Ads 468x60px

Showing posts with label तात्विक. Show all posts
Showing posts with label तात्विक. Show all posts

Thursday, February 6, 2014

मी मुख्यमंत्री .....!

                उद्या माझा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. कसलीही पार्श्‍वभूमी नाही, मंत्रीपदाचा अनुभव नाही.आमदारकीची ही केवळ दुसरीच टर्म. आणि अचानक हा मुख्यमंत्रीपदाचा जॅकपॉट. त्यामुळे सगळीकडे माझाच उदोउदो चालू आहे. प्रत्येक न्यूज चॅनेलवर माझा कोणालाच माहीत नसलेला आतापर्यंतचा जीवनपट उलगडून दाखविण्याची अहमिका लागली आहे, काय करणार प्रश्‍न टीआरपी चा आहे. आणि मी या घडीला सर्वात जास्त  चर्चेचा विषय आहे. दररोज बातम्या मिळवणे, नाही मिळाल्या तर बातम्या तयार करणे हे मीडियाचे उद्योग.सगळी कशी भडक वर्णने, लोकांना बातम्या कळतात पण माहिती काहीच मिळत नाही. आज एवढ्या सहजासहजी एवढी मोठी लॉटरी लागली म्हणल्यावर कोण अशी सुवर्णसंधी विनाकारण सोडेल. मीही त्यांना नाराज न करता सकाळपासूनच विविध न्यूज चॅनेलसना मुलाखती देण्याचा आणि पत्रकार परिषदांचा सपाटा लावला होता, शेवटी जनतेच्या सेवेसाठीच तर आम्ही येथे आहोत.  
                पत्रकारांच्या, जनतेच्या विविध प्रश्नांना मुरब्बी राजकारण्याप्रमाणे उत्तरे देणे चालू होते, प्रश्न कितीही खोचक असला तरी शांत डोक्याने सर्व प्रश्नांची देत होतो. मला लहानपणापासूनच राजकारण्यांवर टीका करणार्‍यांचा प्रचंड राग येतो. आजकाल प्रत्येक बर्‍या-वाईट गोष्टींसाठी राजकारण्यांना जबाबदार धरण्याची (फॅशन) रीत जन्माला आली आहे. तशातच एका माथेफिरू पत्रकाराने प्रश्नांची सरबत्ती चालू केली. म्हणे आजकालचे राजकारणी वैचारिक दिवाळखोर झालेत. आपल्या पदाच्या जबाबदारीची जाण आणि कर्तव्याचे भान आजच्या राजकारण्यांना नाही. सर्व भ्रष्ट आहेत आणि त्यामुळे देशाची अधोगती होत आहे. उद्या मुख्यमंत्री झाल्यावर तुम्हाला वार्षिक ७ लाख रुपये पगार, अमाप सोयीसुविधा मिळणार त्या स्वीकारणे योग्य आहे का? त्याबरोबरच मी मुख्यमंत्रीपदासाठी किती पैसा ओतला याचाही हिशोब त्याला पाहिजे होता. काही अंशी त्याचे बरोबर असले तरी माझा पारा चढला, पण उद्याचा एक जबाबदार मुख्यमंत्री या नात्याने मह्त्प्रयासाने रागावर नियंत्रण ठेऊन मुत्सद्दीपणे जशी द्यावीत तशी उत्तरे देऊन पत्रकार परिषद आटोपती घेतली. पण तो पत्रकार आणि माझा राजकीय प्रवास काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हता.
                फार नाही दहा-पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट, माझा जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला. अनेक राजकारण्यांनी वर्षानुवर्षे शेतकर्‍यांच्या आत्महत्या,कर्जमाफी, कंगालपणाचे भांडवल करून आपआपले मतदारसंघ काबीज केले पण शेतकर्‍यांच्या नशिबी शेवटी आश्वासनाच्या उष्ट्या पत्रावळ्याच आल्या. खरे तर शेतकर्‍यांना कर्जमाफिची काही एक गरज नाहिये,आपला शेतकरी कष्टाळू आहे भिकारी नव्हे! त्यांना फ़क्त योग्य वीज,पाणी, बाजारपेठ द्या, कर्जमाफीच्या कुबड्यांची त्यांना बिल्कूल आवश्यकता नाही. बरं कर्जमाफी दिली तर ती पोहचते का त्यांचापर्यंत का मध्येच तिला पाय फुटतात.