एखाद्या गोष्टीची टंचाई निर्माण झाली की त्या गोष्टीचे भाव गगनाला भिडतात.
ती गोष्ट आपल्याकडे असेल तर अपेक्षेपेक्षा जास्त भाव मिळेल या आशेने किंवा
इतरांच्या सांगण्यावरून त्या गोष्टीचा भाव नको इतका ताणून
धरतो. आपण फक्त जास्त फायद्याचाच विचार केला तर इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होणे
ओघानेच आले. आपल्या मालाची गुणवत्ता, तो नाशवंत आहे याची जाणीव, नवीन
मालाची आवक, बाजारातील घडामोडी
इत्यादी गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि अनपेक्षित मिळालेली संधी गमावून बसतो आणि शेवटी एकतर आपल्याला तो माल आहे त्या पडेल
बाजारभावात विकावा लागतो नाहीतर तो खराब झाला असल्यास नाइलाजाने फेकून द्यावा
लागतो.
अहो नाही मी कांद्याबद्दल नाही बोलत, मी माझ्याबद्दलच बोलतेय. मी २७ वर्षाची एक तरुणी चारचौघींसारखी आणि
स्वप्नेही तशीच. कोणी विशेष दखल घ्यावी असे काही नाही तरी आज मला बोलायचेय. आईच्या
वयाच्या २७ व्या वर्षी आम्हा तिन्ही भावंडांचा जन्म झाला होता आणि माझ्या वयाच्या सत्ताविसाव्यावर्षी आता कुठे वरसंशोधन चालू आहे.
पुर्वी मुलीच्या जन्माबरोबर
तिच्या लग्नाची चिंता जन्माला यायची. मुलगी वयात यायच्या
अगोदरच तिच्या लग्नाच्या जबाबदारीतून कधी मुक्त होऊ याची चिंता आई-बाबांना लागायची
कारण जाणते-अजाणतेपणी मुलीचे वाकडे पाऊल
पडेल वा एखादी अनुचित घटना घडेल याची
सतत टांगती तलवार असायची. घराण्याच्या असलेल्या-नसलेल्या इज्जतीचा संबंध
स्रीयांच्या चारित्र्याशी जोडलेला जो आहे. त्या पारंपारिक मानसिकतेमध्ये, अनामिक भितीमध्ये अजून बदल झाला नसला तरी, स्री-पुरूष
गुणोत्तराच्या प्रचंड तफावतीमुळे आज उपवर मुलींचे आणि
त्यांच्या पालकांचे महत्व प्रचंड वाढले आहे आणि अपेक्षाही. आमचेही तसेच आहे, आई-बाबांच्या असल्यातरी माझ्या मात्र खास अशा काही अपेक्षा नाहीत.
दोन वर्षापूर्वी ताईचे लग्न झाले तोपर्यंत
माझ्या लग्नाविषयी मी कधी विचार केलाच नव्हता, तशी कधी गरजही पडली
नाही सगळे महत्वाचे निर्णय बाबाच घेतात ना. ताईचे लग्नही त्यांनी कसे थाटामाटात
केले. ताई शिक्षिका आहे.दोन-तीन वर्षापासून तिच्यासाठी वरसंशोधन चालू होते पण कुठे
काही ना काही कारणाने अडचणी येत होत्या. त्यातील बर्याच स्थळांना बाबांनीच नकार
कळवला होत्या पण शाळेत ताईचे कुणाबरोबर तरी सूत जुळतेय याची कुणकूण लागताच लगेच
एका स्थळाला होकार कळवला आतापर्यंत त्यापेक्षा कितीतरी सरस स्थळे नाकारली होती.
खरे तर कोणत्याही बाबतीत तो ताईला शोभत नव्हता पण नाईलाज होता. बाकी काही नसले तरी
मुलगा डॅशिंग असावा एवढी तरी बर्याच जणींची इच्छा असते पण हा अगदीच किरकोळ होता.
त्याने कितीही सुसंस्कृतपणाचा चेहर्यावर आव आणला तरी त्याचा बालिशपणा लपतालपत
नव्हता स्पष्ट सांगायचे तर एकदम चिरकूट वाटायचा पण आता ताईचा नवरा म्हणून
रिस्पेक्ट तर द्यायला हवा ना अगदी घरातील सर्वांनीच, पण आता दोन वर्षानंतर
त्याच रिस्पेक्टची चीड येऊ लागली आहे. बाबा प्रत्येक बाबतीत त्यांचा सल्ला का
घेतात हे अनाकलनीय होते कालही तसेच झाले.
