Ads 468x60px

Saturday, July 18, 2026

माझी भूमिका -३.

              स्पष्ट दिसणारा तरीही बहुतेकांना स्वीकारायला जड जाणारा आजचा वर्तमान बाजूला राहू द्या. अगदी दोन-चारशे वर्षे किंवा अडीच-तीन हजार वर्षांपूर्वीच्या मानवी इतिहासावर नजर टाकली, तरी एक अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद विरोधाभास सतत समोर येतो. तो विरोधाभास म्हणजे, आपल्या समाजाने नेहमीच लोककल्याणाचा आणि समाजसुधारणेचा मार्ग स्वीकारलेल्या संतमहापुरुषांना व विचारवंतांना नाकारले आणि कर्मठ, पाखंडी व ढोंगी लोकांना डोक्यावर घेतले. ज्या ढोंगी प्रवृत्तींनी समाजाला गोड बोलून फसवले, चमत्कारांचे खोटे आभास दाखवून भुलवले आणि लुटले, त्यांना या समाजाने आदराचे स्थान देऊन त्यांचा उदोउदो केला. याउलट, ज्या संतमहापुरुषांनी समाजाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले, त्यांच्या वाट्याला मात्र फक्त उपेक्षा, द्वेष आणि अतोनात त्रास आला. सत्य आणि वास्तवाचे वावडे केवळ पाखंडी लोकांनाच नव्हे, तर संपूर्ण समाजालाच असावे असे वाटते. म्हणूनच, जेव्हा जेव्हा या महापुरुषांनी पाखंडी लोकांच्या खोट्या दिखाव्याला आव्हान दिले, तेव्हा समाजाने या विचारवंतांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पण या महापुरुषांचे मोठेपण यातच होते की, समाजाने कितीही विरोध केला, तरी त्यांनी समाजप्रबोधनाचा मार्ग कधीही सोडला नाही. लोक निंदा करत राहिले, तरी हे महापुरुष सत्याची, न्यायाची आणि प्रेमाची वाट चालत राहिले. त्यांचे ध्येय वैयक्तिक स्वार्थ नव्हे, तर मानवाचे कल्याण हेच होते.

                दुसऱ्या बाजूला जे पाखंडी लोक होते, ते मुळात अत्यंत सुमार बुद्धीचे होते. त्यांच्याकडे कोणतेही आत्मिक ज्ञान नव्हते, ना समाजाला पुढे नेण्याची दूरदृष्टी होती. त्यांचे संपूर्ण कर्तृत्व केवळ भपका दाखवण्यात आणि लोकांच्या भीतीचा व अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची दिशाभूल करण्यात होते. लोकांना लुटून ते स्वतःचे आयुष्य अत्यंत विलासी पद्धतीने जगत होते. अशा वेळी एक विचार मनात नक्की येतो या संत-महापुरुषांकडे तर अफाट बुद्धिमत्ता, शब्दांचे सामर्थ्य आणि लोकसंग्रह करण्याची ताकद होती. त्यांनी मनावर घेतले असते, तर त्यांनाही या पाखंडी लोकांसारखाच फसवणुकीचा किंवा चमत्कारांचा मार्ग पत्करून ऐश्वर्यात जगता आले असते. पण, त्यांनी हा सोपा आणि स्वार्थी मार्ग नाकारला. त्यांनी समाजाचा रोष पत्करला, पण सत्याची पाठ सोडली नाही. आज ते पाखंडी लोक काळऔघात इतिहास जमा झाले आहेत, तर त्रास सहन करणारे संत महापुरुष शतकानुशतके मानवाच्या मनामनात आदराने जिवंत आहेत. स्वार्थाचा पाया तात्पुरता असतो, पण कल्याणाचा पाया चिरंतन असतो. आजच्या आधुनिक काळातही आपण जर स्वतःच्या कुटुंबाचे, मित्रांचे किंवा नातेवाईकांचे निरीक्षण केले, तर एक धक्कादायक वास्तव समोर येते. आजही कुटुंबातील एखादी तरी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या ढोंगी, भोंदूबाबाच्या नादी लागलेली दिसते. 'तो कुणीतरी दैवी अवतार आहे, तो आपल्याला अडचणीतून बाहेर काढू शकतो किंवा मोक्ष देऊ शकतो' असा ठाम अंधविश्वास त्यांच्या मनात असतो. भोंदूबाबांनी सांगितलेले उपाय,तोडगे करून आपण आपल्या चुकांचे परिमार्जन करू शकतो, या भ्रमात ते जगतात. पुढे पाच-दहा वर्षांत जेव्हा तो बाबा कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकतो, तेव्हा त्यांचा भ्रमनिरास तर होतो पण दुर्दैवाने त्यांचा अंधविश्वास संपत नाही. एका बाबाचा पर्दाफाश झाला, की त्याची जागा घेणारा दुसरा भोंदू बाबा बाजारात आधीच तयार असतो आणि ही अंधश्रद्धेची साखळी अशीच सुरू राहते.

