Tuesday, December 31, 2024
कर्मवीर, अर्थवीर डॉ. मनमोहनसिंग
Sunday, November 3, 2024
महाराष्ट्रधर्म
आम्ही कोणाच्या समर्थनात नाही, ना कोणाच्या विरोधात आणि तठस्थ तर त्याहूनही नाही. आम्हाला आमच्याच घरात कोणाच्या मेहेरबानीवर आणि अटी शर्तीवर जगणं मान्य नाही. आम्हाला आमच्याच घरात दिली जाणारी दुय्यमपणाची वागणूक मान्य नाही. ज्या महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडवला आहे त्या आमच्या महापुरुषांची अवहेलना आम्ही सहन करणार नाही. आमच्या पूर्वजांनी कष्टाने उभारलेल्या महाराष्ट्रात आश्रयाला आलेल्या उपऱ्यांचे आमच्या संस्कृतीवर केलेलं आक्रमण आणि त्यांनी आमच्या परंपराची केलेली अवहेलना सहन केली जाणार नाही. सर्वांना सामावून घ्यायचा पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा आहे, हा वारसा आम्ही अभिमानाने पुढे चालवत आहोत पण या उद्दात भावनेचा गैरफायदा घेऊन ज्या उपऱ्यांनी इथल्या चवलीपावलीसाठी आत्मा विकलेल्या गद्दारांना सोबत घेऊन कटकारस्थाने करून, छक्केपंजे करून इथल्या भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करून आपापली साम्राज्ये स्थापन केलेली आहेत ती जमीनदोस्त करणे आणि भूमिपुत्रांना न्याय देणे आमचे आद्यकर्तव्य आहे.
आणि म्हणूनच ....
‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’
जे महाराष्ट्राच्या विरोधात, आम्ही त्यांच्या विरोधात.
जे मायमराठीच्या विरोधात, आम्ही त्यांच्या विरोधात.
जे भूमिपुत्रांच्या विरोधात, आम्ही त्यांच्या विरोधात.
जे शिक्षणाच्या विरोधात, आम्ही त्यांच्या विरोधात.
जे रोजगाराच्या विरोधात, आम्ही त्यांच्या विरोधात.
जे सर्वांगीण विकासाच्या विरोधात, आम्ही त्यांच्या विरोधात.
जे पायाभूत सुविधांच्या विरोधात, आम्ही त्यांच्या विरोधात.
जे कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात, आम्ही त्यांच्या विरोधात.
जे नितीनियमाच्या विरोधात, आम्ही त्यांच्या विरोधात.
जे समतेच्या विरोधात, आम्ही त्यांच्या विरोधात.
जे व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधात, आम्ही त्यांच्या विरोधात.
जे सामाजिक सलोख्याच्या विरोधात. आम्ही त्यांच्या विरोधात.
जे सामाजिक सुधारणांच्या विरोधात, आम्ही त्यांच्या विरोधात.
संतोबा..
Sunday, October 27, 2024
लोकशाहीची दिवाळी...
Tuesday, October 8, 2024
नसानखवड्यांच्या फोकादाऱ्या
तुम्ही शाळा-कॉलेज उभारली नाहीत, शिक्षण संस्था स्थापन केल्या नाहीत. उद्योगधंदे उभारले नाहीत, सहकारी संस्था काढलेल्या नाहीत यामध्ये विशेष असे काही नाही. विधायक कार्य तुमच्या हातून घडणे शक्य नाही कारण विध्वंसकता, कावेबाजपणा तुमच्या डीएनए मध्येच खोलवर रुतून बसलेला आहे. सर्वसामान्य लोकांच्या हातात लेखणी आली, त्यांना अक्षर ओळख झाली, ज्ञान मिळवण्याची साधने उपलब्ध झाली तर आपले श्रेष्ठत्वाचे पितळ उघडे पडेल आणि आपले पिढ्याअन् पिढ्या मोक्याचा जागा मिळवण्याच्या अघोषित आरक्षणास धोका निर्माण होईल म्हणून तुम्ही शेकडो वर्षांपासून बहुसंख्याना शिक्षणापासून वंचित ठेवले. सर्वसामान्यांच्या हाताला रोजगार मिळाला तर ते स्वावलंबी होतील, तुमच्या फुकाच्या वर्चस्वाच्या पालख्या वाहायला फुकटचे भोई मिळणे दुरापास्त होईल. म्हणून कुठल्यातरी भीतीचा बागुलबुवा निर्माण करून, त्यांच्या मनात भीती आणि द्वेष निर्माण करून त्यांच्या हातात काठ्या-लाठ्या, दगडगोटे देणे तुमच्या फायद्याचे होते आणि तेच तुम्ही करत आला आहात.
