Ads 468x60px

Monday, December 22, 2025

कावेबाज पाखंडी धर्ममार्तंड


                       आयुष्यातील-भविष्यातील अनिश्चितता. गूढ-रहस्यमयी, अनाकलनीय गोष्टींचा न होणारा उलगडा. अनामिक संकटांची भीती, मोठ्या संकटातून  अविश्वासनीयरित्या सुखरूपपणे बाहेर पडल्यानंतर आलेली  कृतज्ञतेची भावना. सततच्या अपयशातून आलेली हतबलता. आर्थिक - सामाजिक दुर्बलतेमुळे आलेली ओळखशून्यता. कळत-नकळत घडलेल्या चुकीमुळे,अपराधामुळे आलेल्या अपराधीपणाच्या भावनेतून सुटका व्हावी म्हणून तसेच अलौकिक सुखाच्या प्राप्तीच्या ओढीतून. तसेच कौटुंबिक वारसा, प्रथा, परंपरा यांचा प्रभाव, अन् समाजाने आपापल्या स्वीकारावे, समाजाचे पाठबळ मिळावे या भावनेतून आणि हे सारं नाकारले तर समाजातून बहिष्कृत होण्याचा दबाव आणि त्यायोगे होणाऱ्या टीकेपासून वाचण्यासाठी आणि अशा अनेक अपरिहार्यतेतून  सर्वसामान्य लोकं रूढी, परंपरा पर्यायाने धार्मिकतेकडे ओढली जातात. सर्वसामान्य माणसांच्या या भावनांचा, विश्वासाचा अन् बिकट परिस्थितीचा गैरफायदा हे त्या त्या धर्मातील पाखंडी धर्ममार्तंड घेत असतात. जगातील बहुतेक सर्वच धर्माचे धर्ममार्तंड आपापल्या धर्माच्या उदात्तीकरणासाठी काहीतरी अतार्किक,अनाकलनीय, आभासी गोष्टी आपल्या ओघवत्या वाणीने प्रसवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असतात. निसर्गात अनेक चमत्कारिक, रहस्यमय गोष्टी आहेत तसेच कधी चमत्कारिक, रहस्यमय घटना घडत असतात. या चमत्कारिक, रहस्यमय गोष्टी , घटनांचा संबंध आपल्या धर्माशी जोडून आपला धर्म सर्वश्रेष्ठ असल्याचा दावा करतात. असा हा सर्वश्रेष्ठ धर्म कायमच धोक्यात असतो आणि तो वाचवण्यासाठी धर्ममार्तंड सर्वसामान्य लोकांना आवाहन करत असतात. निस्वार्थ सेवाभावाला धर्माचा पाया बनवणे हे धर्ममार्तंडांचे मुख्य ध्येय असते.
                     खरंतर या पाखंडी धर्ममार्तंडांना धर्माशी आणि त्या धर्माच्या अनुयायांच्या अडचणींशी काही देणंघेणं नसते. त्यांना धर्माचा आणि त्यांच्या अनुयायांचा वापर करून आपला स्वार्थ साधून घ्यायचा असतो. ते स्वर्ग दाखवतील पण मार्ग दाखवणार नाहीत. देवाधर्माचे अवडंबर माजवून फक्त पाखंडी धर्ममार्तंडांचा फायदा होतो. सर्वधर्मांमध्ये सर्वधर्मसमभाव असेल किंवा नसेल पण सर्वधर्मीय बहुसंख्य पाखंडी धर्ममार्तंडांमध्ये स्वतःच्याच धर्माच्या अनुयायांना लुबाडण्याची कला वादातीत असते. हे धर्ममार्तंड काल्पनिक आख्यायिका रचून, अख्ख्या समाजाला पिढ्यान् पिढ्यां आपल्या नियंत्रणाखाली ठेवतात. स्वतःच्या कुळातील मूठभर लोकांना जन्मजात श्रेष्ठ ठरवतात आणि बहुसंख्यांना कायमस्वरुपी जन्मजात दुय्यम ठरवले जाते. आश्चर्य म्हणजे हे सर्व त्या बहुसंख्य समाजच्या एवढे अंगवळणी पडते आहे की हाच बहुसंख्य समाज त्या अन्यायाला पिढ्यान् पिढ्यां दैवी कर्तव्य मानून इमानेइतबारे निभावतो. धर्म संकटात नसतो पण धर्माच्या नावाने दुकानदारी चालवणारे संकटात यायला लागले की त्या धर्माचे धर्ममार्तंड त्या त्या धर्मातील सर्वसामान्य लोकांना परधर्मियांमुळे आपला धर्म संकटात आहे आणि तुम्ही जागृत नाही असा दोषारोपण करत सर्वसामान्य लोकांना डिवचत असतात. जेणेकरून त्यांना हवी ती स्फोटक परिस्थिती निर्माण करता येईल आणि त्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना आपली पोळी भाजता येईल. धर्माच्या आचरणाने माणसाच्या अंगी नैतिकता, कृतज्ञता, नीतिमत्ता, आध्यात्मिक