गेल्यावर्षी अर्थात २०२१ ला गेल्या चौदा वर्षांचा अनुशेष भरून काढायचा हा संकल्प केला होता त्यात प्रामुख्याने घर, गाडी, शेती, नोकरी, व्यवसाय, आरोग्य, राजकारण आणि स्वार्थी रोगट नात्यांचा सोक्षमोक्ष या संबंधी संकल्प केला होता त्यापैकी काही संकल्प पूर्ण झाले आहेत तर काही पूर्ण व्हायचे आहेत. मुख्य संकल्पापैकी घर, गाडी (वेटिंगवर आहे), शेती हे संकल्प पूर्ण झालेत त्याबरोबरच नोकरीचा बऱ्यापैकी बॅकलॉग भरून निघालाय आणि स्वार्थी रोगट नात्यांचा सोक्षमोक्ष लावण्यात आला आहे. आरोग्याच्या बाबतीत पोट हाताबाहेर गेलेय ही एकमेव आणि मोठी समस्या आहे त्यादृष्टीने वर्षाच्या मध्यंतरापर्यंत १३ किलो वजन कमी केले पण त्यात सातत्य नसल्यानेच पुन्हा ते १५ किलोने वाढून पूर्ववत झाले. राजकारण आणि आरोग्य ही निरंतर प्रक्रिया आहे आणि त्यात सातत्य हवे असते, त्यामुळे ईथुनपुढे प्रत्येक गोष्टीत सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करीन. व्यवसायाबाबतचा विचार तूर्तास बाजूला ठेवलाय.
या वर्षी जे काही साध्य करता आले त्याला पूर्वाश्रमीच्या कार्याचे पाठबळ आणि बऱ्याच हितचिंतकांचा सक्रिय पाठींबा तसेच काही गोष्टी घडण्यासाठी अनुकूल परिस्थिती कारणीभूत ठरली. आतापर्यंत कोर्टकचेरी, हेवेदावे, मानपान यासारख्या वांझोट्या गोष्टीत खूप वेळ आणि पैसा वाया गेला. वडिलोपार्जित शेतीत माझा किती जीव गुंतला होता हे सर्वांनाच माहिती आहे, आजही कोणी हितचिंतक भेटले की ते त्याविषयीच चौकशी करतात त्यांना आता यानिमित्ताने एकच विनंती आहे की मी हा विषय माझ्यापुरता संपवला आहे, तेव्हा याविषयी चर्चा न करणे उत्तम. गेल्या आठदहा वर्षाच्या काळात केलेल्या सर्वप्रकारच्या प्रयत्नांना अपयशच आले आहे. ज्या लोकांना स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी कळत नाही किंवा कळत असूनही आडमुठेपणा करून समोरच्याला अडचणीत आणणे हे जास्त आनंददायक वाटते अशी लोकं कितीही तडजोडी केल्या तरी ते बदलणार नाहीत याची जाणीव मला झाली आहे, त्यामुळे हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही अन्यथा तेल ही गेले आणि तूपही गेले अशी अवस्था व्हायची हे मला कळून चुकले आहे.
