Ads 468x60px

Saturday, July 9, 2022

मी उपमुख्यमंत्री.

                    साधारणपणे १९९३ ची घटना असेल, त्यावेळेस मी इयत्ता चौथीमध्ये शिकत होतो. आज पारगांवमध्ये ज्याठिकाणी तलाठी ऑफिस आहे त्याठिकाणी आमचा चौथीचा वर्ग भरत असे. आम्हांला शिकवायला भोसले गुरुजी होते, भोसले गुरुजींनी पवार सगळ्यात हुशार म्हणून मुख्यमंत्री, मनोज सहलमंत्री, काळूराम सफाईमंत्री अशी बहुतेक हुशारीवर आणि काहीअंशी आगाऊपणावर आधारित खातेवाटप केले होते. रोज सकाळी मुख्यमंत्री तुकाराम पवार सर्वांचा गृहपाठ तपासतील, वर्ग आणि व्हारांड्याच्या साफसफाईची जबाबदारी सफाईमंत्री काळूरामची. मडकी कशी बनवतात हे प्रत्यक्ष जाऊन पाहण्यासाठी चालत पाच मिनिटांच्या अंतरावर ठरलेल्या सहलीचे नेतृत्व सहलमंत्री मनोजकडे. अर्थात मला कोणतीही जबाबदारी दिली नव्हती. मला तशी अपेक्षाही नव्हती, किंबहुना ती तशी कोणालाच नव्हती.  हे असे मंत्रिमंडळ बनवण्याची संकल्पना अचानक ठरली व तात्काळ त्यांस मूर्तरूप दिले गेले, त्यामुळे कोणाच्या नाराजीचा प्रश्नच नव्हता. 

               अशाप्रकारे खातेवाटप सुरळीत पार पडले असे वाटत असताना मुलींच्या बाजूने गलका चालू झाला, माझ्या मैत्रिणींनी हट्टच धरला की संतोषला काही ना काही पद द्या.    ३५-४० पटसंख्या असलेल्या वर्गात काय आणि किती पदे देणार, गुरुजींनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्या  ऐकायलाच तयार नव्हत्या.  शेवटी नारीशक्तीपुढे गुरुजी हतबल झाले व थोडा विचार करून भोसले गुरुजींनी माझ्यासाठी उपमुख्यमंत्रीपद निर्माण केले व ज्यादिवशी तुकाराम सुट्टीवर असेल त्यादिवशी त्याची मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मी पार पाडायची असे ठरले. तुकाराम बहुदा कधीच गैरहजर नसायचा आणि माझे उपमुख्यमंत्रीपद हे कायमच नामधारी राहिले.गेल्या काही काळापासून उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्रीपदाला वरचढ ठरत असताना थोडाफार आनंद वाटतोय तो केवळ ह्याच एका नामधारीपणाच्या टोचणीमुळे.राज्याचा विचार करता उपमुख्यमंत्री पद घटनात्मक नाही आणि अनिवार्यही नाही,  केवळ खातेवाटपात समतोल राखण्यासाठी, मुख्यमंत्रीपदाची दावेदारी करणाऱ्याची नाराजी दूर करण्यासाठी आणि राजकीय स्थैर्य आणण्यासाठी त्याचा साधारणपणे उपयोग केला जातो.

              आजकाल लोकं पद मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात, बहुदा सामजिक प्रतिष्ठा,प्रसिद्धी, इतरांवर वर्चस्व गाजवण्याची संधी ह्यासाठी सगळा खटाटोप असतो आणि पदाचा मूळ उद्देश बाजूला पडतो. प्रतिष्ठा ही पदाला असते त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला तो त्या पदावर बसलेला आहे तोपर्यंतच ती प्रतिष्ठा, मानसन्मान मिळतो. प्रत्येक पदाचे काही अधिकार आणि कर्तव्ये असतात,  त्याला योग्य न्याय दिला तर त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला मानसन्मान मिळतो. अगदी ती व्यक्ती त्या पदावरून पायउतार झाल्यानंतर देखील आयुष्यभरासाठी त्यांस आदर मिळतो. पण ज्या व्यक्तीच्या कर्तुत्व आणि वर्तणुकीमुळे त्या पदाची प्रतिष्ठा वाढते अशा व्यक्तींबद्दलचा आदर आणि सन्मान पिढ्यानपिढ्या टिकतो. पण एखादी कुवत नसलेली व तडजोड किंवा अपरिहार्यता म्हणून पदावर बसवलेली व्यक्ती तिच्या वर्तणुकीने चेष्टेचा विषय होतो, अशा व्यक्तीची खिल्ली उडवली जाते मग तो मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो वा राष्ट्रपती. कोणाच्या तरी मर्जीने, मिंधे होऊन पद मिळवले तर त्या व्यक्तीच्या हातचे बाहुलं बनून राहावे लागते, सर्व काही दुसऱ्याचा इशाऱ्यावर करावे लागते. अशा व्यक्तीची नामधारी म्हणून केवळ रबर स्टॅम्प सारखी गत होते.अशावेळी ना त्या पदाचा उपभोग घेता येतो ना त्या पदाला योग्य न्याय देता येतो. 

          मला नक्की आठवत नाही कोणत्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात तो धडा होता पण त्या धड्याने मला आयुष्यभरासाठी जमिनीवर राहण्याचा धडा मात्र दिला. बहुधा तो पाठ एखाद्या सरकारी अधिकाऱ्यावर असावा, तो ज्यावेळी अधिकारीपदावर होता तेव्हा त्याच्या हाताखाली असलेला कर्मचारी त्याला रोज आदबीने सलाम करायचा, चहापाणी काही हवं नको ते सर्व पहायचा. एकेदिवशी तो अधिकारी निवृत झाल्यानंतर रस्त्यात त्याची गाठ समोरून सायकलवर येणाऱ्या त्या कर्मचाऱ्यासोबत होते, नेहमी अधिकारी समोर दिसल्यावर मोठया आदबीने सायकलवरून उतरून सलाम करणारा तोच कर्मचारी त्यादिवशी मोठ्या गुर्मीत सायकलवर उतरून त्याच्या समोर सिगारेट सुलगावीत मोठ्या तोऱ्यात निघून जातो याचे त्या अधिकाऱ्यास आश्चर्य व वाईट वाटते. या जिव्हारी लागलेल्या घटनेचे पुनरावलोकन करता त्यांच्या कार्यकाळात त्या कर्मचाऱ्याशी अधिकारी म्हणून केलेली वर्तणुक चुकीची असल्याची उपरती होते. ते अधिकारी आणि कर्मचारी असे नाते होते अधिकरपद जाताच ते संपुष्टात आले. व्यक्ती-व्यक्तींमध्ये कोणत्याही पदाच्या , आर्थिक,सामजिक स्तराच्या आधारे भेदभाव करू नये. मी आजही माझ्या कार्यालयीन मेल मध्ये माझ्या पदाचा उल्लेख कधीच करत नाही.

