Ads 468x60px

Sunday, July 21, 2013

मी एक राजपुत्र.......

                मित्रा, मी इतक्या दूरवरून फक्त तुझ्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी आलो होतो. पण तुला तुझ्या यशापेक्षा माझ्या क्षणभंगूर अपयशाचा एवढा आनंद व्हावा याचे मला आश्चर्य वाटतेय? आणि मी अपयशी झालोय हे फक्त तुम्हाला वाटतेय, तुला माझी आणि मला तुझी काय स्वप्ने आहेत ती माहीत नाहीत का?. माझी स्वप्ने चार-चौघांसारखी नाहीत, खरेतर माझे स्वप्न एक वेडेपणाच आहे पण अजूनही मी त्या वेडेपणाला चिकटून बसलो आहे. तू मात्र तुझ्या स्वप्नांत गरजेप्रमाणे हवा तसा फेरफार करून जिंकल्याचा जल्लोष करतोय, अर्थात त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाहिये, फक्त काही करून तू खुष असावे एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. दु:ख याचेच वाटते की, तू माझा जिवलग मित्र आहेच शिवाय तुला माझे ध्येय व त्यासाठीचे माझे प्रयत्न त्याग याची पूर्ण जाणीव आहे तरीसुध्दा तू मला दोष देत आहेस. पण कधी-कधी असेही वाटते की मला एवढ्या भरभरून संधी मिळत असताना देखील मी माझ्या ध्येयाला चिकटून आहे म्हणून तर तुम्हा सर्वांचा जळफळाट होत नाहीये ना?.

                चांगली नोकरी,सुंदर बायको, टू बीएचके फ्लॅट एवढी सामान्य स्वप्ने दोघांचीही नव्हतीच. याचा अर्थ या गोष्टी आपल्याला नको होत्या अशातला भाग नाहीये, तू त्या मोठ्या कष्टाने,स्वकर्तुत्वाने मिळवल्यात त्याचा मला खरेच खूप अभिमान आहे, पण आपली ध्येय गुंडाळून त्या पूर्ण कराव्यात असे मला वाटत नव्हते. मलाही या गोष्टी आज ना उद्या मिळतील मला कसलीच घाई नाहिये. कारण त्या मिळणारच आहेत,त्याबरोबरच मला ध्येयही गाठता येईल याची मला पूर्ण खात्री आहे म्हणून. पण मी त्या दृष्टीने काहीच हालचाल वा प्रयत्न करत नाही ह्या आरोपाशी मी बिल्कुल सहमत नाहीये, उलट ही एक कठोर तपश्चर्या आहे. कारण मी एक भोगी व्यक्ती आहे, तसेच बरेच काही उपभोगण्यासाठी सहजासहजी उपलब्ध असतानाही एखाद्या योग्याप्रमाणे सर्वाचा त्याग केला आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. हा माझा बचाव नाहीये. हे माझे स्पष्टीकरण फक्त सध्या व पुढे काही गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून आहेत बाकी काही नाही. एखाद्याने मला चांगले म्हणावे म्हणून काही करण्याची मला गरज नाहीये.  मी कसा आहे ते मला चांगले माहीत आहे त्यासाठी कोणाच्या कसल्याही प्रमाणपत्राची मला गरज नाहीये.
                शेवटी एकच सांगतो तुम्ही कोणीही असा, पण मी एक राजपुत्र आहे हे लक्षात ठेवा आणि एका राजपुत्राचे असते तेच माझे स्वप्न आहे त्यापासून मी तसूभरही ढळणार नाही भले त्याबदल्यात मला कसलीही किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर. "वर्षा" हेच एकमेव ध्येय,स्वप्न सर्व काही आहे माझ्यासाठी आणि मी ते प्राप्त करणारच ते सुद्धा स्वकर्तुत्वावर आणि नीतिमत्तेने. ज्यादिवशी मी हक्काने, मानाने वर्षावर जाईल त्यावेळेस तुम्ही माझ्यासोबत असल्यास मला आनंदच होईल. तुम्ही माझ्याशी कसेही वागलात तरी तुमच्याबद्दल माझ्या मनात कसलाही आकस असणार नाही. पण एक त्यादिवशी तुम्ही सर्वांनी माझे राजेपण खुल्यादिलाने मान्य करायचे आणि ते आपण धुमधडाक्यात साजरे करू!!!!
               
