Ads 468x60px

Sunday, February 2, 2014

नाट्यरंग--२) योनीच्या मनीच्या गुजगोष्टी.

       रवींद्र नाट्यमंदिर माझ्या ऑफीसच्या लगतच आहे, एक दोनदा खाद्यमहोत्सवानिमित्त आत गेलो होतो, पण नाटक पाहायला पहिल्यांदाच चाललो होतो सोबत संजू असल्यामुळे ओळखीचे कोणी तरी भेटणारच याची खात्री होती आणि ओळखीचे भेटलेही. तिकीटासाठी बरीच मोठी रांग होती, बहुतेक तिकीट भेटणार नाही असे वाटत होते पण भेटले. आमच्या मागे असणार्‍यांना मात्र तसेच घरी जावे लागले. तोपर्यंत नाटकाचे खूप जास्त काही प्रयोग झाले नव्हते त्यामुळे नाटकाविषयी फारसे काही ऐकले नव्हते. इतरांची ही तीच परिस्थिती होती पण नाटकापेक्षा त्याच्या नाममहिम्यावर आकृष्ट होऊन बरेच जण आले असणार यात शंका नव्हती. अर्थात आम्हीही त्यास अपवाद नव्हता पण आमचा हेतू वेगळा आणि शुद्ध होता याबाबत शंका नसावी.
                नाट्यगृह अगदीच छोटे आहे त्यामुळे स्टेज वैगेरे काही नाही, अगदी कट्यावर बसून गप्पा मारतोय असा भास व्हावा, आणि त्यामुळेच ते नाटकाच्या प्रकृतीला पोषक वाटत होते. प्रत्येकजण काही ना काही अपेक्षा घेऊनच नाटक पाहायला येत असतो, इतर नाटकापेक्षा सगळ्याच बाबतीत हे काहीसे वेगळे होते. काही लोक त्यातील स्पष्ट उल्लेख पटत नसल्याने उठुनही जात होते.मी काही तथाकथित पांढरपेशा नाही त्यामुळे त्या शिव्या, स्पष्ट उल्लेख मला खटकत नव्हता, आम्ही दोघेही (मी भावी)कलाकार असल्याने नाटकाच्या संहितेच्या दृष्टीकोनातून त्याचे महत्वही जाणून होतो. पण नाटक जसजसे पुढे जाऊ लागले तसा आमचाही भ्रमनिरास होऊ लागला. असा विषय आणि तोही इतक्या मोकळेपणाने रंगमंचावर सादर करणे खरेच कौतुकास्पद होते पण हेतू शुद्ध व्यावसायिक वाटत होता.
                हे नाटक पाहून जवळपास वर्ष होत आलेय, त्यानंतर मिळत्याजुळत्या नावाची, विषयाची तीन-चार नाटके आली.अनेक टीका करणारे लेख वाचनात आले. माझा आक्षेप त्यातील शिव्या, कधी स्पष्ट तर कधी अश्लील उल्लेखांना नाहीतर एवढे सर्व करून तिचे गुज पुरुषांपर्यंत पोहचवण्यात आलेल्या अपयशाला आहे, व्यावसायिक दृष्टीकोण असल्यामुळे त्यात भडकपणा जास्त जाणवतो, अगदी कोणीतरी हैदोससारख्या पुस्तकातील उतारेच वाचतेय असे वाटत राहते.शरद करमरकरच्या माध्यमातून जे ज्ञान द्यायचा प्रयत्न केला आहे तो अगदीच अनावश्यक वाटला.काही वेळा अज्ञानात सुख असते याचे भान ठेवायला होते, संहितेपेक्षा नितीमत्ता वरचढ असायला हवी. काय कसे करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, काही अव्यक्त भावना, अज्ञात गोष्टी उलगडण्याचा मोह टाळायला पाहिजे होता. एका पवित्र, नाजूक गोष्टीची शब्दबंबाळ व्यथा तिलाच रक्तबंबाळ करत होती. हा पांढरपेशी धंदेवाईकपणा होता आणि त्यानंतर आलेली अशा पद्धतीची नाटके त्याचेच फलित.विचारांना काहीतरी खाद्य मिळेल या अपेक्षेने गेलो पण भ्रमनिरासच झाला.....