              आजकाल जिथेतिथे केवळ राजकारणच नाही तर प्रत्येक क्षेत्रात पदासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच खेळले जाते. ज्या गोष्टी साध्य करण्यासाठी त्या पदाचे प्रयोजन केलेले असते त्यालाच हरताळ फासला जातो. पदाची लालसा असणे वाईट नाही, पण त्यासाठी आपली त्या पदासाठी असलेली योग्यता - अयोग्यता विचारात न घेता घोडेबाजार, साठमारी, विश्वासघात करून या ना त्याप्रकारे पद हस्तगत केले जाते.  पदाचा गैरवापर करून आपला आणि समर्थकांचा फायदा करून घेतला जातो, प्रतिस्पर्धकांना नेस्तनाबूत केले जाते. काळाच्या परिपेक्षात पाचदहा वर्षे फार नाहीत आणि कोणतेही पद सार्वभौम नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट नीतीनियमाने, नैतिक अधिष्ठान असलेले डावपेच खेळून मिळवावे. कावेबाजपणे, पाताळयंत्रीपणे, कुटील डावपेच खेळून काही मिळवले आणि आपण कितीही नीतिमत्तेने वागल्याची भलामण केली तरी आपण कसे वागलो त्याचे प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर, वर्तणुकीवर उमटत असते.आपण कितीही लपवाछपवी, सारवासारव केली तरी कधी ना कधी सत्य समोर येतेच. सर्व काही हस्तगत करून इतरांच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत होत नसेल, चारचौघांत उजळ माथ्याने फिरता येत नसेल आणि आपल्या विजयापेक्षा प्रतिस्पर्ध्याच्या पराभवाची चर्चा होत असेल तर तो आपला पराभवच नाही का?.

                 संतोबा...

Thursday, July 7, 2022

लोकशाही

                    लोकशाही ही एक चांगली शासन व्यवस्था आहे पण ती सर्वोत्तम नाही. ज्ञात,प्रचलित शासनव्यवस्थेत निश्चित ती वरचढ आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हवे ते मिळण्याची संधी असते पण ते मिळेलच याची खात्री नसते. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असते त्यामुळे या आकड्यांच्या खेळांमुळे सर्वांना समान संधी द्यायची म्हणले तरी ती संधी अल्पसंख्याकातील बहुसंख्याला, गरीबातील श्रीमंताला मिळते. भारतासारख्या खंडप्राय देशात साक्षात लोकशाही अस्तित्वात येणे कठीण आहे, आता भारतात जी लोकशाही अस्तित्वात आहे तिला आपण प्रातिनिधिक लोकशाही असे म्हणू शकतो. सर्वसामान्य जनतेचा लोकशाही व्यवस्थेतील सहभाग हा मतदानापुरताच अर्थात लोकप्रतिनिधी निवडून देण्याइतपतच मर्यादित असतो. एकदा निवडून आलेला प्रतिनिधी काय काय उपद्व्याप करतो, सत्तेसाठी, स्वार्थासाठी कोणाच्या वळचणीला जातो ते हतबलपणे पाहण्याव्यतिरिक्त त्याच्या हातात काहीही राहत नाही. थोडक्यात जनतेला मतदानाचा हक्क असला तरी एकदा निवडून दिलेल्या प्रतिनिधीने कर्तव्यात कसूर केली तर वचक ठेवण्याचे कोणतेही प्रयोजन नाही.

            निवडून दिलेला लोकप्रतिनिधी एकदा निवडून गेल्यानंतर तो त्याची लोकप्रतिनिधी म्हणून असलेली कर्तव्ये पार पाडेल याची खात्री देता येत नाही. बऱ्याचदा जनतेला व अगदी लोकप्रतिनिधीलाही त्याच्या कर्तव्याची जाण नसते. त्यामुळे दूरदृष्टीने लोकोपयोगी निर्णय घेण्यापेक्षा जनमतावर प्रभाव पाडणाऱ्या लोकप्रिय घोषणा करण्याकडे त्यांचा कल असतो. लोकप्रिय घोषणाव्यतिरिक्त जनमतावर प्रभाव पाडणाऱ्या अनेक गोष्टी असतात. धार्मिक,वांशिक,प्रादेशिक, भाषिक अस्मितांचा बाजार मांडून जनमताचे केंद्रीकरण केले जाते. विरोधकांवर खोटेनाटे आरोप करून त्यांची प्रतिमा बदनाम केली जाते. सत्ता हाती असेल तर प्रसारमाध्यमे, सरकारी यंत्रणांना हाताशी धरून विरोधीपक्षाविरोधी नरेटिव्ह तयार केले जाते. तथाकथित सेलिब्रिटिंना हाताशी धरून जनमत इन्फ्लूअन्स् करण्याचा प्रयत्न केला जातो अशाने सर्वसामान्य मतदार भावनेचा भरात मतदान करतो आणि चुकीचे लोकप्रतिनधी विधानसभेत, लोकसभेत पाठवले जातात. कोणा एका पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आणि विरोधी पक्ष कमजोर झाला तर अनेक निर्णय घेताना मनमानी केली जाते, हे निर्णय लोकहितापेक्षा सत्ताधारी पक्षाच्या विचारसरणीला पूरक ठरतील असे, आणि ठराविक व्यक्ती, संस्थाच्या हिताचे असतात. ही एकाधिकारशाही एक प्रकारची हुकूशाहीच म्हणता येईल आणि म्हणूनच अशा प्रचंड बहुमताला बऱ्याचदा पाशवी बहुमत असेही म्हणतात.

            आज खूप साऱ्या लोकांना लोकशाही नकोशी वाटते त्यापेक्षा त्यांना हुकूमशाही आणि लष्करशाहीचे सुप्त आकर्षण आहे. लोकशाही शासनव्यवथेत  राज्य कारभार  लालफितीत अडकल्यामुळे, स्पष्ट बहुमताअभावी आघाडी,युती करण्याची अपरिहार्यता आणि कोणताही निर्णय घेण्यासाठी लागणारा विलंब, घटक पक्षात एकवाक्यता नसणे यामुळे देशाच्या प्रगतीस खीळ बसते अशी सर्वसामान्य जनतेची धारणा बनलेली असते. फॅसिस्ट विचारसरणीचे पक्ष प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या त्याची भलामण करत असतात. आत्यंतिक राष्ट्रवाद, काल्पनिक सोनेरी भूतकाळाचे गुणगान आणि तो प्रत्यक्षात उतरवण्याचे स्वप्न, मूठभर भांडवलदारांच्या हाती सर्व आर्थिक प्रगतीच्या चाव्या आणि त्यातून जीवघेणी विषमता,  विचारवंतांचे वावडे आणि सर्व प्रश्न सोडवणारा, बाह्य शक्तिपासून संरक्षण करणारा एकमेव सर्वशक्तीशाली नेता अशी फॅसिस्ट पक्षाची मांडणी असते आणि म्हणून ते लोकशाहीला दोष देत हुकूमशाही आणि लष्करशाहीसाठी आग्रही असतात. हुकूमशाही आणि लष्करशाहीत पहिला बळी सर्वसामन्य जनतेच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा जातो हे सर्वसामन्य लोकांच्या खिजगणीत नसते, एककल्ली  आणि अनियंत्रित कारभारामुळे सर्व स्तरांवर देशाची आर्थिक घडी इतकी बिघडते की जनतेला हुकुमशहाच्या मेहेरबानी वर जगल्या सारखे जगावे लागते. खरंतर प्रत्येक व्यवस्थेत काही ना काही गुण दोष असतातच एखादी व्यवस्था, संस्था, व्यक्ती कितीही चांगल्याप्रकारे कार्यरत असली तरी कालांतराने तिला विरोधाचा सामना करावा लागतो. अगदी तिच्या समर्थकांमध्येदेखील कुरबुरी वाढू लागतात. जगात अनेक शासनव्यवस्था, राज्ये, संस्कृती उदयास आल्या आणि लोप पावल्या. इतर शासनव्यवस्थेच्या मानाने लोकशाही शासनव्यवस्था लोकांच्या भावनांचा उद्रेक न होता दीर्घकाळ टिकून आहे.