जाऊ द्या कार्यकर्ते तर गब्बर होतात ना!शेतकर्‍यांच्या आत्महत्तेशी आपले काय घेणे देणे अशीच राजकारण्यांची रीत! मुलभूत सोईसुविधाकडे लक्ष द्यायचे सोडून हे सणावाराला साड्या वाटणार, दिवाळीला साखर वाटणार, निवडणुका जवळ आला की सर्वांना फुकटात तीर्थयात्रेला नेणार.अहो ज्याचे हातावर पोट आहे अशी व्यक्तीसुद्धा  तीर्थयात्रेला जाणे शक्य नसेल तर जाणार्‍याजवळ स्वकमाईतून नारळासाठी पैसे देते. दुसर्‍याच्या कमाईचा नारळ पावणार नाही म्हणून. मग फुकटात तीर्थयात्रा करणार्‍यास देव कसा पावणार?
                दुसर्‍यांकडून बदलाची अपेक्षा करणे हा स्वत:च्या बुद्धीचा व कर्तुत्वाचा अपमान असतो, त्यामुळे न पटणार्‍या गोष्टींना विरोध करण्याचा सोडून मी त्यांच्याशी लढायचे ठरवले. विविध माध्यमांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्‍न केला, बदल घडवण्यासाठी जे शक्य होईल ते करण्याचा प्रयत्‍न केला शेवटी आमदाराकीची निवडणूकदेखील लढवली पण मला हजार मतेसुद्धा मिळाली नाहीत. शुद्ध हेतू असताना आणि एवढी मेहनत करूनदेखील एका गावगुंडासामोर झालेला माझा लाजिरवाणा पराभव माझ्या जिव्हारी लागला होता. ज्या लोकांसाठी लढतोय तेच आपल्यासोबत नाही, त्यांना काय चांगले काय वाईट हे कळत नाही म्हणल्यावर सगळे संपल्यासारखे होते, पण पराभव स्वीकारणे माझ्या रक्तातच नाही. पराभवाचे विश्लेषण केले आणि मग कुठे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचे, कुठे महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकरांचा उदोउदो करायचा हे शिकलो. कोणत्या गोष्टीला कधी पाठिंबा द्यायचा व कधी विरोध करायचा हेही शिकलो. हे सर्व करताना मला आतून वेदना व्हायच्या पण मी हेच करणार होतो कारण जिंकण्यासाठी मी तत्वांचे सत्व तात्पुरते बाजूला ठेवण्याचे ठरवले होते.
                मी विधानसभेला जिंकून येणे हे आपले लोक किती भावनाप्रधान आहेत याचा मूर्तीमंत उदाहरण. जिंकण्यासाठी मला माझ्याशीच किती तडजोड करावी लागली हे मात्र माझे मलाच माहीत. मला माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी खूप काही चांगले करायचेय आणि मी ते करणारच, त्यासाठी कायकाय पणाला लावलेय याची कल्पना देखील कोणी करू शकणार नाही. मी काही पैसा कमण्यासाठी राजकारण करत नाही त्यासाठी अनेक मार्ग आहेत त्यासाठी आयुष्य पणाला लावायची काय गरज?आणि तो दीडदमडीचा पत्रकार मला मुख्यमंत्री म्हणून मिळणार्‍या पगाराबद्दल प्रश्न विचारतो, यापेक्षा जास्त पगार तर पदवीधारकास बहुराष्ट्रीय कंपनीत सुरवातीलाच मिळतो, पण राजकारण्यांना दोष देणे हा आपण आपला मुलभूत हक्कच समजतो अगदी घरात बायको आपली ऐकत नाही त्याचा राग सुद्धा राजकारण्यांवर काढण्याची आपली मानसिकता. तो पत्रकार मला पैशांमध्ये मोजू पहात होता म्हणून मी जरा चिडलो होतो मात्र आता बर्‍यापैकी सावरलोय. पण मला एक कळत नाहीए आता जवळपास दोन तास होत आलेत त्या घटनेला, पण अद्याप त्या पत्रकाराच्या अपघाताची बातमी अजून कशी नाही आली बरे.

Sunday, February 2, 2014

औट घटकेची सुटका!!!