ज्या गोष्टींची लाज वाटायला पाहिजे ती अभिमानाने सांगताना केवळ कोडगेपणा असून भागत नाही तर कमालीचा नीचपणा अंगी असावा लागतो. हा नीचपणा तुमच्यात पिढ्याअन् पिढ्या वारश्याने चालत आला आहे आणि आता तो नीचपणाचा वारसा तुमच्या डीएनए मध्ये घट्ट रुतून बसला आहे त्यामुळे त्याला कितीही वेगळा करायचे म्हणलं तरी तसे करता येणार नाही. पाताळयंत्रीपणा, कावेबाजपणा करून संपूर्ण समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हातभार लावणाऱ्या अनेक थोर युगपुरुषांस संपविण्यात आपला हातखंडा आहे, शिवाय त्यांच्या मृत्यूंचे सोहळे करून त्यात युगपुरुषांच्या अनुयायांनाच आनंदाने ढोल बडवायला भाग पाडायचे याची पायाच्या अंगठ्याने गाठ मारायची कला आपल्याला चांगलीच अवगत आहे. आता कुठे तुमच्या काही अनुयायांना तुमचे नैतिक अधःपतन झालंय असे वाटतेय पण तुमच्या अंगी नैतिकता कधीच नव्हती. तुम्ही पोट फुगवून बैल बनण्याचा प्रयत्न करणारा अहंकारी बेडूक आहात याची जाणीव अनेकांना होतीच. खरंतर तुम्ही जेवढे स्वतःला अभिजन असल्याचे ढोल बडवता तेवढे तुम्ही बुद्धिमान नाहीत. केवळ कंपूशाहीच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला तुमच्या क्षेत्रात स्पर्धकच निर्माण होऊ न दिल्याने तुम्ही इतरांच्यापेक्षा वरचढ आहात हे बहुसंख्यांच्या मनावर बिंबवण्यात यशस्वी झालात, तुमचा कावा ओळखण्यात बहुसंख्य कमी पडले म्हणून तुमची चलती आहे.
तुम्हां लोकांना दुसऱ्यांच्या भल्याचे काम करता येत नाही म्हणून तुम्ही चांगले काम करणाऱ्या लोकांची बदनामी करत त्यांच्या कामात उणेपणा आणण्याचा प्रयत्न करता. पिढ्यानपिढ्या तुम्ही अशी कटकारस्थाने करत अनेक थोर लोकांची खोट्या थापा मारून बदनामी केली पण तुमच्या खोट्या कांगाव्याने, कपटीपणामुळे त्यांची प्रतिमा अजूनच उजळली. तुम्हालाच त्यांची बदनामी करणे अंगलट आली. थुंकून चाटण्यात तुमच्या इतका तरबेज कोणी नाही. बदनामी करून त्यांना नामोहरम करता येत नाही म्हणून नाईलाजाने तुम्ही तुमच्या फायद्यासाठी वरकरणी त्यांचा उदोउदो करता. त्या थोर व्यक्तीविरोधात छुपी कुजबुज मोहीम राबवून, वादग्रस्त वक्तव्ये करून जनमाणसांच्या मनात संभ्रम निर्माण करता. कोणीतरी आपल्या जातकुळीतील त्या क्षेत्रातील बुजगावणे पुढे आणत व राईचा पर्वत करत त्या बुजगावण्यामुळेच ती व्यक्ती थोर होऊ शकली अशी आवई उठवता व त्या बुजगावण्याला थोर आदर्श म्हणून समाजच्या माथी मारण्याचे पातक करता. तुम्हाला तुमचे दिखाऊ धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय वर्चस्व अबाधित ठेवायचे असते त्यामुळे तुम्ही त्या वर्चस्वाला आव्हान निर्माण होऊ न देण्याची पुरेपूर काळजी घेता.