शेती मिळवण्यासाठीची ही तळमळ कोणत्याही आर्थिक कारणातून नव्हती कारण शेतीवर मी माझ्याकडे काहीही नसताना अवलंबून नव्हतो आणि आताही नाही. जन्मापासून आईने मोलमजुरी करून मला शिकवले, वाढवले आहे. शेतीतील कोणत्याही उत्पन्नाचा हिस्सा माझ्या उपयोगी पडला नाही एवढेच काय पण आई व्यतिरिक्त इतर कोणाही सग्यासोयऱ्यांचे माझ्या जडणघडणीत एकतर्फी योगदान/उपकार नाहीत, जे काही देणंघेणं होते त्याची ज्या त्यावेळेस परतफेड केली आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाला शेतीची जी खानदानी ओढ असते ती आहेच शिवाय ज्या शेतीसाठी वारस हवा, वंशाला दिवा हवा म्हणून ज्यांनी वडिलांना दुसरे लग्न करावयास भाग पाडून माझ्यारुपाने शेतीस वारस मिळवून देण्यासाठी भरीस घातले. ज्या शेतीला,घरादाराला वारस मिळावा म्हणून नवससायास केले त्या वारसाला जन्मापासून बेवारशासारखं, उपऱ्यासारखं दुसऱ्याचा दारात वाढावे लागले आणि आता मोठेपणी फायद्यात आहे म्हणून कायद्याच्या आडून शेतीची लुबाडणूक केली, कोर्टकचेऱ्या करायला भाग पाडले, मला रस्त्यावर आणण्याची भाषा केली. सामोपचाराने, मोबदला देऊनही कोणताही तोडगा निघू न देता कवडीमोल किंमतीने शेती दुसऱ्याच्या घशात घातली. माझ्याच हक्काच्या शेतीसाठी मला लढावे लागणे दुर्दैवी होते पण ही माझ्या हक्काची, आत्मसन्माची लढाई होती म्हणून मी सर्वस्वपणाला लावून लढत होतो, तडजोडी, कमीपणा स्विकारत होतो पण त्यात यश आले नाही शेवटी सगळ्याचा सोक्षमोक्ष लावला. ईथुनपुढे ज्याला जे हवे ते करावे, जे मिळवता येईल ते मिळावावे परंतु माझ्या वळचणीस येऊ नये. एक लक्षात ठेवायचे, आज त्या शेतीची जी किंमत आहे, आज न उद्या त्याच्यापेक्षा जास्त किंमतीचा माझा एकेक शब्द असेल याची मी त्यांना खात्री देतो.
असे सगळे विरोधात असतानाही सातबाऱ्यावर माझं नाव लावता आले, त्यात माझं स्वतःच काही फारसं कर्तृत्व नसून माझ्या राहीआत्या आणि कुटुंबीयांचा मोठेपणा आहे. ही तीच आत्या आहे जी मला लहानपणापासून संतोबा म्हणते आणि म्हणून 'संतोबा' याच नावाने मी लेखन करतो. मी लहान असताना हट्ट करायचो म्हणून रक्षाबंधनला येताना आत्या माझ्यासाठी खास राखी घेऊन यायची त्यापैकी लाकडी हत्तीची, आणि मोरपंखांची राखी अजूनही आहे तशी आठवणीत आहे, तसेच त्यांनी आणलेले टाळ अजूनही काही काळापूर्वी पर्यंत घरात होते. आत्यांनी निरपेक्षपणे विनाअट, विनामोबदला दिलेल्या त्या जमिनीची किंमत किती, तिचा किती फायदा होईल, किती उत्पन्न निघेल याच्याशी मला काही देणेघेणे नाही. त्यातून मला जे मानसिक समाधान मिळाले त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. माझ्या मनात जो अन्यायाचा लाव्हा धुसमत होता तो यामुळे शांत झाला आहे आणि त्याची राख झाली आहे त्या राखेतून हा फिनिक्स लवकरच झेपावेल अशी आशा आहे (डिप्लोमासाठी कोल्हापूरला असताना "हा फिनिक्स लवकरच झेपावेल" हे माझे एक पेटंट वाक्य होते) आता ज्यांनी मला त्रास दिला त्यांच्याबद्दल माझ्या मनात कसलीही द्वेष भावना नाही. याबद्दल त्यांनी आत्यांचे आभार मानायला हवेत.
गेल्यावर्षा प्रमाणेच यावर्षी म्हणजे २०२२ या वर्षभरात पुढील गोष्टी साध्य करावयाचा मानस आहे. वर्षभरात कमीतकमी ५१ लेख लिहिणे, छत्तीस लाख एक्कावण हजार पावले चालणे( प्रतिदिन सरासरी दहा हजार पावले). आर्थिक शिस्तीचा अंगीकार करणे. आरोग्य आणि राजकारण यामध्ये सातत्य आणि जे काही करायचे, जे काही घ्यायचे ते सर्वोत्तम. असा संकल्प आहे त्याबरोबरच हे नेहमीचे संकल्पाचे गुऱ्हाळ बंद करून स्वप्नपूर्तीच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात करायची आहे. हे सर्व जगजाहीर यासाठी की मनातल्या मनात केलेल्या संकल्पनांना पळवाट काढता येते पण हे असं जगजाहीर केलं म्हणजे किमान संकल्पपुर्तीसाठी प्रयत्न केले जातील.
...संतोबा.
0 प्रतिक्रिया:
Post a Comment