. मी एका माहिती-तंत्रज्ञान
क्षेत्रातील नामांकित ऑर्गनाइज़ेशन मध्ये काम करते.आज मला जो पाहायला येणार आहे ना
तो सुद्धा याच क्षेत्रातील असल्यामुळे तीन-चार वेळा कांदापोह्याचा कार्यक्रम झाला
असला तरी आज पहिल्यांदाच येणार्या मुलाबद्दल उत्सुकता होती. त्याला पुन्हा मुंबईला
जायचे असल्याने जाता जाता तो एकटाच मला पाहून जाणार होता. ठरल्याप्रमाणे चार वाजता
तो आमच्या एका नातेवाईकसोबत आला.बाहेर बाबा
जावयासोबत तर आत स्वयंपाकघरामध्ये ताई-आई व मी होतो. अपेक्षेप्रमाणे समीर माझा
छोटा भाऊ घरात नव्हताच. चहा आणि पोहे ताईनेच बनवले होते. आई सर्वांना चहा घेऊ
बाहेर सोबत ताई गेली. माझे सारे लक्ष दोघींच्या हावभावाकडे होते. पण दोघींच्या
हावभावावरुन काहीही तर्क बांधाता आला नाही. दोघी आत आल्यावर ताईने विशेष उत्सुकता
दाखवली नसली तरी आई जास्त उत्सुक वाटत होती. थोड्यावेळाने बाबांनी मला हाक मारली.
पहिलीच वेळ नसली तरी छातीत धडधड वाढली होती. मी पोहे घेऊन बाहेर आली अर्थात ताईने
बनवलेले. त्याच्यासह सर्वांना पोहे दिले पण त्याला पाहायला नाहीच जमले. खाली मान
घालून मी त्याच्या समोर बसली होती. बाबांनीच माझ्याबद्दल बोलायला सांगितले. आता
मान वर करण्याची संधी मिळाली.
माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. माझ्या
स्वप्नातसुद्धा नसलेल्या राजकुमारपेक्षाही राजबिंडा होता तो. आजूबाजूच्या सर्व
गोष्टीचा मला विसर पडला समीर कधी आलाय हेही माझ्या लक्षात नाही आले. पाहताक्षणीच
मी त्याच्या प्रेमात पडले माझ्या आवाजातील कंपनातून ते जाणवतही होते त्याच्याही
कदाचित हे लक्षात आले असेल.तोही एकटा असल्याने थोडा भांबावला होता,त्याची ओळख करून देताना त्याने त्याचे नाव सांगितलेच नाही पण कार्यक्रम
संपल्यानंतर तो स्वत:ची पूर्ण माहिती मेलवरून द्यायला व माझी माहिती घ्यायला
उत्सुक होता पण ताईच्या नवर्याने त्याची काही गरज नाही म्हणून नकार दिला. त्याला
ते कदाचित आवडले नसावे पण त्याच्याकडेही काही पर्याय नव्हता. त्याला माझ्याबद्दल
काहीच माहिती नव्हती आणि गोंधळल्यामुळे कदाचित माझे नावही विसरला असेल असे
त्याच्या हावभावावरून जाणवत होते.एकंदरीत प्रत्येक बाबतीत मला सरस होता, आमच्याकडून नकार द्यावा असे काहीच नव्हते, मी तर अगदीच हुरळून
गेले होते पण त्याचा होकार आहे नाही हे काही त्याच्या हावभावावरून समजून येत
नव्हते म्हणून जोपर्यंत त्याचा होकार येत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल काहीही
विचार करायचा नाही असे ठरवले होते उगीच नकार असेल तर वाईट वाटायला नको. पण झाले
सगळे उलटच,कोणी मला माझी पसंती विचारालीच नाही. बाबांचा
होकार असला तरच माझ्या पसंतीच विचार केला जाणार होता.
सासरे जावयांचा बराच खल झाल्यानंतर नकार
द्यायचा ठरवला होता कारण त्याचे मुंबई किंवा पुण्यात घर नव्हते. का कोणासठाऊक
चिरकुटचा( ताईचा नवरा आज तो माझ्या मनातून पूर्ण उतरला,आजपासून माझ्यासाठी तो चिरकूटच) त्यास इतका टोकाचा विरोध का होता? माझ्या प्रमाणे आईसुद्धा होकारासाठी आग्रही
होती आश्चर्य म्हणजे घरात कशातच ढवळाढवळ न करणार्या समीरलाही तसेच वाटत होते
त्याने स्पष्ट बोलूनही दाखवले पण आमचे ऐकतो कोण. थोड्यावेळाने त्याच्यासोबतच्या
नातेवाईकाने त्याचा प्राथमिक होकार आहे असे फोन करून कळवले त्यामुळे मला जास्तच
वाईट वाटले कारण त्याला आमच्याकडून कसलाच प्रतिसाद जाणार नव्हता त्यामुळे तो आमचा
नकार समजणार हे उघडच होते पण तो मला अगदी मनापासून आवडलाय हे त्याच्यापर्यंत
पोहचणार नव्हते.माझीही काही मते आहेत,माझ्याही काही अपेक्षा
आहेत याची मला जाणीव झाली. दोघांनाही एकमेकांबदद्ल काहीही माहीत नसले तरी
काहीतरी चमत्कार होऊन तो भेटेल अशी वेडी आशा वाटतेय. पुढचे स्थळ कितीही चांगले असले तरी मी मात्र निश्चित नकार देणार आहे आजच्या नकाराचा निषेध म्हणून.....
0 प्रतिक्रिया:
Post a Comment