कटकारस्थानाशिवाय तुम्हाला देशद्रोहाची, धर्मद्रोहाची वाटण्याचा प्रमाणपत्र वाटण्याचा छंद आहे पण खरे देशद्रोही समाजद्रोही, धर्मद्रोही तुम्ही आहात.देव, देश, धर्माच्या तुमच्या सोईच्या व्याख्या करून बहुसंख्य जनतेला मानसिक गुलामगिरीत ढकलण्याच्या दांडगा अनुभव तुम्हाला आहे. प्रत्येक पांढरपेशा क्षेत्रात कंपुशाही करत आपली मक्तेदारी अबाधित ठेवण्यासाठी बहुजनांना अज्ञान, अंधश्रध्देच्या जोखडाखाली पर्यायाने दारिद्र्यात ठेवण्याचा समाजद्रोहीपणा तुम्ही केला. जेव्हा परकीय सत्ता भारतावर राज्य करत होत्या तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी खर्डेघाशी केली, हेरगिरी केली एवढंच काय आताही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही हेरगिरी केल्याची उदाहरणे आहेत. देवाधर्माचेही तुम्हाला सोयरसुतक नाही, तुमच्या फायद्यासाठी आणि पोटापाण्यासाठी देवाधर्माचा वापर केला, बहुजनांना सेवा आणि स्वतःला मेवा अशी देवाधर्माची पद्धतशीर मांडणी केली. अपवादात्मक काही तरी चांगले कार्य तुमच्याकडून झाले असले तरी ते कधी निर्हेतुक, निरपेक्ष नव्हते, त्याआडून काहीतरी साध्य करण्याचा डाव होता. तुमच्या विकृत विचारसरणीमुळे जनभावनेचा उद्रेक होऊन तुमच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ नये म्हणून अपवादात्मक चांगले दिसणारे कार्य तो उद्रेक शमविण्यासाठी, रागाचा निचरा करण्यासाठी सेफ्टी व्हॉल्व म्हणून काम करण्यासाठी होते.
कंपुशाहीचा फायदा घेत प्रशासनाला हाताशी धरून, समाजावर प्रभाव पाडणाऱ्या माध्यमांना, व्यक्तींना कुठल्याशा गोष्टीचा लाभार्थी बनवून त्यांना आपल्या अंकित करून त्या कणाहीन, मिंध्या लोकांकडून स्वतः चे गुणगान गाऊन घेऊन स्वतःची प्रतिमा उजळवण्याची कला सोडली तर तुमच्याकडे उपद्रवमूल्याशिवाय दुसरं काही नाही. अगदी तुम्ही ज्यात स्वतःला निष्णात समजता त्या फोकादाऱ्या करताना देखील तुम्ही सेल्फ गोल करता आणि तुमचा मतलबी गोतावळा मास्टरस्ट्रोक म्हणून उर बडवून घेत असतो. तुमचे समाजाला देशोधडीला लावण्याचे ईप्सित साध्य करण्यासाठी तुम्ही सतत वादग्रस्त बोलून तुम्ही जनमाणसाचा मनाचा अंदाज घेता व त्यावर काही तीव्र प्रतिक्रिया आली तर दुसऱ्याची मेलेली मढी उकरून सारवासारव करण्याचा प्रयत्न करता. तुमचा दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ शोधताना स्वतःच्या डोळ्यातील मुसळाचे मोठ्या तोऱ्यात समर्थन करण्याचा निर्लज्जपणा वादातीत आहे. तुम्ही स्वतः काहीही चांगले करणार नाही आणि दुसरा काहीतरी करत असेल तर त्याच्या कामात खोडा घालणार. तुमच्यासारखा नसानखवडा जगात सापडणार नाही. विरोधक सोडा स्वतःचा सहकारी तुम्हाला वरचढ ठरेल अशी शक्यता निर्माण झाली तरी तुम्ही त्यांचा पध्दतशीरपणे काटा काढता. लक्षात ठेवा जे जे तुम्ही इतरांसोबत बरं वाईट केलेय ते सारं उलटून तुमच्याकडे येणार हे निश्चित, हा कर्मसिद्धांत आहे आणि तो कोणालाही चुकला नाही. तुम्ही सुधारण्यापलीकडे गेला आहात त्यामुळे तुमच्या सुधारण्याची बिल्कूल अपेक्षा नाही. म्हणतात ना अति तेथे माती, तुम्ही वेगाने अति करण्याच्या टोकावर पोहचताय, सध्या आम्ही तुम्ही त्या टोकावर पोहचण्याची वाट पहातोय. बाकी कार्य तुमचे कर्मच करेल.