नाट्यरंग- १) विच्छा माझी पुरी करा


      चित्रपटगृह किंवा नाट्यगृहात जाऊन चित्रपट वा नाटक पाहण्याचा शौक आम्हांस बिल्कुल नाही. मराठी चित्रपट, नाटक चालावीत, जगावीत असे आम्हांस वाटते खूप पण त्यासाठी प्रयत्न काहीच नाही. कोणी अगदी आग्रहाने चल म्हणाले तरी आम्ही जात नाही पण आमचे मित्र संजय मोहिते हे स्व:त कलाकार असल्याने आणि त्यांची मुख्य भूमिका असलेले नाटक असल्याने आम्ही नकार तरी कसा देणार. "विच्छा माझी पुरी करा" या नाटकानेच माझी नाट्यगृहात जाऊन नाटक पाहण्याची नसलेली इच्छा पुरी झाली. नाटक पाहिल्यानंतर नाट्यगृहात जाऊन ते पाहण्यात काय वेगळाच आनंद असतो याची जाणीव झाली त्याचबरोबर उद्‌घाटनाचा प्रयोग असल्याने अनेक नामवंत कलाकारांना प्रत्यक्षात भेटता आले. एक कलाकार म्हणून संजयबद्दल सुरुवातीपासूनच आदर होत आणि ह्या नाटाकाने द्विगुणीत झाला, अर्थात तो फारसा दिसून येत नाही. मी सल्ले देण्यात,मस्ती करण्यात नेहमीच त्याच्या वरचढ असतो अर्थात हा त्याचा मोठेपणा.
            सन्माननीय प्रेक्षक म्हणून चार-सहा प्रयोग मित्रांना फुकटात दाखविताना माझा वांझोटा अभिमान उगीचच उफाळून यायचा. मला सर्व फुकटात असले तरी आता त्या फुकटाची लाज वाटू लागली होती. कारण दोन अडीच तास रंगमंचावर दमदार अभिनयाने मनोरंजनासोबत सामाजिक प्रबोधन करणार्‍या कलाकारांची वैयक्तिक आयुष्यातील फरपट मी जवळून पहात होतो. फुकटात नाटक पाहणे त्या कलाकाराच्या अभिनयाचा अपमानच नव्हे तर माझ्या सामाजिक बांधिलकीशीही प्रतारणा होती. स्टेटस म्हणून तीनशे रुपयाचा शर्ट दीड-दोन हजाराला विकत घेताना काहीच वाटत नाही पण १५०-२०० चे तिकीट काढून नाटक-चित्रपट पाहायला जिवावर येते.
            कित्येक कलाकारांच्या आयुष्याची राखरांगोळी झालेली आपण नेहमी पाहतो.कलाकारांना आपण तारे म्हणतो ते त्यांना शोभण्यासारखेच आहे. रात्री तारे चमकतात तोपर्यंतच त्यांचे अस्तित्व, रात्र संपली की ते अस्तित्वशून्य होतात, आपल्यालाही त्यांची अनुपस्थिती सूर्यप्रकाशात जाणवत नाही. कलाकारांचेही तसेच आहे,  ऐन उमेदीच्या काळात तार्‍याप्रमाणेच समाजाच्या सुख-दुखावर मनोरंजनाची फुंकर घालून हास्य पसरवणार्‍या बर्‍याचशा कलाकारांच्या उत्तरार्धातील आयुष्याची राख पैलतीरी पोहचण्यासाठी कोणाच्यातरी मेहेरबानीची आवश्यकता लागते. अभिनय हा त्यांचा व्यवसाय नसतो त्यांचे वेड असते. प्रत्येक क्षेत्रात असे  ध्येयवेडे असतात अशा वेड्यांचे कर्तुत्व अजरामर होतेच पण जिवंतपणीसुद्धा त्यांचे अस्तित्व तळपत राहायला हवे.