      खरंतर लोकशाही स्वातंत्र्य,समतेची आई आहे असे म्हणता येईल. अर्थात परिपूर्ण स्वातंत्र्य आणि समता कदापी प्रस्तापित होऊ शकत नाही, एका छोट्या कुटुंबातही ते शक्य होत नाही पण लोकशाही मार्गाने विषमतेची दरी बुजवण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहते. लोकशाही आहे म्हणून समाजातील शेवटच्या घटकाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि प्रगती करण्याचे सप्न पाहण्याची आणि आर्थिक सामजिक उद्धार करण्याची संधी तरी मिळते. एखाद्या गोष्टीत काही त्रुटी असतील तर त्या आपण दुरुस्त करतो, तिला उध्वस्त करत नाही. घरात ढेकूण झाले तर आपण त्यांचा बंदोबस्त करतो ना की घर जाळतो. लोकशाहीचेही तसेच आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बदल हा लोकशाहीचा आत्मा आहे. सध्या तरी लोकशाहीला पर्याय नाही. जनता प्रगल्भ झाली तर लोकशाही आपोआप प्रगल्भ होत जाईल. लोकशाहीचे महत्व आणि उपयुक्तता प्रत्येक व्यक्तीने समजून घ्यायला हवी. कोणतही योजना, निर्णयाबाबत प्रत्येक जण खुश राहू शकत नाही पण हुकुमशाहीचे गुणागण गाणे घर जाळून कोळशाचा व्यापार करण्यासारखे आहे.

                     व्यक्ती, समाज व संस्कृती या जर लोकशाहीभिमुख नसतील, तर लोकशाही पद्धतीचे संविधान स्वीकारूनही त्या देशात लोकशाही रूजणे व टिकणे अवघड असते.लोकशाही ही केवळ शासनव्यवस्था न राहता ती एक जीवनपद्धती व्हायला हवी.  वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवनात प्रत्येक नागरिकाने तिचा अवलंब केला पाहिजे. गुलाम, मालक या संकल्पना कालबाह्य व्हायला हव्यात. प्रत्येक नागरिकाने स्वतः मध्ये असलेल्या सरंजामी, वर्चस्ववादी प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे. एखादी गोष्ट योग्य-अयोग्य, चांगली-वाईट असणे हे व्यक्ती सापेक्ष आहे. स्वतःला जे योग्य वाटतेय, चांगले वाटतेय त्याची जबरदस्ती इतर व्यक्तींवर करू नये अगदी त्या आपल्या कुटुंबाचा भाग असतील आणि सर्वांगीण दृष्ट्या आपल्यावर अवलंबून असतील तरी आपण त्या व्यक्तीच्या मतांचा आदर करणे हे प्रगल्भतेचे लक्षण आहे. लोकशाहीची अशी प्रगल्भता समाजाच्या प्रत्येक व्यक्तींच्या विचारांमध्ये भिनली तर एक सुदृढ समाज निर्माण होऊ शकतो व परिपूर्ण लोकशाही अस्तित्वात येऊ शकते. प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी संधी मिळण्यासाठी लोकशाही टिकली पाहिजे आणि दिवसेंदिवस ती जास्त निकोप व्हायला हवी.  सुजाण नागरिक म्हणून ती आपल्या सर्वांची गरज आणि जबादारी आहे.

                                                   संतोबा...

Wednesday, July 6, 2022

मानसिक आरोग्य

                आजकालच्या धक्काधक्कीच्या, धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही ढासळत चालले आहे. शारीरिक आरोग्याबाबत आपण फार सजग नसलो तरी एका ठराविक मर्यादेनंतर आपण शारीरिक आरोग्याची काळजी घेतो. पण मानसिक आरोग्याबाबत आपले नेहमीच दुर्लक्ष होते, किंबहुना मानसिक आरोग्य बिघडवणारी परिस्थिती कशी हाताळायची हेच आपल्याला कळत नाही. कौटुंबिक कलह, वडिलोपार्जित संपत्तीतील वाद, नात्यातील क्लिष्टता, नोकरी धंद्यातील कामाचा दबाव, सामाजिक प्रतिष्ठेचा दबाव असल्या गोष्टी आपले मानसिक आरोग्य बिघडवत असतात.  या गोष्टींचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर देखील होत असतो. खरंतर आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे पण बऱ्याचदा मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या बाह्य घटकांवर, व्यक्तीवर आपले नियंत्रण नसते.  अशावेळी ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या गोष्टी काहीतरी उपाययोजना करून व्यवस्थित हाताळायला शिकायला हवे. 

               कौटुंबिक कलह आणि नात्यातील क्लिष्टता हे मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे सगळ्यात प्रमुख घटक आहेत. त्यात प्रामुख्याने दोन पिढ्यांमधील विसंवाद.वडिलोपार्जित संपत्तीचे वाद, नात्यामधील कर्तव्ये आणि हक्क यांचा असमतोल,  बदलत्या परिस्थितीत दोन कुटुंबांमधील आर्थिक, सामाजिक स्तर रुंदावणारी दरी. स्वतःच्या व इतरांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे. जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग, विश्वासघात.  नात्यांमधील मानपान, गैरसमज या गोष्टींचा समावेश होतो. हे सगळं मिटवण्यासाठी आपण कितीही सामोपचाराची समजूतदारपणाची भूमिका घेतली तरी त्याला फारसं यश येत नाही. कारण बहुतेकांना हक्काची जाण असते पण जबाबदारीचे भान नसते, त्यांची कर्तव्यामध्ये स्वतःचा वाटा  आणि हक्कांमध्ये दुसऱ्याचा वाटा नको अशी आडमुठेपणाची भूमिका असते. त्यामुळे काही वेळा कोर्टकचेऱ्या करण्याची वेळ येते, बऱ्याचदा त्यामधून काहीच साध्य होत नाही याउलट वेळ, पैसा आणि मानसिक स्वास्थ्य धुळीस  मिळते. अशा कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात.

             नात्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे सोपे नसते, अशावेळी आपण स्वतः नात्यांमध्ये दुजाभाव करायचा नाही, सगळ्यांना आपले समजायचे, त्यांनी आपल्याला आपले समजायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, त्यासाठी आपण आपले मानसिक आरोग्य खराब करायचे नाही. त्यांनी आपल्याला आपले समजावे हा अट्टहास आपण सोडून द्यायचा. कारण स्वभावाला औषध नसते. आपण आयुष्यभर फक्त बेरीज करत राहायची आणि केवळ त्या बेरजेत अडथळा आणणाऱ्यांची वजाबाकी करायची. जेव्हा दोन पिढ्यांमध्ये विसंवाद होतो त्यावेळी आपण त्यांच्याजागी आपल्याला ठेऊन विचार करावा, त्यांचा संघर्ष, अनुभव हा वेगळ्या पातळीवरचा असतो. वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस जनरेशन गॅपची समस्या जटील बनत चालली आहे. आपले आचारविचार कोणावरही लादायचे नाही, नात्यांना बंधनात बंदिस्त करण्यापेक्षा त्यांना योग्य ती मोकळी दिली तर ती जास्त निरोगी राहतील. आपण कुटुंबाचा आधार बनून इतरांना परावलंबी बनवण्यापेक्षा, आपण आपल्या कुटुंबाचा पाया बनण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून सर्वाँना स्वकर्तृत्वावर भरारी घेता येईल. महत्वाचे म्हणजे जसे आहात तसे रहा, आदर्शवादाचा झेंडा मिरवत कोणाचा गॉडफादर बनण्याचा प्रयत्न करू नका. कोणालाही सदा सर्वकाळ खुश ठेवता येत नाही, कोणासाठी कितीही केलं तरी पलटायचे असते त्यावेळी ते पलटतातच शिवाय त्यासाठी बिनबुडाची कारणे देत सगळा दोष आपल्यालाच माथी मारून, आपली यथेच्छ बदनामी करून नामानिराळे होतात. त्यामुळे लोकांच्या मनातून उतरण्याची चिंता करू नका, स्वतःच्या मनातून उतरणार नाही याची दक्षता तेवढी घ्या.

