Ads 468x60px

Thursday, December 26, 2013

यंदा कर्तव्य आहे --१) पार्श्वभूमी


                आम्हाला आजपर्यंत सर्व गोष्टी अपेक्षेपेक्षा जास्त मिळाल्या आहेत, फक्त वेळेवर नाही मिळाल्या हीच काय ती शोकांतिका. ज्यांची दिवा लावायची ऐपत नसते अशा लोकांना सुद्धा वंशाला दिवा हवा असतो, आमचे तर राजघराणे. आमच्या थोरल्या मातोश्रींना पुत्ररत्न  प्राप्त झाले नाही त्यामुळे समस्त आप्तपरिवार चिंतेने ग्रासला होता. राजघराण्याला वंशज तर हवाच, घराण्याची बहुपत्नीत्वाची परंपरा असली तरी पिताश्रींचा पुनर्विवाहास विरोध होता. पण घरातील थोरा-मोठ्यांच्या आग्रहाने विरोध मावळलाच, तो मावळायलाच हवा होता नाहीतर अस्तंगत होऊ लागलेल्या राजघराण्यास राजपुत्र कसा लाभणार.                 
                 दुसरया विवाहानंतरही बरीच वर्षे उलटली तरी अजून राजपुत्राच्या आगमनाची चाहूल नव्हती. नवस सायास,उपासतापास सर्व झाले पण सर्व व्यर्थ. एखाद्या अलौकिक गोष्टीचे साक्षी व्हायचे तर एवढी वाट तर बघावीच लागणार ना? तब्बल एका तपाच्या जीवघेण्या प्रतीक्षेनंतर सर्वांना हवीहवीशी वाटणारी गोड बातमी आली. राजघराण्यास वंश लाभला. सर्व आसमंतात आनंद पसरला, चार दिवस ढ़गाआड लपलेल्या सुर्यनारायणाने आपल्या सोनेरी किरणांची बरसात हिरवागार शालू परिधान केलेल्या धरीत्रीवर केली. आदल्या रात्री विजांच्या भयावह कडकडाटासह कोसळणारा मुसळदार पाऊस एकदम थांबला होता, जणू काही आपली एखादी अमूल्य ठेव दुसर्‍याची हाती स्वाधीन करून तो निशब्द झाला होता.शनिवार २१ जुलै १९८४ इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा हा दिवस, पण कोणी कुठेच नाही लिहून ठेवला. कदाचित तो दिवस जन्माने नव्हे तर कर्तुत्वाने लिहिला जावा अशीच नियतीची इच्छा असावी.
                राजपुत्रच तो, त्याची प्रत्येक गोष्ट राजकुमारासारखीच असणार, दिसण्यालाही अपवाद कसा असणार? प्रत्येकाची राजपुत्राला पाहण्याची इच्छा होती, मात्र राजपुत्राच्या आजींनी कोणाची इच्छा पुरी होऊ दिली न जाणो कोणाची नजर लागायची. आजीबाईंच्या या पवित्र्याने हेल (पाण्याची कमतरता असल्याने बाळंतिणीच्या घरी पाणी भरण्याची परंपरा) घालणार्‍या स्रियां विशेषतः नाराज व्हायच्या पण आजीबाईंनी त्यांची कधी पर्वा केली नाही.  सावत्रपणा आणि दुजाभाव हे नात्याच्या दृष्टीने समानार्थी शब्द म्हणायला हवेत, पण अनेक सावत्र नाती राजपुत्रास लाभली असली तरी सावत्रपणाचा लवलेशही कोणत्याच नात्यात नव्हता. नजर लागू नये म्हणून दुनियेपासून लपवून ठेवणार्‍या सख्या आजीपेक्षा राजपुत्राच्या गोष्टी सांगणार्‍या सावत्र आजीकडे जास्त ओढा होता. संसाररूपी भवसागर पार  करण्यासाठी सक्षम बनविण्याचा प्रयत्‍न करणार्‍या आईपेक्षा जरा काही झाले की दृष्ट काढणारी सावत्र आई जास्त जवळची वाटायची. तसेही राजपुत्राच्या दृष्टीने कोणी सख्खे-सावत्र असा भेदभाव नव्हताच मातोश्रींचे तसे संस्कारच होते. कालऔघात सर्व वैभव,मानमरातब नष्ट झाले नावातून पाटील आणि जातीतून क्षत्रिय ही नष्ट झाले होते. वंशावळ लिहिण्याची क्षत्रियांची परंपराही शेवटच्या घटका मोजत होती.