शांतता यायला हवी पण धर्ममार्तंड मात्र त्यास अपवाद असतात कारण धर्म हा त्यांचा धंदा असल्यामुळे त्यांच्या धंद्याच्या आड येणाऱ्या कोणालाही ते सोडत नाही भले तो धर्माचा अन कट्टर अनुयायी का असेना. एवढेच काय ज्या धर्माचा या धर्ममार्तंडांनी ठेका घेतला आहे त्याच धर्माचा संस्थापक जरी प्रकट झाला आणि त्याने या धर्ममार्तंडाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले, विरोध केला तर त्या धर्मसंस्थापकाला देखील ते संपवल्याशिवाय राहणार नाही. अनुयायांपेक्षा धर्म मोठा आहे, धर्माने त्याच्या अनुयायांना सदमार्ग दाखवून वाचवायला हवं, पण धर्ममार्तंडाच्या कृपेने धर्मच कायम धोक्यात असतो आणि त्याला वाचविण्याची जबाबदारी धर्माच्या अनुयायांवर असते. 
                    धर्म धोक्यात आहे म्हणून पाखंडी धर्ममार्तंडाचे ऐकून धर्माच्या अनुयायांनो तुम्ही धर्म वाचवायला गेलात की तुम्ही अडचणीत याल. कारण बहुसंख्य धर्ममार्तंडांमध्ये ढोंगीपणा, दुटप्पीपणा ठासून भरलेला असतो. डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवणारे अनुयायी हे त्यांचे भांडवल आहे. तुम्हाला जगण्यासाठी शाश्वत आणि आवश्यक असणाऱ्या गोष्टींबद्दल ते बोलणार नाही आणि त्यादृष्टीने काही प्रयत्नही करणार नाही. ते तुम्ही काय खाऊ -पिऊ नये, कोणते कपडे घालू नये याबद्दल बोलतील पण ते तुमच्या मूलभूत प्रश्नांबद्दल कधी बोलणार नाहीत. ते रोजगार, महागाई, शिक्षण, भ्रष्टाचार, गोरगरीबांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल बोलणार नाहीत ते बिघडलेल्या सामाजिक व्यवस्था, शासनप्रशासनाच्या मनमानीवर बोलणार नाहीत. कसलेही प्रश्न न विचारता मनोभावे सेवा करणारे अनुयायी धर्ममार्तंडाची संपत्ती आहे, त्यात वाढ होणे त्यांच्या फायद्याचे आहे. अनुयायांच्या जीवनातील अनिश्चितता, भिती आणि चमत्कारांचे आमिष हे ह्या त्यांच्या धंद्याचे भांडवल आहे. त्यामुळे अनुयायांनी स्थिरस्थावर, सुखी, स्वावलंबी होणे त्यांना हितकारक नाही. दर्जेदार शैक्षणिक व्यवस्था ही सामाजिक समतेचा आणि शाश्वत उन्नतीचा मार्ग आहे. आर्थिक स्थैर्य हे स्वाभिमानी,स्वावलंबी जीवनाचा पाया आहे. तुमचं ज्यामुळे भलं होऊ शकणार आहे, तुमचे आयुष्य सुखासमाधानाचे होऊ शकणार आहे अशा शिक्षण, आर्थिक स्थैर्य अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याऐवजी तुमच्या मनात या भौतिक गोष्टींबद्दल अपराधीपणाची भावना निर्माण करतात. पैशाअभावी माणूस हतबल होतो आणि हतबल माणूस नाईलाजाने कोणालाही शरण जातो. जीवनातील अनिश्चितता हे त्यांच्या जगण्याचे भांडवल आहे. भौतिकसुख हे तुमच्या मोक्ष प्राप्तीतील मोठा अडथळा आहे हे तुमच्या मनावर ठसवण्यात त्यांचा हातखंडा असतो. पैसा कमावणे, गुंतवणूक करणे हे त्यामुळे पाप समजले जाते. स्थिरस्थावर असणाऱ्या लोकांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण करण्यात ते यशस्वी होतात.                
