Ads 468x60px

Sunday, February 2, 2014

औट घटकेची सुटका!!!


            दिवस मावळतीला निघाला होता आणि पशु-पक्षी आपल्या घरट्याकडे. मी ही शेतातील थोडे फार काम संपवून घरी आलो होतो. मलाही घाई झाली होती स्वत:च्या घराकडून स्वत:च्या घराकडे जाण्याची, पटापट तयारी करून फॉर्चूनर घेऊन मुंबईकडे जायला निघालो. लहान असताना कधीतरी धुरळा उडवत येणारी गाडी पाहिली की आपणही मोठेपणी अशाच एखाद्या गाडीतून धुरळा उडवत जाऊ असे वाटायचे पण आता ते शक्य नव्हते आता सगळे रस्ते चकाचक झाले होते. गाव ओलांडून थोडा पुढे गेलो तर एक आजी-आजोबा बस थांब्यावर एसटीची वाट पाहत थांबले होते, पण शेवटची एसटी गेल्यामुळे मिळेल त्या गाडीने जाऊ असा विचार करून ते माझ्या गाडीला हात करत होते. नेहमीप्रमाणे मी वेगानेच गाडी चालवत होतो, इतरांच्याप्रमाणेच मीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्याच वेगाने पुढे निघून गेलो. कोणाला लिफ्ट द्यायला ती काही सार्वजनिक मालमत्ता थोडीच होती.

            आजी-आजोबांना ओलांडून एक-दोन किलोमीटर पुढे आलो पण त्या दोघांची छबी माझ्याडोळ्यासमोरून जात नव्हती उलट ती जास्तच क्लेशदायक वाटू लागली. शेवटी काहीही विचार न करता सरळ गाडी माघारी फिरवली. खूप लांब नाही अगदी सहा महिन्यापुर्वी आमचीही हीच अवस्था होती, आम्हीही असेच लाल डब्ब्याची वाट पहात तासनतास उभा राहत असे आणि आज त्याचा आम्हाला विसर पडला हे खरोखर लज्जास्पद होते. मी पुन्हा यू टर्न घेऊन आजी आजोबांना गाडीत घेतले. मनावरचे ओझे एकदम कमी झाले. त्यांना कुठे जायचे ते विचारले तर त्यांना काळेवाडीला जायचे होते पण सासवडला सोडले तरी चालणार होते पण मला तसेहि पुढे जायचे होते त्यामुळे मी तुम्हाला काळेवाडीला सोडतो फक्त कुठे उतरायचे ते सांगा म्हणालो कारण काळेवाडी, ढुमेवाडी यामध्ये नेहमी माझा गोंधळ उडतो. आता गाडी जरा कमी वेगाने चालवणे भाग होते, " कुठल्या गावचा बाळ तू" आजोबा अनोळखी असले तरी प्रश्न अपेक्षितच होता. थोडा विचार केला आजोबांचे पुढचे काय प्रश्न असतील हे ही लक्षात आले आणि ठरवले त्यांच्या सर्व न विचारलेल्या प्रश्नांचीसुद्धा उत्तरे द्यायची. तसे प्रश्न विचारलेले मला आवडत नाही. सात-आठ मिनिटे होती तेवढेच माझेही मन हलके होईल.

            मी याच गावचा गेल्या सात-आठ वर्षापासून मुंबईला असतो, कंप्यूटर इंजिनियर आहे पण याच वर्षी नोकरी सोडली आहे.सर्व सरळ मार्गी प्रयत्न करून देखील काहीच मनासारखे होत नव्हते, पण चुकीचे काही करायला मन तयार नव्हते. शेवटी सोडली नोकरी कारण तिच्यामुळेच माझ्या अनेक आवडत्या गोष्टींना मुरड घालावी लागत होती आणि तिचा जास्त काही फायदाही होत नव्हता खाऊन-पिऊन सुखी एवढेच. तेवढ्या पगारात कोणी मुलगी द्यायला देखील तयार नव्हते. मला माझ्यापेक्षा लोकांसाठी काहीतरी चांगले करायचे होते. नोकरी सोडली पण पुढे काही करायचे ते निश्चित नव्हते. महिना-दोन महिने पुरतील एवढे पैसे होते ज्यासाठी मुंबईला आलो होतो त्यासर्व गोष्टी करायच्या ठरवल्या. स्वत:चे पोट भरण्याची कला प्रत्येकाकडेच असते माझ्याकडे निश्चितच इतरांपेक्षा ती जास्त असेल त्यामुळेच सगळे काही अनपेक्षितपणे मनासारखे होऊ लागले. हे आधीच केले असते तर असा विचार मनात आला पण त्या अनुभवाची जी शिदोरी मिळाली ती पुढील आयुष्यात निश्चित उपयोगी पडणारी आहे. सध्या माझे तरी खूप छान चालले आहे.घरी आई वडील आहेत, चार-पाच एकर शेती आहे. आठ-पंधरा दिवसांनी येतो शेतीची खूप आवड आहे पण जास्त काही करत नाही बरे वाटते आईला भेटल्यावर जेवढा आनंद भेटतो तेवढाच आनंद होतो पण हा आनंद आता थोड्या दिवसांचा.... पुढेचे शब्दच फुटेनासे झाले जणू अश्रुसोबत शब्दही थिजले.     