  

Wednesday, July 17, 2013

काल मला देव भेटला....

              काल मला देव भेटला,म्हणजे देव काही माझ्यापासून वेगळा नाहीये पण आजकाल मला माझ्याशीच बोलण्यासाठी  वेळ  नाही  तर  काम  नसताना  देवाशी  कशाला  बोलू  उगाचच. काल देव  स्वत:हून माझ्याकडे आलाय  हे  पाहून  विशेष  असे  काही  नाही  वाटले.  देव  कसल्यातरी  चिंतेतच होता त्या चिंतेमुळे देवाची तेज:पुंजप्रभा झाकोळली होती. देवालाही स्वत:चे मन मोकळे करावेसे वाटत असेल नापण त्यासाठी एवढे देवाचे निस्सीम भक्त असताना माझ्याकडे कशाला हा प्रश्न  मला पडला म्हणून त्याला पहिला  प्रश्न तोच विचारला तर देव म्हणतो कसा जे आस्तिक आहेत ते त्यांचीच गाऱ्हाणी गाणार,नास्तिक असणाऱ्यांना तर माझा विटाळ होतो म्हणून तुझ्याकडे आलोय.
      मी म्हणालो पण देवा मी तर  नास्तिक आहे सर्वांना माहित्ये. तू काय माझ्यापेक्षा वेगळा आहेस काया देवाच्या उत्तराने मात्र मी आश्चर्यचकित झालोदेवाला म्हणालो अरे मी घरातून बाहेर पडताना आई नेहमी म्हणते "देवाच्या पाया पड" तर मी असेच म्हणतो देव काय माझ्यापेक्षा वेगळा आहे का?
     पण देवा तू एवढा चिंताक्रांत का आहेसतुझ्या भक्तांवर एकामागून एक येणार्‍या संकटांनी तू हैराण झाला आहेस कातू काहीच करू शकत नाही,का ही तुझीच करणी आहेलोकांनी तुझ्यावर कसा विश्वास ठेवावा तरीही ठेवतातच कितीही काहीही झाले तरीपण मग   घरादारावर तुळशीपत्र ठेऊन तुझ्या दर्शनासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी  कशाचीही पर्वा न करता कुठे-कुठे यात्रा करतात आणि तू तुला भेटायला आलेल्याच भक्तांना सरळ मुक्तीच देतो आणि तीही इतकी निर्दयीपणे कधी गाड्यांच्या अपघातात तर कधी निसर्गाच्या प्रकोपात. असे का?
           देव थोडासा गंभीर होत म्हणालाजे स्वत:च हरवले आहेत ते मला काय शोधणार ? . ह्याच लोकांनी मला वेगवेगळ्या मंदिरात बंदिस्त केले आहे ना!! अगदी ह्यांच्या सोईनुसार माझ्या विश्रांतीची वेळ ठरते. घुसमट होते रे माझी. मला वाटले मी माणूस बनवून एक अतिशय सुंदर आणि सृजनशील गोष्ट जन्मास घातली आहे. मुलगा तरुण झाल्यावर बापाला आराम मिळेल अशी अपेक्षा असते,त्याप्रमाणे मला ही वाटले आता मलाही विश्रांती मिळेल पण माझा अपेक्षाभंगच झालाय. यांच्या अपेक्षा ऐकून घ्यायलाच मला वेळ मिळत नाहीमग पूर्ण कधी करणारआणि का म्हणून करायच्याकाय दिले नाही मीकशात चुकलोय हेच मला  कळत नाहिये?मी चराचरात सामावलेला असताना मुळात त्या पवित्र तिर्थक्षेत्राच्या नावाखाली मला एका ठिकाणी बंदिस्त केले आहे. मला शक्य होईल एवढ्या सर्व शक्ती मी मानवाला प्रधान केल्या आहेत.लाख मोलाची बुध्दिमत्ता दिली असताना निर्लज्जपणे कवडीमोल लाचेचे लालूच देऊन मला भ्रष्ट करण्याचा निरर्थक प्रयत्न करत आहेत. वाटले मनुष्य आपल्या बुध्दी सामर्थ्याच्या जोरावर इतर सजीवांना सोबत विश्वाचा रहाटगाडा हाकेल पण त्याला स्वत:लाच न्याय देता आला नाही तर त्या मुक्या जीवांना काय देणार?
      देव उद्विग्नपणे असे बरेच काही बोलत होता एकूणच काय देवपणाचे ओझे पेलवणे देवाला जरा
जडच जात होते.शेवटी मीच देवाला वचन दिलेमी आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितले नाही आणि यापुढेही काही मागणार नाही पण अधून-मधून भेटत जाईल. एवढे सुंदर विश्व बनवल्याबद्दलतसेच मी काही न मागताच मला सर्व काही दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी!!!!!!!!                जाता जाता देव  मला  म्हणाला  अधे-मध्ये चुका करत जा एखादे वाईट काम ही करत जा नाहीतर हे लोक  तुलासुद्धा एक दिवस देव बनवतील.