            दिवस मावळतीला निघाला होता आणि पशु-पक्षी आपल्या घरट्याकडे. मी ही शेतातील थोडे फार काम संपवून घरी आलो होतो. मलाही घाई झाली होती स्वत:च्या घराकडून स्वत:च्या घराकडे जाण्याची, पटापट तयारी करून फॉर्चूनर घेऊन मुंबईकडे जायला निघालो. लहान असताना कधीतरी धुरळा उडवत येणारी गाडी पाहिली की आपणही मोठेपणी अशाच एखाद्या गाडीतून धुरळा उडवत जाऊ असे वाटायचे पण आता ते शक्य नव्हते आता सगळे रस्ते चकाचक झाले होते. गाव ओलांडून थोडा पुढे गेलो तर एक आजी-आजोबा बस थांब्यावर एसटीची वाट पाहत थांबले होते, पण शेवटची एसटी गेल्यामुळे मिळेल त्या गाडीने जाऊ असा विचार करून ते माझ्या गाडीला हात करत होते. नेहमीप्रमाणे मी वेगानेच गाडी चालवत होतो, इतरांच्याप्रमाणेच मीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्याच वेगाने पुढे निघून गेलो. कोणाला लिफ्ट द्यायला ती काही सार्वजनिक मालमत्ता थोडीच होती.

            आजी-आजोबांना ओलांडून एक-दोन किलोमीटर पुढे आलो पण त्या दोघांची छबी माझ्याडोळ्यासमोरून जात नव्हती उलट ती जास्तच क्लेशदायक वाटू लागली. शेवटी काहीही विचार न करता सरळ गाडी माघारी फिरवली. खूप लांब नाही अगदी सहा महिन्यापुर्वी आमचीही हीच अवस्था होती, आम्हीही असेच लाल डब्ब्याची वाट पहात तासनतास उभा राहत असे आणि आज त्याचा आम्हाला विसर पडला हे खरोखर लज्जास्पद होते. मी पुन्हा यू टर्न घेऊन आजी आजोबांना गाडीत घेतले. मनावरचे ओझे एकदम कमी झाले. त्यांना कुठे जायचे ते विचारले तर त्यांना काळेवाडीला जायचे होते पण सासवडला सोडले तरी चालणार होते पण मला तसेहि पुढे जायचे होते त्यामुळे मी तुम्हाला काळेवाडीला सोडतो फक्त कुठे उतरायचे ते सांगा म्हणालो कारण काळेवाडी, ढुमेवाडी यामध्ये नेहमी माझा गोंधळ उडतो. आता गाडी जरा कमी वेगाने चालवणे भाग होते, " कुठल्या गावचा बाळ तू" आजोबा अनोळखी असले तरी प्रश्न अपेक्षितच होता. थोडा विचार केला आजोबांचे पुढचे काय प्रश्न असतील हे ही लक्षात आले आणि ठरवले त्यांच्या सर्व न विचारलेल्या प्रश्नांचीसुद्धा उत्तरे द्यायची. तसे प्रश्न विचारलेले मला आवडत नाही. सात-आठ मिनिटे होती तेवढेच माझेही मन हलके होईल.

            मी याच गावचा गेल्या सात-आठ वर्षापासून मुंबईला असतो, कंप्यूटर इंजिनियर आहे पण याच वर्षी नोकरी सोडली आहे.सर्व सरळ मार्गी प्रयत्न करून देखील काहीच मनासारखे होत नव्हते, पण चुकीचे काही करायला मन तयार नव्हते. शेवटी सोडली नोकरी कारण तिच्यामुळेच माझ्या अनेक आवडत्या गोष्टींना मुरड घालावी लागत होती आणि तिचा जास्त काही फायदाही होत नव्हता खाऊन-पिऊन सुखी एवढेच. तेवढ्या पगारात कोणी मुलगी द्यायला देखील तयार नव्हते. मला माझ्यापेक्षा लोकांसाठी काहीतरी चांगले करायचे होते. नोकरी सोडली पण पुढे काही करायचे ते निश्चित नव्हते. महिना-दोन महिने पुरतील एवढे पैसे होते ज्यासाठी मुंबईला आलो होतो त्यासर्व गोष्टी करायच्या ठरवल्या. स्वत:चे पोट भरण्याची कला प्रत्येकाकडेच असते माझ्याकडे निश्चितच इतरांपेक्षा ती जास्त असेल त्यामुळेच सगळे काही अनपेक्षितपणे मनासारखे होऊ लागले. हे आधीच केले असते तर असा विचार मनात आला पण त्या अनुभवाची जी शिदोरी मिळाली ती पुढील आयुष्यात निश्चित उपयोगी पडणारी आहे. सध्या माझे तरी खूप छान चालले आहे.घरी आई वडील आहेत, चार-पाच एकर शेती आहे. आठ-पंधरा दिवसांनी येतो शेतीची खूप आवड आहे पण जास्त काही करत नाही बरे वाटते आईला भेटल्यावर जेवढा आनंद भेटतो तेवढाच आनंद होतो पण हा आनंद आता थोड्या दिवसांचा.... पुढेचे शब्दच फुटेनासे झाले जणू अश्रुसोबत शब्दही थिजले.     

