Ads 468x60px

Saturday, November 19, 2016

पुरंदरमध्ये "विमानतळाची" मोगलाई

                           ८ ऑगस्ट १६४८ च्या आठवड्यात आदिलशहाचा , विजापूरचा सरदार फत्तेखान शिरवळ, पुरंदरवर चालून आला त्याला बेलसर परिसरात मावळ्यांनी आसमान दाखवले. आताही विमानतळ नावाचा ब्रह्मराक्षस याच परिसरावर चालून आला आहे. शासन-प्रशासन,लोकप्रतिनिधी ब्रह्मराक्षसाचे सरदार आहेत. ते येथिल शेतकऱ्यांच्या विरोधाला जुमानत नाही. आंदोलने,उपोषणे,निषेध यांनी फरक पडत नाही ते त्याच आवेशात हल्ला करत आहेत. साम-दाम-दंड-फितुरी सगळे पर्याय वापरून पहात आहेत. त्याकाळी शेकडो मावळ्यांनी हजारो आक्रमकांना धुळीस मिळवले. आताही तेच होईल कारण त्याच मावळ्यांचे वारस आम्ही आहोत. आताच्या आधुनिक काळात अन्याय झाला तर आपण मोगलाई आहे का? असे म्हणतो, पण याचा प्रत्यक्ष अनुभव पारंगाव पंचक्रोशीतील लोक घेत आहेत मुघलशाही, आदिलशाही एकाचवेळेस चालून आले आहेत व त्यांनी ही गावे उद्ध्वस्त करण्याचा हट्ट धरला आहे पण आम्ही शिवबाचे मावळे हे होऊ देणार नाही प्रसंगी प्राणांची आहुती द्यावी लागली तरी बेहत्तर.
                            पुरंदर म्हणजे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक,धार्मिक सामाजिक जडणघडणीचा अमूल्य वारसा आणि दैदिप्यमान इतिहासाचा आत्मा.स्वराज्यास हातभार लावणारे सरदार गोदाजी जगताप, सूर्याजी काकडे, पिलाजी जाधवराव , उमाजी नाईक, भारताच्या सामाजिक क्रांतीचे जनक फुले दाम्पत्य, महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा, संत सोपानकाका समाधी, भुलेश्वराचे मंदिर हे सर्व याच पुरंदरमधले. काय सांगू आणि काय नको ही यादी संपता संपणार नाही. एवढा दैदिप्यमान वारसा असलेला पुरंदर आज प्रकल्पग्रस्त होण्याच्या मार्गावर आहे. गुंजवणी, रायता, एम.आय.डी.सी. आणि आता विमानतळ. झाले तेवढे प्रकल्प पुरे झाले आता नविन काही नको. पुरंदर सुजलाम सुफलाम व्हायला हवा. अंजीर,सिताफळ, डाळिंब, वाटाणा, टोमॅटो, भाजीपाला, फुले यासाठीही पुरंदर प्रसिद्ध आहे. आजची तरुण पिढी शेतीत नवनवीन प्रयोग करून चांगले उत्पन्न काढत आहेत नविन फळबागांची लागवड करत आहेत. हे सारे ओसाड होऊ द्यायचे नाही म्हणून हा विमानतळविरोधी लढा,संघर्ष आहे.
                               पुरंदरमधील प्रत्येक गावाला काही ना काही इतिहास आहे. असं असताना आजूबाजूच्या गावातील ज्या गावांचा विमानतळाच्या प्रकल्पात नाव नाही अशा गावातील काही लोक विमानतळ होणार म्हणून खुश झाले आहेत. विमानतळाला पाठिंबा देत आहेत पण त्यांनी गाफिल राहू नये अविचार करू नये त्यांनी आमच्या लढ्यात सामील व्हावे. कुठे खड्डा खोदला तर ढीग होतोच. जिथे विमानतळ होईल तिथे आजूबाजूच्या गावात विकास नाही पण टाकाऊ कचरा आणि सांडपाण्याचा निचरा होईल. पारगावं परिसरात विमानतळ शंभर टक्के होणार नाही आणि आम्हाला आमच्या लढ्यात ज्या गावांनी साथ दिली तिथेही होऊ देणार नाही. उद्या हे इकडे तिकडे सरकून तुमचे गांव बाधित व्हायची वाट पहावू नका आताच विरोध करा. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या,सुविधा मिळतील याचा विचार तुम्हीच करा. ज्यांना जमिनी विकायचा नाहीत त्यांना जमिनीचे भाव वाढले काय अन पडले काय , काही फरक पडणार नाही आणि भाव वाढले म्हणून जमिनी विकल्या तर परत विकत घेता येणार नाही. या चुकीला माफी नाही एकदा घडून गेले तर परत चूक झाली म्हणून माघारी येता येणार नाही.
                  आपण काय गमावतोय, काय चूक करतोय हे प्रत्यक्ष चूक केल्याशिवाय कळत नाही. बऱ्याचदा चूक झाल्यावर पुन्हा सावरण्याची संधी मिळत नाही. हे विमानतळाचेही तसेच आहे. ९०-९५ टक्के लोकांना कितीही मोबदला दिला तरी विमानतळ नको आहे. जे ५-१० टक्के तळ्यात-मळ्यात आहेत त्यांनी इतर प्रकल्पग्रस्त लोकांच्या अनुभवातून बोध घ्यावा. आपल्याला अनेक मोठमोठी आश्वासने, आमिषे , प्रलोभने मिळतील त्यापासून दूर राहावे कुणाची चाकरी करण्यापेक्षा कष्टाची भाकरी बरी. कोणाच्याही भूल थापांना बळी पडू नये. नाहीतर तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे अशी अवस्था व्हायची.
हे सगळे ढोंगी आहेत कारण, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधायला शेकडो परवानग्या लागतात , पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणे मग इथे पुरंदरमध्ये सहा हजार एकर ओसाड करून काय पर्यावरणाची भरभराट होणार आहे का???? स्मारक करायचे तर करा नाहीतर नका करू पण आहे तो इतिहासाचा साक्षीदार पुरंदर उद्ध्वस्त नका करू. महात्मा फुलेंचे गाव उद्धवस्त करायला शासन-प्रशासनाला काही वाटत नाही उद्या अडथळा येतो म्हणून पुरंदरचा किल्ला भुईसपाट कराल! आम्ही सरकार निवडून दिले ते जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना देशोधडीला लावण्यासाठी नाही. आम्ही तुम्हाला सत्ता दिलीये महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर नाही केला. आमचे विश्वस्त म्हणून काम करा. विश्वासघात करू नका. आमच्या होकाराशिवाय कोणाताही प्रकल्प राबवू नका. विमानतळ तर नकोच नको.
                                                                                      ------- संतोबा (संतोष गांजुरे )

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!