Sunday, June 23, 2013

एक पत्र राजसाहेबांना….

       राजसाहेब आपली वक्तृत्वशैली असो वा जीवनशैली त्याचे प्रचंड आकर्षण आजच्या तरुणाईला आहे, तर इतराना कौतूक.मग तो विरोधी पक्षातील असो वा अमराठी!!! अर्थात आम्हीही त्यास अपवाद नाही आहोत. पण ते वैचारिक साम्यतेमुळे. साहेब कोणत्याविषयावर काय बोलतील, कोणावर टीका करतील,कोणाचे कौतूक करतील याचे अचूक अंदाज आम्ही बांधत असू, ते इतके अचूक असत की काही मित्रांना मी भाषणे लिहून देतो की काय अशी शंका येत. पण आता साहेबांची मोहिनी ओसरत चालली आहे, आमचे अंदाज ही चुकू लागलेत. जसा पक्षाचा विकास वेगाने झाला तशाच लोकांच्या अपेक्षाही वाढल्या पण त्यांचा भ्रमनिरासच झाला.
       समर्थकांसह विरोधकांचेही लक्ष नाशिकवर केंद्रित झालेय. होणारच कारण नाशिक शहरात आपले तीन आमदार आहेत ज्यांचा कालावधी संपत आलाय, महापालिकेत सत्ता आहे. पण विकासाची कुठे सुरूवात आहे असे दिसत नाही. लोकांचा भ्रमनिरास होतोय आणि याची आपणास निश्चित जाणीव आहे. वेळोवेळी पुरेसा कालावधी पुर्ण झाला नाही, पूर्ण सत्ता नाही अशी कारणे आपण देत आहात. नाशिक शहरात आपले तीन आमदार आहेत ज्यांचा कालावधी संपत असतानामहापालिकेत सत्ता असताना आपण अशी कारणे देणे शोभत नाही. सत्तेत असल्याशिवाय कामे होत नाही हे पटत नाहीत कारण विरोधी पक्षातीलही काही आमदार-खासदार आहेत जे सत्तेत नसताना जोमाने काम करत आहेत मग इतराना का अडचण यावी. आपण एक-दोन वर्ष पाळणा नाही हलला तर अनेक शंका घ्यायला. अनाहूत सल्ले द्यायला सुरूवात करतो. मग एक वर्षानंतर काही कामांची अपेक्षा करणे निरर्थक नक्कीच नाही. लोकांसाठी स्वत:ची संस्कृती,अस्मिता टिकवण्याबरोबरच विकासही महत्वाचा आहे. बायको नुसती सुंदर असून चालत नाही तिला मुलंही व्हायला हवीत ना?
       मोदींनी ठेका दिल्याप्रमाणे गुजरातेतून जशा विकासाच्या बातम्या येतात तशाच बातम्या नाशिकमधून येतील अशी आमची भोळी अशा होती, होती अशासाठी की आता वर्ष उलटून गेले पण तिकडे विशेष काही होतेय याची जराशीही कुणकुण लागत नाहीये. गुजरातेत काय,किती आणि खरच विकास झालाय हे आम्ही थोडेच पाहिलय? पण सगळेच उदोउदो करतायेत आणि आपण स्वत: गुजरातचा विकास पाहून आला आहात आणि तोंडभरून स्तुतीही केले आहे म्हणजे नक्कीच विकास होतोय असे मानायला हरकत नाही. पण आपल्या नाशिकमधून,महाराष्ट्रातून अशा बातम्या कधी येणार?