            बाळ असे बोलू नये, थोड्या दिवसाचा का?आजोबांनी मिनिटभराच्या शांततेचा भंग करत विचारले. आजोबा ती माझी वडीलोपार्जित जमीन असली तरी कायद्याने त्यावर वडिलांप्रमाणे आत्यांचा,बहिनींचा हिस्सा आहे आणि त्या तो घेणारच आहेत. मला ते पटत नसले तरी माझा त्याला विरोध नाही तसेच त्याबदल्यात जमिनीचा मोबदला देणे माझ्या आवाक्यात नाही त्यामुळे ती जमीन जाणारच आहे. "अरे मग एखादा तुकडा विकून त्यांना दे काही हिस्सा काहीच न राहण्यापेक्षा थोडी तरी शिल्लक राहील." आजोबांचा अजून एक सल्ला. आजोबा बरोबर आहे तुमचे पण ही जमीन माझी आई आहे तिला विकण्याचे पाप  मी नाही करू शकणार नाही भले सगळी जमीन गेली तरी चालेल पण अशी भडवेगिरी करायला मला जमणार नाही. आता आजोबांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, भिजलेल्या शब्दात आजोबा म्हणाले "बरोबर आहे,पोरा ही घरोघरची कहाणी आहे मी सुद्धा त्याच कारणासाठी माझ्या मुलीला भेटायला चाललोय बघू काही ऐकले तर ऐकले. मलाही एकुलता एक मुलगा आहे तोही तुझ्यासारखाच आहे पण मलाच हे मान्य नाही. कायदा गाढव असतो हेच खरे. आजोबा कायदा कधी गाढव नसतो आपण त्याला तसा बनवतो. कायदा सर्वसामान्यसमाजासाठी अन्यायाविरोधात लढण्यासाठी सर्वात शक्तिमान शस्र आहे पण आपण त्याचा गैरवापर करतो इतकेच.एव्हाना आम्ही काळेवाडीला पोहचलो, आजोबांनी ३० रुपये दिले इतरवेळी असे कोणी पैसे देण्याचा प्रयत्‍न केला असता तर खूप राग आला असता पण आता माझ्या स्टेटसपेक्षा आजोबांचा स्वाभिमान जास्त वरचढ होता आणि तो मला दुखावायचा नव्हता. आजोबांचा निरोप घेऊन मी पुढच्या प्रवासाला निघालो. 

            खूप एकटेपणा जाणवू लागला, कोणीतरी जोडीला असायला हवे होते असे तीव्रतेने वाटत होते. माझा आवडता मुंबई-पुणे प्रवास आज जीवघेणा वाटू लागला होता. इतरांना भले मी स्थितप्रज्ञ वाटत असेल पण एकांतात मनाचे बुरूज क्षणात असे काही कोसळतात की ते सावरताना भरलेल्या जखमा पुन्हा ठसठसू लागतात. स्मृतिपटलावर कोरलले त्यागाचे क्षण गडद होऊ लागले होते. प्रत्येक गोष्ट नेहमी हसत मुखाने स्विकारली त्यामुळे मला सर्वजण गृहीतच धरत गेले आणि माझा हरएक त्याग सुद्धा.सर्वजण जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते तेव्हाही आणि आता काही का होईना असताना मी काय कमावले हेच बघतात पण मी काय-काय आणि कसे गमावलेय ह्याचा विचारसुद्धा कोणाच्या मनात येत नाही. मनात आले तर पुन्हा सर्वकाही क्षणात मिळवू शकतो पण आता खूप पुढे आलो आहे, आता पुन्हा त्याच गोष्टीत मला अडकायचे नाही......

