त्यांस नुकतीच २९ नोव्हेंबर २०२० रोजी चौदा वर्षे पूर्ण झाली. 

                 बिकट आर्थिक, सामाजिक परिस्थिती पालटण्यासाठी  नोकरी हाच उपाय वाटत होता, मुंबईत एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी लागल्याने वाटलं आता दिवस पालटतील, तसे ते पालटले देखील पण तो बदल पोटापाण्यापुरतं आणि राहणीमानाइतपतच मर्यादित राहिला. ज्या वेगाने प्रगती व्हायला गावी ती झाली नाही, तुलनेने सुरुवातीला बेरोजगार असणारे काहीजण उद्योग-व्यवसाय करून इतकेच काय तर काहीजण छक्के-पंजे करून अनपेक्षितरीत्या जास्त लवकर प्रस्थापित झाले. नोकरी करणे चूक नव्हते, ती नसती तर कदाचित त्या बिकट परिस्थितीत मी पूर्णपणे उद्ध्वस्त ही होऊ शकलो असतो पण आयटी सारख्या अस्थिर क्षेत्रात, नोकरीत स्थिरावलो ही मात्र निश्चित चूक होती. बऱ्याचदा आपण बिकट परिस्थितीशी संघर्ष करून ती बदलतो मात्र एकदा ती सोईस्कर झाली की आपण तिच्या अधीन होऊन जातो आणि काही दिवसानंतर पहिले पाढे पंचावन्न होतात अन कधीकाळी आपल्याला रोल मॉडेल मानणारी लोकं आपल्या पाठीमागे आपल्याला नावे ठेऊ लागतात.

           केवळ नोकरीच्या जीवावर फार पुढे जाता येतच नाही, ती ना मरू देते ना जगू देते. एक प्रकारची गुलामीच ती, त्यात एकदा अडकलं त्यातून सुटका नाहीच. खरंतर उद्योजकतेचे बाळकडू आत्मसात करण्याची संधी पहिल्याच नोकरीत मिळाली होती. मी पहिल्यांदा जेव्हा धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीत प्रवेश केला तेव्हा समोर  "बी ब्लॉक" या बिल्डिंगवर पुरुषभर उंचीच्या अक्षरात धीरूभाईंचे वाक्य  लिहिले होते, ""Think big, think fast, think ahead. Ideas are no one's monopoly". जे अगदी पटण्यासारखेच होते, कारण सृजनशीलता कोणाचीही मक्तेदारी नसते.  पण आपल्या गुणसूत्रात ना उद्योजकता होती ना व्यवहारीकता होती. त्यामुळे दुसऱ्याची चाकरी करण्यातच धन्यता मानण्याशिवाय गत्यंतर नव्हते. धीरूभाई अंबानींचेच दुसरं वाक्य होते,  "If you don't build your dream, someone else will hire you to help them build theirs".  हे आम्ही त्यांच्याकडे काम करून सार्थकीच लावत होतो.  दुसरीकडे सव्वा दोन हजार वर्षांपूर्वीच राजकीय गुरू ॲरिस्टॉटल यांनी सांगितलेल्या  "All paid jobs absorb and degrade the mind"  या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो.  कारण टार्गेट्स आणि डेडलाईन्स चक्रव्यूहात सृजनशीलतेचा गळा घोटला जातोय हे जाणवत होतेच. सारं काही कळत होतं पण वळत नव्हते,  संघर्षमय का होईना पण एका कम्फर्ट झोन मध्ये मी स्थिरावलो होतो आणि त्यातून जोखीम पत्करण्याची तयारी नव्हती.

              त्यामुळेच आज चौदा वर्षे नोकरी करून देखील आईने चारचौघांत कौतुकाने सांगण्यासारखे माझ्या हातून काहीच घडले नाही. शेती, घर, गाडी, व्यवसाय यापैकी मला काहीच साध्य करता आले नाही. "ठेविले अनंते तैसेचि रहावे l चित्ती असो द्यावे समाधान ll" या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओवी प्रमाणे अगदी चाकोरीबद्ध जीवन जगणे चालू होते. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे कर्तव्य करत होतो. त्याचाच परिपाक म्हणजे वेळोवेळी वेतनवाढ, पदोन्नतीमध्ये डावलले गेले, अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावला जायचा मात्र तरी त्याचे मला कधी विशेष काही वाटले नाही, पण आज चौदा वर्षांनंतर हा मागचा आढावा घेताना आपण फार तत्त्वनिष्ठपणे वागून चूक केली की काय अशी शंका यावी इतका या व्यावहारिक दुनियेत मी मागे पडलोय. साधी राहणी उच्च विचारसरणी या वृत्तीने आजपर्यंत जगत आलोय.  आज मी इथपर्यंत पोहचूनही सोबतचे, हाताखालचे लोकं स्वतःच्या गाडीने ये जा करत असताना मी मात्र अजूनही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतो, तेच इतर गोष्टींबाबाबतही मग ते मोबाईल, घर, टीव्ही काहीही असो,  थोडक्यात मी म्हणजे जणूकाही डाऊन टू अर्थ चे मूर्तिमंत उदाहरणच. आज मात्र या सर्वाचे कौतुक वाटावे की लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. एकंदरीत काय तर सदासर्वकाळ आदर्शवादाचा झेंडा घेणंही अडचणीचे ठरू शकते. 