             एका चित्रपटासाठी १०० कोटी घेणार्‍या कालाकारांबद्दल मी बोलत नाही त्यांच्या सहकारी कलाकारांचे मानधन पहा, आपल्या मराठीत तर कलाकारांची जास्तच होरपळ होत असते. "फॉरेनची पाटलीण" या चित्रपटातील पक्या भावोजी या प्रसिद्ध भूमिकेसाठी संजूला अवघे चाळीस हजार मानधन भेटले होते हे एकूण मला आश्चर्याचा दुख:द धक्का बसला होता. कला, संस्कृती टिकवणे हे आपले स्वत:चे अस्तित्व टिकवण्याहून वेगळे नाही. मी आता महिन्या-पंधरा दिवसाला एखादा चित्रपट वा नाटक पाहायचे ठरवले आहे आणि ते ही तिकीट काढून. आणि तुम्ही...

यंदा कर्तव्य आहे -- ४) दुसरी बाजू

    एखाद्या गोष्टीची टंचाई निर्माण झाली की त्या गोष्टीचे भाव गगनाला भिडतात. ती गोष्ट आपल्याकडे असेल तर अपेक्षेपेक्षा जास्त भाव मिळेल या आशेने किंवा इतरांच्या सांगण्यावरून त्या गोष्टीचा भाव नको इतका  ताणून धरतो. आपण फक्त जास्त फायद्याचाच विचार केला तर इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होणे ओघानेच आले. आपल्या मालाची गुणवत्ता, तो नाशवंत आहे याची जाणीव, नवीन मालाची आवक, बाजारातील घडामोडी इत्यादी गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि अनपेक्षित मिळालेली संधी  गमावून बसतो आणि शेवटी एकतर आपल्याला तो माल आहे त्या पडेल बाजारभावात विकावा लागतो नाहीतर तो खराब झाला असल्यास नाइलाजाने फेकून द्यावा लागतो.
                अहो नाही मी कांद्याबद्दल नाही बोलत, मी माझ्याबद्दलच बोलतेय. मी २७ वर्षाची एक तरुणी चारचौघींसारखी आणि स्वप्नेही तशीच. कोणी विशेष दखल घ्यावी असे काही नाही तरी आज मला बोलायचेय. आईच्या वयाच्या २७ व्या वर्षी आम्हा तिन्ही भावंडांचा जन्म झाला होता आणि माझ्या वयाच्या सत्ताविसाव्यावर्षी आता कुठे वरसंशोधन चालू आहे. पुर्वी मुलीच्या जन्माबरोबर तिच्या लग्नाची चिंता जन्माला यायची. मुलगी वयात यायच्या अगोदरच तिच्या लग्नाच्या जबाबदारीतून कधी मुक्त होऊ याची चिंता आई-बाबांना लागायची कारण जाणते-अजाणतेपणी मुलीचे वाकडे  पाऊल पडेल वा एखादी अनुचित घटना घडेल  याची सतत टांगती तलवार असायची. घराण्याच्या असलेल्या-नसलेल्या इज्जतीचा संबंध स्रीयांच्या चारित्र्याशी जोडलेला जो आहे. त्या पारंपारिक मानसिकतेमध्ये, अनामिक भितीमध्ये अजून बदल झाला नसला तरी, स्री-पुरूष गुणोत्तराच्या प्रचंड तफावतीमुळे आज उपवर मुलींचे आणि त्यांच्या पालकांचे महत्व प्रचंड वाढले आहे आणि अपेक्षाही. आमचेही तसेच आहे, आई-बाबांच्या असल्यातरी माझ्या मात्र खास अशा काही अपेक्षा नाहीत.
                दोन वर्षापूर्वी ताईचे लग्न झाले तोपर्यंत माझ्या लग्नाविषयी मी कधी विचार केलाच नव्हता, तशी कधी गरजही पडली नाही सगळे महत्वाचे निर्णय बाबाच घेतात ना. ताईचे लग्नही त्यांनी कसे थाटामाटात केले. ताई शिक्षिका आहे.दोन-तीन वर्षापासून तिच्यासाठी वरसंशोधन चालू होते पण कुठे काही ना काही कारणाने अडचणी येत होत्या. त्यातील बर्‍याच स्थळांना बाबांनीच नकार कळवला होत्या पण शाळेत ताईचे कुणाबरोबर तरी सूत जुळतेय याची कुणकूण लागताच लगेच एका स्थळाला होकार कळवला आतापर्यंत त्यापेक्षा कितीतरी सरस स्थळे नाकारली होती. खरे तर कोणत्याही बाबतीत तो ताईला शोभत नव्हता पण नाईलाज होता. बाकी काही नसले तरी मुलगा डॅशिंग असावा एवढी तरी बर्‍याच जणींची इच्छा असते पण हा अगदीच किरकोळ होता. त्याने कितीही सुसंस्कृतपणाचा चेहर्‍यावर आव आणला तरी त्याचा बालिशपणा लपतालपत नव्हता स्पष्ट सांगायचे तर एकदम चिरकूट वाटायचा पण आता ताईचा नवरा म्हणून रिस्पेक्ट तर द्यायला हवा ना अगदी घरातील सर्वांनीच, पण आता दोन वर्षानंतर त्याच रिस्पेक्टची चीड येऊ लागली आहे. बाबा प्रत्येक बाबतीत त्यांचा सल्ला का घेतात हे अनाकलनीय होते कालही तसेच झाले.
