आली आली ही लोकशाहीची निवडणूक,
सज्ज होती सारे, पुन्हा करावया फसवणूक.
सुरू झाली नागरी समस्यांची सोडवणूक.
झाकण्या पाचवर्षाच्या नाकर्तेपणाचे पाप,
खड्ड्याळ रस्त्यांचा करू लागले मेकअप.
आली आली ही लोकशाहीची निवडणूक,
रखडलेल्या फायलींवर खरडल्या सह्या भराभर.
नाजूक, अत्यवस्थ तिजोरीवर दिला डोईजड भार.
बोलूनचालून गद्दार, अस्तित्व राखण्याची मारामार.
म्हणून ज्यांनी दिला आधार, त्यांच्यावर करती वार.
आली आली ही लोकशाहीची निवडणूक,
चर्चेत राहण्या रोज नवा वाद, नव्या तरकीब.
रातदिन सगळीकडे प्रायोजित बातम्यांचा रतीब.
तिकीटापायी कुणाचे ब्रेकअप, कोणाचे पॅचअप.
कोणी क्षणात बदलले पक्ष, कोणी बदलला बाप.
आली आली ही लोकशाहीची निवडणूक,
वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक ज्यांना संधी नाकारली.
त्यांच्या चारदिवस खाण्यापिण्याची सोय झाली.
फसव्या योजना, आश्वासनांचा भडिमार झाला.
काळ्याचा पांढरा करून, रोकडा व्यवहार केला.
आली आली ही लोकशाहीची निवडणूक,
कधी न दिसणारा साहेब घेऊ लागला गाठीभेटी.
साहेबांच्या प्रचारासाठी, बेरोजगारांची दाटीवाटी.
ज्यांनी केली फसवणूक, झटू लागले त्यांच्यासाठी.
जणूकाही हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या पाठी.
संतोबा...
0 प्रतिक्रिया:
Post a Comment