Ads 468x60px

Tuesday, December 13, 2016

2) पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ विरोध- घोषणा.

जोर जबरदस्ती नको विमानतळाची,
आधुनिक शेती हीच गरज काळाची.

विमानतळ नको, जमिनीच राहू द्या ,
पॅकेजचे जाऊ द्या, पाणी तेवढं येऊ द्या.

फसवू नका, भुलवू नका.
भूमिपुत्रांना हाकलवू नका.

जीवाची होतीया तळमळ,
नका करू हो विमानतळ.

वारसा आमचा सात-बारा.
विमानतळाला नाही थारा.

असेल विमानतळासाठी शासन हट्टी.
तरी आम्ही होऊ देणार नाही धावपट्टी.

लबाड लांडगा ढोंग करतोय.
पुरंदरच्या विकासाचे सोंग करतोय.

हिरवी वनराई, काळी आई अन् गोठ्यातील गाई.
म्हणतात काय? विमानतळ होणार नाही, होणार नाही.

आमचा-तुमचा नाही उद्योगपतींचा फायदा आहे,
पण काळजी नसावी लोकशाहीचा कायदा आहे.

विकासाचे प्रतिक नांगर आहे.
विमानतळ तर भंगार आहे.

विकास कशाला म्हणतात कळत नाही फारसं,
म्हणून तर गुडघ्याला बाशिंग बांधून केलंय बारसं.

उतू नका, मातू नका, मत दिले तुम्हाला विसरू नका.
एकच मागणी आम्हां सर्वांची, विमानतळ करू नका.

घामाचा गंध, मातीचा सुगंध, आहे जन्मोजन्मीचा ऋणानुबंध.
विमानतळ नको, शेतात सोनं पिकवण्यातच आमचा आनंद.
                                                  ........ संतोबा   (संतोष गांजुरे)

