Ads 468x60px

Wednesday, November 7, 2012

बायकोचा प्रियकर !!!



        येथून जवळच आमचे घर आहे पण या बागेतील एका कोपर्‍यात बसणे आणि समोर रंगबेरंगी आकर्षक रोषणाई केलेल्या बारकडे एकटक पाहत विचारात हरवणे हा एक महिन्यापासूनचा दिनक्रमच ठरलाय. ऑफीस सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे घरी जाण्याऐवजी आजकाल आमची पाउले या बागेकडे वळतात.घरी जावे तरी कोणासाठी? हा प्रश्न आम्हाला घरी आतुरतेने वाट पाहणारी सुंदर,प्रेमळ बायको, दोन वर्षाची आमची सुंदर राजकन्या असताना पडावा याचे सर्वानाच काय मलाही आश्चर्य वाटतेय.
असे काय बिघडले की अचानक एवढा दुरावा वाढला? बर्‍याचवेळा अज्ञानात सुख असते असे म्हणतात, आतापर्यंत आमच्या बायकोचे आमच्यावर प्रचंड जीवपाड प्रेम आहे या अज्ञानात आम्ही होतो पण सुखी होतो. आता ही गोष्ठ उघड तरी कशी करावी कारण आपल्याकडे गुन्हेगारापेक्षा पिडीतालाच दोष देण्याची पध्दत आहे. काल परवापर्यंत मी एक आदर्शवत नवरा होतो, पण आता आमच्या बायकोच्या बाहेरख्यालीपणामुळे माझा काही दोष नसताना काहीबाबतीत आमच्यावरही दोष येईलच. आमचा दोष एवढाच की एक दिवस ऑफिसमध्ये एक मुलगी प्रेमभंग झाला म्हणून एक विश्वासू सहकारी म्हणून आमच्याजवळ रडरड रडली आणि आम्ही तिचे सांत्वन करता करता तिचा प्रेमात पडलो आणि लग्नही केले एवढेच!!!
                आम्ही अगदीच काही गर्भश्रीमंत नाही आहोत तेव्हा सुरवातीलाच आम्ही आमच्या बायकोला माझ्या मिठीतच स्वर्ग आहे  अशी वल्गना केली पण बायकोच्या "माझ्यासाठी हा स्वर्ग ठीक आहे पण, आपल्या होणार्‍या बाळासाठी तर हवा ना?" या प्रतीउत्तराने निरूत्तर होऊन आम्ही पूर्वीपेक्षा जास्त जोमाने कामास लागलो.एव्हाना आमच्या बायकोने एका सुंदर राजकन्येला जन्म दिला. आता आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि आम्ही पूर्वीपेक्षा जास्त तडफेने काम करू लागलो.  रात्री थकून-भागून आल्यावर शांत झोपलेल्या आमच्या निरागस राजकन्येला पाहून आमचा थकवा कुठच्याकुठे पळून जात होता. हो पण बायकोकडे थोडे दुर्लक्ष झाले पण त्याला पर्याय नव्हता. आम्ही आता आई-बाप झालो होतो त्यामुळे एवढी तडजोड करणे भागच होते. पण दुर्दैवाने असे म्हणावे लागेल आम्ही बाप झालो पण आमच्या बायकोला आई नाही होता आले. तिने दुसर्‍याच्या मिठीत स्वर्ग शोधला. जिच्या प्रेमभंगाच्या दुखाःच्या भळभळत्या जखमेवर फुंकर घातली नव्हे ती बरी केली तिने तीच जखम खरवडून आम्हास दान केली.
