बरसणं तू विसरलास. आम्हांवरी का रुसलास?
काळया आईचा लेक, तुझ्या विरहात रे उदास.
तुझ्या एका सरीसाठी, जीव त्याचा कासावीस,
सुकलेल्या पिकांना आता, तुझीच आहे आस.
तुझ्या एका आगमनाने, फुलतील त्यांचे श्वास.
तुझ्या कोसळण्याला, कोसती पांढरपेशी शहरी.
उडे तारांबळ त्यांची, होई उशीर जाण्या कामावरी.
खड्डे, ट्रॅफिक, साऱ्याचे खापर फोडती तुझ्यावरी.
सर्व अडचणींचे कारण मानून, समजती तुला वैरी,
म्हणूनच का बा रुसून बसलास, तू आज आम्हांवरी?.
पाणी निरंतर घरच्या नळाला अन् दूध येते पिशवीत.
अन्नधान्य भाजीपाला मिळतो ऑनलाईन बाजारात,
हे सारे कुठे बनते कारखान्यात, की पिकते शिवारात.
नको कसली चिंता, जर मिळे हे बसल्या जागी घरात.
दर्जा कमी, पॅकिंग मस्त, मिळो फक्त हे स्वस्त दरात.
त्यांना पुरेसा आहे तू, कवितेत अन् गाण्यात.
काही क्षण हवा आहेस रोमँटिक वातावरणात.
बरसावं की नको, नको ठरवू त्यांच्या वागण्यात.
तू कितीही कोसळ, तू आहे आमच्या जगण्यात.
कोसळणं तुझं सण आमचा, न मावे आनंद गगनात.
कोसळ तू मनसोक्त याक्षणी, नको देऊ ताण,
काळ्या आईच्या हतबल लेकरांचा ठेव तू मान!
तहानल्या धरतीला तू दे टपोऱ्या मोत्यांचे दान.
पिकाला येऊ दे बहर, सुगंधाने दरवळू दे रान.
शहरातल्या लेकीला त्याच्या, मिळो मायेचा वाण.
संतोबा...
0 प्रतिक्रिया:
Post a Comment