              आजकाल पैसा, संपत्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. पैसा, संपत्ती नसेल तर आपल्यालाही समाजात काही किंमत राहत नाही. पैसा कमावण्यासाठी त्यासाठी लोकं वाट्टेल त्या थराला जातात. पैसा मिळवणे गरजेचेच आहे पण त्यासाठी वाट्टेल त्या थराला जायची वा काही धूर्त डावपेच खेळायची गरज नाही. पैशासाठी कोणाची लाचारी पत्करण्याची वा कोणाचे मिंधे होण्याचीही गरज नाही. कोणाच्या हातचे बाहुले बनण्यापेक्षा नितीनियमाने जेवढा कमवता येईल तेवढा पैसा कमवा व सुखासमाधानाने रहावे. फुकट मिळणारी झोपही पैशाने विकत घेता येत नाही म्हणून असे कोणते कृत्य करू नका ज्याने तुमची झोप उडेल. आयुष्यात अनेक प्रसंग येतात जिथे वादीवादातील आपल्याच हक्काच्या गोष्टी आपले जिवलग लांड्यालबाड्या करून लुबाडू पाहतात. अशावेळी जेवढे सामोपचाराने मिटवता येईल तेवढे मिटवण्याचा प्रयत्न करा नसेल मिटत तर इतर कायदेशीर मार्गाने मिटवण्याचा प्रयत्न करा. एवढं सगळं करून पदरी काही पडण्याची शक्यता नसेल किंवा जे मिळणार आहे त्याच्या तुलनेत जास्त वेळ आणि पैसा खर्च होणार असेल तर जे तर त्या गोष्टी मिळवण्याचा नाद सोडून द्यावा. तो वेळ आणि पैसा इतर ठिकाणी गुंतवा निश्चितच त्याचा परतावा जास्त आणि समाधन देणारा असेल. कधी कधी काही गोष्टी निर्व्याजपणे सोडता आल्या पाहिजेत, पानगळ झाल्याशिवाय नवी पालवी फुटत नाही.  त्या गोष्टी भले सांपत्तिक असो वा कौटुंबिक त्या निर्व्याजपणे सोडायला जमले तर मानसिक ताणतणाव आश्चर्यकाकरीत्या गायब होतो शिवाय तुम्ही त्यागले ते कोणत्या न कोणत्या रूपात सव्याज परत मिळेल.  आपण मानपान करायचा आणि त्यांनी मनमानी करायची हे जास्त काळ सहन करून चालत नाही, योग्यवेळी अशांना आपल्या आयुष्यातून बाद करणे जास्त योग्य असते, अशावेळी जास्त फायद्यातोट्याचा विचार करून चालत नाही. आपल्याशी वाईट वागणाऱ्यांबद्दल कुठलीही बदल्याची भावना मनात ठेऊ नये. बदल्याची भावना समोरच्यापेक्षा आपल्या स्वतःला जास्त त्रास देते. इतरांना त्रास नको म्हणून त्यांच्या चुकांना क्षमा करायचे नाही तर आपल्याला त्रास नको म्हणून त्यांच्या चुकांना माफ करायचे. माफ करून ते जर सुधारण्यासारखे नसतील तर त्यांना आयुष्यातून कायमस्वरूपी बाजूला करणे श्रेयस्कर समजायचे.

                      समाजात वावरताना, नोकरी धंद्यात अनेकदा आपण अडचणीत सापडतो, काही गोष्टीबद्दल आपल्या मनात एकप्रकारची भिती बसलेली असते. भित्या पाठी ब्रह्मराक्षस असे म्हणतात, त्याप्रमाणे त्या भितीमुळे आपला आत्मविश्वास डळमळीत होऊ लागतो, तो मानसिक ताण आपल्या पेलवत नाही ना कोणाला सांगताही येत नाही. त्यावेळी आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव असे ठरवून ज्या गोष्टींची भिती वाटतेय त्यांना सरळ भिडायचे. जी गोष्ट घडण्याची भिती वाटते ती घडली असे समजायचे. कसलेही ओझे घेऊन जगायचे नाही मग ती भिती असो कोणाचे उपकार तात्काळ त्यातून बाहेर पडायचे. कधीही कोणाची बरोबरी करण्याच्या भानगडीत पडू नये, कधीही कोणाशी तुलना करू नये. तुमच्याकडे काय नाही हे पाहताना तुमच्याकडे जे काही आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण तुमच्याकडे जे काय आहे ते मिळावं अशी ही कित्येक जणांची स्वप्न असतील. जे नाही ते मिळवण्याच्या नादात जे आहे त्याचा उपभोग घेण्यास विसरू नका. या जगात कोणीच सार्वभौम नाही प्रत्येक जण कोणाला न कोणाला बांधील आहे. प्रत्येकाला कोणती ना कोणती नियमावली पाळावीच लागते. या जगी सर्व सुखी असा कोणीही नाही, प्रत्येकाला तो ज्या पायरीवर आहे त्या प्रकारची सुख आणि दुःख त्याच्या आयुष्यात असतात त्यामुळे कोणाच्या सुखदुःखाचा आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ देऊ नये.  शेवटी कितीही मिळवले तरी कमीच आहे आपण कोण आहोत हे पाहण्यापेक्षा आणि इतर कोणाशी आपली तुलना करण्यापेक्षा या ब्रम्हांडात ही आपली अखंड पृथ्वी एक धुलिकणा एवढी आहे हे लक्षात घ्या. मी कधी हे मिळवायचे ते मिळवायचे असा विचार करतो त्यावेळी  "ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?" असं म्हणणारा प्यासा मधील गुरुदत्त डोळ्यांसमोरून तरळून जातो.


                                                संतोबा...