संतोबा...
Sunday, October 6, 2024
माझा मार्गदर्शक महाराष्ट्र
माय मराठी, असे माझी प्रेमळ माऊली.
काय वर्णावी, अमृताहुनी गोड तिची बोली.
सदा सर्व क्षेत्रात अग्रेसर, हा महाराष्ट्राचा वसा.
लाभला त्यास, कर्तुत्ववान थोरामोठ्यांचा वारसा.
छत्रपती शिवबा, आपल्या सर्वांचा राजा.
गुण्यागोविंदाने नांदे, सुखी तयाची प्रजा.
स्थापले स्वराज्य, भेद नसे जातीधर्माचा.
शून्यातून विश्व निर्मिले, आदर्श स्वकर्माचा.
हाती घेऊनिया, शुभ्र खडू अन् काळा फळा.
जोतिबासावित्रीने उघडल्या सर्वांसाठी शाळा.
गरीब, अस्पृश्य अन् स्त्रियांचा करण्या उद्धार.
सोशिले कित्येक घाव, प्रसंगी सोडले घरदार.
राजाश्रय मिळाला, शिक्षण, शेती, उद्योगास.
लाभला असा, राजर्षी शाहू लोकराजा जनतेस.
कायदे जनहिताचे, सक्तीचे अन् मोफत शिक्षण.
शोषितांस प्रवाही आणण्या, दिले त्यांस आरक्षण.
स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा केला पुरस्कार.
बाबासाहेबांनी दिला सर्वांस संविधानाचा आधार.
शुद्रातिशुद्रास मिळे, मानवी जगण्याचा अधिकार.
संविधानच मार्गदर्शक, त्याआधारे चाले कारभार.
संतोबा...
Saturday, September 21, 2024
आलबेल
लढण्याच्या गडबडीत,रडण्यासाठी वेळ नाही.
रोज घड्याळाच्या काट्यावरची पळापळ सोपी नाही.
हे असलं जगणे आहे की मरणं, याचा ताळमेळ नाही.
वाटतं सोडून द्यावे सारे, पण हा भातुकलीचा खेळ नाही.
सगळं काही आलबेल आहे असं काही नाही,
जे बक्कळ दिसतंय, तो सगळा आभास आहे.
त्याचा महिन्याच्या महिन्याला हप्त्यांचा त्रास आहे.
आवकजावक मेळ बसेना, त्यात वाढीव टॅक्स आहे.
महिनाअखेरी बाकी शून्य राहण्याचा विश्वास आहे.
सगळं काही आलबेल आहे असं काही नाही,
जे नव्हते ते सगळं मिळवलेय, जे होतं ते गमावून.
न केला भेदभाव, न दूजाभाव, घेतले सारे सामावून.
कित्येक घाव दुर्लक्षिले, कितीदा गेले मज फसवून.