       आमच्या पुरंदरमध्ये विजयबापू शिवतारे या शिवसेनेच्या वाघाने , नजरेत भरेल असा कामे करण्याचा सपाटा लावला आहे, ते ही विरोधी पक्षातच आहेत आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात!! त्यांची कामे बघून बारामतीकराना घाम फुटलाय म्हणे. निवडणुकीच्यावेळी आमच्या मातोश्रींनी कोणाला मत देऊ असे विचारले तर आम्ही रेल्वे इंजिनवर शिक्का मार म्हणालो माझा पक्ष आहे. शेजारी-पाजारी, सगेसोयरे म्हणाले घड्याळावर शिक्का मार आपला पाहुणा आहे. आईने बेधडक धनुष्यबाणावर शिक्का मारला. तोपर्यंत धनुष्यबाणाचा पुरंदरशी संबंध फक्त अनामत रक्कम जप्त होण्याइतपतच होता यावेळी इतरांची अनामत रक्कम जप्त झाली!! आज आम्हाला आमच्या मातोश्रींचा अभिमान वाटतोय. ती अशिक्षित आहे पण अडाणी नाही.त्यामुळे आपल्याकडे सत्ता नाही, पुरेसा कालावधी मिळाला नाही, अशी कारणे आपल्यासारख्या डॅशिंग नेत्याकडून अपेक्षित नाहीत.
       आता विधानसभा निवडणूका जवळच आल्यात काही दिवसात आपण सभा घ्यायला सुरवात कराल. पण खरे सांगतो साहेब सभा ऐकण्याची ती ओढ शिल्लक नाही राहिली. मान्य आहे बरेचशे वैचारिक दिवाळखोर नेते आहेत त्यांच्यावर आपण टीका-टिप्पणी करता त्यांची खिल्ली उडवता नक्कल करता. आम्ही ते शेकडो वेळा पाहिलेय पुन्हा पुन्हा, पण आता ते पाहून आम्हाला हसू येत नाही. त्या नेत्यानी सुद्धा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी काही ना काही कामे केलीत, काही तजवीज केलीये. याउलट आपल्या नेत्यांची- कार्यकर्त्यांची नावे खंडणी वसुली,खून,मारामारी, बलात्कार अशा अनेक गुन्हेगारी खटल्यात येतायेत. आणि आपण सभामधून एकहाती सत्तेची मागणी करताय. जनतेच राहू दे बाजूला पण कार्यकर्त्यांचे काय त्यांना अपेक्षित उर्जा मिळालीच नाही कसे काम करणार ते. सत्तेची पहिली पायरी म्हणून नाशिक कडून काही अपेक्षा होत्या पण सर्वांच्या पदरी निराशाच पडलीये. आपल्या टीकेचा, कारणांचा आम्हाला उबग आला आहे.
       त्यामुळे उद्या कोणीही एखादा टग्या उठून साहेबांना रड्या म्हणेन , आम्हाला ते बिल्कूल आवडणार नाही पण त्याचा विरोध तरी आम्ही कसा करायचा?.....