Monday, September 9, 2013

बलात्कार ख्ररेच थांबावेत ?????

    दररोज बलात्काराच्या बातम्या आणि त्या संदर्भातील प्रतिक्रिया ऐकून आम्ही व्यथित होत होतो. परंतू आमची व्यथा कशी व्यक्त करावी या विवंचनेत कित्येक दिवस आम्ही अस्वस्थ होतो. कारण आम्हीसुध्दा काही धुतलेल्या तांदळासारखे नाही आहोत. आमच्याकडूनही काही वेळा मानसिक व्यभिचार होतो त्यामुळे या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे की नाही हा प्रश्न पडला होता. खूप विचारांती आम्ही या निष्कर्षाप्रत आलो कीआमचा हा मानसिक व्याभिचार म्हणजे कधी अप्रतिम सौंदर्याला दिलेली दाद होती, तर कधी पुरुषत्वाने घातलेली साद होती. आणि या सर्व गोष्टी मनातल्या मनात होत्या त्याचा त्रास कोणाला ही झाला नाही, म्हणजे याबाबत वाद असण्याचे काही कारण नाही. दुसरे असे की मानसिक व्याभिचार न केलेली व्यक्ती या पृथ्वीतलावर सापडणे केवळ अशक्य. आमच्या कित्येक मित्रांनी प्रेमविवाह केला आहे, पण तरीसुध्दा त्यांची वासुगिरी,लाळ घोटेपणाला काही मर्यादा नाही याच गोष्टीवरुन कित्येकदा आमचे वाद झाले आहेत. त्यामुळे त्यामानाने निश्चितच आम्ही कितीतरी सज्जन आहोत. असो तर विषयाला सुरूवात करूया....
      राजधानीतील अमानुष सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर अशा प्रकरणांचे पीकच आले आहे असे वाट्तेय.त्याबरोबरच वाटेल त्या विक्षिप्त प्रतिक्रिया देण्याचेही पीक भलतेच फोफावले आहे. आमच्या दृष्टिकोनातून बलात्कार ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. कोणी ठरवून किवा कट रचून करत असतील असे मला वाटत नाही, पण काही वेळेस बदला घेण्याचा किवा इतरही काही उद्देशाने ठरवून किवा कट रचून करत असतील याचीही शक्यता नाकारता येत नाही. कोणी पीड़ित मुलीलाच जबाबदार धरत आहेत कोणी समाजव्यवस्थेला. कोणी क़ायदा बदलण्याची भाषा करतोय तर कोणी आरोपीला काय शिक्षा द्यायची याची भाषा करतोय. मीडीयावालेही या वाहयात प्रतिक्रियांना भलतीच प्रसिद्धि आणी मह्त्व देत आहे व आपण ही चवीने त्या बातम्या वाहिन्याना हवाहवा असलेला टी. आर. पी वाढण्यास मदतच करत आहोत.
      बलात्कार हा आपल्या मानवजातीवरील सर्वात घाणेरडा कलंक आहे व तो दूर करणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे हे जाणून ह्या संकटामधून सर्वांच्या सहभागतून एखादा सुवर्णमध्य काढायचा सोडून एकमेकांना वाहयात सल्ले देण्याची चढाओढच लागली आहे. उदाहरणादाखल..
      पीडिताने जर बलात्काराचा आनंद लुटला असेल तर, अशा गुन्ह्यासाठी देहदंडाविषयी शिक्षा देताना दोनदा विचार करावा- एक न्यायाधीश
      आरोपींबरोबरच पीडित तरुणीसुद्धा तेवढीच जबाबदार."टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही हातांनी वाजते", तिने आरोपींना भाऊ, दादा संबोधून आपला जीव व इज्जत वाचवायला हवी होती"-स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु.
"बलात्काराच्या घटना घडायला नको असतील तर बालविवाह केले जायला हवेत" - माजी मुख्यमंत्री
      क्षुल्लक प्रसिध्दीपोटी टिचभर कपडे घालून उत्तान दृश्‍ये, अश्लील अंगविक्षेप करणार्‍या मॉडेल्सनी बलात्कराला आम्ही जबाबदार नाही,ते तर आमच्या जन्माच्या आधीही व्हायचे. बलात्कार्यांना फाशी द्यावी, त्यांचे लिंग कापून टाकावे अशा प्रकारची वक्तव्य केली.त्यांच्या प्रतिक्रिया देण्यात पिडितेबद्दलच्या आत्मियतेपेक्षा प्रसिध्दीची हाव जास्त होती.
