आपल्या मुलीशी,बहिणीशी लग्न करावे अशी गळ मला अनेक नातेवाईकांनी,मित्रांनी घातली होती, त्यांचे अनंत उपकार असल्यांमुळे त्यांनी मला गृहीतच
धरले होते. त्या सर्व मुली माझ्यापेक्षा सात-आठ वर्षांनी लहान, माझ्या धाकटया बहिणीच्या वयाच्या त्यामुळे
त्यांच्याकडे पाहण्याचाही दृष्टिकोन तोच. तसेच ज्या मुलींना अंगाखांद्यावर खेळवले
आहे त्यांच्याशी लग्न करावे हा विचारसुद्धा माझ्या मनाला शिवत नव्हता. त्या सुंदर
होत्याच, शिवाय सगळ्यांची सर्व काही व्यवस्थित करून देण्याची
ऐपतही होती. त्यामुळे दुसरीकडे लग्न
ठरण्यात काही अडचण येण्याची शक्यता बिल्कूल नव्हती.मला अगदी जवळून ओळखत असल्याने तसेच त्यावेळेस त्यांना सुयोग्य वाटत असल्याने त्यांची
माझ्याकडून अपेक्षा रास्त असली तरी त्यातील इतर धोकेही मला दिसत होतेच, परिस्थिती बेताची असताना फक्त माझ्यावर भिस्त ठेवण्याचा निर्णय बिल्कूल
व्यवहार्य नव्हता. तो तसा नसायलाही हवा पण तो व्यवहार नंतर अनुभवा लागणार याची
खात्री मला होती. दुरून डोंगर साजरे, तसे त्यावेळी माझ्या
सर्व गोष्टी चांगल्या वाटत असतील तरी नंतर त्या वाटतीलच असे नव्हते. माझे
सगळ्यांशीच चांगले संबंध होते ते तसेच रहावेत अशीच माझी इच्छा होती त्यामुळे नकार
देणे माझ्यासाठी जीवघेणे होते पण नाईलाज होता. नकारामागे माझा हेतू जरी चांगला
असला तरी गैरसमज व्हायचा तो झालाच आणि त्याचा त्रासही, तोही मला एकट्यालाच नव्हे तर मातोश्रींनासुद्धा.
यथावकाश त्या सर्वजणींची लग्नकार्ये व्यवस्थित पार पडली, आणि ती पार पडेपर्यंत
थांबायचे असे मी ठरवलेच होते. अनेकांकडून विचारणा होत होती, पण बहिणीच्या लग्नाची ढाल करून नकार देत राहिलो. न जाणो काही कारणाने
एखादीचे नाहीच जमले तर... वयाच्या मानाने बराच पोक्त विचार होता, हा पोक्तपणा संस्काराने,
परिस्थितीने आणि उपजतच अंगी
होता. पण माझ्या नकाराने अनेकांच्या मनात अनेक शंकाचे थैमान घातले होते, अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. मी मात्र त्या सर्वाकडे जाणीवपूर्वक
दुर्लक्ष केले. पण काल परवापर्यंत माझा उदोउदो करणारे आज एवढे का दुरावले याचे
मात्र दु:ख होत होते. सर्वांचे व्यवस्थित व्हावे ही माझी आंतरिक इच्छा होती आणि त्यानुसार सर्वांचे सर्वकाही
व्यवस्थित झाले, आता तरी काही कारण नसताना माझ्यावर असलेला जो
अविचारी राग होता तो दूर होईल ही अपेक्षा होती पण तो फोल ठरली. सर्वांनीच माझ्याशी
अबोला धरला. संकटे ही भ्याड असतात ती एकटी कधीच येत नाहीत, माझ्यावर अशीच संकटाची मालिका चालू आहे आणि सोबत कोणाचीच नाही. कित्येकदा
पराभव स्वीकारून मोकळे व्हावे असे वाटते पण माझ्यातील पराकोटीचा अहंकार मला तसा
करू देत नाही. याच अहंकारपोटी बरेच काही गमावले असले तरी माझे जे काही अस्तित्व आहे ते त्याच्यामुळेच.
या सगळयात एक समाधानाची गोष्ट म्हणजे इतरांचा
जरी माझ्यावर राग असला तरी त्या मुलींशी असलेल्या संबंधात कधीच कटुता आली नाही.
माझ्यासाठी माझा निर्णय योग्यच असल्याची ही पोच होती. नात्यामध्ये व्यवहार मला
मान्य नाही, एवढेच नव्हे तर
कोणताही निर्णय घेताना मी फायद्यातोट्याचा विचार कधीच करत नाही जे काही ठरवतो ते
अंतःप्रेरणेने(इन्स्टिंक्टवर). कधी-कधी मलाही मी चुकतोय असे वाटते पण माझा
अंतरात्मा मला क्षुल्लक फायद्यासाठी तडजोड करण्यापासून परावृत्त करतो. विश्वातील
अनेक थोरामोठ्यांचा मी आदर करतो पण कधी कोणाचे अनुसरण(फॉलो) करत नाही. माझ्यासाठी
माझा आत्मा हीच एकमेव शक्ती आहे जी मला कधी फसवणार नाही, चुकीचा मार्ग दाखवणार नाही आणि अगदी नकळत,चुकून झालेल्या चुकीबद्दल माफही करणार नाही.
आत्म्यात परमात्म्याचा अंश असतोच त्या परमात्म्याच्या अंशाशी का होईन प्रामाणिक
राहण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील.
मला कोणी दोष दिलेला मला आवडत नाही, पण म्हणून मी योग्य होतो हे सिद्ध करण्याचा फंदात मी कधीच पडणार नाही.
इतरांनी माझ्याशी कसे वागावे हे माझ्या हातात नसले तरी मी इतरांशी कसे वागावे हे
निश्चितच माझ्या हातात आहे. तशीच माझी एक वाईट सवय आहे माझ्याबद्दल वाईट चिंतून
मला माझ्या निर्णयाचा मला पश्चाताप करावा लागेल अशी दिवास्वप्ने बघणार्यांची स्वप्ने मी कधी पूर्ण होऊ देत नाही. त्यामुळे
विनाकारण हेकेखोरपणा सोडून सर्वांनी पुर्वीप्रमाणे माझ्याशी प्रेमाने राहावे हे
उत्तम.माझ्याशी कोणी कसेही वागले तरी मी चांगलेच वागण्याचा प्रयत्न करेन. अगदीच
नाईलाज झाला तर त्यांच्या संपर्कात कधीच न येण्याचा प्रयत्न करेन कारण लोकांच्या
संतापाचा स्फोट होतो तसा माझ्या संयमाचा उद्रेक होतो आणि त्या उद्रेकात कोणी भस्म
झालेले मला बिल्कूल आवडणार नाही.
0 प्रतिक्रिया:
Post a Comment