Saturday, June 22, 2013

साहेब

                आमचे स्वप्न काय हे ऐकून बर्याच जणांसाठी तो चेष्टेचा विषय बनतो,कारण ते आहेच तसे स्वप्नवत
आम्हाला आमची कोणतीही गोष्ठ सर्वसामन्य असलेली आवडत नाही मग आमचे स्वप्न तरी सामान्य कसे असेल?याच स्वप्नापायी आम्हाला मुंबईची अनामिक ओढ लागली अगदी आमचे पहिले प्रेम म्हणजे मुंबई!!!
                आज २० नोव्हेंबर २०१२ ला आम्हाला मुंबईत पाउल ठेऊन  वर्षे झालीपण खरे सांगायचे तर या सहा 
वर्षात आम्हांस खास असे काही करता आले नाहीप्रयत्न केले पण अपेक्षित यश कधीच लाभले नाहीत्याची कधी आम्ही पर्वा केली नाही कारण आमचे स्वप्न पूर्ण होणे किती खडतर आहे आणि त्याला किती कालावधी लागेल 
याची आम्हांस पूर्ण जाणीव आहेपण मुंबईत आल्यानंतर एक ना एक दिवस आमची बाळासाहेबांसोबत भेट   होईल अशी आशा नव्हे खात्रीच होते पण हा योग जुळून येण्याआधीच परवा साहेबांनी हे जग सोडलेआम्ही   निश्चितच आमच्या प्रयत्नात कमी पडलो आणि साहेबांचा आशिर्वाद नाही लाभला याची आम्हांस आता खंत  वाटते आहे पण नशिबानेच निदान अंत्ययात्रेत का होईना डोळेभरून साहेबांचे अंतिम दर्शन झाले हाच आशीर्वाद समजून   आम्ही आमचे पुढील प्रयत्न चालू ठेऊ.
    आम्ही नक्की काय प्रयत्न केले हा सर्वाना प्रश्न पडला असेल पण याचे उत्तर माझे स्वप्न पूर्ण झाल्यानंतरच भेटेल आणि त्यावेळीच त्याला काही तरी अर्थ प्राप्त झाला असेलदुर्दैवाने यासाठी आपणांस आणखी काही दशके वाट  पहावी लागेल.....


Saturday, June 15, 2013

मी आणि माझी अहंकारीक वचने --- ५

आयुष्यभर अपराधीपणाचे ओझे वाहण्यापेक्षा अपराध छोटा असो वा मोठा तो तत्काळ मान्य करणे केव्हाही श्रेयस्कर!!!
***********************************************************************
माझा तुमच्या देवावर विश्वास नाहीये, मी असा दगड शोधतोय ज्यावर मला डोळे झाकून विश्वास ठेवता येईल. भले माझ्या यशानंतर तुम्ही त्याचा देव केला तरी चालेल!!!!!!!!!!!!!
************************************************************************
जगासाठी आपण चांगले असणे ही आपल्या स्वत:साठी सर्वात वाईट गोष्ट आहे.
************************************************************************
ज्यांनी आपल्या ध्येयाशी तडजोड केली आहे ते सर्वजण त्यांच्याच नव्हे तर जगाच्या दृष्टीनेही यशस्वीच आहेत....
************************************************************************
सर्व गोष्टी जर माझ्या मनासारख्या झाल्या असत्या तर आज मी काहीच करू शकलो नसतो
************************************************************************
विवाहित मुलीचे आई-वडिलांप्रती असलेले प्रेम वळवाच्या पावसासारखे असते, वर्षातून एखादेवेळेसच अवचित येणारा वळीव सोसाट्याचा वारा,मेघांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटांसह येऊन आपल्या आगमनाची वर्दी अखंड आसमंताला देत क्षणात धो-धो बरसून नाहीसा होतो, नंतर सारे कसे शांत सुने-सुने........
तर मुलाचे प्रेम म्युनिसिपालीटीच्या पाण्याच्या नळासारखे.... सर्वांची रोजचीच तक्रार असते पण त्याशिवाय जगताही येत नाही...
************************************************************************

Wednesday, November 14, 2012

ये ना सजनी


ये ना ये ना सजनी
एकांताच्या रणरणत्या ऊन्ही,
जिंकूनी मज घे ना
हळव्या या क्षणी मिठीत ये ना.