                . मी एका माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित ऑर्गनाइज़ेशन मध्ये काम करते.आज मला जो पाहायला येणार आहे ना तो सुद्धा याच क्षेत्रातील असल्यामुळे तीन-चार वेळा कांदापोह्याचा कार्यक्रम झाला असला तरी आज पहिल्यांदाच येणार्‍या मुलाबद्दल उत्सुकता होती. त्याला पुन्हा मुंबईला जायचे असल्याने जाता जाता तो एकटाच मला पाहून जाणार होता. ठरल्याप्रमाणे चार वाजता तो आमच्या एका नातेवाईकसोबत आला.बाहेर बाबा जावयासोबत तर आत स्वयंपाकघरामध्ये ताई-आई व मी होतो. अपेक्षेप्रमाणे समीर माझा छोटा भाऊ घरात नव्हताच. चहा आणि पोहे ताईनेच बनवले होते. आई सर्वांना चहा घेऊ बाहेर सोबत ताई गेली. माझे सारे लक्ष दोघींच्या हावभावाकडे होते. पण दोघींच्या हावभावावरुन काहीही तर्क बांधाता आला नाही. दोघी आत आल्यावर ताईने विशेष उत्सुकता दाखवली नसली तरी आई जास्त उत्सुक वाटत होती. थोड्यावेळाने बाबांनी मला हाक मारली. पहिलीच वेळ नसली तरी छातीत धडधड वाढली होती. मी पोहे घेऊन बाहेर आली अर्थात ताईने बनवलेले. त्याच्यासह सर्वांना पोहे दिले पण त्याला पाहायला नाहीच जमले. खाली मान घालून मी त्याच्या समोर बसली होती. बाबांनीच माझ्याबद्दल बोलायला सांगितले. आता मान वर करण्याची संधी मिळाली. 
                माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. माझ्या स्वप्नातसुद्धा नसलेल्या राजकुमारपेक्षाही राजबिंडा होता तो. आजूबाजूच्या सर्व गोष्टीचा मला विसर पडला समीर कधी आलाय हेही माझ्या लक्षात नाही आले. पाहताक्षणीच मी त्याच्या प्रेमात पडले माझ्या आवाजातील कंपनातून ते जाणवतही होते त्याच्याही कदाचित हे लक्षात आले असेल.तोही एकटा असल्याने थोडा भांबावला होता,त्याची ओळख करून देताना त्याने त्याचे नाव सांगितलेच नाही पण कार्यक्रम संपल्यानंतर तो स्वत:ची पूर्ण माहिती मेलवरून द्यायला व माझी माहिती घ्यायला उत्सुक होता पण ताईच्या नवर्‍याने त्याची काही गरज नाही म्हणून नकार दिला. त्याला ते कदाचित आवडले नसावे पण त्याच्याकडेही काही पर्याय नव्हता. त्याला माझ्याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि गोंधळल्यामुळे कदाचित माझे नावही विसरला असेल असे त्याच्या हावभावावरून जाणवत होते.एकंदरीत प्रत्येक बाबतीत मला सरस होता, आमच्याकडून नकार द्यावा असे काहीच नव्हते, मी तर अगदीच हुरळून गेले होते पण त्याचा होकार आहे नाही हे काही त्याच्या हावभावावरून समजून येत नव्हते म्हणून जोपर्यंत त्याचा होकार येत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल काहीही विचार करायचा नाही असे ठरवले होते उगीच नकार असेल तर वाईट वाटायला नको. पण झाले सगळे उलटच,कोणी मला माझी पसंती विचारालीच नाही. बाबांचा होकार असला तरच माझ्या पसंतीच विचार केला जाणार होता.