Saturday, November 19, 2016

पुरंदरमध्ये "विमानतळाची" मोगलाई

                           ८ ऑगस्ट १६४८ च्या आठवड्यात आदिलशहाचा , विजापूरचा सरदार फत्तेखान शिरवळ, पुरंदरवर चालून आला त्याला बेलसर परिसरात मावळ्यांनी आसमान दाखवले. आताही विमानतळ नावाचा ब्रह्मराक्षस याच परिसरावर चालून आला आहे. शासन-प्रशासन,लोकप्रतिनिधी ब्रह्मराक्षसाचे सरदार आहेत. ते येथिल शेतकऱ्यांच्या विरोधाला जुमानत नाही. आंदोलने,उपोषणे,निषेध यांनी फरक पडत नाही ते त्याच आवेशात हल्ला करत आहेत. साम-दाम-दंड-फितुरी सगळे पर्याय वापरून पहात आहेत. त्याकाळी शेकडो मावळ्यांनी हजारो आक्रमकांना धुळीस मिळवले. आताही तेच होईल कारण त्याच मावळ्यांचे वारस आम्ही आहोत. आताच्या आधुनिक काळात अन्याय झाला तर आपण मोगलाई आहे का? असे म्हणतो, पण याचा प्रत्यक्ष अनुभव पारंगाव पंचक्रोशीतील लोक घेत आहेत मुघलशाही, आदिलशाही एकाचवेळेस चालून आले आहेत व त्यांनी ही गावे उद्ध्वस्त करण्याचा हट्ट धरला आहे पण आम्ही शिवबाचे मावळे हे होऊ देणार नाही प्रसंगी प्राणांची आहुती द्यावी लागली तरी बेहत्तर.
                            पुरंदर म्हणजे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक,धार्मिक सामाजिक जडणघडणीचा अमूल्य वारसा आणि दैदिप्यमान इतिहासाचा आत्मा.स्वराज्यास हातभार लावणारे सरदार गोदाजी जगताप, सूर्याजी काकडे, पिलाजी जाधवराव , उमाजी नाईक, भारताच्या सामाजिक क्रांतीचे जनक फुले दाम्पत्य, महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा, संत सोपानकाका समाधी, भुलेश्वराचे मंदिर हे सर्व याच पुरंदरमधले. काय सांगू आणि काय नको ही यादी संपता संपणार नाही. एवढा दैदिप्यमान वारसा असलेला पुरंदर आज प्रकल्पग्रस्त होण्याच्या मार्गावर आहे. गुंजवणी, रायता, एम.आय.डी.सी. आणि आता विमानतळ. झाले तेवढे प्रकल्प पुरे झाले आता नविन काही नको. पुरंदर सुजलाम सुफलाम व्हायला हवा. अंजीर,सिताफळ, डाळिंब, वाटाणा, टोमॅटो, भाजीपाला, फुले यासाठीही पुरंदर प्रसिद्ध आहे. आजची तरुण पिढी शेतीत नवनवीन प्रयोग करून चांगले उत्पन्न काढत आहेत नविन फळबागांची लागवड करत आहेत. हे सारे ओसाड होऊ द्यायचे नाही म्हणून हा विमानतळविरोधी लढा,संघर्ष आहे.
                               पुरंदरमधील प्रत्येक गावाला काही ना काही इतिहास आहे. असं असताना आजूबाजूच्या गावातील ज्या गावांचा विमानतळाच्या प्रकल्पात नाव नाही अशा गावातील काही लोक विमानतळ होणार म्हणून खुश झाले आहेत. विमानतळाला पाठिंबा देत आहेत पण त्यांनी गाफिल राहू नये अविचार करू नये त्यांनी आमच्या लढ्यात सामील व्हावे. कुठे खड्डा खोदला तर ढीग होतोच. जिथे विमानतळ होईल तिथे आजूबाजूच्या गावात विकास नाही पण टाकाऊ कचरा आणि सांडपाण्याचा निचरा होईल. पारगावं परिसरात विमानतळ शंभर टक्के होणार नाही आणि आम्हाला आमच्या लढ्यात ज्या गावांनी साथ दिली तिथेही होऊ देणार नाही. उद्या हे इकडे तिकडे सरकून तुमचे गांव बाधित व्हायची वाट पहावू नका आताच विरोध करा. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या,सुविधा मिळतील याचा विचार तुम्हीच करा. ज्यांना जमिनी विकायचा नाहीत त्यांना जमिनीचे भाव वाढले काय अन पडले काय , काही फरक पडणार नाही आणि भाव वाढले म्हणून जमिनी विकल्या तर परत विकत घेता येणार नाही. या चुकीला माफी नाही एकदा घडून गेले तर परत चूक झाली म्हणून माघारी येता येणार नाही.
                  आपण काय गमावतोय, काय चूक करतोय हे प्रत्यक्ष चूक केल्याशिवाय कळत नाही. बऱ्याचदा चूक झाल्यावर पुन्हा सावरण्याची संधी मिळत नाही. हे विमानतळाचेही तसेच आहे. ९०-९५ टक्के लोकांना कितीही मोबदला दिला तरी विमानतळ नको आहे. जे ५-१० टक्के तळ्यात-मळ्यात आहेत त्यांनी इतर प्रकल्पग्रस्त लोकांच्या अनुभवातून बोध घ्यावा. आपल्याला अनेक मोठमोठी आश्वासने, आमिषे , प्रलोभने मिळतील त्यापासून दूर राहावे कुणाची चाकरी करण्यापेक्षा कष्टाची भाकरी बरी. कोणाच्याही भूल थापांना बळी पडू नये. नाहीतर तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे अशी अवस्था व्हायची.
हे सगळे ढोंगी आहेत कारण, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधायला शेकडो परवानग्या लागतात , पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणे मग इथे पुरंदरमध्ये सहा हजार एकर ओसाड करून काय पर्यावरणाची भरभराट होणार आहे का???? स्मारक करायचे तर करा नाहीतर नका करू पण आहे तो इतिहासाचा साक्षीदार पुरंदर उद्ध्वस्त नका करू. महात्मा फुलेंचे गाव उद्धवस्त करायला शासन-प्रशासनाला काही वाटत नाही उद्या अडथळा येतो म्हणून पुरंदरचा किल्ला भुईसपाट कराल! आम्ही सरकार निवडून दिले ते जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना देशोधडीला लावण्यासाठी नाही. आम्ही तुम्हाला सत्ता दिलीये महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर नाही केला. आमचे विश्वस्त म्हणून काम करा. विश्वासघात करू नका. आमच्या होकाराशिवाय कोणाताही प्रकल्प राबवू नका. विमानतळ तर नकोच नको.
                                                                                      ------- संतोबा (संतोष गांजुरे )

Sunday, October 16, 2016

३) म्हणून आहे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला विरोध!!!