               प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी टर्निंग पॉईंट येतच असतो. माझ्या आयुष्यात तो कोरोनाचा रूपाने आला. अनपेक्षितपणे कोरोनासारखी जागतिक महामारी आली अन माझ्या पायाखाची जमीन हादरली, कोरोनाचे सुरुवातीचे रौद्ररूप पाहून आपण आणि बाकी सर्व कुटुंब सहीसलामत बाहेर पडू की नाही याची शाश्वती वाटेना. आतापर्यंत आज ना उदया होईल या सबबीखाली चाल ढकल चालू होती पण आता मागचा सर्व जीवनपट पुन्हा एकदा उलगडू लागला. कुटुंबाने केलेले कष्ट, पाहिलेली स्वप्ने नजरेसमोर येत होती. सहा महिन्यांहून अधिक काळ सगळं काही ठप्प झाले, सगळं सुरळीतपणे चालू झाल्यावर जोमाने प्रयत्न करून गेल्या१४ वर्षांचा अनुशेष या एका वर्षांत भरून काढायचा आहे. त्यासाठी केवळ बदल करून चालणार नाही तर कायापालट करावा लागेल. शेती, घर, गाडी, व्यवसाय, आरोग्य आणि राजकारण हे या वर्षीच करायचं आहे हाच वर्षीचा संकल्प आहे आणि त्या दृष्टीने आजच १ जानेवारी २०२१ पासून पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. हे सगळं याच वर्षी पूर्ण करायचे आहे, त्यासाठी शक्य तेवढा घाम गाळणार आहे आणि पुढे हे सारं टिकवण्यासाठी भले रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर. 

           हे असे सारे ठरवलं असले तरी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आई-वडिलांचे स्वप्न आहे की थोडी का होईना बागायती शेती असावी, स्वतःची विहीर, पाईपलाईन असावी. एखादी सीताफळाची का होईना बाग असावी. अपवाद वगळता सामाईक विहिरींचा वापर वीसेक वर्षांपासून बंदच आहे,  वयोमानानुसार पूर्वी सारखी धावपळ करणे आता जमत नाही त्यात भावकीचा आडमुठेपणा तर जगजाहीर आहे. त्यामुळे स्वतःची थोडी  का होईना बागायती शेती,बाग असावी जिथे वेळ घालवता येईल. पण नोकरी आणि जमिनीचा वाद एकाचवेळी सुरू झाला तो मिटवण्यासाठी गेली सात-आठ वर्षे हरतऱ्हेचे प्रयत्न करून पाहिले, दोन पावले माघार घेऊन समजूतदारपणे तोडगा काढायचा प्रयत्न केला, कोर्ट-कचेरीत पाण्यासारखा पैसे ओतला, स्वाभिमान गहाण ठेऊन उंबरठे झिजवले पण कशाचाही फायदा झाला नाही. आता एका स्वप्नासाठी इतर स्वप्नांचा बळी द्यायचा नाही. केवळ शेतीसाठी रोगट, स्वार्थी नात्यांचे ओझे वागवायचे नाही. या असल्या रोगट नात्यांनी माझे आर्थिक, मानसिक, सामाजिक खच्चीकरण केले, इतके की कधी कधी आपण अनाथ असतो तर बरे झाले असते इतपत या नातेवाईकांनी छळ केला आहे. नोकरी इतकीच ही असली नात्यांची गुलामी सहन केली आहे. आता मात्र या दोन्ही मधून बाहेर पडायचे आहे. आता दोन्ही बाबतीत सहनशीलतेची मर्यादा संपत आली आहे. नोकरी हा अर्थाजनाचा एकमेव स्रोत असल्यामुळे गुलामगिरीच्या चौदा वर्षांचे पंधरा-सोळा वर्ष होतील पण वीस होणार नाहीत. आता ऑफर लेटर, एक्सपिरिअन्स लेटर, प्रमोशन लेटर यांची होळी करायची वेळ आली आहे. गुलामगिरीचे जोखड भिरकावून देण्याची वेळ आली आहे. त्याच प्रमाणे स्वार्थी, रोगट नात्यांचा समारोप करण्याची वेळ आली आहे.आता एकदाचे परतीचे दोर कापायचे आहेत अन फक्त पुढची वाट चालायची आहे.

                                             संतोबा....

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!