                सासरे जावयांचा बराच खल झाल्यानंतर नकार द्यायचा ठरवला होता कारण त्याचे मुंबई किंवा पुण्यात घर नव्हते. का कोणासठाऊक चिरकुटचा( ताईचा नवरा आज तो माझ्या मनातून पूर्ण उतरला,आजपासून माझ्यासाठी तो चिरकूटच) त्यास इतका टोकाचा विरोध का होता?  माझ्या प्रमाणे आईसुद्धा होकारासाठी आग्रही होती आश्चर्य म्हणजे घरात कशातच ढवळाढवळ न करणार्‍या समीरलाही तसेच वाटत होते त्याने स्पष्ट बोलूनही दाखवले पण आमचे ऐकतो कोण. थोड्यावेळाने त्याच्यासोबतच्या नातेवाईकाने त्याचा प्राथमिक होकार आहे असे फोन करून कळवले त्यामुळे मला जास्तच वाईट वाटले कारण त्याला आमच्याकडून कसलाच प्रतिसाद जाणार नव्हता त्यामुळे तो आमचा नकार समजणार हे उघडच होते पण तो मला अगदी मनापासून आवडलाय हे त्याच्यापर्यंत पोहचणार नव्हते.माझीही काही मते आहेत,माझ्याही काही अपेक्षा आहेत याची मला जाणीव झाली. दोघांनाही एकमेकांबदद्ल काहीही माहीत नसले तरी काहीतरी चमत्कार होऊन तो भेटेल अशी वेडी आशा वाटतेय. पुढचे स्थळ कितीही चांगले असले तरी मी मात्र निश्चित नकार देणार आहे आजच्या नकाराचा निषेध म्हणून.....

यंदा कर्तव्य आहे --३) दुनियादारी


          बरेच दिवस टाळाटाळ केली पण आता शेवटी कांदा-पोह्याची सुरूवात करणे भाग होते,घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून अशी म्हण का आहे याचा कटू अनुभव येऊ लागला होता. आता या दोन्ही गोष्टी मला मृगजळाप्रमाणे भासू लागल्या होत्या. नेहमीच वेळ संपत आल्यावर माझी सुरूवात होते. आताही वेळ उलटून चालली आहे आणि आम्ही वधुसंशोधनास सुरूवात केली आहे. काही वर्षापूर्वी आईला वाटायचे एकुलता एक मुलगा आहे, चांगला शिकलेला आहे, रूपानेही राजबिंडा आहे. घरी बागायती शेती आहे, गावाकडे का होईना पण स्वत:चे घर आहे. हुशार, निर्व्यसनी, कमावता आहे. त्यामुळे आपल्याला हवी तशी सून मिळेल असा भाबडा विश्वास तिला होता. पण आता खूप उशीर झाला आहे असे तिला वाटतेय त्यामुळे तिला आता फक्त सून हवी आहे, स्वप्नांशी तिने तडजोड केली आहे. पण मी काय करू आता इकडे आड तिकडे विहीर. ज्या गोष्टी मला माझ्या मनाविरुद्ध स्वीकाराव्या लागल्यात त्याचा खूप त्रास भोगलाय मी. आता ही तसेच होईल का? माहीत नाही. योग नाही आला की भोग भोगावेच लागतात..
                मनाची तयारी म्हणून सहजच मॅट्रिमोनी साइट्सवर नोंदणी केली पण मुलींच्या अवास्तव अपेक्षा पाहून आमचा आत्मविश्वास पार गळफटला. इतर मुले मुलीचे नाव,गाव,फोटो पाहत असतील पण मी फक्त अपेक्षा काय ते पहात होतो.साइट्सवरुन जुळवायचा प्रश्नच नव्हता कारण मी स्वत:च ठरवून असे काही केले असते तर कुठेही काही नसताना अफवांचे अमाप पीक वाढले असते. मी लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करत नाही पण या गोष्टींचा पुढेही त्रास होईल म्हणून अजून काही काहीच नाही केले. त्यामुळे वधुसंशोधनाची जबाबदारी घरच्यांवर-नातेवाईकांवरच सोडली. पण आता सुरवात झाल्यावर प्रत्येकाला शिक्षणापासून नोकरीपर्यंत, पगारापासून प्रॉपर्टीपर्यंत इतरही बरीचशी माहिती पुन्हा-पुन्हा देताना फार ऑकवर्ड वाटू लागले पण पर्याय नव्हता. विवाहविषयक साइट्सवर एकदा माहिती देणे ठीक आहे पण इथे प्रत्येकवेळी तीच ती माहिती पुन्हा देऊन उठाव नसलेल्या माळव्यासारखी माझी अवस्था झाली होती. मुली विषयी काही माहिती विचारली की दिसायला चांगली आहे एवढेच मोघम उत्तर मिळत असे.