ये ना ये ना सजनी
मी तुझाच तुझाच जाणुनी,
श्वास-श्वासात गुंफूनी एक हो ना
थरथरत्या ओठांस आधार दे ना.

ये ना ये ना सजनी
ओल्या माझ्या स्वप्नातील अप्सरा बनूनी,
मोहरल्या स्पर्शात बोल ना
प्रेमाचे गोड गुपीत खोल ना.
  
ये ना ये ना सजनी
मज अतृप्ता घडे अमृताचे घेऊनी,
झिंगूनी नशेत प्रणयाच्या
पाठी बेधुंद क्षणाच्या आठवणी सोड ना.

ये ना ये ना सजनी
आरस्पानी सौंदार्याची खाण लेऊनी,
बिलगूनी मज बेशलाक विसाव ना
स्वर्गसुखाच्या लहरीत चिंब हो ना.

( एक प्रयत्न फसलेला. पण त्यासाठीसुध्दा दोन दिवस खर्च केले. जाउ दे हा पहिलाच प्रयत्न होता. तरीसुध्दा काहीसा बदल करून हे सुध्दा यशस्वी होईल याची खात्री आहे.)

ब्रेक-अप

(फॅशनेबल/राजेशाही म्हणता येईल अशा वेषातील प्रेमी युगुल, प्रेयसी थोडी बावरलेली तर प्रियकराचा दु:खी असल्याचा व सर्व काही संपले असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न ....
प्रियकर विंगेतून धीरगंभीरपणे चालत येत आहे, मागून प्रेयसी धावत धावत नाटकी स्वरात प्रियकराचा हात धरून विनवणी करतेय...)
प्रेयसी- नाही नाही, नाथा हे शक्य नाही!!!तुम्ही मला सोडून जाणे कदापि  शक्य नाही . मी तुम्हाला माझे सर्वस्व अर्पण केले आहे, काय दिले नाही मी तुम्हाला घासातील घास दिला,श्वासातील श्वास दिला आणि तुम्ही माझ्या भावनांची काहीही कदर न करता मला सोडून चालला आहात.
प्रियकर- असे कसे म्हणू शकतेस तू? तुझ्या प्रत्येक घासामागे पैशांची रास माझी होती, अन् प्रत्येक श्वासमागे स्वर्गसुखाची आस होती, आणि भावनाबद्दल बोलशील तर तिच्यासाठीच तर तुला सोडून चाललो आहे ना!
प्रेयसी- म्हणजे माझ्याच जीवाभावाच्या मैत्रिणिने माझा घात केला तर...
प्रियकर- घात नव्हे राणी साथ, साथ दिली तिने मला प्रत्येक नाजूक क्षणी....
प्रेयसी- (कानावर हात ठेवून दु:खावेगाने) बस्स करा आता, मला हे नाही ऐकवत. कोणत्या जन्मीचा सूड उगवत आहात तुम्ही माझ्यावर. चंद्राला साक्षी ठेऊन आपण काय काय नाही केले.
प्रियकर - नाही नाही ते केले..
प्रेयसी - याच चंद्राला साक्षी ठेऊन तुम्ही मला सात जन्म साथ देण्याचे वचन दिले होते.
प्रियकर - हो दिले होते, सात जन्मी साथ देण्याचे वचन दिले होते आणि मी ते पाळणार ही आहे,पण सात जन्मात किती दिवस साथ द्यायची हे नव्हते सांगितले, या जन्मासाठीचा तुझा कोटा संपलेला आहे.
प्रेयसी - नाथ एवढा अन्याय नका करू माझ्यावर, पौर्णिमेच्या चंद्राला साक्षी ठेऊन प्रेमाची बरसात केली आणि आज आमावस्येच्या अंधार्‍या रात्री माझ्या जीवनात अंधार करून तुम्ही चालला आहात.
प्रियकर - अंधार तर तुझ्यामुळे झाला होता माझ्या जीवनात, पण मला आता भावना भेटली आणि मला खर्‍या प्रेमाचा साक्षात्कार झाला . तू मला सर्वस्व अर्पण करण्याचे नाटक करून माझ्यावर वर्चस्व प्रस्थापित केले.
