Ads 468x60px

Sunday, October 16, 2016

३) म्हणून आहे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला विरोध!!!

             पारगांव पंचक्रोशीतील सात गावांच्या तीव्र विरोधानंतर तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि इतर गावांतील लोकांनी, ज्यांच्या जमिनीवर सध्या विमानतळ नावाच्या ब्रह्मराक्षसाची नजर पडलेली नाही त्यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन आमच्या विरोधाला प्रतिउत्तर द्यायला सुरूवात केली आहे. हा लेख खास त्यांच्यासाठी त्यांनी हे वाचून, त्यावर विचार करून नंतर आम्हाला विरोध करा.
                     तुमची जमिन जिला तुम्ही काळी आई मानता आणि तिच्यावर अगदी स्वतःच्या भावाने अतिक्रमण जरी केले तरी अगदी पोलिस स्टेशनचे, कोर्टाचे दार ठोठवता. आपल्या रक्ताचं पाणी करून सिंचन करता, प्रसंगी त्यासाठी सणवार, कपडालत्ता यावर खर्च न करता विहिरी,बोअर, पाईप लाईन यावर खर्च करता. संपूर्ण आयुष्य काळ्या आईची सेवा करण्यात घालवता.त्याच काळ्या आईला कोणत्या तरी प्रकल्पासाठी  तुम्हाला कोणतीही अधिकृत माहिती न देता हडप करण्याचा प्रयत्न केला जातो, तुमच्या मनात भविष्याबद्दल संभ्रमावस्था निर्माण केली जाते. अशा वेळी तुम्ही काय कराल?तुमचा लोकप्रतिनिधी तालुक्याच्या, जिल्ह्याच्या विकासाच्या गमजा मारत असताना तुमच्या पुनर्वसनाबद्दल एकही चकार शब्द काढत नसेल.तुम्ही ज्यांना तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे त्यांनी  तुम्हाला आधार देण्याऐवजी ते जाहीरपणे तुम्हाला वाळीत टाकण्याचे आवाहन करत असेल, वेगवेगळ्या माध्यमातून एकटे पाडायचा प्रयत्न करत असेल, तुमच्यावर बहिष्कार घालत असेल तर तुम्ही काय कराल?जेव्हा तुम्ही मोर्चा काढता त्यानंतर सरकारला,लोकप्रतिनिधींना जाग येते व जमिनीचा मोबदला काय द्यायचा यायचा अभ्यास चालू असल्याचे सांगितले जाते, म्हणजे आधी जे जाहीर केले आहे ती धूळफेक होती आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला फसवलच जातेय हे स्पष्ट दिसत असेल. आतापर्यंत झालेल्या बहुतेक प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना फसवल्याची, प्रकल्प अर्धवट राहिल्याची उदाहरणे तुमच्या समोर असेल अशा वेळी तुम्ही काय कराल?
            आयुष्यभर शिवछत्रपती, शंभूराजे , महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पदस्पर्शाने, कर्तृत्वाने पावन झालेल्या भूमीत आपला जन्म झाला ह्याचा अभिमान बाळगला. छत्रपतींचे स्वातंत्र्याचे, फुले यांचे समतेचे तत्व अंगिकारले, ज्या गावाच्या पंचक्रोशीत स्वराज्याची पहिली लढाई जिंकली त्या गावात आपला जन्म झाला ही प्रेरणा कोणत्याही संकटात तारून नेत होती. त्या पवित्र भूमीतून परागंदा व्हायची वेळ आमच्यावर असली असेल तर ही गोष्ट आम्हाला जगबुडीपेक्षा कमी नाही. तुमचा इतिहास भूगोल पुसला जाणार असेल अशावेळी तुम्ही काय कराल? ज्या गावात तुमचा जन्म झाला, ज्या घरात तुम्ही वाढला, ज्या शाळेत तुम्ही शिकला, घडला, ज्या मंदिरात तुम्ही श्रद्धेने प्रार्थना केल्या, ज्या जमिनीत तुम्ही सोनं पिकवत होता हे सर्व क्षणार्धात उद्धवस्त होत असताना दिसत असेल तर तुम्ही काय कराल?
      आमचा लढा हा आमची काळी आई, आमचे  गांव वाचवण्यासाठी आहे,आमचा लढा आमच्या अस्तित्वासाठी, अस्मितेसाठी आहे.आमचा विरोध तडजोड करून जास्त मोबदला पदरात पाडण्यासाठी नाही. शितावरून भाताची परीक्षा करून नये. या लढ्यात तुम्हीही आम्हाला साथ द्याल अशी अपेक्षा आहे कारण हा ब्रह्मराक्षस तुम्हालाही गिळंकृत करेल यात शंका नाही, कारण हा ब्रह्मराक्षस एकटा येणार नाही, त्यासोबत अनेक उद्योगधंदे, मोठे रस्ते ई. अनेक पायाभूत सुविधांना घेऊन येणार आहे त्यासाठी तुमच्याही जमिनी जाणारच आहेत, सध्याच्या पाणीसाठ्यात पिण्यासाठी पाणी पुरत नाही मग एवढया मोठ्या प्रकल्पासाठी धरणे बांधावे लागणार नाही का?. त्यासाठी तुमच्या जमिनी नाही जाणार का? जमिनीच्या किंमती अफाट वाढतील तुम्ही फक्त जमिनी विकू शकाल, विकत कधीच घेऊ शकणार नाही. दुसऱ्या गावात, दुसऱ्या तालुक्यात बंगले बांधूनही तुम्ही उपरेच ठरणार , पुढील पिढ्या तुम्हाला माफ करतील?
          पैसा हा टिकाऊ नाहीये आहे तो प्रवाही आहे, तो जेवढ्या वेगाने येईल तेवढ्याच वेगाने निघून जाईल. ही क्षणिक श्रीमंतीची सूज असेल कारण अनेक ठिकाणी जमिनी विकून करोडपती झालेल्या लोकांची काय अवस्था आहे पहा. पैसा आल्यानंतर कधी ओळख न दाखवलेले पाहुणे-रावळेही त्यांच्या अनंत अडचणी घेऊन मदतीसाठी दारात उभे राहतील .मी आणि पारगांव पंचक्रोशीतील सर्व बांधवांची एकच अपेक्षा आहे आमच्या चितेवर तुमच्या भाकरी भाजू नका त्याची धग आज न् उद्या तुम्हालाही लागणारच आहे. आमच्या आया-बहिणींचे तळतळाट घेऊ नका या लढ्यात सहभागी होऊन आशिर्वाद घ्या.

                                                                            संतोबा (संतोष गांजुरे)

1 प्रतिक्रिया:

Nana Kamble said...

संतोष दादा एकदम बरोबर माहीती दिलीत
पुढील पिड्या माफ़ करणार नाहीत आपल्याला जर विमानतळ जाले तर
इडा पीड़ा टळो विमानतळ पुरन्दर भाइर् पळो

आम्ही सहभागी आहोत ह्या विरोधात।


 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!