न कळे का दुरावले आप्तजण, सारं काही निभावून.
सगळं काही आलबेल आहे असं काही नाही,
कोंडीत पकडले त्यांनी, संकटी ज्यांना घालावी साद.
आपलेच दात अन् ओठ, मागावी तरी कोणाकडे दाद.
नसती सख्ख्यांचीच लुबाडण्याची नियत, नसते वाद.
तर नसती करावी लागली असती एवढी जद्दोजहद.
सगळं काही आलबेल आहे असं काही नाही,
आता बस्स, जमिनीचा एक तुकडा कमावायचाय.
त्यावर फळाफुलांचे, निर्मळ नंदनवन फुलवायचंय.
निवांत, बिनघोर डोळे मिटूनी, अंगणी पहुडायचंय.
अन् निरव एकांतात, निसर्गाचे स्वर्गीय गूज ऐकायचंय.
संतोबा....
Sunday, June 30, 2024
🎉 आपल्या रावल्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने🎉
गेल्या आठवड्यात १९ जूनला राहुल गांधींचा वाढदिवस होता आणि मी त्यांना मित्र म्हणून शुभेच्छा देणारे स्टेटस व्हॉट्सॲप आणि फेसबुकला ठेवले होते. त्यानंतर काहीजणांच्या विस्मयजनक तर काहीजणांच्या हेटाळणीयुक्त प्रतिक्रिया आल्या, मला त्या अपेक्षित होत्या कारण अशा प्रतिक्रियांचा अनुभव मला राहुल गांधीच काय राजीव गांधी, पंडित नेहरूंच्या बाबतीतही असाच आहे. समाजाची सामाजिक समज किती तकलादू आहे आणि राहुल गांधींबद्दलच्या चारित्र्यहननाच्या, बदनामीच्या अपप्रचाराला बळी पडून लोकांची बौद्धिक कार्यक्षमता किती कार्यक्षम राहिली आहे याची मला जाणीव होतीच. राहुल गांधींच्याबद्दल लोकांच्या मनात एवढा द्वेष का आहे? लोकं त्यांची एवढी खिल्ली का उडवतात. राहुल गांधी गुन्हेगार आहे का? भ्रष्टाचारी आहे का? घोटाळेबाज आहे का? देशद्रोही आहे का?. बहुतेकांना होय असे वाटते पण त्यांना हा प्रश्न पडत नाही की अनेक देशी, परदेशी गुप्तहेर यंत्रणा, पेगासस राहुल गांधीवर नजर ठेऊन असूनही त्यांची कोणत्याच बाबतीत त्यांना कोंडी करता आली नाही. निव्वळ राजकीय हेतूने केलेल्या आरोपांनुसार आज केवळ राहुल गांधीच नव्हे तर त्याचे संपूर्ण कुटुंब तुरुंगात असायला हवे होते. राहुलच्या संपूर्ण कुटुंबीयांची मग ते जिवंत असोत वा मृत कसलाही विधिनिषेध न बाळगता, त्यांच्या कार्याची जाण न ठेवता खूप खालच्या पातळीवर जाऊन बदनामी, हिणकस,हिडीस टीका, बेलगाम आरोप केले, त्यांचे विकृत फोटोशॉप करून विरोधकांनी आपआपल्या थोर खानदानी परंपरेचे दर्शन घडवले. काहीही करून त्यांना गुन्हेगार, देशद्रोही ठरवण्याचा घाट घातलेला दिसत असताना गांधी कुटुंबीयांपैकी कोणाचीही एखादी क्षुल्लक चूक जरी सापडली असती तर अमर्याद सत्ता हाती असल्याने राईचा पर्वत करून राहुल आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात डांबले असते, त्यांना राजकारणातून, सार्वजनिक जीवनातून हद्दपार केले असते पण जंगजंग पछाडून असे काही करता आले नाही.