      काय कारणे असू शकतील बलात्काराला निव्वळ विकृती,पुरुषी अहंकार,स्त्रीयांबद्दलची तुच्छता,पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव, फॅशनेबल,आखूड कपडे, भडक मेकअप, लिंगगुणोत्तरातील तफावत,सार्वजनिक ठिकाणी चाललेले अश्लील चाळे, आर्थिक,सामाजिक परिस्थितीमुळेचा अविवाहितपणा, मागणी तसा पुरवठा नाही झाला तर बंड हे होणारच. ही सगळीच कारणे गृहीतधरून काही गोष्टीवर आपण स्वत:च निर्बंध घातले तर एक जबाबदार समाज म्हणून या पापातून थोडी का होईना मुक्ती होईल.
      आखूड आणि तंग कपडे घालणे ही फक्त फॅशनच नाही तर मॉडर्नपणा दाखविण्याची गरज अर्थात स्टेटस सिम्बॉल बनले आहे. बराचसा वादही यावरूनच आहे, ही एक अशी गोष्ट आहे त्यामुळे मुले बलात्कारास प्रवृत्त होतात असा खूप जणांचा आक्षेप आहे, पण ह्या नराधामांच्या वासनेस ६ महिन्याच्या मुलीपासून ६० वर्षाच्या वृद्धेपर्यंत कोणीही बळी पडत असते. कमीत कमी १३ वर्षापर्यंतच्या मुलीकडे पाहून बलात्कारास प्रवृत्त होणे ही विकृती नाही का? त्या ६ महिन्याच्या, ६ वर्षाच्या मुलीने काय गुन्हा केलाय तिने काय तंग कपडे घातले होते, का तिने त्याला दादा म्हणायला पाहिजे होते म्हणजे त्याने तिला सोडून दिले असते? एवढ्या लहान मुलीकडे पाहून जर कोणी उत्तेजित होत असेल तर त्याने तात्काळ मानसोपचार तज्ञांची भेट घेऊन पुढे होणारा अनर्थ टाळावा हे उत्तम.मुलींनीही समाजात वावरताना जबाबदारीने वागलेले उत्तम, तुमचे आखूड कपडे, भडक मेकअप, तथाकथित बॉयफ्रेंड बरोबरचे चाळे करून सुध्दा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या सुरक्षितपणामुळे तुम्ही बलात्कारास बळी पडत नसाल पण तुम्हाला पाहून एखादा पेटलेला नराधम एखाद्या लहान,असहाय मुलीवर बलात्कार करायला प्रवृत्त होत नसेल कशावरून? निश्‍चितच प्रत्येकाने सुंदर दिसण्याचा प्रयत्‍न करणे यात काहीच गैर नाही, चारचौघात आपण उठून दिसत असू तर आपला आत्मविश्वास आपोआपच द्विगुणित होतो यात शंका नाही पण मेकअप करताना तो सौंदर्य खुलविण्यासाठी करतोय खुणविण्यासाठी नाही हे लक्षात ठेवावे.
      बलात्कार करून खून, सामूहिक बलात्कार अशा प्रकरणात द्रुतगती न्यायालये स्थापन करावीत एक ते तीन महिन्यात अंतिम निकाल द्यावा. गुन्हा सिध्द झाल्यास अशा गुन्हेगारांस शक्यतो फाशीची शिक्षा तीही तात्काळ देण्यात यावी. पण जिथे एकाच व्यक्ती कडून बलात्कार केला जातो तिथे मात्र असे करणे उचित होणार नाही, त्या प्रकरणात काही वेगळे पैलू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीसुध्दा व्यवस्थित गुन्हा शाबित झाला तर त्याला जन्मठेप देण्यात यावी. इतर गुन्ह्यात शिक्षा देताना गुन्हेगार एकापेक्षा जास्त असतील तर त्यांच्या शिक्षेत भागाकार होत असेल पण सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात शिक्षा देताना गुणाकार करावा.
      ज्या घरात स्रीयांचा आदर सत्कार होत नसेल त्या घरात सुख-समाधान कधीच लाभू शकणार नाही, एक लक्षात ठेवा तुमची बायको,आई,बहीण खुष असेल तरच तुम्ही खुष राहू शकाल पण त्यांचा छळ करूनही तुम्ही सुखी राहू शकत असाल तर मग आपण माणूस म्हणवून घ्यायच्या लायकीचे नाही आहोत हे लक्षात ठेवा. मुलगा-मुलगी भेद करू नका, मुलीच्या जन्माचीही तेवढ्याच आतुरतेने वाट पहा. शेवटी ती आहे म्हणून तो आहे आणि तो आहे म्हणून ती दोघेही एकमेकाशिवाय अपूर्णच मग भेदभाव कशाला. चला मानसिकता बदलूया, देश बदलूया एक नवीन सुसंस्कृत भारत घडवूया..