                हो नाही करता पाच-सहा मुली पाहून झाल्या आहेत. मी निर्णय अंतःप्रेरणेने घेत असल्याने अपेक्षा अशा नव्हत्या त्यामुळे कोणी विचारले की मुलीबद्दल काय अपेक्षा आहेत तर मी काही नाहीत असे सरळ उत्तर देई. पण माझ्या उत्तराने ती व्यक्ती संभ्रमात पडे. ह्याच्यामध्ये काही दोष तर नाही की अगदीच अडलाय असे तर नाही ना? असे कदाचित त्या व्यक्तीस वाटत असावे. हे माझ्या लक्षात आल्यावर अनुरूप असावी असे डिप्लोमॅटिक उत्तर देऊ लागलो. पहिल्यांदा कांदा-पोह्यासाठी जाताना खूप चिंतेत होतो कारण मला ती नाही आवडली तर नकार देता येईल की नाही. की काहीच विशेष अपेक्षा नसल्याने इतरांचे ऐकून होकार देईल. पण सुदैवाने तसे काही झाले नाही, पहिला कार्यक्रम उरकल्यानंतर आता मात्र ती भीती मनातून गेली.
                पहिल्या तिन्ही मुलींमध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे त्यांना पाहून हा पाहण्याचा कार्यक्रम आहे की मयताचा हेच कळत नव्हते अगदी निर्विकार चेहरे. कसली उत्सुकता वैगेर काहीच आणि त्यांच्या घरचेही तसेच. त्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे ती हसतमुख असावी ही माझी प्राथमिक अपेक्षा आहे. एखाद्या ठिकाणी किवा कोणाच्या घरी गेल्यानंतर आधी असलेला आनंद माझ्यामुळे जर द्विगुणीत होत नसेल तर अशा ठिकाणी जायचे मी टाळतो. इथे तर पहिल्यांदाच मी आल्याचे कोणाला सोयर ना सुतक. त्यामुळे तात्काळ माझा नकार निश्चित झाला. कसलीच माहिती नसताना मी थेट पाहायला जायचो.त्यानंतर पाहिलेल्या दोन मुली सर्वसामान्यच होत्या पण मला भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता, त्यांचा बोलण्यातून मला हवा असलेला आपलेपणा जाणवत होता. त्यामुळे मी कसला ही विचार न करता होकार दिला. त्यांचाही होकार होता पण माझ्या मिळकतीवरुन नकार देण्याचा करंटेपणा त्यांचा घरच्यांनी केला. त्यांनी ज्या अशाश्वत कारणांसाठी नकार दिला  ते पचवणे मला जड जात होते.
                मी  संवेदनशील असल्यामुळे त्या नकारामुळे परत मनाची तयारी करायला महिना-दोन महिने लागायचे. मात्र त्या मुलींविषयी माझ्या मनात बिल्कूल रोष नव्हता उलट त्यांचाबद्दल चांगल्या भावना होत्या. एक तर नकार त्यांचा नव्हता तर घरच्यांचा होता आणि घरच्यांचा इच्छेचा मान राखण्याची आपली परंपराच आहे. पण त्यांच्या काळजीवाहू नातेवाईकांना ज्यांनी चिल्लर गोष्टीसाठी मला नकार दिला आहे त्यांना एक दिवस नकाराचा पश्चाताप करायला नाही लागला तर नवलच म्हणावे लागेल.