            बाळ असे बोलू नये, थोड्या दिवसाचा का?आजोबांनी मिनिटभराच्या शांततेचा भंग करत विचारले. आजोबा ती माझी वडीलोपार्जित जमीन असली तरी कायद्याने त्यावर वडिलांप्रमाणे आत्यांचा,बहिनींचा हिस्सा आहे आणि त्या तो घेणारच आहेत. मला ते पटत नसले तरी माझा त्याला विरोध नाही तसेच त्याबदल्यात जमिनीचा मोबदला देणे माझ्या आवाक्यात नाही त्यामुळे ती जमीन जाणारच आहे. "अरे मग एखादा तुकडा विकून त्यांना दे काही हिस्सा काहीच न राहण्यापेक्षा थोडी तरी शिल्लक राहील." आजोबांचा अजून एक सल्ला. आजोबा बरोबर आहे तुमचे पण ही जमीन माझी आई आहे तिला विकण्याचे पाप  मी नाही करू शकणार नाही भले सगळी जमीन गेली तरी चालेल पण अशी भडवेगिरी करायला मला जमणार नाही. आता आजोबांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, भिजलेल्या शब्दात आजोबा म्हणाले "बरोबर आहे,पोरा ही घरोघरची कहाणी आहे मी सुद्धा त्याच कारणासाठी माझ्या मुलीला भेटायला चाललोय बघू काही ऐकले तर ऐकले. मलाही एकुलता एक मुलगा आहे तोही तुझ्यासारखाच आहे पण मलाच हे मान्य नाही. कायदा गाढव असतो हेच खरे. आजोबा कायदा कधी गाढव नसतो आपण त्याला तसा बनवतो. कायदा सर्वसामान्यसमाजासाठी अन्यायाविरोधात लढण्यासाठी सर्वात शक्तिमान शस्र आहे पण आपण त्याचा गैरवापर करतो इतकेच.एव्हाना आम्ही काळेवाडीला पोहचलो, आजोबांनी ३० रुपये दिले इतरवेळी असे कोणी पैसे देण्याचा प्रयत्‍न केला असता तर खूप राग आला असता पण आता माझ्या स्टेटसपेक्षा आजोबांचा स्वाभिमान जास्त वरचढ होता आणि तो मला दुखावायचा नव्हता. आजोबांचा निरोप घेऊन मी पुढच्या प्रवासाला निघालो. 

            खूप एकटेपणा जाणवू लागला, कोणीतरी जोडीला असायला हवे होते असे तीव्रतेने वाटत होते. माझा आवडता मुंबई-पुणे प्रवास आज जीवघेणा वाटू लागला होता. इतरांना भले मी स्थितप्रज्ञ वाटत असेल पण एकांतात मनाचे बुरूज क्षणात असे काही कोसळतात की ते सावरताना भरलेल्या जखमा पुन्हा ठसठसू लागतात. स्मृतिपटलावर कोरलले त्यागाचे क्षण गडद होऊ लागले होते. प्रत्येक गोष्ट नेहमी हसत मुखाने स्विकारली त्यामुळे मला सर्वजण गृहीतच धरत गेले आणि माझा हरएक त्याग सुद्धा.सर्वजण जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते तेव्हाही आणि आता काही का होईना असताना मी काय कमावले हेच बघतात पण मी काय-काय आणि कसे गमावलेय ह्याचा विचारसुद्धा कोणाच्या मनात येत नाही. मनात आले तर पुन्हा सर्वकाही क्षणात मिळवू शकतो पण आता खूप पुढे आलो आहे, आता पुन्हा त्याच गोष्टीत मला अडकायचे नाही......

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!