Ads 468x60px

Saturday, June 20, 2026

विमानतळ

विमानतळ 

काळ बनलंय विमानतळ,  
पण टळून जाईल ही वेळ.  
तुटू न देऊ या मातीशी नाळ,  
धीर धरू, सोसू थोडीशी कळ.
एकी राखू, येईल पंखात बळ,
जगप्रसिद्ध अंजीर अन् सीताफळ.  
जागतिक वारसा हा, नको त्यास झळ,  
हा ठेवा वाचवण्यासाठी ही सारी तळमळ.  
त्यासोबत असे ताज्या माळव्यांची हिरवळ,  
कष्टाचे मिळे समाधान आणि उत्पन्न बक्कळ.  
आश्वासनांचा अन् मोबदल्याचा नका घालू मेळ,  
अडल्यानडल्यास फितवण्याचा नका हो करू खेळ. 
विरोध असे आमचा ठाम, नको संमतीची खळखळ,  
आम्ही ओळखून आहोत सारी दलाल दुतोंडी गांडुळं.  
कटकारस्थाने करू उघड अन् थांबवू त्यांची वळवळ.  
हर हर महादेवाचा जयघोष ओठी आहे सदासर्वकाळ.
अन् खंडोबाच्या भंडाऱ्याने रंगले आहे आमुचे कपाळ.
लढजिंकण्याच्या निर्धाराने उत्साह आमुचा सळसळं.
शिवछत्रपतींच्या केवळ नावानेच रक्त आमुचे उसळं.
हा आमुचा लढाच आणेन बळीराजाचा सुवर्णकाळ.
दुधदुभत्या, खात्या घरात आनंदाने नांदेल गोकुळ.
दलालांनो तुम्ही आता नका येऊ आमच्या जवळ.
जगा अन् जगू द्या, एवढीच मागणी साधीसरळ.
तुम्ही आम्ही एकच, नको कसलीही जळजळ.
तुम्हाला सुधारण्याचे मार्ग आहेत पुष्कळ.
ऐका एवढा सल्ला, नका करू खळबळ. 
नाहीतर कराल आयुष्यभर पळापळ.
संतोबा (संतोष गांजुरे)

Sunday, June 14, 2026

सुखी माणसाचा सदरा

                       एका दुःखी राजाची गोष्ट प्रसिद्ध आहे, त्या राजाकडे गडगंज संपत्ती, राजवाडे, नोकरचाकर आणि सर्व प्रकारची विलासी साधने असतात. असे असूनही राजा मनातून प्रचंड अस्वस्थ, दुःखी आणि चिंतेत असतो. त्याला रात्रीची झोप लागत नाही. अनेक वैद्य आणि हकीम त्याच्यावर उपचार करतात, पण कोणालाच त्याचा आजार समजत नाही.शेवटी एक वृद्ध आणि सुजाण साधू राजाला एक अजब उपाय सांगतो.
"महाराज, या जगात जो कोणी पूर्णपणे सुखी माणूस असेल, त्याचा सदरा (शर्ट) तुम्ही एका रात्रीसाठी अंगावर परिधान करा. तुमचे दुःख आणि अस्वस्थता कायमची नाहीशी होईल."
राजाचे सैनिक संपूर्ण राज्यात सुखी माणसाचा शोध घेऊ लागतात. ते श्रीमंत व्यापारी, मंत्री, जमीनदार यांच्याकडे जातात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख, चिंता असतेच. पैसा असूनही कोणी सुखी नसतं.
शोध घेता घेता सैनिकांना राज्याच्या सीमेवर एका झोपडीबाहेर रात्रीच्या वेळी एक शेतकरी गाढ झोपलेला आणि आनंदाने गाणे गुणगुणताना दिसतो. सैनिक त्याला विचारतात, "तू तुझ्या आयुष्यात पूर्ण सुखी आहेस का?" तो हसून उत्तर देतो, "हो, मी या जगातला सगळ्यात सुखी माणूस आहे. मला कोणतीही चिंता नाही."
सैनिक आनंदित होतात आणि राजाच्या आज्ञेनुसार त्याचा सदरा मागतात. पण जेव्हा ते त्याच्याकडे नीट पाहतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येते की त्या सुखी माणसाच्या अंगावर साधा सदरासुद्धा नसतो! तो उघड्या अंगानेच आनंदाने जगत असतो.
जेव्हा ही गोष्ट राजाला समजते, तेव्हा त्याचे डोळे उघडतात. त्याला समजते की, सुखाचा संबंध बाह्य वस्तूंशी किंवा कपड्यांशी नसून तो माणसाच्या मनाशी असतो.