Saturday, January 1, 2022

संकल्प - २०२२

                    गेल्यावर्षी अर्थात २०२१ ला गेल्या चौदा वर्षांचा अनुशेष भरून काढायचा हा संकल्प केला होता त्यात प्रामुख्याने घर, गाडी, शेती, नोकरी, व्यवसाय, आरोग्य, राजकारण आणि स्वार्थी रोगट नात्यांचा सोक्षमोक्ष या संबंधी संकल्प केला होता त्यापैकी काही संकल्प पूर्ण झाले आहेत तर काही पूर्ण व्हायचे आहेत. मुख्य संकल्पापैकी घर, गाडी (वेटिंगवर आहे), शेती हे संकल्प पूर्ण झालेत त्याबरोबरच नोकरीचा बऱ्यापैकी बॅकलॉग भरून निघालाय आणि स्वार्थी रोगट नात्यांचा सोक्षमोक्ष लावण्यात आला आहे. आरोग्याच्या बाबतीत पोट हाताबाहेर गेलेय ही एकमेव आणि मोठी समस्या आहे त्यादृष्टीने वर्षाच्या मध्यंतरापर्यंत १३ किलो वजन कमी केले पण त्यात सातत्य नसल्यानेच पुन्हा ते १५ किलोने वाढून पूर्ववत झाले. राजकारण आणि आरोग्य ही निरंतर प्रक्रिया आहे आणि त्यात सातत्य हवे असते, त्यामुळे ईथुनपुढे प्रत्येक गोष्टीत सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करीन. व्यवसायाबाबतचा विचार तूर्तास बाजूला ठेवलाय.
                  या वर्षी जे काही साध्य करता आले त्याला पूर्वाश्रमीच्या कार्याचे पाठबळ आणि बऱ्याच हितचिंतकांचा सक्रिय पाठींबा तसेच काही गोष्टी घडण्यासाठी अनुकूल परिस्थिती कारणीभूत ठरली. आतापर्यंत कोर्टकचेरी, हेवेदावे, मानपान यासारख्या वांझोट्या गोष्टीत खूप वेळ आणि पैसा वाया गेला. वडिलोपार्जित शेतीत माझा किती जीव गुंतला होता हे सर्वांनाच माहिती आहे, आजही कोणी हितचिंतक भेटले की ते त्याविषयीच चौकशी करतात त्यांना आता यानिमित्ताने एकच विनंती आहे की मी हा विषय माझ्यापुरता संपवला आहे, तेव्हा याविषयी चर्चा न करणे उत्तम. गेल्या आठदहा वर्षाच्या काळात केलेल्या सर्वप्रकारच्या प्रयत्नांना अपयशच आले आहे. ज्या लोकांना स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी कळत नाही किंवा कळत असूनही आडमुठेपणा करून समोरच्याला अडचणीत आणणे हे जास्त आनंददायक वाटते अशी लोकं कितीही तडजोडी केल्या तरी ते बदलणार नाहीत याची जाणीव मला झाली आहे, त्यामुळे हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही अन्यथा तेल ही गेले आणि तूपही गेले अशी अवस्था व्हायची हे मला कळून चुकले आहे. 
                 शेती मिळवण्यासाठीची ही तळमळ कोणत्याही आर्थिक कारणातून नव्हती कारण शेतीवर मी माझ्याकडे काहीही नसताना अवलंबून नव्हतो आणि आताही नाही. जन्मापासून आईने मोलमजुरी करून मला शिकवले, वाढवले आहे. शेतीतील कोणत्याही उत्पन्नाचा हिस्सा माझ्या उपयोगी पडला नाही एवढेच काय पण आई व्यतिरिक्त इतर कोणाही सग्यासोयऱ्यांचे  माझ्या जडणघडणीत एकतर्फी योगदान/उपकार नाहीत, जे काही देणंघेणं होते त्याची ज्या त्यावेळेस परतफेड केली आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाला शेतीची जी खानदानी ओढ असते ती आहेच शिवाय ज्या शेतीसाठी वारस हवा, वंशाला दिवा हवा म्हणून ज्यांनी वडिलांना दुसरे लग्न करावयास भाग पाडून माझ्यारुपाने शेतीस वारस मिळवून देण्यासाठी भरीस घातले. ज्या शेतीला,घरादाराला वारस मिळावा म्हणून नवससायास केले त्या वारसाला जन्मापासून बेवारशासारखं, उपऱ्यासारखं दुसऱ्याचा दारात वाढावे लागले आणि आता मोठेपणी फायद्यात आहे म्हणून कायद्याच्या आडून शेतीची लुबाडणूक केली, कोर्टकचेऱ्या करायला भाग पाडले, मला रस्त्यावर आणण्याची भाषा केली. सामोपचाराने, मोबदला देऊनही कोणताही तोडगा निघू न देता कवडीमोल किंमतीने शेती दुसऱ्याच्या घशात घातली. माझ्याच हक्काच्या शेतीसाठी मला लढावे लागणे दुर्दैवी होते पण ही माझ्या हक्काची, आत्मसन्माची लढाई होती म्हणून मी सर्वस्वपणाला लावून लढत होतो, तडजोडी, कमीपणा स्विकारत होतो पण त्यात यश आले नाही शेवटी सगळ्याचा सोक्षमोक्ष लावला. ईथुनपुढे ज्याला जे हवे ते करावे, जे मिळवता येईल ते मिळावावे परंतु माझ्या वळचणीस येऊ नये. एक लक्षात ठेवायचे, आज त्या शेतीची जी किंमत आहे, आज न उद्या त्याच्यापेक्षा जास्त किंमतीचा माझा एकेक शब्द असेल याची मी त्यांना खात्री देतो.
                    असे सगळे विरोधात असतानाही सातबाऱ्यावर माझं नाव लावता आले, त्यात माझं स्वतःच काही फारसं कर्तृत्व नसून माझ्या राहीआत्या आणि कुटुंबीयांचा मोठेपणा आहे. ही तीच आत्या आहे जी मला लहानपणापासून संतोबा म्हणते आणि म्हणून 'संतोबा' याच नावाने मी लेखन करतो. मी लहान असताना हट्ट करायचो म्हणून रक्षाबंधनला येताना आत्या माझ्यासाठी खास राखी घेऊन यायची त्यापैकी लाकडी हत्तीची, आणि मोरपंखांची राखी अजूनही आहे तशी आठवणीत आहे, तसेच त्यांनी आणलेले टाळ  अजूनही काही काळापूर्वी पर्यंत घरात होते. आत्यांनी निरपेक्षपणे विनाअट, विनामोबदला दिलेल्या त्या जमिनीची किंमत किती, तिचा किती फायदा होईल, किती उत्पन्न निघेल याच्याशी मला काही देणेघेणे नाही. त्यातून मला जे मानसिक समाधान मिळाले त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. माझ्या मनात जो अन्यायाचा लाव्हा धुसमत होता तो यामुळे शांत झाला आहे आणि त्याची राख झाली आहे त्या राखेतून हा फिनिक्स लवकरच झेपावेल अशी आशा आहे (डिप्लोमासाठी कोल्हापूरला असताना "हा फिनिक्स लवकरच झेपावेल" हे माझे एक पेटंट वाक्य होते) आता ज्यांनी मला त्रास दिला त्यांच्याबद्दल माझ्या मनात कसलीही द्वेष भावना नाही. याबद्दल त्यांनी आत्यांचे आभार मानायला हवेत.
                 गेल्यावर्षा प्रमाणेच यावर्षी  म्हणजे २०२२ या वर्षभरात पुढील गोष्टी साध्य करावयाचा मानस आहे. वर्षभरात कमीतकमी ५१ लेख लिहिणे, छत्तीस लाख एक्कावण हजार पावले चालणे( प्रतिदिन सरासरी दहा हजार पावले). आर्थिक शिस्तीचा अंगीकार करणे. आरोग्य आणि राजकारण यामध्ये सातत्य आणि जे काही करायचे, जे काही घ्यायचे ते सर्वोत्तम. असा संकल्प आहे त्याबरोबरच हे नेहमीचे संकल्पाचे गुऱ्हाळ बंद करून स्वप्नपूर्तीच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात करायची आहे. हे सर्व जगजाहीर यासाठी की मनातल्या मनात केलेल्या संकल्पनांना पळवाट काढता येते पण हे असं जगजाहीर केलं म्हणजे किमान संकल्पपुर्तीसाठी प्रयत्न केले जातील.  
                                                                 
                                                                                                           ...संतोबा.
  