कोवळ्या वयापासून राहुलवर अनेक आघात झालेत, मात्र त्यातून त्याच्यात कसलाही कडवटपणा आलेला दिसत नाही. कोणाच्याबद्दल त्याच्या मनात द्वेष, आकस दिसत नाही. बेछूट गोळीबाराने पंतप्रधानपदी असलेल्या आजीच्या शरीराची चाळणी झालेला मृतदेह, बॉम्बस्फोटात पंतप्रधानपदी असलेल्या वडिलांच्या शरीराच्या चिंधड्या झालेला मृतदेह पाहण्याचे दुर्दैव त्याच्या वाट्याला आलेले, परदेशीत्वाच्या मुद्द्यावरून आईवर झालेली बोचरी टीका. त्यातून त्याला राजकारणाबद्दल निश्चित विरक्ती आलेली असेल किंबहुना त्यालाही राजकारणाची ओढ नसावी असे वाटत होते. पण म्हणतात ना जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. नाईलाजाने का होईना त्याला राजकारणात यावे लागले. त्याच्याकडे राजकारणात विरोधकांची जीवघेणी टीका, बेलगाम आरोप सहन करण्यासाठी लागणारी गेंड्याची कातडी नाही. अगदी वयाच्या पन्नाशीतही त्याच्यात निर्मळ, निखळ निरागसपणा दिसतो. शिवाय राहुल फार काही मुत्सद्दी राजकारणी आहे अशातला भाग नाही. त्यामुळे त्याची पप्पू अशी प्रतिमा निर्माण करण्यात भाड्याच्या ट्रोलर्स ना प्रचंड यश आले एवढे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनादेखील राहुल पप्पूच आहे असे वाटावे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना भाडेकरू ट्रोलर्सचा प्रतिवाद करणे कठीण झाले होते. काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट होत होती, संघटनेची पडझड होतच होती. भारत काँग्रेसमुक्त करण्याची सुडाची मोहीम यशस्वी होण्याच्या मार्गावर होती, काँग्रेस कधीच उभारी घेऊ शकणार नाही आणि राहुलच काँग्रेस संपवणार असा समज निर्माण करण्यात यश आलेलं होते आणि त्यावर विश्वास वाटण्यासारखी परिस्थिती होती.
सर्व बाजूंनी निराशाजनक परिस्थिती होती, सारं काही संपल्यात जमा होते. ज्यांच्यासाठी लढायचे तेच खिल्ली उडवत होते. पिढ्यान् पिढ्या सत्ता असताना सोबत राहून आपापली संस्थाने निर्माण केलेले सरंजाम भीतीने वा फायदा बघून साथ सोडून गेले होते. सोबत फारसे कोणी नव्हते पण तीन चार पिढ्यांची पुण्याई राहुलच्या पाठीमागे होती, कित्येकांच्या वडिलांनी, आजोबा-पंजोबांनी त्यांच्यासाठी केले नसेल त्यापेक्षा जास्त राहुलच्या वडिलांनी, आजोबा-पंजोबांनी देशातील जनतेसाठी केले आहे. भारताच्या जडणघडणीत त्यांचे भरीव योगदान आहे. पक्षाची, स्वतःची राखरांगोळी झालेली असताना त्या राखेतून राहुल भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेपावला. तो जिद्दीने भारतभर चालत राहीला. कडाक्याच्या थंडीत, उन्हातान्हात, काश्मीर मधल्या बर्फात स्वतःचा मार्ग निर्माण करत राहिला. भारत, भारतातील जनता समजून घेत राहिला शेतकरी, कामगार, नोकरदार, कष्टकरी सगळ्यांशी संवाद साधला. त्यांचे म्हणणे आपुलकीने ऐकून घेतले. हळूहळू का होईना जनतेला त्याची गोरगरिबांविषयीची तळमळ जाणवू लागली. त्याच्या विरोधकांनी त्याला रोखण्यासाठी जे करता येईल ते केले खासदारकी रद्द केली, घर काढून घेतले, बँक