रवींद्र नाट्यमंदिर माझ्या ऑफीसच्या लगतच आहे, एक दोनदा खाद्यमहोत्सवानिमित्त आत गेलो होतो, पण नाटक पाहायला पहिल्यांदाच चाललो होतो सोबत
संजू असल्यामुळे ओळखीचे कोणी तरी भेटणारच याची खात्री होती आणि ओळखीचे भेटलेही. तिकीटासाठी
बरीच मोठी रांग होती, बहुतेक
तिकीट भेटणार नाही असे वाटत होते पण भेटले. आमच्या मागे असणार्यांना मात्र तसेच
घरी जावे लागले. तोपर्यंत नाटकाचे खूप जास्त काही प्रयोग झाले नव्हते त्यामुळे
नाटकाविषयी फारसे काही ऐकले नव्हते. इतरांची ही तीच परिस्थिती होती पण नाटकापेक्षा
त्याच्या नाममहिम्यावर आकृष्ट होऊन बरेच जण आले असणार यात शंका
नव्हती. अर्थात आम्हीही त्यास अपवाद नव्हता पण आमचा हेतू वेगळा आणि शुद्ध होता
याबाबत शंका नसावी.
नाट्यगृह अगदीच छोटे आहे त्यामुळे स्टेज
वैगेरे काही नाही, अगदी कट्यावर बसून गप्पा मारतोय असा भास
व्हावा, आणि त्यामुळेच ते नाटकाच्या प्रकृतीला पोषक वाटत होते.
प्रत्येकजण काही ना काही अपेक्षा घेऊनच नाटक पाहायला येत असतो, इतर नाटकापेक्षा सगळ्याच बाबतीत हे काहीसे वेगळे होते. काही लोक त्यातील
स्पष्ट उल्लेख पटत नसल्याने उठुनही जात होते.मी काही तथाकथित पांढरपेशा नाही
त्यामुळे त्या शिव्या, स्पष्ट उल्लेख मला खटकत नव्हता, आम्ही दोघेही (मी भावी)कलाकार असल्याने नाटकाच्या संहितेच्या
दृष्टीकोनातून त्याचे महत्वही जाणून होतो. पण नाटक जसजसे पुढे जाऊ लागले तसा
आमचाही भ्रमनिरास होऊ लागला. असा विषय आणि तोही इतक्या मोकळेपणाने रंगमंचावर सादर
करणे खरेच कौतुकास्पद होते पण हेतू शुद्ध व्यावसायिक वाटत होता.
हे नाटक पाहून जवळपास वर्ष होत आलेय, त्यानंतर मिळत्याजुळत्या नावाची, विषयाची तीन-चार नाटके
आली.अनेक टीका करणारे लेख वाचनात आले. माझा आक्षेप त्यातील शिव्या, कधी स्पष्ट तर कधी अश्लील उल्लेखांना नाहीतर एवढे सर्व करून तिचे गुज
पुरुषांपर्यंत पोहचवण्यात आलेल्या अपयशाला आहे, व्यावसायिक दृष्टीकोण
असल्यामुळे त्यात भडकपणा जास्त जाणवतो, अगदी कोणीतरी
हैदोससारख्या पुस्तकातील उतारेच वाचतेय असे वाटत राहते.शरद करमरकरच्या माध्यमातून
जे ज्ञान द्यायचा प्रयत्न केला आहे तो अगदीच अनावश्यक वाटला.काही वेळा अज्ञानात
सुख असते याचे भान ठेवायला होते,
संहितेपेक्षा नितीमत्ता वरचढ
असायला हवी. काय कसे करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, काही अव्यक्त भावना, अज्ञात गोष्टी उलगडण्याचा मोह टाळायला पाहिजे
होता. एका पवित्र, नाजूक गोष्टीची शब्दबंबाळ व्यथा तिलाच
रक्तबंबाळ करत होती. हा पांढरपेशी धंदेवाईकपणा होता आणि त्यानंतर आलेली अशा
पद्धतीची नाटके त्याचेच फलित.विचारांना काहीतरी खाद्य मिळेल या अपेक्षेने गेलो पण
भ्रमनिरासच झाला.....
0 प्रतिक्रिया:
Post a Comment