               --संतोष गांजुरे.

Wednesday, July 17, 2013

काल मला देव भेटला....

              काल मला देव भेटला,म्हणजे देव काही माझ्यापासून वेगळा नाहीये पण आजकाल मला माझ्याशीच बोलण्यासाठी  वेळ  नाही  तर  काम  नसताना  देवाशी  कशाला  बोलू  उगाचच. काल देव  स्वत:हून माझ्याकडे आलाय  हे  पाहून  विशेष  असे  काही  नाही  वाटले.  देव  कसल्यातरी  चिंतेतच होता त्या चिंतेमुळे देवाची तेज:पुंजप्रभा झाकोळली होती. देवालाही स्वत:चे मन मोकळे करावेसे वाटत असेल नापण त्यासाठी एवढे देवाचे निस्सीम भक्त असताना माझ्याकडे कशाला हा प्रश्न  मला पडला म्हणून त्याला पहिला  प्रश्न तोच विचारला तर देव म्हणतो कसा जे आस्तिक आहेत ते त्यांचीच गाऱ्हाणी गाणार,नास्तिक असणाऱ्यांना तर माझा विटाळ होतो म्हणून तुझ्याकडे आलोय.
      मी म्हणालो पण देवा मी तर  नास्तिक आहे सर्वांना माहित्ये. तू काय माझ्यापेक्षा वेगळा आहेस काया देवाच्या उत्तराने मात्र मी आश्चर्यचकित झालोदेवाला म्हणालो अरे मी घरातून बाहेर पडताना आई नेहमी म्हणते "देवाच्या पाया पड" तर मी असेच म्हणतो देव काय माझ्यापेक्षा वेगळा आहे का?
     पण देवा तू एवढा चिंताक्रांत का आहेसतुझ्या भक्तांवर एकामागून एक येणार्‍या संकटांनी तू हैराण झाला आहेस कातू काहीच करू शकत नाही,का ही तुझीच करणी आहेलोकांनी तुझ्यावर कसा विश्वास ठेवावा तरीही ठेवतातच कितीही काहीही झाले तरीपण मग   घरादारावर तुळशीपत्र ठेऊन तुझ्या दर्शनासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी  कशाचीही पर्वा न करता कुठे-कुठे यात्रा करतात आणि तू तुला भेटायला आलेल्याच भक्तांना सरळ मुक्तीच देतो आणि तीही इतकी निर्दयीपणे कधी गाड्यांच्या अपघातात तर कधी निसर्गाच्या प्रकोपात. असे का?
           देव थोडासा गंभीर होत म्हणालाजे स्वत:च हरवले आहेत ते मला काय शोधणार ? . ह्याच लोकांनी मला वेगवेगळ्या मंदिरात बंदिस्त केले आहे ना!! अगदी ह्यांच्या सोईनुसार माझ्या विश्रांतीची वेळ ठरते. घुसमट होते रे माझी. मला वाटले मी माणूस बनवून एक अतिशय सुंदर आणि सृजनशील गोष्ट जन्मास घातली आहे. मुलगा तरुण झाल्यावर बापाला आराम मिळेल अशी अपेक्षा असते,त्याप्रमाणे मला ही वाटले आता मलाही विश्रांती मिळेल पण माझा अपेक्षाभंगच झालाय. यांच्या अपेक्षा ऐकून घ्यायलाच मला वेळ मिळत नाहीमग पूर्ण कधी करणारआणि का म्हणून करायच्याकाय दिले नाही मीकशात चुकलोय हेच मला  कळत नाहिये?मी चराचरात सामावलेला असताना मुळात त्या पवित्र तिर्थक्षेत्राच्या नावाखाली मला एका ठिकाणी बंदिस्त केले आहे. मला शक्य होईल एवढ्या सर्व शक्ती मी मानवाला प्रधान केल्या आहेत.लाख मोलाची बुध्दिमत्ता दिली असताना निर्लज्जपणे कवडीमोल लाचेचे लालूच देऊन मला भ्रष्ट करण्याचा निरर्थक प्रयत्न करत आहेत. वाटले मनुष्य आपल्या बुध्दी सामर्थ्याच्या जोरावर इतर सजीवांना सोबत विश्वाचा रहाटगाडा हाकेल पण त्याला स्वत:लाच न्याय देता आला नाही तर त्या मुक्या जीवांना काय देणार?
      देव उद्विग्नपणे असे बरेच काही बोलत होता एकूणच काय देवपणाचे ओझे पेलवणे देवाला जरा
जडच जात होते.शेवटी मीच देवाला वचन दिलेमी आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितले नाही आणि यापुढेही काही मागणार नाही पण अधून-मधून भेटत जाईल. एवढे सुंदर विश्व बनवल्याबद्दलतसेच मी काही न मागताच मला सर्व काही दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी!!!!!!!!                जाता जाता देव  मला  म्हणाला  अधे-मध्ये चुका करत जा एखादे वाईट काम ही करत जा नाहीतर हे लोक  तुलासुद्धा एक दिवस देव बनवतील.

