आजच्या धावपळीच्या युगात माणूस एकलकोंडा होत चालला आहे. तंत्रज्ञानामुळे जग मुठीत आलयं पण त्यातील माणसे, आठवणी, नाती निसटून गेलीत. पण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कित्येक वर्षांपासून शिक्षणानंतर विविध कारणांनी दुरावलेली लोकं पुन्हा एकत्र येत आहेत. रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नातं फार जवळचे असते. नातेवाईकांकडे गेले की दुःखावरच्या खपल्या काढल्या जातात. शेतीचं काय,कोर्ट केसचा निकाल काय, फ्लॅट, गाडी, नोकरी नको ते विषय काढले जातात पण मैत्रीचं नाते टाईम मशीन सारखे असते, क्षणभरात ते तुम्हाला शाळा, कॉलेजात घेऊन जाते. परवा बऱ्याच दिवसांनी एका मित्राचा कॉल आला, पहिलाच प्रश्न होता काय रे ती आठवतेय का? पण सध्या मी काय करतोय हे महत्वाचे असल्याने, "सध्या ती काय करते" हे न विचारता विषयाला सराईतपणे कलाटणी दिली. मात्र तरी मन पस्तिशीतून विशीकडे क्षणभरात पोहचलेच.
जीवनाच्या विविध टप्प्यावर अनेक मित्र व त्यांचे ग्रुप्स निर्माण झालेत. ज्यावेळी पारगांवातील, शाळेतील मित्रांसोबत असतो त्यावेळी ते दिवस आठवतात ज्यावेळेस चिंचा, बोरे, आंबा, जांभूळ, पेरू हे विकत घेऊन खायच्या गोष्टी आहेत याची कल्पनाही नसायची. दिवस दिवस क्रिकेट खेळणे, तासनतास पोहणे. पावसात चिंब भिजणे, पाऊस थांबल्याबरोबर माळरानावर खळखळणार पाणी पाहायला जाणे, त्या वाहत्या पाण्यावर धरणे बांधणे, शाळेतील गंमती जमती, शिक्षक त्यांची विविध लकबी, त्यांच्या केलेल्या नकला सगळ्यांची उजळणी होऊन तो कधीही न येणारा काळ जिवंत होतो. कॉलेजात इतर गावांतील मुलांमुळे मित्र परिवार विस्तारला. तिथल्या वेगळ्याच गंमती, शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीपासून अगदी बसस्थानक नियंत्रकाच्या "सासवड-सुपा बस क्रमांक ४५१७ फलाट क्रमांक आठला लागलेली आहे". या उद्घघोषणेपर्यंत सारं काही मनाच्या एका कोपऱ्यात कोरलेलं आहेत. पुढे डिप्लोमासाठी कोल्हापूरला जावं लागल्यावर सगळ्याच गोष्टी सोबत जुळवून घ्यावं लागले पण आवडत्या राज्यशास्त्र, सहकार, शिक्षणशास्त्र सोडून अजिबात न उमगणाऱ्या फिजिक्स, मैथ्सशी कधीच जुळवून घेता आले नाही. पण ते सारं काही आयुष्याला कलाटणी देणारे होते.
काळाच्या ओघात खूप काही बदललंय, खूप काही नष्ट झालंय. पण त्या आठवणी कुठे तरी खोलवर रुतून बसल्या आहेत. शाळा, कॉलेजात बेंच, हॉस्टेलच्या रूम्सच नाही तर त्यावेळेसचा काळही एकमेकांशी शेअर केला होता. आजकाल तंत्रज्ञानाच्या अविष्काराने सारं काही सहज शेअर करता येत असले तरी आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर केलेल्या संघर्षाच्या,उपद्व्यापाच्या अनेक कडू गोड आठवणी असणारी आमची शेवटचीच पिढी असेल की काय असे वाटतंय. या आठवणी अशाच जपल्या पाहिजेत आणि जमेल त्यावेळेस एकत्र जमून त्याची उजळणी केली पाहिजे. आजच्या धक्काधक्कीच्या तेच क्षण तुम्हाला नवचैतन्य प्राप्त करून देतील आणि कोणत्याही बऱ्यावाईट काळात जगण्याचे बळही देतील.
संतोबा.....
0 प्रतिक्रिया:
Post a Comment