वचने, आश्वासनांचा घेऊनी डोई टोप.
मतांचा जोगवा मागत फिरले दारोदार.
पण सग्या सोयऱ्यानांच दिले झुकतं माप,
भरवला केवळ त्यांच्यासाठी खास दरबार.
इतरांशी करून दूजाभाव मापात केलं पाप,
तिजोरी राहील स्वहाती असा केला कारभार.
गोरगरीब जनतेचा भोवला त्यांना शाप,
आली डोक्यावर ईडीची टांगती तलवार.
जमाखर्चाची बेरीज करता लागली धाप,
अवसान गळाले, चिंतेत पडले सरदार.
एका साध्या नोटीशीने रात्रीत बदलला बाप,
ज्याने केला उद्धार, लुटूनी त्यास केले निराधार.
दैवत म्हणोनी ज्यांच्या नावाचा केला जप.
त्यांच्या हाती देऊनी तुरी, पळाले सारे गद्दार.
अन्याय झाला आमुच्यावरी अशी मारुनी थाप,
पिढ्यान्पिढ्यांचे तालेवार झाले ताटाखालचे मांजर.
दिल्लीचेही तख्त राखतो, अशी महाराष्ट्राची छाप,
होऊनी दिल्लीचे मिंधे, गद्दार झाले हूकुमाचे ताबेदार.
उपऱ्यांची चाले मनमानी, कारभारी डोळे झाकून चुपचाप.
व्यवसाय-उद्योगधंदे गेले बाहेर, सोडला महाराष्ट्र वाऱ्यावर.
नेत्यावीन लढण्याचा वारसा, औंरंग्यास इथेच केला गप्प.
महाराष्ट्र-मराठीद्रोह्यांनो खबरदार, झाले जरी नेते फितूर.
मराठी, महाराष्ट्राला नडेल, अशी नाही कुणाची टाप.
गनिमांशी लढण्यास शूरवीर, निर्माण होतील घरोघर.
आता या साऱ्या गद्दारांची, जनताच उडवणार झोप.
हाती घेऊन मशाल, नाद तुतारीचा सर्वत्र घुमवणार.
संतोष गांजुरे...
0 प्रतिक्रिया:
Post a Comment