Tuesday, October 9, 2012

सासू-सून आणि मी!!!

मी माझ्या आईचा एकुलता एक लाडका मुलगा आणि माझ्या बायकोचा एकमेवाद्वितीय नवरा. अर्थात दोघींचेही माझ्यावर आणि माझेही दोघींवर जीवापाड प्रेम आहे!
लोकांच्या घरात भांड्याला भांडी लागतात पण आमच्या घरात शब्दाला शब्द लागणेही कठीण होऊन बसले होते, कदाचित दोघीनांही एकमेकिंबद्दल काहीतरी तक्रार असावी पण मी नाराज होऊ नये म्हणून त्यांनी असा अबोला धरला असावा..पण हाच अबोला माझ्यासाठी जीवघेणा ठरत होता.
बायकोवर प्रेम करणे गुन्हा जरी नसला तरी चारचौघात करणे किवा तसे दाखवणे असेल कदाचित, कारण बरेच जण बायकोवरच्या प्रेमाला किवा तिचे ऐकणार्‍याला बायकोचा गुलाम समजतात. आणि ज्यांनी तुम्ही राजा बनण्याची स्वप्ने पाहिलीत त्यांना असे बायकोचा गुलाम झालेले थोडेच आवडणार आहे आणि आईसाठी मी नेहमीच राजा आहे.
    आईबद्दल तर प्रश्नच नाही पण माझी बायकोदेखिल प्रेमळ आहेच पण मुख्य म्हणजे जास्त समजूतदार आहे. आणि म्हणूनच आम्ही ठरवले आणि त्याप्रमाणे मी आता बायकोवर चिढतो रागावतो,दम किवा धमकीही देतो अर्थात खोटे तरीसुद्धा ती रडतेच अगदी खरेखुरे!!!माझ्याकडे फक्त शारीरिकच नाही तर शाब्दिक जीवघेणी ताकद आहे याची मला आणि बायकोला आता खात्री पटली. आमची ही मात्रा मात्र लागू पडली तेव्हापासून आई प्रत्येकवेळी सुनेची बाजू घेऊ लागली आहे आणि येणार्‍या जाणार्‍या समोर बायकोचे भरभरून कौतुकही करू लागलीये.  
मी लहान असताना आईसुद्धा मी अबोला धरला की माझा अबोला घालविण्यासाठी ताईवर किवा इतर कोणावरही मुद्दाम खोटेनाटे रागवायची आणि ही मात्रा माझ्या अबोला घालवण्यास लागू पडायची....मी ही तेच करतोय!!!!!
त्यानंतर आता सासू-सुनेच्या आणि आम्हा नवरा-बायकोच्या प्रेमाला भलताच बहर आला आहे!!!!!
         ---संतोष गांजुरे
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!