Thursday, November 25, 2021

एसटी कर्मचाऱ्यांचा संप.

प्रती,
महाराष्ट्र सरकार, कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी आणि एसटी महामंडळ कर्मचारी.
विषय : एसटी महामंडळ कर्मचारी संप आणि खाजगीकरणाबाबत.
शेतकऱ्यांच्या पाठोपाठ आता एसटी कर्मचाऱ्यांच्यावर आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे, गेल्या काही दिवसांत जवळपास ४२ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तुटपुंजा पगार, आणि तो ही नियमित नसेल तर कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांसमोर अर्थार्जनाचा दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नसेल तर आपण आपले कुटुंब सांभाळू शकत नाही या अपराधीपणाच्या भावनेतून त्यांनी आत्महत्येसारखा दुर्दैवी पर्याय निवडला तर त्यात त्यांचा काय दोष. शेवटी आपल्या रास्त मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांना संपाचे हत्यार उगारावे लागले, खरे तर ही संप करण्याची वेळ यायलाच नको होती. आत्महत्येचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन आधीच त्यांच्या अडचणी समजून उपाययोजना करायला हव्या होत्या. आज दोन आठवड्याहून अधिक काळ संप चालू असून त्यावर तोडगा निघत नसेल, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होत नसेल तर ते दुर्दैवी आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढणे बाजूला ठेऊन, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते, त्याशिवाय एसटीच्या खासगीकरणाच्या दिशेने पावले टाकली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. अशाने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन त्यांच्यातील खदखद वाढू शकते आणि संप अजून चिघळू शकतो. विलिनीकरणाबाबतचा निर्णय निश्चितच सोपा नाही, पण काल पत्रकार परिषदेत परिवहन मंत्र्यानी अडीच ते पाच हजार पगारवाढ करून, ४१ टक्के पगारवाढ दिली, ऐतिहासिक पगारवाढ दिली असे म्हणत आकड्यांचा खेळ मांडला. ४१ टक्के पगारवाढ ही काही सरसकट पगारवाढ नाही. आकड्यांची जुळवाजुळव करण्यापेक्षा कर्मचाऱ्यांच्या पगाराची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. वेतननिश्चिती आणि वेतनवृद्धीबाबत जर कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतले तर कदाचित विलीनीकरणाची मागणी तूर्तास मागे पडून संप मिटू शकतो. सरकारने ऊठसूट कामावर हजर न झाल्यास कारवाई करण्याची, निलंबन करण्याची धमकी न देता संप मिटवण्याचा प्रयत्न करायला हवा. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून संप सामोपचाराने, सुवर्णमध्य काढून मिटवावा. खाजगीकरणाबाबत केंद्रासरकारच्या पावलावर पाऊल ठेऊन एसटीचे खाजगीकरण करण्यासाचे पातक राज्य सरकारने करू नये कारण त्याचा फटका केवळ एसटी कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य गोरगरीब जनतेला बसणार आहे.
एसटी खाजगीकरणाबाबत चर्चा चालू आहे हे संपकऱ्यानां विचलित करण्यासाठी की खरोखर तशी हालचाल चालू आहे की काय हे माहीत नाही पण जर राज्यसरकार एसटीचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते दुर्दैवी असेल आणि सर्वसामान्य जनता तो प्रयत्न हाणून पाडेल. खरंतर एसटीचे खाजगीकरण व्हावे ही पांढरपेशावर्गाची सुप्त इच्छा आहे कारण काय तर ती कायम तोट्यात असते म्हणून. एसटी ही सर्वसामान्य जनतेच्या दळणवळणाच्या सेवेसाठी आहे. तिच्याकडून तिजोऱ्या भरण्याच्या अपेक्षा ठेऊ नयेत. गाव तिथे रस्ता ,रस्ता तिथे एसटी हे महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. आम्हांला तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त, शाळा, कॉलेजसला जाण्यासाठी एसटी शिवाय पर्याय नव्हता. एसटीच्या फेऱ्या कमी असल्यामुळे, एकदा एसटी चुकली की तासन तास ताटकळत थांबावे लागायचे पण तरी त्याबद्दल कोणाची तक्रार नसायची. कारण एसटी सारखा हक्काचा आणि परवडणारा दुसरा पर्याय नव्हता, ती केवळ एसटी नव्हती ती आमची जीवनवाहिनी होती. वर्ष ९९-२००० ची गोष्ट पारगांव ते सासवड ८० रुपये मासिक विद्यार्थी पास होता नंतर तो १०० व काही कालावधीनंतर तो १२० झाला आणि आम्ही आंदोलन केले, एवढी बिकट आर्थिक परिस्थिती बहुतेकांची होती, एसटी नसती तर आम्हाला कदाचित उच्चशिक्षण घेता आले नसते. पुण्यापासून केवळ ३५ किलोमीटरवर असणाऱ्या पारगांव सारख्या ठिकाणी अशी अवस्था असेल तर दुर्गम भागात किती बिकट अवस्था असेल याची कल्पना करवत नाही. एसटीला अर्धेअधिक पासवाले प्रवासी शिवाय प्रवासी असो वा नसो प्रत्येक गावात एसटी पोहचत होती, कित्येकदा घरासमोरून एखाददुसरा प्रवाशी घेऊन जाणारी सासवड-भोसलेवाडी ही एसटी बस दिसत असे. एसटीचे खाजगीकरण केले तर कदाचित ती फायद्यात येईलही पण मग एसटी ग्रामीण, दुर्गम भागात, कमी प्रवाशी संख्या असलेल्या भागात धावेल काय? विद्यार्थी, वृद्ध, अपंग यांना सवलत मिळेल का? तिकिटाचे दर आवाक्यात राहतील काय?. एसटीच्या पाससाठी अडीचशे-तीनशे रुपये नाहीत म्हणून आत्महत्या केल्याच्या घटना आपण ऐकल्या असतीलच. एसटीचे खाजगीकरण कित्येक गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेऊ शकते.
खरंतर आजही दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर एसटी फायद्यात ही आणता येईल. आजकाल शहरीभागात इ-कॉमर्सचे जाळे पसरलेले आहे त्या माध्यमातून सर्वकाही ऑनलाईन मिळते पण ग्रामीण, दुर्गमभागात अजून तसे जाळे पसरलेले नाही एसटीच्या माध्यमातून त्याचा विस्तार करून बसमध्ये पार्सलसाठी काही बंदिस्त जागा करून इ-कॉमर्स कंपन्याना सुविधा देण्याची शिवाय बसस्थानकाची काही जागा इ-कॉमर्स हब, पीकअप पॉईंट म्हणून त्यांना भाडेतत्त्वावर देता येईल का याची चाचपणी करून एक अतिरिक्त उत्पन्नाचा दीर्घकालीन मार्ग निघू शकतो. याशिवाय जाहिरातींच्या माध्यमातून देखील उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करता येईल. याव्यतिरिक्त प्रवाशी वाढीसाठी, उत्पन्नवाढीचे इतर मार्ग काढण्यासाठी शिवाय एसटी प्रशासनामध्ये काही अनियमितता असेल, काही गडबड, गोंधळ असेल तर प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असलेले व अनेक पदे भूषविलेल्या श्री. महेश झगडे यांच्यासारख्या काही सनदी अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी समिती नेमून एसटीच्या भल्यासाठी नियमित नाविन्यपूर्ण उपक्रम आखता येईल तसेच एसटी प्रशासन आणि राज्यशासन यामध्ये समन्वयही राखता येईल.
माझी सर्व संपकरी एसटी महामंडळ कर्मचारी वर्गाला विनंती आहे की त्यांनी संप जास्त ताणू नये. जे खरं दुखणं आहे त्यावर उपाययोजना राज्य सरकार करत असेल तर एखाद्या अवास्तव मागणीसाठी अडून बसू नये. शक्य तेवढ्या मागण्या मान्य करवून एसटी पूर्वपदावर आणावी. आवश्यकता भासल्यास संप पुन्हा करता येईल. सरकारविरोधक नेहमी जनतेच्या सोबत असतात, संप चिघळत ठेवणे, सर्वसामान्य जनतेत असंतोष, रोष निर्माण करणे त्यांच्या फायद्याचे असते. त्यांच्या कट-कारस्थानाला बळी पडू नये. संपाची सूत्र तुमच्या हातात राहतील याची काळजी घ्या त्यांच्या हाताचे बाहुले बनून उद्ध्वस्त होऊ नका. संघटीत आणि सावध रहा कारण आजकाल मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या आणि दुसऱ्याच्या चितेवर स्वार्थाच्या भाकरी भाजणाऱ्यांची कमी नाही, ते तुमच्या खांद्यावर बंदूक ठेऊन त्यांचा स्वार्थ साधून घेतील पण फासावर तुम्ही लटकले जाल. सन्माननीय तोडगा काढून संप लवकरात लवकर मिटवणे आणि एसटी वाहतूक सेवा पूर्वपदावर आणणे सरकार आणि एसटी कर्मचारी संघटनेचे दोघांचीही सामुदायिक जबाबदारी आहे आणि तेच एसटी कर्मचारी आणि तमाम सर्वसामान्य जनतेच्या हिताचे आहे. आशा आहे लवकरच संप लवकर मिटेल आणि सगळं सुरळीत होईल.
संतोष गांजुरे.
२५ नोव्हेंबर २०२१.