             पारगांव पंचक्रोशीतील सात गावांच्या तीव्र विरोधानंतर तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि इतर गावांतील लोकांनी, ज्यांच्या जमिनीवर सध्या विमानतळ नावाच्या ब्रह्मराक्षसाची नजर पडलेली नाही त्यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन आमच्या विरोधाला प्रतिउत्तर द्यायला सुरूवात केली आहे. हा लेख खास त्यांच्यासाठी त्यांनी हे वाचून, त्यावर विचार करून नंतर आम्हाला विरोध करा.
                     तुमची जमिन जिला तुम्ही काळी आई मानता आणि तिच्यावर अगदी स्वतःच्या भावाने अतिक्रमण जरी केले तरी अगदी पोलिस स्टेशनचे, कोर्टाचे दार ठोठवता. आपल्या रक्ताचं पाणी करून सिंचन करता, प्रसंगी त्यासाठी सणवार, कपडालत्ता यावर खर्च न करता विहिरी,बोअर, पाईप लाईन यावर खर्च करता. संपूर्ण आयुष्य काळ्या आईची सेवा करण्यात घालवता.त्याच काळ्या आईला कोणत्या तरी प्रकल्पासाठी  तुम्हाला कोणतीही अधिकृत माहिती न देता हडप करण्याचा प्रयत्न केला जातो, तुमच्या मनात भविष्याबद्दल संभ्रमावस्था निर्माण केली जाते. अशा वेळी तुम्ही काय कराल?तुमचा लोकप्रतिनिधी तालुक्याच्या, जिल्ह्याच्या विकासाच्या गमजा मारत असताना तुमच्या पुनर्वसनाबद्दल एकही चकार शब्द काढत नसेल.तुम्ही ज्यांना तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे त्यांनी  तुम्हाला आधार देण्याऐवजी ते जाहीरपणे तुम्हाला वाळीत टाकण्याचे आवाहन करत असेल, वेगवेगळ्या माध्यमातून एकटे पाडायचा प्रयत्न करत असेल, तुमच्यावर बहिष्कार घालत असेल तर तुम्ही काय कराल?जेव्हा तुम्ही मोर्चा काढता त्यानंतर सरकारला,लोकप्रतिनिधींना जाग येते व जमिनीचा मोबदला काय द्यायचा यायचा अभ्यास चालू असल्याचे सांगितले जाते, म्हणजे आधी जे जाहीर केले आहे ती धूळफेक होती आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला फसवलच जातेय हे स्पष्ट दिसत असेल. आतापर्यंत झालेल्या बहुतेक प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना फसवल्याची, प्रकल्प अर्धवट राहिल्याची उदाहरणे तुमच्या समोर असेल अशा वेळी तुम्ही काय कराल?
            आयुष्यभर शिवछत्रपती, शंभूराजे , महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पदस्पर्शाने, कर्तृत्वाने पावन झालेल्या भूमीत आपला जन्म झाला ह्याचा अभिमान बाळगला. छत्रपतींचे स्वातंत्र्याचे, फुले यांचे समतेचे तत्व अंगिकारले, ज्या गावाच्या पंचक्रोशीत स्वराज्याची पहिली लढाई जिंकली त्या गावात आपला जन्म झाला ही प्रेरणा कोणत्याही संकटात तारून नेत होती. त्या पवित्र भूमीतून परागंदा व्हायची वेळ आमच्यावर असली असेल तर ही गोष्ट आम्हाला जगबुडीपेक्षा कमी नाही. तुमचा इतिहास भूगोल पुसला जाणार असेल अशावेळी तुम्ही काय कराल? ज्या गावात तुमचा जन्म झाला, ज्या घरात तुम्ही वाढला, ज्या शाळेत तुम्ही शिकला, घडला, ज्या मंदिरात तुम्ही श्रद्धेने प्रार्थना केल्या, ज्या जमिनीत तुम्ही सोनं पिकवत होता हे सर्व क्षणार्धात उद्धवस्त होत असताना दिसत असेल तर तुम्ही काय कराल?
      आमचा लढा हा आमची काळी आई, आमचे  गांव वाचवण्यासाठी आहे,आमचा लढा आमच्या अस्तित्वासाठी, अस्मितेसाठी आहे.आमचा विरोध तडजोड करून जास्त मोबदला पदरात पाडण्यासाठी नाही. शितावरून भाताची परीक्षा करून नये. या लढ्यात तुम्हीही आम्हाला साथ द्याल अशी अपेक्षा आहे कारण हा ब्रह्मराक्षस तुम्हालाही गिळंकृत करेल यात शंका नाही, कारण हा ब्रह्मराक्षस एकटा येणार नाही, त्यासोबत अनेक उद्योगधंदे, मोठे रस्ते ई. अनेक पायाभूत सुविधांना घेऊन येणार आहे त्यासाठी तुमच्याही जमिनी जाणारच आहेत, सध्याच्या पाणीसाठ्यात पिण्यासाठी पाणी पुरत नाही मग एवढया मोठ्या प्रकल्पासाठी धरणे बांधावे लागणार नाही का?. त्यासाठी तुमच्या जमिनी नाही जाणार का? जमिनीच्या किंमती अफाट वाढतील तुम्ही फक्त जमिनी विकू शकाल, विकत कधीच घेऊ शकणार नाही. दुसऱ्या गावात, दुसऱ्या तालुक्यात बंगले बांधूनही तुम्ही उपरेच ठरणार , पुढील पिढ्या तुम्हाला माफ करतील?
          पैसा हा टिकाऊ नाहीये आहे तो प्रवाही आहे, तो जेवढ्या वेगाने येईल तेवढ्याच वेगाने निघून जाईल. ही क्षणिक श्रीमंतीची सूज असेल कारण अनेक ठिकाणी जमिनी विकून करोडपती झालेल्या लोकांची काय अवस्था आहे पहा. पैसा आल्यानंतर कधी ओळख न दाखवलेले पाहुणे-रावळेही त्यांच्या अनंत अडचणी घेऊन मदतीसाठी दारात उभे राहतील .मी आणि पारगांव पंचक्रोशीतील सर्व बांधवांची एकच अपेक्षा आहे आमच्या चितेवर तुमच्या भाकरी भाजू नका त्याची धग आज न् उद्या तुम्हालाही लागणारच आहे. आमच्या आया-बहिणींचे तळतळाट घेऊ नका या लढ्यात सहभागी होऊन आशिर्वाद घ्या.