खाती गोठवली त्याला अडचणीत आणायची एक संधी सोडली नाही. अनेक आघात सोसूनदेखील न डगमगता लढत राहिला पण कधी आपला तोल ढळू दिला नाही आपली खानदानी आदब त्याने राखली. चेहऱ्यावरचे हसू ओसरू दिले नाही, एकप्रकारे त्याने खात्रीच दिली की तुम्ही त्याच्यावर कितीही टीका केली तरी तो सुडभावनेने वागणार नाही. या सगळ्यातून तो आता ताऊन, सुलाखून निघाला आहे त्याची प्रतिमा त्याने मेहनतीने उजळवली आहे. त्याचे फळ म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीत सगळे काही विरोधात असताना चांगले यश मिळाले आहे. विरोधात असताना तो ताठ मानेने, नजरेला नजर भिडवून बोलत असतो या उलट सत्तेत असून त्याच्या विरोधकांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत आहे, माना झुकलेल्या आहेत. लोकसभेतील विरोधकांच्या वागण्यातील सहजता आणि सत्ताधाऱ्यांच्या वागण्यातील अवघडलेपण बरेच काही सांगून जाते. चेहऱ्यावर जे नीतिमत्तेचे तेज आहे ते पैशाने, सत्तेने, बळजबरीने विकत घेता येत नाही ते चांगल्या कर्तुत्वाने आणि निर्मळ मनाने कमवावे लागते. युवराज, शहजादे म्हणून त्याची हेटाळणी करणाऱ्यांना, युवराज शहाजादा कसा असतो याचा वस्तुपाठच त्याने घालून दिला आहे.
राहुल गांधीच्या जागी आपण आपल्याला ठेऊन पहा, कित्येकांना आज ड्रीम इलेव्हन किंवा कुठल्यातरी एखाद्या प्लॅटफॉर्मवर दोन तीन कोटी भेटले तर तात्काळ नोकरीचा राजीनामा देऊन शांतेत जीवन जगायची इच्छा असेल. राहुलला हे सगळं करताच आले असते. सर्वच बाबतीत खानदानी श्रीमंती असताना त्याने हा काट्याचा मार्ग कशाला निवडला असता तो देखील कसली ओढ नसताना. राहुल किंवा त्याचे समर्थन करणाऱ्यांची हेटाळणी करणाऱ्यांना एवढे सांगायचे आहे की तुमच्या मनात रावल्याबद्दल एवढा द्वेष नसता तर आमच्याही मनात रावल्याबद्दल एवढे प्रेम नसते. तुम्ही ज्यांची भक्ती करता त्या नेत्यावर टीका करून बघा त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा अनुभव घेऊन बघा. राहुलशी कोणत्याही बाबतीत त्याची माझी बरोबरी नसली तरी मी त्याच्यावर टीका करू शकतो, त्याला रावल्या बोलू शकतो आणि आपण राहुलला प्रेमाने वा रागाने रावल्या म्हणले तरी तो आपल्याशी आदबीनेच बोलेल. मी त्याला रावल्या म्हणले तरी तो मला संतोषजी म्हणूनच बोलणार आणि म्हणून रावल्या आपला मित्र आहे. अर्थात राहुलचेही काही अंधभक्त असतील त्यांना हे असे रावल्या बोलणे आवडणार नाही पण त्यांच्या आवडण्या न आवडण्याचा आपल्याला काही फरक पडत नाही. अंधभक्त कोणाचेही असोत त्यांची फिकीर आपण करायची नाही. राहुल गांधी काही माझा नेता नाही किंवा मी काँग्रेस किंवा कोणत्याच पक्षाला बांधील नाही. मला ज्यावेळी जो योग्य वाटेल त्याला मी मतदान केले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार, सुप्रियाताई), काँग्रेस(संजय जगताप) आणि शिवसेना (विजय शिवतारे) या पक्षांना त्या त्यावेळी असलेल्या परिस्थिती नुसार मतदान केले आहे आणि मी ज्यांना मतदान केले आहे ते निवडून आलेच आहेत. निवडून दिलेल्यापैकी मी कोणाचाही समर्थक किंवा कार्यकर्ता नाही उलट त्यांनी जेव्हा काही समाजाच्या हितास बाधा आणणारी भूमिका त्यावेळी मी मला जमेल तसा विरोध केला आहे. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतची माझी भूमिका जगजाहीर आहेच आणि त्याचे परिणामही बघितले असतील. जेव्हा कधी काँग्रेस सत्तेत येईल तेव्हा मी काँग्रेस आणि राहुल गांधींचा पूर्वीपेक्षा तीव्र विरोधक असणार आहे, कारण पुन्हा 'अच्छे दिन' पाहणे परवडणार नाही आणि ते 'अच्छे दिन' पुन्हा पाहण्याची हिंमत सर्वसामान्य जनतेमध्ये राहिलेली नाही. राहुलला राजकारणाचा मोठा वारसा आहे, तो लढतोय, त्याच्यावर अन्याय होतोय म्हणून त्याला साथ देऊ नका. तो जे करतोय ते तुमच्या फायद्याचे, येणाऱ्या पिढ्यांच्या फायद्याचे पर्यायाने समाजाच्या, देशाच्या फायद्याचे असेल तरच समर्थन द्या अन्यथा त्याला प्राणपणाने विरोध करा, आपण काही कोणाचे मिंधे नाही आणि कोणी आपले घर चालवत नाही आपल्यालाच आपल्या आणि कुटुंबियांच्या भल्यासाठी कष्ट करायचे आहेत.
यानिमित्ताने मला एकच गोष्ट अधोरेखित करायची आहे की कोणत्याही राजकीय पक्षाच्या चुकीच्या धोरणांची, नेत्यांच्या चुकीच्या गोष्टींची बाजू घेणे जनता म्हणून आपल्या सर्वांच्या अंगलट येऊ शकते. एखादया राजकीय पक्षाची विचारधारा कितीही आवडत असली म्हणून पक्षाच्या, नेत्याच्या चुकीच्या गोष्टींसाठी आपण कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळून नैतिक, न्याय बाजू असणाऱ्या कोणालाही अंगावर, शिंगावर घ्यायचे नाही. त्यात तो आपला लाडका पक्ष खुनशी, द्वेष पसरवणारा असेल, घातकी असेल तर तुम्ही किती त्यांचे समर्थक असाल, पक्षासाठी किती झटले असाल, त्याग केला असेल तरी पक्षनेतृत्व गरज पडली तर तुमचा बळी द्यायला बिलकुल कचरत नाही. जे पहिल्या फळीतील नेते आहेत, ज्यांनी पक्ष वाढीसाठी भरीव योगदान दिलेले आहे अशांना देखील पद्धतशीर पणे बाजूला करण्यात येते, कार्यकर्ते तर त्यांच्या खिजगणीतही नसतात त्यामुळे तुम्ही ज्यांना समर्थन देता ते खरोखर तुमचे नेते आहेत की तुमचे वापरकर्ते आहेत याची स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीने शहानिशा करणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडत्या नेत्याचा, पक्षाचा जरूर उदोउदो करा, भक्ती करा पण बुद्धी गहाण ठेऊन अंधभक्त बनू नका. चांगल्या चांगले आणि वाईटाला समजण्याइतकी बुद्धी शिल्लक ठेवा. तुमच्या अंधभक्तीचे वाईट परिणाम केवळ तुम्हालाच नव्हते तर तुमच्या येणाऱ्या पिढ्या , तुमचे आप्तेष्ट सर्वांच भोगावे लागणार याची जाण ठेवा. जो तुमच्या भल्याचा, तुमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याचा विचार करेल, तुम्हाला समाजात निर्भयपणे , स्वतंत्रपणे वावरता येईल असा समाज घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर कोणाच्याही कसल्याही भावनिक आवाहनांना बळी न पडता तुमच्या भल्यासाठी अशा नेत्यासोबत, पक्षासोबत ठामपणे उभे रहा.
संतोबा...