Saturday, February 1, 2014

यंदा कर्तव्य आहे--२) धर्मसंकट

           परवा संक्रांतीची सुट्टी असल्याने ताईला भेटायला गेलो, बर्‍याच दिवसापासून जायचे होते पण हक्काची सुट्टी(रविवार) मी फक्त माझ्यासाठीच राखून ठेवतो म्हणून जमत नव्हते. आळशीपणामुळे बर्‍याच गोष्टींचा अनुशेष(बॅकलॉग) शेष राहिला आहे याची जाणीव झाल्यामुळे फक्त धावती भेट होती. मामा घरी आल्याने किती आनंद होतो ह्याचा मलाही चांगलाच अनुभव आहे,पण मामाच्या मोबाइलवर नवीन गेम खेळायला मिळणार हा जास्तीच आनंद आजच्या मुलांना जास्त. माझे लग्न हा आजकाल इतका चर्चेचा विषय  झाला आहे की, मी त्यास घाबरून सामाजिक जीवनातून जवळपास संन्यासच घेतलाय. त्यामुळे आजकाल बरेच फोनकॉल्सही मिस होतात. पण आता स्वत:च घरी गेल्यामुळे लग्नाचा विषय नाही निघाला तर नवलच. दोन्ही भाचे आणि त्यांचा मित्र गेम खेळण्यात इतके दंग होते की त्यांना इतर गोष्टीचा विसरच पडला होता. तासाभराच्या गप्पानंतर छोट्या भाच्याकडून मोबाइल घेऊन बाहेर पडलो. ताईचा निरोप घेणार तेवढ्यात दहा-अकरा वर्षाच्या छोट्या निरागस भाच्याचा आवाज आला, "मामाचे लग्न व्हायला नाही पाहिजे, नाहीतर मामा आपल्या घरी आयुष्यात येणार नाही".निरागसच तो, पण इतर शहाण्यासुरत्यांचे काय...  
                आपल्या मुलीशी,बहिणीशी लग्न करावे अशी गळ मला अनेक नातेवाईकांनी,मित्रांनी घातली होती, त्यांचे अनंत उपकार असल्यांमुळे त्यांनी मला गृहीतच धरले होते. त्या सर्व मुली माझ्यापेक्षा सात-आठ वर्षांनी लहान, माझ्या धाकटया बहिणीच्या वयाच्या त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचाही दृष्टिकोन तोच. तसेच ज्या मुलींना अंगाखांद्यावर खेळवले आहे त्यांच्याशी लग्न करावे हा विचारसुद्धा माझ्या मनाला शिवत नव्हता. त्या सुंदर होत्याच, शिवाय सगळ्यांची सर्व काही व्यवस्थित करून देण्याची ऐपतही होती. त्यामुळे  दुसरीकडे लग्न ठरण्यात काही अडचण येण्याची शक्यता बिल्कूल नव्हती.मला अगदी जवळून ओळखत असल्याने तसेच त्यावेळेस त्यांना सुयोग्य वाटत असल्याने त्यांची माझ्याकडून अपेक्षा रास्त असली तरी त्यातील इतर धोकेही मला दिसत होतेच, परिस्थिती बेताची असताना फक्त माझ्यावर भिस्त ठेवण्याचा निर्णय बिल्कूल व्यवहार्य नव्हता. तो तसा नसायलाही हवा पण तो व्यवहार नंतर अनुभवा लागणार याची खात्री मला होती. दुरून डोंगर साजरे, तसे त्यावेळी माझ्या सर्व गोष्टी चांगल्या वाटत असतील तरी नंतर त्या वाटतीलच असे नव्हते. माझे सगळ्यांशीच चांगले संबंध होते ते तसेच रहावेत अशीच माझी इच्छा होती त्यामुळे नकार देणे माझ्यासाठी जीवघेणे होते पण नाईलाज होता. नकारामागे माझा हेतू जरी चांगला असला तरी गैरसमज व्हायचा तो झालाच आणि त्याचा त्रासही, तोही मला एकट्यालाच नव्हे तर मातोश्रींनासुद्धा.