Sunday, June 7, 2026

                  भांडवलशाही शोषणव्यवस्थेच्या शिखरावर मूठभर शोषक असतात, तर तळाशी अथांग कष्टकरी वर्ग असतो. थोडक्यात, या व्यवस्थेची रचना एखाद्या पिरॅमिडसारखी असते. या संरचनेत आपण जसे वरून खाली येतो, तशी लोकसंख्या आणि त्यांच्यावरील शोषणाचा भार उत्तरोत्तर वाढत जातो.

       ▲ [०१%] मालक / भांडवलदार 
     ▲▲▲ [०९%] उच्चपदस्थ अधिकारी / कंत्राटदार
   ▲▲▲▲▲ [९०%] सामान्य कामगार / मजूर वर्ग

या पिरॅमिडच्या अगदी तळाशी देशातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक श्रमिक वर्ग कार्यरत असतो. व्यवस्थेतील उच्चपदस्थ अधिकारी हे भांडवलशाहीचे 'ठेकेदार' किंवा प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. मालकांचे नफा मिळवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची मुख्य जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असते. स्वतःचे गलेलठ्ठ पगार, बोनस आणि पदे सुरक्षित ठेवण्यासाठी हे अधिकारी कनिष्ठ स्तरावर प्रचंड मानसिक व व्यावसायिक दबाव निर्माण करतात. या व्यवस्थेत शोषण आणि दबावाचा प्रवाह नेहमी उच्च स्तराकडून कनिष्ठ स्तराकडे वाहत असतो. मालक हे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर दबाब आणतात. अधिकारी हा दबाव व्यवस्थापकांवर संक्रमित करतात. व्यवस्थापक शेवटी या सर्व ताणाचा बोजा तळातील प्रत्यक्ष काम करणाऱ्या कामगारांवर लादतात. या संपूर्ण प्रक्रियेत सामान्य कर्मचाऱ्यांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसते. केवळ वरून आलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करणे एवढेच त्यांचे कर्तव्य ठरवले जाते. जोपर्यंत ही केवळ नफाकेंद्री भांडवलशाही अस्तित्वात आहे, तोपर्यंत शोषणाचे हे दुष्टचक्र अव्याहतपणे सुरूच राहणार. भांडवलशाही व्यवस्थेचा हा पिरॅमिड संपत्ती आणि नफ्याच्या वाटपाच्या बाबतीत नेमका उलटा असतो. यात सर्वात जास्त घाम गाळणाऱ्या शोषिताला सर्वात कमी मोबदला मिळतो आणि काहीही शारीरिक कष्ट न करणाऱ्या शोषकाला सर्वाधिक नफा होतो.

▼▼▼▼▼ प्रचंड नफा – मूठभर मालक व भांडवलदारांच्या पदरात
  ▼▼▼ गलेलठ्ठ पगार – व्यवस्थापन सांभाळणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना
    ▼ तुटपुंजी मजुरी – प्रत्यक्ष अहोरात्र राबणाऱ्या लाखो कामगारांना.

                     भय हे अनेकांच्या यशस्वी व्यवसायाचे मूळ भांडवल आणि बहुसंख्याकांच्या शोषणाचे मुख्य कारण आहे

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!