         मला खरेच  माझी बायको बाहेरख्याली  आहे या गोष्टीवर बिल्कुल विश्वास नाही बसला. पण काही न शोधता पुराव्यांच्या एवढ्या पुरवण्या साचल्या की त्या तपासण्यावाचून पर्यायच शिल्लक नाही राहिला. सरतेशेवटी काल आम्ही तिच्या प्रियकराला भेटायला गेलो आणि आमच्या पायाखालची जमिनच हादरली..!!! त्यांचे हे लफडे सुमारे दोन वर्षापासून चालू होते त्यावेळी तो अविवाहित होता आणि त्याची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आणि तयारी होती पण आमच्या बायकोला फ्क्त संबंध हवे होते जबाबदारी नव्हे!!! त्याच्या लग्नानंतर त्याने बर्‍याचदा हे संबंध तोडायचा प्रयत्न केले पण तिच्या हट्टासमोर त्याचे काही चालले नाही. तो ही बिचारा हैराण झालाय, आम्हाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली पण जिथे आमच्याच कंबरेची लंगोटी सुटलीये तिथे दुसर्‍याची लाज कशी झाकणार!!!!
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढे सर्व माहीत आहे तर एकदाचा सोक्षमोक्ष का नाही लावून टाकत या प्रकरणाचा. बरोबर आहे तुमचे पण त्याचे असे आहे की आम्हाला कोणी कितीही दुखावले तरी कोणाशीही सूडबुध्दीने वागायचे नाही असे संस्कार आहेत आमच्यावर दुसरे असे की आमचे विचारपूर्वक घेतलेले आणि अविचाराने घेतलेले दोन्ही प्रकारचे निर्णय फसतात म्हणून आम्ही आत्मप्रेरणेने (इन्स्टिंक्ट) निर्णय घेतो पण गेले महिनाभर याबाबतीत आमचे अंतर्मन आम्हास काहीच कौल देत नव्हते पण आम्ही मात्र काही झाले तरी बायकोला त्रास होईल असे वागणार नव्हतो. हो एक सांगायचे राहिलेच या माझ्या या महिन्याभरच्या कठीण कालखंडात आमच्या वर्गमैत्रीणने आम्हास खूप आधार दिला.
 आताच तासाभरापुर्वी ती येथून निघून गेली आहे कदाचित आमच्या आयुष्यातून देखील कायमची. आमच्या महिन्याभराच्या सहवासात तिच्या हे लक्षात आले की पुर्वीप्रमाणे रागाच्याभरात आम्ही निर्णय नाही घेत आणि आम्ही सर्वच बाबतीत सुसंस्कृत आदर्शवत बनलो आहे तसा पुर्वीही होतोच पण आता आमचे विचार संकुचित राहीले नव्हते. याच मैत्रिणिने आम्हाला पुर्वी मागणी घातली होती, आमच्यापेक्षा काकणभर सरस असताना देखील आम्ही तिला नकार दिला होता. हिनेच आम्हाला बायकोच्या या गोष्टीची कल्पना दिली. पण आता आमच्यातील बदल पाहून न राहून ती रडू लागली व मला माझ्या बायकोपासून दूर करण्यासाठी व मला मिळवण्यासाठी जो काही कट तिने तिच्या मित्राच्या सहाय्याने रचला होता तो तिनेच उघड केला.
तिची कबुली ऐकून क्षणभर मी निशब्द झालो पण लगेच सावरलो. तिला वाटले असेल मी तिच्यावर रागावेन पण का मी का रागवावे ? त्या काळात मला जर कोणी नकार दिला असता तर मीही तो पचवू शकलो नसतो, आणि काय केले असते हेही नाही सांगू शकत. दुसरे असे की हा महिनाभराचा काळ एकप्रकारे माझ्या परीक्षेचा काळ होता आणि मला असे वाटतेय मी निश्चित पास झालोय. आणि त्याबदल्यात मला आता  या  पुढील सुंदर आयुष्य भेटले आहे. मनावर खूप ताण होता तो एका क्षणात दूर झाला आहे. आता मी घरी निघतोय खूप दिवस बायकोला स्वर्गसुखाची अनुभूती दिली नव्हती आज अभूतपूर्व अशी स्वर्ग सैर घडवणार आहे, एवढेच नव्हे तर आता रोज स्वर्गाची सैर करण्याचे ठरवले आहे.

  शेवटी आम्हाला आमच्या बायकोच्या नसलेल्या प्रियकराचे आभार मानायलाच हवेत!!! नाही का?

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!