                ज्या गोष्टीसाठी वारस हवा त्या गोष्टींचा वारसा राजपुत्राला मिळण्याची शक्यता धुसर होत चालली होती. पण राजपुत्राला असल्या कोणत्याच गोष्टीची कधी खंत वाटली नाही, जे काही मिळवायचे होते ते स्वत:च्या कर्तुत्वावर.गेलेले राज्य,वैभव,प्रतिष्ठा परत मिळवायची तर राजधानीत राहून कार्य करण्यावाचून दुसरा पर्याय नाही हे राजपुत्राच्या अगदी लहानपणीच लक्षात आले होते. त्यादृष्टीने शिक्षण संपल्याबरोबर त्यांनी राजधानीकडे प्रस्थान.केले मात्र सात वर्षाच्या वास्तव्यानंतरही विशेष असे काही हस्तगत करता नाही आले. सोबतीचे त्यांच्या दृष्टीने प्रगती करत असताना राजपुत्राची गाडी मात्र वेड्याध्येयाचा आशेने एकाच ठिकाणी रुतुन बसली होती. सोबतच्या इतरांनी घरदार,गाड्या घेऊन थाटून संसार थाटला होता. मात्र राजपुत्राला जग जिंकण्याची इच्छा असताना टू-बीएच-केच्या झोपडीत त्या स्वप्नांना बंदिस्त करायचे नव्हते. पण खर तर राजपुत्राला दुनियादारी कळलीच नाही.
                राजपुत्र उपवर झाल्यापासून मातोश्रींची चिंता वाढली होती, आधी आपल्या राजबिंड्या राजपुत्रास तशीच तोलामोलाची राजकन्या भेटेल कीं नाही चिंता होती. पण परिस्थितीत प्रचंड बदल घडला होता गुणांची जागा धनाने घेतली होती, प्रामाणिकपणा,एकनिष्ठता इ. अनेक गुण हद्दपार झाले होते त्यांची जागा गाडी-बंगला-पगार इत्यादीने घेतली होती. त्यामुळे आता मातोश्रींना सून तरी भेटेल की नाही याची चिंता लागली होती. राजपुत्राने आपल्या ध्येयात संसाराचा अडथळा नको म्हणून काही वर्षे चालढकल केली पण आता सर्व भगिनींची कर्तव्ये पार पाडल्यानंतर काही कारणेशिल्ल्क राहिली नव्हती आणि राजपुत्रालाही आपल्या कर्तव्याची,जबाबदारीची जाणीव होऊ लागली होती. राजपुत्राचीही संसाराबद्दल बरीच स्वप्ने,इच्छा होत्या तश्या अनेक सुवर्णसंधीही मिळाल्या होत्या पण त्या सर्व राजपुत्राने ठोकारल्या कारण राजपुत्र कधी स्वत:साठी जगत नाही. पण आता मातोश्रींच्या इच्छेखातर राजपुत्र बोहल्यावर चढायला तयार झाले.
                या कसोटीच्या क्षणी राजपुत्राच्या मनात अनेक वादळे उठली होती पण यामध्ये नक्की यशस्वी होऊ याची खात्री होती. कारण अनेकांचे प्रेम,आशीर्वाद याचा त्यांस लाभ झाला होता त्यातील आज जवळ नसलेले चेहरेच राहून राहून आठवत होते.कितीही संकटे आली तरी त्याला बिनधास्त सामोरे जाताना, काही आनंदाच्या गोष्टी घडत असताना, जरा काही झाले की दृष्ट काढणार्‍या थोरल्या मातोश्री कमल बबन गांजुरे, राजपुत्राच्या गोष्टी सांगणारी आजी श्रीमती गंगुबाई बाबुराव गायकवाड, नजर लागू नये म्हणून इतरांपासून लपविणारी आजी लक्ष्मीबाई तुकाराम गांजुरे, राजपुत्राने जन्म घेतला हेच मोठे कर्तव्य असे मानणारे व त्याचा अभिमान असणारे आजोबा तुकाराम महादेव गांजुरे. सतत लोकांपासून दूर ठेवल्यामुळे सशाप्रमाणे भित्रा बनू लागलेल्या राजपुत्राला वाघाप्रमाणे बेडर बनवणारे आजोबा नारायण आबा गायकवाड यांची आठवण नेहमीच व्हायची. आज यापैकी कोणीही आपल्यात नसले  तरीपण त्यांची आठवण राजपुत्रास नेहमी व्याकुळ करते, पण कोणाला अशा गोष्टी सांगताही येत नाही. पाण्यातील माशाचे अश्रू कोणाला दिसत नाहीत असे म्हणतात तेच खरे. राजपुत्र  या सर्वांचा नेहमीच ऋणी राहीन.........

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!