                      हा सगळा खेळ मुळात मानवाच्या मानसिक दुर्बलतेवर आणि 'झटपट सुखाच्या' अपेक्षेवर चालतो. माणसाला कष्ट न करता, स्वतःच्या चुकांची जबाबदारी न घेता चमत्काराने संकटांतून मुक्त व्हायचे असते. ढोंगी बाबा याच मानसिकतेचा गैरफायदा घेतात. ते लोकांना आत्मपरीक्षण करायला शिकवत नाहीत, तर त्यांना परावलंबी बनवतात. याउलट, खऱ्या संतांनी माणसाला स्वतःच्या आत डोकावायला शिकवले, कर्म करायला प्रवृत्त केले आणि अंधश्रद्धेऐवजी विवेकाची कास धरायला सांगितली. संतशिरोमणी सावता महाराजांनी "स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात" या वचनानुसार स्वतः कर्म करून आपल्याला मार्ग दाखवला आहे. हा स्वकर्माचा आणि विवेकाचा मार्ग कठीण व स्वतःला बदलणारा असल्यामुळे सामान्य माणूस त्याकडे पाठ फिरवतो आणि खोट्या आशेचा बाजार मांडणाऱ्या ढोंगी लोकांच्या जाळ्यात सहज अडकतो. जोपर्यंत आपण चमत्कार आणि अंधश्रद्धेच्या या दुष्टचक्रातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत समाजाची खरी प्रगती होणे अशक्य आहे. ढोंगी, भोंदू आणि भामट्यांच्या नादी लागण्याचा हा प्रकार केवळ अशिक्षित वा अल्पशिक्षित लोकांमध्येच आहे अशातला भाग नाही. उलट उच्चशिक्षित वर्गामध्ये अशा फसवणुकीचे प्रमाण आणि कट्टरता जास्त पाहायला मिळते. विज्ञान आणि शिक्षणाचा प्रसार होऊनही जर आपली मानसिकता बदलणार नसेल, तर आपण केवळ तंत्रज्ञानाने प्रगत होऊ, विचाराने नाही. खऱ्या संतमहापुरुषांच्या विचारांचा सन्मान करणे म्हणजे केवळ त्यांची जयंती साजरी करणे किंवा त्यांच्या मूर्तीची पूजा करणे नव्हे, तर त्यांनी दाखवलेल्या विवेक, सत्य आणि माणुसकीच्या मार्गावर चालणे होय. ज्या दिवशी आपण भोंदूगिरीला नाकारून बुद्धीप्रामाण्यवाद स्वीकारू, त्याच दिवशी या महापुरुषांच्या बलिदानाचे आणि त्यागाचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.