Wednesday, December 30, 2020

गुलामगिरीची चौदा वर्षे!!!

             परिस्थिती अशी होती की, कधी एकदा शिक्षण पूर्ण करतोय आणि कुठेतरी एखादी नोकरी मिळवतोय एवढेच ध्येय होते. रडतकडत अर्धवट शिक्षण पूर्ण केलं, नोकरी भेटेल अशी पुसटशीही आशा नव्हती. कारण ना शिक्षणासाठी, ना नोकरीसाठी कोणाचे मार्गदर्शन होते. त्याचीच परिणीती म्हणजे बारावी आर्ट्स नंतर डिप्लोमाला गेलो आणि डिप्लोमानंतर काही दिवस शेतमजुरी, नंतर  एमआयडीसीमध्ये एका ऑटोमोबाईल युनिटमध्ये सहा महिन्यांत कामगारापासून मॅनेजर पर्यंतचा प्रवास करून तिथे रामराम ठोकला. पुढे एका फार्मा कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून सहा महिने काम केले, नंतर सहाएक महिने मित्राच्या कंप्युटर शॉप मध्ये काम केले. सरतेशेवटी डिप्लोमाच्या वर्गमित्राच्या रेफरन्सने(हवं तर वशिल्याने म्हणा) घोडं गंगेत न्हाले आणि आयटीत क्षेत्रात नोकरी भेटली त्यांस नुकतीच २९ नोव्हेंबर २०२० रोजी चौदा वर्षे पूर्ण झाली. 

                 बिकट आर्थिक, सामाजिक परिस्थिती पालटण्यासाठी  नोकरी हाच उपाय वाटत होता, मुंबईत एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी लागल्याने वाटलं आता दिवस पालटतील, तसे ते पालटले देखील पण तो बदल पोटापाण्यापुरतं आणि राहणीमानाइतपतच मर्यादित राहिला. ज्या वेगाने प्रगती व्हायला गावी ती झाली नाही, तुलनेने सुरुवातीला बेरोजगार असणारे काहीजण उद्योग-व्यवसाय करून इतकेच काय तर काहीजण छक्के-पंजे करून अनपेक्षितरीत्या जास्त लवकर प्रस्थापित झाले. नोकरी करणे चूक नव्हते, ती नसती तर कदाचित त्या बिकट परिस्थितीत मी पूर्णपणे उद्ध्वस्त ही होऊ शकलो असतो पण आयटी सारख्या अस्थिर क्षेत्रात, नोकरीत स्थिरावलो ही मात्र निश्चित चूक होती. बऱ्याचदा आपण बिकट परिस्थितीशी संघर्ष करून ती बदलतो मात्र एकदा ती सोईस्कर झाली की आपण तिच्या अधीन होऊन जातो आणि काही दिवसानंतर पहिले पाढे पंचावन्न होतात अन कधीकाळी आपल्याला रोल मॉडेल मानणारी लोकं आपल्या पाठीमागे आपल्याला नावे ठेऊ लागतात.

           केवळ नोकरीच्या जीवावर फार पुढे जाता येतच नाही, ती ना मरू देते ना जगू देते. एक प्रकारची गुलामीच ती, त्यात एकदा अडकलं त्यातून सुटका नाहीच. खरंतर उद्योजकतेचे बाळकडू आत्मसात करण्याची संधी पहिल्याच नोकरीत मिळाली होती. मी पहिल्यांदा जेव्हा धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीत प्रवेश केला तेव्हा समोर  "बी ब्लॉक" या बिल्डिंगवर पुरुषभर उंचीच्या अक्षरात धीरूभाईंचे वाक्य  लिहिले होते, ""Think big, think fast, think ahead. Ideas are no one's monopoly". जे अगदी पटण्यासारखेच होते, कारण सृजनशीलता कोणाचीही मक्तेदारी नसते.  पण आपल्या गुणसूत्रात ना उद्योजकता होती ना व्यवहारीकता होती. त्यामुळे दुसऱ्याची चाकरी करण्यातच धन्यता मानण्याशिवाय गत्यंतर नव्हते. धीरूभाई अंबानींचेच दुसरं वाक्य होते,  "If you don't build your dream, someone else will hire you to help them build theirs".  हे आम्ही त्यांच्याकडे काम करून सार्थकीच लावत होतो.  दुसरीकडे सव्वा दोन हजार वर्षांपूर्वीच राजकीय गुरू ॲरिस्टॉटल यांनी सांगितलेल्या  "All paid jobs absorb and degrade the mind"  या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो.  कारण टार्गेट्स आणि डेडलाईन्स चक्रव्यूहात सृजनशीलतेचा गळा घोटला जातोय हे जाणवत होतेच. सारं काही कळत होतं पण वळत नव्हते,  संघर्षमय का होईना पण एका कम्फर्ट झोन मध्ये मी स्थिरावलो होतो आणि त्यातून जोखीम पत्करण्याची तयारी नव्हती.