प्रेयसी - (अतिशय रागाने) ये येडओझ्या, ज्या भावनाच्या जीवावर तू उड्या मारत आहेस ना ती माझ्याच सांगण्यावरुन
तुझ्यावर प्रेमाचे नाटक करत आहे....
प्रियकर - नाही,नाही हवे तर येडओझ्या अशी प्रतीकात्मक शिवी देण्यापेक्षा खरी शिवी दे पण हे खोटे आहे,हे कबूल कर.
प्रेयसी - नाही हे खरेच आहे, मला माझ्या स्वप्नातील राजकुमार केव्हाच भेटला आहे, आणि तुझ्यावरच्या खोट्या प्रेमापायी तुझी तात्पुरती सोय करून तुझ्या प्रेमाची परतफेड करण्याचा प्रयत्न करत होते, पण तू जास्तच उडायला लागला म्हणून खरे बोलायची वेळ आली.
प्रियकर - मग तू तो भेटला त्याचवेळी मला का नाही सोडले?
प्रेयसी - सोडणार होते पण अड्जस्ट होत होते म्हणून तुला सोडवत नव्हते!!!!!! शेवटी कितीही अनुभव असला तरी असे तडकाफडकी सोडणे अजून जमत अजून नाही मला.
प्रियकर - म्हणजे मी तुझे पहिले प्रेम नव्हतो, तो स्पर्श पहिला नव्हता आणि तो अनुभवही!!!! मला वाटले मीच ओपनिंग केलीय.
प्रेयसी - ओपनिंग,ओपनिंग काय बोंबलतोय. बॉल जवळ येईपर्यंत तरी तुझी बॅट हातात टिकते का? तुला साधे जुने बॉल हाताळता येत नाही आणि निघाला ओपनिंग करायला! त्या नव्या कोर्‍या बाउन्सी पिच आणि लालभडक कडक बॉल समोर भल्याभल्यांची हेल्मेट घालून फाटते तिथे तुझी काय दशा झाली असती याची कल्पना आहे का तुला?
प्रियकर - ते काहीही असू दे पण तू विश्वासघात केला आहेस.
प्रेयसी - नाही नाही मी विश्वासचा घात नाही केला उलट तोच मला सोडून गेला! त्याचमुळे भावना आणि माझ्यामध्ये १ ऐवजी
२ चा गॅप पडला आहे. माझे ११ झाले आहेत तर तिचे ९ .
प्रियकर - हे ऐकण्यापुर्वी माझे कान का फाटले नाहीत.
प्रेयसी - नीट बघ कान नाहीतर दुसरे काहीतरी फाटले असेल.
प्रियकर - ते काय फाटले आहे ते माझे मी बघेन तुझा माझा आता काहीही संबंध राहिला नाहीए.
प्रेयसी - हो ना खरेच आपले संबंध जास्त काळ नाही टिकले, तुझ्या आग्रहाखातर तुला नाथ म्हणता म्हणता मला जगन्नाथ भेटला, वाटले आता तुला भावनाचा नववा नवनाथ बनवेन तुही सुखी होशील पण तुला अज्ञानातील सुख नाही मानवले त्याला मी काय करणार .आता भावना करेन आठव्या दशरथाबरोबर कंटिन्यू नाहीतर मी जगन्नाथला सोडेपर्यंत राहीन आठव्याच्या आठवणीत काही दिवस.
प्रियकर- काय या आजकालच्या मुली...भावनाकडे दशरथ आहे,तुला जगन्नाथ भेटला आहे आता मी काय करू???
आकाशवाणी -- अपना हाथ जगन्नाथ!!!!!!!!!!(प्रियकर डोक्याला हात लाऊन खाली बसतो)
प्रियकर --- पुन्हा एकदा ..... 


(हे स्किट स्टार प्रवाहवरील 'ढिंका चिका' साठी लिहिले होते पण मलाच ते फसलेय असे वाटल्याने नाही पाठवले!!!!)
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!