                     धर्ममार्तंड तुम्हाला साधन संपत्तीचा मोह सोडण्याचा उपदेश करत असतात मात्र जगभरातील अनेक धार्मिक संस्था, धार्मिक समुदाय यांच्याकडे मात्र प्रचंड संपत्ती असते. याबाबतीत आफ्रिकन धर्मोपदेशक(Bishop) डेस्मंड टूटू यांनी मजेशीररीत्या एक विसंगत वाटू शकणारे पण वास्तववादी सत्य कथन केले आहे, ते म्हणतात, ज्यावेळी धर्ममार्तंड आमच्याकडे आले त्यावेळी त्यांच्याकडे धर्मग्रंथ होता आणि आमच्याकडे जमिनी होत्या. त्यांनी आम्हाला प्रार्थना करण्यास सांगितली, आम्ही डोळे मिटून प्रार्थना केली. आम्ही जेव्हा डोळे उघडले त्यावेळी आमच्या हातात धर्मग्रंथ होता आणि त्यांच्याकडे जमिनी होत्या.  'When the missionaries came to Africa, they had the Bible and we had the land. They said, ‘Let us pray.’ We closed our eyes. When we opened them, we had the Bible, and they had the land.’   खरंतर अध्यात्मिकेमुळे अनासक्ती यायला हवी होती पण पाखंडी धर्ममार्तंड अनुयायांना साधन संपत्तीच्या मोहापासून दूर राहायला सांगून स्वतः करोडोंची संपत्ती बाळगतात, महागड्या गाड्या, वस्तूंचा वापर करतात, ऐशो आरामात राहतात. खरंतर  संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात पाखंडी लोकांचे अचूक वर्णन केले आहे.
                                      लोकां सांगे ब्रम्हज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥१॥
                                       तेणें ज्ञान कां सांगावें । ज्ञानासारिखें वर्तावें ॥२॥
                                       नित्य वाची ज्ञानेश्वरी । दारीं भिकार्‍यासी मारी ॥३॥
                                       तुका म्हणे ऐसे धर्ममार्तंड । आम्ही देखिले उदंड ॥४॥
ह्या पाखंडी लोकांची मजल फक्त अफाट संपत्ती कमावण्या आणि उपभोगण्यापर्यंतच आहे असे नाही तर अनेक विकृत दुष्कृत्ये हे लोक करत असतात. जगभरात अनेक धर्ममार्तंडावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
               सर्वधर्मीयांनी हे लक्षात घ्यायला हवं की धर्म आणि धर्ममार्तंड हे वेगवेगळे आहेत. हे धर्ममार्तंड धर्माचे दलाल झाले आहेत त्यांच्याकडून तुमची लूट होऊ नये म्हणून सर्वांनी सजग राहिले पाहिजे. खरंतर हे धर्ममार्तंड धर्माला बंदिस्त करतात आणि धर्माच्या अनुयायांवर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध घालतात. धर्म, धर्ममार्तंड आपले असो वा दुसऱ्याचे त्यांना आपल्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे पण धर्माच्या दलालांना तुमच्या श्रद्धेचा बाजार मांडू देऊ नका. तुमची विचारशक्ती जागृत करा, तुमच्या मेंदूचा वापर दुसऱ्याला करू देऊ नका. आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्या भल्याबुऱ्याचा विचार करा. चांगले शिक्षण घ्या, नोकरी व्यवसायात पारंगत व्हा, स्वावलंबी व्हा. नितीनियमाने संपत्ती कमवून आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर व्हा. दान धर्म करण्याची भावना निर्माण झाली तर गरजवंताना मदत करा, आपण समाजाचे देणे लागतो याची जाणीव ठेवून समाजातील दीनदुबळ्या घटकांना आत्मसन्मानाने जगता येईल यासाठी प्रयत्न करा. नेहमी सत्याची, न्यायाची बाजू घ्या, अन्यायाला विरोध करा. आपआपला धर्मसमृद्ध करण्यासाठी आपआपल्या धर्मातील वाईट प्रवृत्ती ठेचून काढा, कालबाह्य झालेल्या गोष्टी सोडून द्या. कालबाह्य गोष्टींना चिकटून राहून धर्माचे डबके होऊ देऊ नका. नवीन चांगल्या लोककल्याणकारी गोष्टींचा स्वीकार करून धर्म प्रवाही ठेवा.आपल्या धर्मातील लोक सुखी, समाधानी, समृद्ध झाली तर आपलाच धर्म आपोआप समृद्ध होईल. अनुयायांनी निर्भय, सुखी, समाधानी, समृद्ध, स्वावलंबी ,नीतीवान असणे यापेक्षा दैवीकृपा वेगळी काय असू शकते?.

                               संतोबा.....

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!