आमचा कोणालाही विरोध नाही. आम्ही सत्य, अहिंसा, समता, स्वातंत्र्यता, न्याय या उच्च मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारे आहोत. पण ही मूल्ये पायदळी तुडवणारे यांना आमचा तीव्र विरोध असेल. कारण एक मूल्ये एकतर्फी जपली जाऊ शकत नाही आणि ती एकतर्फी जपण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न मूल्ये जपणाऱ्याच्या आणि एकूणच सर्वसमाजाच्या अधःपतनाला, दुर्दशेला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून जे मतलबी, कृतघ्न, खोटारडे, विश्वासघातकी, गद्दार, ढोंगी, पाखंडी, समाजद्रोही, वर्चस्ववादी, विषमतावादी, हिंस्त्र, अन्यायी आहेत त्या सर्वांना आणि अनैतिक, बेकायदेशीर, अन्यायकारक गोष्टींना आमचा ठाम विरोध आहे.
आमचा परप्रांतियांना विरोध नाही.
तुम्ही पोटापाण्यासाठी तुमचे सर्वस्व सोडून आला आहात, काम करा आणि आपला उदरनिर्वाह करा पण इथे येऊन आमच्यावर वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करु नका. तुम्ही आमच्या ताटातील दोन घास खात आहात आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण आमचे ताटच जर हिसकावून घेणार असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही.
आमचा अमराठींना विरोध नाही.
तुम्ही वर्षा दोनवर्षांसाठी महाराष्ट्रात पोट भरायला आला आहात तर मराठी शिकायलाच हवं, मराठीत बोलायलाच हवं असे काही नाही पण तुम्ही पिढ्या अन् पिढ्या इथे राहणार आणि मराठी शिकणार नाही, बोलणार नाही आणि उलट मराठीला कमीपणा दाखवणार, मराठी लोकांशी उर्मटपणाने वागणार हे चालणार नाही.
आमचा कोणत्याही उद्योगपतींना विरोध नाही.
तुम्ही उद्योगधंदे उभारा, अमाप संपत्ती कमवा आमची हरकत नाही पण तुम्ही ताकदीच्या जोरावर कायद्यातील पळवाटा काढून नैसर्गिक साधन संपत्तीची वाट लावणार असला, राष्ट्रीय संपत्ती लुबाडणार असेल तर ते आम्हाला चालणार नाही. तुम्ही सार्वजनिक संपत्ती लुबाडून उभ्या केलेल्या साम्राज्याचे सर्वसामान्य जनतेला गुलाम बनवलेले आम्हाला चालणार नाही.
आमचा कोणत्याही संघटनेला विरोध नाही.
तुम्ही समाजात जागरूकता निर्माण करा. लोककल्याणासाठी सरकारवर दबाव टाका, आम्ही तुमचे स्वागत करू. पण लोकांची दिशाभूल करून, त्यांच्या खऱ्या प्राथमिकता बाजूला ठेवून, त्यांना वांझोट्या गोष्टीत गुरफटवून राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेले आम्हाला चालणार नाही.
आमचा कोणत्याही विचारसरणीला विरोध नाही.
तुम्ही तुमच्या विचारांचे उदात्तीकरण करा, प्रचार-प्रसार करा – आमची हरकत नाही. पण कावेबाजपणा करून आमच्या तरुण पिढीचे वर्तमान उद्ध्वस्त करणे आणि भविष्य अंधकारमय करणे आम्ही कधीच खपवून घेणार नाही.
आमचा कोणत्या नेत्याला विरोध नाही
तुम्ही अखंड विश्वाचे नेते व्हा, देशात कायदा-सुव्यवस्था व लोककल्याणकारी राज्य प्रस्थापित करा–आम्ही समर्थन देऊ. पण सत्ता टिकवण्यासाठी 'फोडा आणि राज्य करा' ही युक्ती वापरून समाजात फूट पाडलेली, यादवी माजवलेली आणि अशांतता पसरवलेली आम्हाला चालणार नाही.
आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही.
तुम्ही जगातील सर्वात मोठा पक्ष व्हा, कायम सत्तेत राहा – आमची हरकत नाही. पण भांडवलदारांची दलाली करून सर्व साधनसंपत्तीचे केंद्रीकरण करून, जनतेला देशोधडीला लावून, समाजकल्याणकारी व्यवस्था उद्ध्वस्त करून, सर्वसामान्यांना भांडवलदारांचे गुलाम करण्याच्या तुमच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र विरोध करू.
आमचा कोणत्याही देशाला विरोध नाही.
तुम्ही स्वतःच्या देशाची प्रगती करा किंवा त्यात अनागोंदी माजवा आम्हाला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. पण आमच्या देशात छुप्या कारवाया, भेकड हल्ले करणे, देशाच्या स्वातंत्र्यावर आणि स्वायत्ततेवर आक्रमण करणे आम्ही कदापी सहन करणार नाही.
आमचा कोणत्या व्यक्तीला विरोध नाही
तुम्ही इतरांना हानी न पोहोचवता स्वतःचे जीवन जगण्याचा उपभोग जरूर घ्या पण तुम्ही तुमच्या व्यक्तिस्वातत्र्यांचा उपभोग घेतना दुसऱ्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्रमण करणार असाल तर ते खपवून घेतले जाणार नाही.
आमचा कोणत्या जातीला विरोध नाही.
तुम्ही तुमच्या जातीचा अभिमान बाळगा, थोरवी गा, एकत्र येऊन प्रगती करा त्यासाठी काही हरकत नाही.पण फक्त 'या जातीत जन्मलो म्हणून मी श्रेष्ठ' असा दावा करून इतरांना कमी लेखणे, कंपुशाही करून फक्त आपल्याच जातीतील लोकांना संधी देऊन बाकीच्यांना संधीपासून दूर ठेवणे हे आम्ही सहन करणार नाही.
आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही.
धर्माने माणसाला चांगले आचरण, नैतिकता आणि न्यायाने जगण्याचे मार्गदर्शन करावे. 'वसुधैव कुटुंबकम्' या तत्त्वाने प्रेम, बंधुभाव, सुख-शांती पसरवावी – आम्ही त्याचे स्वागत करू. पण धर्माच्या नावाने भेदाभेद, हिंसा आणि अशांतता पसरवली जाईल, तर असा धर्म आम्हाला मान्य नाही.
आमचा कोणत्याही धर्माच्या ठेकेदाराला विरोध नाही.
तुम्ही तुमच्या धर्माच्या श्रेष्ठत्वाचे गुणगान गा, त्याचा प्रचार, प्रसार करा – आम्हाला हरकत नाही. पण सर्वसामान्य लोकांच्या गरिबी, आजार, बेरोजगारी, भावनिक असुरक्षिततेचा गैरफायदा घेऊन त्यांना भीती, आमिष दाखवून, चमत्काराच्या नावाने हातचलाखी करून लुबाडणे आम्ही कधीच चालवून घेणार नाही.
संतोबा...
0 प्रतिक्रिया:
Post a Comment