                                                                            संतोबा (संतोष गांजुरे)

Wednesday, October 12, 2016

४)बळी राजाचा बळी- विमानतळाचा वामनावतार

            आपल्या माता भगिनी  वर्षानुवर्षे " ईडा पीडा टळो, बळीचे राज्य येवोअशी कामना निर्मिकाकडे करत आहेत पण बळीराजाचे राज्य सोडा त्याचे अस्तित्वच संपूष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असाच एक आधुनिक वामनावतार, पारगांव पंचक्रोशीतील भूमीपुत्रांच्या डोक्यावर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रूपाने पाय ठेऊन ऊभा आहे. उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग अशीच काहीशी अवस्था पुरंदरमध्ये होणाऱ्या विमानतळाची झालेली आहे. स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेता त्यांच्याशी कसलीही बोलणी करता विमानतळ होण्यावर शिक्कामोर्तब केले. एवढेच काय त्याचे नामकरण ही निश्चित केले.  गावात अनेकांच्या पांड-दोन पांड जमिनीसाठी चार-चार केसेस चालू असताना, सरकारने एका शब्दाने विचारता. आधी १८०० हेक्टर, चार दोन दिवसांनी २००० हेक्टर आणि मुख्यमंत्र्यानी घोषणा करताना २४०० हेक्टर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी २००० हेक्टरच काय ३००० हजार हेक्टर जमीन घ्या म्हणणे म्हणजे भुमीपुत्रांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. आणि फक्त घोषणा होताना विमानतळाचे क्षेत्र अक्राळ-विक्राळ रूप धारण करत आहे, पुढे प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाल्यावर किंवा भविष्यात विस्तार करायचा तर किती क्षेत्र लागेल याचा अंदाजच करता येत नाही हे विमानतळ नसून  अक्राळ-विक्राळ ब्रह्मराक्षस आहे.
           एकंदरीत जमिनी बळकावण्याची राजकीय इच्छा पहाता आणि इथे कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्याचा / पक्षाचा विरोध नसल्याने लोकांच्या विरोधात जाऊन हा विमानतळ होतोय की काय अशी शंका येऊ लागलीये.  प्रश्न मातीचा असला तरी जातीच्या आधारे फूट पाडण्याचे कुटिल डावपेच खेळणे चालू आहे. अस्मितेचे राजकारण करून, भावनिक साद घालून लोकांच्या विरोधाची तीव्रता कमी करण्यासाठी, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठीच विस्थापितांच्या भवितव्याचा विचार करण्याआधी नामांतराचा घाट घातला आहे. छत्रपती संभाजी राजांचे नाव देऊन भावनिक राजकारण आणि पुढे महात्मा फुले यांच्या नावाचा नसलेला वाद दाखवून विमानतळ विरोधकात फूट पाडण्याचे घाणेरडे राजकारण त्याचीच प्रचीती देत आहे. संभाजी राजे, महात्मा फुले दोघेही युगपुरूष आहेत. दोघांपैकी कोणाचेही नाव दिले किंवा नाही दिले आम्हाला  काही फरक पडत नाही कारण ते आमच्या हृदयात आहे, त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. नाव देऊन सरकारला त्यांचा सन्मान केल्यासारखे वाटत असेल तर हे काजव्याने सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखे आहे.
       आतापर्यंतच्या इतिहासाला अनुसरून मोबदल्याच्या संदिग्ध घोषणा केल्या आहेत. आणि तरीही त्या अपुर्‍या आहेत आणि आतापर्यंत अनुभवातून त्या अपुर्‍या घोषणा पूर्ण न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. बऱ्याच प्रकल्पासाठी जमिनी हस्तगत केल्या पण ना प्रकल्प उभे राहीले ना प्रकल्पग्रतांचे पुनर्वसन झाले. आताही शेतकऱ्यानां जमिनीचा मोबदला म्हणून सरकारने–                    
१)संपादित जमिनीच्या ७० टक्के जमिनीला सरकारी बाजारभावाच्या पाचपट उरलेल्या ३० टक्के जमिनीचा विकसित प्लॉट
२)कृषी खात्याच्या अहवालानुसार दहा वर्षे वार्षिक उत्पन्नाची रक्कम
 )जमीनधारकांच्या मुलांना प्राधान्याने प्रकल्पात नोकरी. 