                     मी स्वतः माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे या आधुनिक क्षेत्रातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांची मानसिकता मी अतिशय जवळून अनुभवली आहे. आज समाजात या क्षेत्राला अफाट प्रतिष्ठा आहे. उच्च शिक्षण आणि तांत्रिक कौशल्यांच्या जोरावर हा तरुण वर्ग गलेलठ्ठ पगार कमवतोय, आर्थिक स्थैर्य उपभोगतोय. पण या झगमगाटामागे त्यांची एक अत्यंत उद्वेगजनक बाजू लपलेली आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणारा हा वर्ग सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कमालीचा अपरिपक्व आहे. आर्थिक स्थैर्यामुळे त्यांना सुख-सुविधांचे एक ‘प्रिव्हिलेज’ मिळाले आहे. त्यामुळेच, समाजातील दाहक वास्तव, सर्वसामान्यांचे प्रश्न आणि तळागाळातील संघर्ष याच्याशी त्यांचे काही देणेघेणे उरलेले नाही. स्वतःच्या वातानुकूलित, सुखवस्तू चौकटीत सुरक्षित राहून संकुचित जगण्यातच ते धन्यता मानतात. याच आर्थिक संपन्नतेतून आणि सामाजिक अलिप्ततेतून त्यांच्यामध्ये 'सिव्हिक सेन्स' आणि सामाजिक जबाबदारीचा प्रचंड अभाव निर्माण झाला आहे. तंत्रज्ञानाचा विचार करताना तर्कशुद्ध बुद्धी वापरणारे हेच उच्चशिक्षित लोक जेव्हा सामाजिक किंवा धार्मिक बाबींचा प्रश्न येतो, तेव्हा फसव्या प्रचारतंत्राला सहज बळी पडतात आणि कसलीही शहानिशा न करता अंधभक्तीच्या आहारी जातात. जेव्हा कधी मी अशा विषयांवर त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मी आपसूकच एकटा पडतो. मी जे बोलतोय ते सत्य आणि वास्तव आहे, याची जाणीव आतून त्यांनाही असते पण त्यांच्या डोळ्यांवर जाणीवपूर्वक पसरवलेल्या भ्रमाचा पडदा इतका गडद असतो की, ते सत्य स्वीकारण्याचे धाडस त्यांच्यात नसते. परिणामी, ते वैयक्तिक पातळीवर निरुत्तर झाले की, झुंडशाही करून माझी खिल्ली उडवू लागतात. अर्थात, त्यांच्या या खिल्ली उडवण्याने मी कधीही मागे हटत नाही. मी आता शक्यतो अशा लोकांसोबतचे वादविवाद आणि वादाचे विषय टाळतो. कारण हे लोक आता केवळ 'अंधभक्त' राहिले नसून त्यांचे रूपांतर वैचारिक 'झोंबी'मध्ये झाले आहे, जे स्वतःच्या बुद्धीने विचार करत नाहीत आणि आता काही झाले तरी ते बदलणार नाहीत. मला माझी ऊर्जा अशा निरर्थक वादात वाया घालवायची नाही. मला केवळ एखाद्या व्यक्तीपुरता 'सिलेक्टिव्ह' नव्हे, तर संपूर्ण समाजाची विचारसरणी बदलणारा एक मोठा 'कलेक्टिव्ह' बदल घडवण्यासाठी काम करायचे आहे.

             शेवटी एक गोष्ट मी नम्रपणे कबूल करतो की, या एवढ्या मोठ्या जगात माझी स्वतःची स्वतंत्र अशी काहीच मोठी ओळख नाही, मी खरंतर कोणीच नाही. पण ज्यांच्यामुळे आज मी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहिलो आहे, ज्यांच्यामुळे मला जी काही थोडीफार सामाजिक दृष्टी लाभली आहे आणि विवेकवादी विचार करण्याची बुद्धी मिळाली आहे, त्यामध्ये मला घडवणाऱ्या अनेक थोर समाजसुधारकांच्या विचारांचा आणि त्यांच्या त्यागमय कार्याचा निश्चितपणे खूप मोठा वाटा आहे. मी त्यांच्या या वैचारिक ऋणात कायम राहू इच्छितो. संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात अत्यंत हक्काने आणि अधिकारवाणीने पांडुरंगाला म्हणतात-

झड मारोनियां बैसलों पंगती । उठवितां फजिती दातयाची ॥१॥
काय तें उचित तुम्हां कां न कळे । कां हो झांका डोळे पांडुरंगा ॥ध्रु.॥
घेईन इच्छेचें मागोनि सकळ । नाहीं नव्हे काळ बोलायाचा ॥२॥
तुका म्हणे जालों गगनाधिकारी । नाहीं लोक परी लाज देवा ॥३॥

तुकोबा ज्याप्रमाणे देवाच्या भक्तीच्या आणि कृपेच्या पंगतीत हट्टाने ठाण मांडून बसले आणि त्यांनी आपला अधिकार मिळवला, अगदी त्याच न्यायाने, मी स्वतः कोणीच नसलो तरी, या थोर विचारवंतांच्या आणि समाजसुधारकांच्या 'लोकहिताच्या कार्याच्या पंगतीला' हट्टाने बसण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. भोवताली वैचारिक अंधार कितीही गडद असला, लोक खिल्ली उडवत असले किंवा मला एकटे पाडत असले, तरी या महापुरुषांनी दिलेल्या विवेकाचा दिवा हातात धरून मी सत्याची आणि न्यायाची वाट चालत राहीन. ही पंगत समाज परिवर्तनाची आहे, माणुसकीची आहे आणि एकदा या पंगतीत स्थान मिळवल्यावर आता मागे हटण्याचा प्रश्नच उरत नाही. हाच सत्याचा, न्यायाचा वारसा पुढे नेणे आणि समाजात कलेक्टिव्ह बदल घडवणे, हेच आता माझ्या जगण्याचे ध्येय असेल.                         

                                                                                            संतोबा...

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!