                यथावकाश त्या सर्वजणींची लग्नकार्ये व्यवस्थित पार पडली, आणि ती पार पडेपर्यंत थांबायचे असे  मी ठरवलेच होते. अनेकांकडून विचारणा होत होती, पण बहिणीच्या लग्नाची ढाल करून नकार देत राहिलो. न जाणो काही कारणाने एखादीचे नाहीच जमले तर... वयाच्या मानाने बराच पोक्त विचार होता, हा पोक्तपणा संस्काराने, परिस्थितीने आणि उपजतच अंगी होता. पण माझ्या नकाराने अनेकांच्या मनात अनेक शंकाचे थैमान घातले होते, अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. मी मात्र त्या सर्वाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. पण काल परवापर्यंत माझा उदोउदो करणारे आज एवढे का दुरावले याचे मात्र दु:ख होत होते. सर्वांचे व्यवस्थित व्हावे ही माझी आंतरिक इच्छा होती आणि त्यानुसार सर्वांचे सर्वकाही व्यवस्थित झाले, आता तरी काही कारण नसताना माझ्यावर असलेला जो अविचारी राग होता तो दूर होईल ही अपेक्षा होती पण तो फोल ठरली. सर्वांनीच माझ्याशी अबोला धरला. संकटे ही भ्याड असतात ती एकटी कधीच येत नाहीत, माझ्यावर अशीच संकटाची मालिका चालू आहे आणि सोबत कोणाचीच नाही. कित्येकदा पराभव स्वीकारून मोकळे व्हावे असे वाटते पण माझ्यातील पराकोटीचा अहंकार मला तसा करू देत नाही. याच अहंकारपोटी बरेच काही गमावले असले तरी माझे जे काही अस्तित्व आहे ते त्याच्यामुळेच.
                या सगळयात एक समाधानाची गोष्ट म्हणजे इतरांचा जरी माझ्यावर राग असला तरी त्या मुलींशी असलेल्या संबंधात कधीच कटुता आली नाही. माझ्यासाठी माझा निर्णय योग्यच असल्याची ही पोच होती. नात्यामध्ये व्यवहार मला मान्य नाही, एवढेच नव्हे तर कोणताही निर्णय घेताना मी फायद्यातोट्याचा विचार कधीच करत नाही जे काही ठरवतो ते अंतःप्रेरणेने(इन्स्टिंक्टवर). कधी-कधी मलाही मी चुकतोय असे वाटते पण माझा अंतरात्मा मला क्षुल्लक फायद्यासाठी तडजोड करण्यापासून परावृत्त करतो. विश्वातील अनेक थोरामोठ्यांचा मी आदर करतो पण कधी कोणाचे अनुसरण(फॉलो) करत नाही. माझ्यासाठी माझा आत्मा हीच एकमेव शक्ती आहे जी मला कधी फसवणार नाही, चुकीचा मार्ग दाखवणार नाही आणि अगदी नकळत,चुकून झालेल्या चुकीबद्दल माफही करणार नाही. आत्म्यात परमात्म्याचा अंश असतोच त्या परमात्म्याच्या अंशाशी का होईन प्रामाणिक राहण्याचा माझा नेहमीच प्रयत्‍न राहील.
                मला कोणी दोष दिलेला मला आवडत नाही, पण म्हणून मी योग्य होतो हे सिद्ध करण्याचा फंदात मी कधीच पडणार नाही. इतरांनी माझ्याशी कसे वागावे हे माझ्या हातात नसले तरी मी इतरांशी कसे वागावे हे निश्चितच माझ्या हातात आहे. तशीच माझी एक वाईट सवय आहे माझ्याबद्दल वाईट चिंतून मला माझ्या निर्णयाचा मला पश्चाताप करावा लागेल अशी दिवास्वप्ने बघणार्‍यांची  स्वप्ने मी कधी पूर्ण होऊ देत नाही. त्यामुळे विनाकारण हेकेखोरपणा सोडून सर्वांनी पुर्वीप्रमाणे माझ्याशी प्रेमाने राहावे हे उत्तम.माझ्याशी कोणी कसेही वागले तरी मी चांगलेच वागण्याचा प्रयत्‍न करेन. अगदीच नाईलाज झाला तर त्यांच्या संपर्कात कधीच न येण्याचा प्रयत्‍न करेन कारण लोकांच्या संतापाचा स्फोट होतो तसा माझ्या संयमाचा उद्रेक होतो आणि त्या उद्रेकात कोणी भस्म झालेले मला बिल्कूल आवडणार नाही.
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!