              त्यामुळेच आज चौदा वर्षे नोकरी करून देखील आईने चारचौघांत कौतुकाने सांगण्यासारखे माझ्या हातून काहीच घडले नाही. शेती, घर, गाडी, व्यवसाय यापैकी मला काहीच साध्य करता आले नाही. "ठेविले अनंते तैसेचि रहावे l चित्ती असो द्यावे समाधान ll" या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओवी प्रमाणे अगदी चाकोरीबद्ध जीवन जगणे चालू होते. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे कर्तव्य करत होतो. त्याचाच परिपाक म्हणजे वेळोवेळी वेतनवाढ, पदोन्नतीमध्ये डावलले गेले, अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावला जायचा मात्र तरी त्याचे मला कधी विशेष काही वाटले नाही, पण आज चौदा वर्षांनंतर हा मागचा आढावा घेताना आपण फार तत्त्वनिष्ठपणे वागून चूक केली की काय अशी शंका यावी इतका या व्यावहारिक दुनियेत मी मागे पडलोय. साधी राहणी उच्च विचारसरणी या वृत्तीने आजपर्यंत जगत आलोय.  आज मी इथपर्यंत पोहचूनही सोबतचे, हाताखालचे लोकं स्वतःच्या गाडीने ये जा करत असताना मी मात्र अजूनही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतो, तेच इतर गोष्टींबाबाबतही मग ते मोबाईल, घर, टीव्ही काहीही असो,  थोडक्यात मी म्हणजे जणूकाही डाऊन टू अर्थ चे मूर्तिमंत उदाहरणच. आज मात्र या सर्वाचे कौतुक वाटावे की लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. एकंदरीत काय तर सदासर्वकाळ आदर्शवादाचा झेंडा घेणंही अडचणीचे ठरू शकते. 

               प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी टर्निंग पॉईंट येतच असतो. माझ्या आयुष्यात तो कोरोनाचा रूपाने आला. अनपेक्षितपणे कोरोनासारखी जागतिक महामारी आली अन माझ्या पायाखाची जमीन हादरली, कोरोनाचे सुरुवातीचे रौद्ररूप पाहून आपण आणि बाकी सर्व कुटुंब सहीसलामत बाहेर पडू की नाही याची शाश्वती वाटेना. आतापर्यंत आज ना उदया होईल या सबबीखाली चाल ढकल चालू होती पण आता मागचा सर्व जीवनपट पुन्हा एकदा उलगडू लागला. कुटुंबाने केलेले कष्ट, पाहिलेली स्वप्ने नजरेसमोर येत होती. सहा महिन्यांहून अधिक काळ सगळं काही ठप्प झाले, सगळं सुरळीतपणे चालू झाल्यावर जोमाने प्रयत्न करून गेल्या१४ वर्षांचा अनुशेष या एका वर्षांत भरून काढायचा आहे. त्यासाठी केवळ बदल करून चालणार नाही तर कायापालट करावा लागेल. शेती, घर, गाडी, व्यवसाय, आरोग्य आणि राजकारण हे या वर्षीच करायचं आहे हाच वर्षीचा संकल्प आहे आणि त्या दृष्टीने आजच १ जानेवारी २०२१ पासून पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. हे सगळं याच वर्षी पूर्ण करायचे आहे, त्यासाठी शक्य तेवढा घाम गाळणार आहे आणि पुढे हे सारं टिकवण्यासाठी भले रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर. 

           हे असे सारे ठरवलं असले तरी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आई-वडिलांचे स्वप्न आहे की थोडी का होईना बागायती शेती असावी, स्वतःची विहीर, पाईपलाईन असावी. एखादी सीताफळाची का होईना बाग असावी. अपवाद वगळता सामाईक विहिरींचा वापर वीसेक वर्षांपासून बंदच आहे,  वयोमानानुसार पूर्वी सारखी धावपळ करणे आता जमत नाही त्यात भावकीचा आडमुठेपणा तर जगजाहीर आहे. त्यामुळे स्वतःची थोडी  का होईना बागायती शेती,बाग असावी जिथे वेळ घालवता येईल. पण नोकरी आणि जमिनीचा वाद एकाचवेळी सुरू झाला तो मिटवण्यासाठी गेली सात-आठ वर्षे हरतऱ्हेचे प्रयत्न करून पाहिले, दोन पावले माघार घेऊन समजूतदारपणे तोडगा काढायचा प्रयत्न केला, कोर्ट-कचेरीत पाण्यासारखा पैसे ओतला, स्वाभिमान गहाण ठेऊन उंबरठे झिजवले पण कशाचाही फायदा झाला नाही. आता एका स्वप्नासाठी इतर स्वप्नांचा बळी द्यायचा नाही. केवळ शेतीसाठी रोगट, स्वार्थी नात्यांचे ओझे वागवायचे नाही. या असल्या रोगट नात्यांनी माझे आर्थिक, मानसिक, सामाजिक खच्चीकरण केले, इतके की कधी कधी आपण अनाथ असतो तर बरे झाले असते इतपत या नातेवाईकांनी छळ केला आहे. नोकरी इतकीच ही असली नात्यांची गुलामी सहन केली आहे. आता मात्र या दोन्ही मधून बाहेर पडायचे आहे. आता दोन्ही बाबतीत सहनशीलतेची मर्यादा संपत आली आहे. नोकरी हा अर्थाजनाचा एकमेव स्रोत असल्यामुळे गुलामगिरीच्या चौदा वर्षांचे पंधरा-सोळा वर्ष होतील पण वीस होणार नाहीत. आता ऑफर लेटर, एक्सपिरिअन्स लेटर, प्रमोशन लेटर यांची होळी करायची वेळ आली आहे. गुलामगिरीचे जोखड भिरकावून देण्याची वेळ आली आहे. त्याच प्रमाणे स्वार्थी, रोगट नात्यांचा समारोप करण्याची वेळ आली आहे.आता एकदाचे परतीचे दोर कापायचे आहेत अन फक्त पुढची वाट चालायची आहे.

                                             संतोबा....

Friday, March 20, 2020

मानवजात

आम्ही सर्वश्रेष्ठ, आम्ही सर्व शक्तिशाली.
आमुच्या हाती असे विनाशाच्या मशाली.

आम्ही वणवे पेटवू, आम्हीच झाडे तोडू.
प्राणी, पक्षी, सारे सजीवच जिंवत गाडू.

आम्ही करू विकास, धरती  करू भकास.
गुदमरे जरी श्वास, करू पर्यावरणाचा ऱ्हास.

हवापाणी दूषित करू, सारं वातावरण बिघडवू.
स्वार्थापोटी नियम सारे, आम्ही पायदळी तुडवू.

देवदानवा आम्ही निर्मिले, आम्हां कसली भिती.
साऱ्या विश्वाचा रहाटगाडा, आता आमुच्या हाती.

आमुची स्पर्धा आमुच्याशी, विध्वंसाचा खेळ मांडू.
देशा-धर्मात आम्ही विभागू, सारे एकमेकांशी लढू. 

क्षेपणास्त्र सुसज्ज आम्ही, हवा तेवढा संहार करू.
क्षणात सृष्टी भस्मसात करू, आम्ही कधी ना हरू.

वर्चस्वाची आस विज्ञानाची कास, करती ही प्रगती.
तरी भयभीत होती सारे, कळेना काय ही अधोगती.

एक अतिसूक्ष्म विषाणू,जो न दिसे दृष्टीला.
देई आव्हान, मानवजातीच्या अस्तित्वाला.

क्षणात पलटे बाजू, इथे काही नसे शाश्वत.
बेशिस्त मनुष्यजात, झाली स्वगृही बंदिस्त. 

हेवेदावे क्षणात विरघळती, सारे होती एक.
हरवण्या त्यांस, मिळून उपाय शोधती अनेक.

सर्वशक्तिमान, असहाय्य तो हिमनगाचे टोक.
उमगेल का मानवां, काय बरोबर काय चूक.
                                
                                             संतोबा...
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!