या लिखाणात वापरलेल्या उपमांबद्दल मी सर्व प्राणीमात्रांची माफी मागतो. कोणत्याही प्राण्याची बदनामी करण्याचा माझा अजिबात हेतू नाही, कारण त्यांचे गुण-दोष हे नैसर्गिक असतात. उदाहरणार्थ, सरडा रंग बदलतो ही त्याची संकटापासून स्वतःचा बचाव करण्याची नैसर्गिक कला आहे. परंतु, जेव्हा आपण एखाद्या माणसाला 'रंग बदलणारा सरडा म्हणतो, तेव्हा तो सरड्याचा अपमान नसून, माणसाच्या बदलत्या स्वभावावर केलेले भाष्य असते. मानव हा देखील एक प्राणीच आहे. त्याला लाभलेल्या बुद्धिमत्तेच्या वरदानामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ मानला जातो; पण हे पूर्ण सत्य नाही. जगभरातील अंधभक्त याला सर्वात मोठा अपवाद आहेत. खरं तर, अंधभक्तांचा बुद्ध्यांक (IQ) हा कोणत्याही सजीव प्राण्यापेक्षाही कमी असतो. निसर्गात प्रत्येक प्राण्याला संकटाची उपजत चाहूल लागते, त्याला आपल्या धोक्याची जाणीव असते. कोणताही धर्म, धर्मग्रंथ किंवा मसिहा पाठीशी नसतानाही आजवर ते टिकून आहेत. प्राण्यांना आपण माणसांइतके बुद्धिमान समजत नसलो तरी कोणताही प्राणी आपल्या नैसर्गिक गुणधर्माच्या पलीकडे जाऊन स्वतःची व्यवस्था उद्ध्वस्त करत नाही. दुर्दैवाने, बुद्धीचे वरदान लाभलेला माणूस मात्र अंधभक्तीत अडकून स्वतःचा आणि सर्व सामाजिक व्यवस्थेचा विनाश करत असतो.
अंधभक्ती केवळ त्या अंधभक्त व्यक्तीसाठीच नाही तर तिच्या कुटुंबासाठी, एकूणच समाजासाठी घातक असते. अंधभक्ती ही एक अत्यंत घातक मानसिक गुलामगिरी आहे, जी माणसाचा विवेक आणि स्वतंत्र विचार पूर्णपणे नष्ट करते. त्यामुळेच कट्टर अंधभक्तांमध्ये सुधारणा होण्याची तिळमात्र शक्यता नसते. निरोध तरी एकदा वापरून फेकून दिला जातो, अंधभक्तांना वारंवार वापरून फेकून दिले जाते तरी ते सुधारत नाही. त्यांचे तथाकथित तारणहार, पाखंडी धर्ममार्तंड, नेते आपले ईप्सित साध्य करण्यासाठी या अंधभक्तांचा वारंवार वापर करून त्यांना फेकून देतात. आश्चर्य म्हणजे, इतक्या वेळा शोषित आणि उपेक्षित होऊनही अंधभक्त कधी आत्मपरीक्षण करत नाही. उलट, नेत्याने, पाखंडी धर्ममार्तंडाने आपला वापर करून घेण्यालाच ते आपल्या जीवनाचे सार्थक समजतात. आपला गैरफायदा घेतला जात आहे हे मान्य करणे त्यांच्या अहंकाराला पटत नसल्यामुळे ते स्वतःला सतत खोट्या समाधानात ठेवतात. सामान्य माणूस चुकीची जाणीव झाल्यावर स्वतःमध्ये बदल करतो, परंतु कट्टर अंधभक्त हा शोषणाच्या अशा चक्रव्यूहात अडकलेला असतो की तो वैचारिकदृष्ट्या कायमचा परावलंबी आणि निष्प्राण बनतो, ज्यामुळे अशा मानसिकतेत सुधारणेला अजिबात वाव उरत नाही.
हे लिखाण विचार करण्याची क्षमता गमावलेल्या अंधभक्तांसाठी मुळीच नाही, कारण खुद्द त्यांचा तथाकथित 'तारणहार'ही त्यांच्या भल्यासाठी काही करत नाही. हे लिखाण अशा सर्वसामान्य लोकांसाठी आहे, जे अंधभक्तांच्या वाढत्या अंधभक्तीमुळे आणि अतार्किक वादविवादांमुळे पुरते हैराण झाले आहेत. अंधभक्तांना कसे हाताळावे आणि जे लोक या चुकीच्या मार्गावर आहेत, त्यांना पुन्हा विवेकवादाकडे कसे आणावे, याचे मार्गदर्शन करणे हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. अंधभक्तांशी वाद घालणे म्हणजे केवळ वेळ आणि ऊर्जा वाया घालवणे होय. त्यामुळे त्यांच्याशी कामाव्यतिरिक कसलीही चर्चा न करता, केवळ कामापुरते आणि सुरक्षित अंतर ठेवणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. अंधभक्तांना कधीही कमी लेखून चालणार नाही, कारण त्यांच्याकडे जरी तर्क आणि विवेक नसला, तरी आक्रमकता आणि दुष्प्रचार (प्रपोगंडा) पसरवण्याची मोठी आसुरी शक्ती असते. त्यांना कमी समजण्याची चूक आपल्याला महागात पडू शकते, कारण अंधभक्त स्वतः सुधारण्याची शक्यता शून्य असली, तरी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या दुसऱ्या सर्वसामान्य, माणसाला बिघडवण्याची पुरेपूर क्षमता त्यांच्यात असते. स्वतः न सुधारता इतरांनाही आपल्यासारखेच आंधळे व विखारी बनवणे, हाच अंधभक्तांचा मुख्य स्वभावगुण आहे. आपले प्रियजन कोणाच्याही अंधभक्तीच्या विळख्यात अडकणार नाहीत, यासाठी आपण वेळीच आणि कायम जागृत राहिले पाहिजे. अंधभक्तांच्या आणि त्यांच्या पाखंडी तारणहारांच्या खोटेपणाची वारंवार पोलखोल करून, त्यांना समाजात डोईजड होऊ न देणे गरजेचे आहे. अशा समाजघातक अंधभक्तांपासून आणि त्यांच्या विषारी मानसिकतेपासून आपण कायम सावध राहणे, हेच आजच्या काळात आपले सर्वोच्च सामाजिक कर्तव्य आहे.