ही प्रमुख तीन प्रलोभने दिली आहेत,पण ही सर्व प्रलोभने मृगजळाप्रमाणे आभासी तसेच अविश्वासार्ह वाटत आहेत. कारण शेतकऱ्याला बाजारभावाच्या पाचपट किंमत मिळणार असली तरी किंमत कोण ठरवणार? शेतीची पाचपट सरकारी किंमत चालू बाजारभावाच्या आसपासच आहे. विमानतळ होणार अशा घोषणेने भाव कित्येक पटीने वाढले आहेत आणि ते वाढतच राहतील हा फायदा नव्हे तर तोटाच आहे. एकरात जमीन जाईल आणि गुन्ठ्यात घ्यावी लागेल. बेताच शिक्षण असलेल्या गोरगरिबांच्या मुलांना नोकरी कसली मिळणार, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याची? कारण दुसरी उच्चपदाची नोकरी कशाच्या आधारे देणार? नुकसान भरपाई म्हणून हजारो कोटीच्या अनुदानातून पाच-पंचवीस रुपयाचे चेक देणारे शेतीच्या वार्षिक उत्पन्नाचा काय मोबदला देतील ?.विकसित प्लॉट कधी, कुठे,कसा देणार याबाबत स्पष्टता नाही. सहा हजार एकरावर वसलेल्या लोकांनी कुठे जायचे याबद्दलही काही स्पष्टता नाही. ह्या तुटपुंज्या घोषणासुद्धा लोकांच्या विरोधानंतर जाहीर केल्या आहेत त्यातून लोकांबदद्लचा शुष्क कळवळा आणि त्यांच्या अंधकारमय भविष्याचे चित्र स्पष्ट करत आहेत. भावनिक विचार करता कितीही मोबदला दिला तरी लोकांना  नको आहे पण व्यावहारिक दृष्ट्या विचार करता ही सरकार जो मोबदला देत आहे तो तुटपुंजा आहे.
       मुळात आम्ही शेती विकावीच का? कारण शेती करणे हे आमचे कर्म आणि  तोच आमचा धर्मही आहे. फायदया तोट्याचा विचार करुन आम्ही शेती करत नाहीआम्ही शेतकरी बळीराजाचे वंशज आहोत, आमच्याकडे जी काही वारसाहक्काने चार-दोन एकर जमिन आली आहे तेच आमचे राज्य, आणि ते टिकवणे पुढील पिढीकडे हस्तांतरित करणे हे आमचे आदय कर्तव्य होय. विमानतळाच्या पाठिंब्याकरिता विकासाच्या देशहिताच्या गमजा केल्या जात आहेत, पण कसला विकास ? गोरगरिबांना , भूमीपुत्रांना देशोधडीला लाऊन कसला विकास करतायरक्ताचे पाणी करून अन् पोटाला चिमटा काढून फुलवलेले मळे,बागा,घर-दार,विहिरी-बारवा हे सर्व जमिनोदस्त होणार या चिंतेने सर्वांची झोप उडाली आहे. आता कुठे पुरंदर उपश्याचे पाणी अनियमीत का होईना येत आहे. त्यासाठी लोकांनी कर्जे काढून पाईपलाईन केल्या आहेत. आता कुठे चांगले दिवस येतील अशी आशा निर्माण झाली होती पण या विमानतळरुपी ब्रह्मराक्षसाने त्यावरही विरजण घातले आहे.  
          देशाच्या सर्वांगिण विकासासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार होणे गरजेचे आहे त्यासाठी जमिनीची गरज ती देणे क्रमप्राप्तच आहे, पण औद्योगिकीकरणासाठी अविकसित भागात खूप जमिनी पडिक पडलेल्या आहेत त्या ठिकाणी उद्योग उभारावेत, जमिनी स्वस्त मिळतीलच शिवाय तेथील बेरोजगारांना रोजगार मिळेल, मागासभागात पायाभूत सुविधा अस्तित्वात येऊन देशाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. पण सरकार उद्योगपतीनां सर्व काही लगेच हवे आहे, त्यांना मागास भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यास वेळ नाही. त्यामुळेच त्यांना रेल्वेमार्ग, महामार्ग याच्या दुतर्फा एक एक किलोमीटर क्षेत्र हस्तगत करायचे आहे. देशातील बहुसंख्य शेतकरी हे अल्पभुधारक आहेत अशाने बरेच शेतकरी भूमीहीन, उपरे होतील अर्थात तेही उद्योगपातींच्या फायद्याचेच आहे कारण गुलामासारखे काम करायला त्यांना मजूरही मिळतील. असे असले तरी शेतकरी अन्याय सहन करून किती दिवस गप्प बसतील, तुम्ही त्यांच्या हातातील नांगर हिसकावणार असाल तर प्रथम ते लेखणी हाती घेतील , त्यांच्या लेखणीची भाषा जर तुम्हाला समजणार नसेल तर मात्र त्या लेखणीची ठोकणी झाल्याशिवाय राहणार नाही.
                                        संतोबा (संतोष गांजुरे).
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!