Ads 468x60px

Wednesday, November 26, 2025

प्रवाहपतित सेलेब्रिटी

                        क्रिकेट, राजकारण आणि सिनेसृष्टीचे भारतीय समाजाला प्रचंड आकर्षण आहे. या क्षेत्रात यशस्वी होणाऱ्या व्यक्तींचे भरपूर कट्टर अनुयायी तयार होत असतात विशेषतः सिनेसृष्टी आणि क्रिकेट. या सेलिब्रिटी सिनेकलावंत आणि क्रिकेटपटूंचे चाहते सेलिब्रिटींच्या अनेक बऱ्यावाईट गोष्टींचे समर्थन आणि अनुकरण करत असतात. आवडत्या सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी ते अनेक दिव्य पार करत असतात, त्यांच्यासाठी वेळ आणि पैसे खर्च करत असतात तर काहीजण त्यांच्यासाठी जीव द्यायला मागे पुढे पाहत नाही. त्यांना अगदी देवत्व बहाल करतात. अशा पाठीराख्यांमुळे सिनेमा किंवा क्रिकेटमध्ये यशस्वी होणाऱ्याला त्याच्या प्रतिभेच्या कित्येक पटीने मोबदला आणि नावलौकिक मिळत असतो. या सेलिब्रिटींच्या जीवनशैलीचा प्रभाव त्यांच्या चाहत्यांवर पडत असतो, ते त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते त्यांचे दिसणे असो, ते वापरत असलेली उत्पादने असो. प्रसिद्ध व्यक्तींनी अंगिकारलेल्या चांगल्या वाईट सवयींना, कृतींना सामाजिक प्रतिष्ठा मिळत असते. त्यांच्या कृतींचे सर्वसामान्य व्यक्तींकडून अनुकरण केले जाते. त्यामुळे सेलिब्रिटींच्या प्रसिद्धीचा वापर करून उद्योजकाने आपली उत्पादनांची जाहिरात न केली तरच नवल. त्यामुळे पाण्यासारखा पैसा ओतून व्यावसायिक लोकं सेलिब्रिटी कडून आपल्या मालाची जाहिरात करत असतात. गडगंज श्रीमंत असलेला सेलिब्रिटी त्याच्यादृष्टीने क्षुल्लक असलेल्या रकमेपायी लोकांच्या आरोग्यास हानिकारक असलेल्या एखाद्या गोष्टीची जाहिरात करताना त्याच्या चाहत्यांचा, सामाजिक बांधिलकीचा विचार करत नाही. मग ती जाहिरात पान मसाल्याच्या नावाखाली गुटख्याची असो, सोड्याचा नावाखाली दारूची असो, खेळाच्या नावाखाली जुगाराची असो, श्रमपरिहार, उत्साहवर्धकपेयांच्या नावाखाली हानिकारक शीतपेयांची असो. आपल्या मुळे किती कुटुंबे उद्ध्वस्त होईल याचा सारासार विचार सेलिब्रिटी करत नाही. सर्वसामान्य लोकं आपला चरितार्थ चालवण्यासाठी नोकरीधंदा करतात, तो करताना काही तडजोडी करतात, प्रसंगी मानापमान सहन करतात पण एका मर्यादेपलीकडे आत्मसन्मान विकून पैसे कमवत नाही. पण या गडगंज सेलिब्रिटींची नेमकी काय अगतिकता असते की ती असली अनैतिक कामे करायला सहज तयार होतात.                    
                        खरंतर कोणताही सिनेअभिनेता सिनेरसिकांशिवाय मोठा होऊ शकत नाही, कोणताही खेळाडू , क्रिकेटपटू क्रिडा चाहत्यांशिवाय, प्रेक्षकांशिवाय मोठा होऊ शकत नाही. कोणताही राजकीय नेता कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्याशिवाय मोठा होऊ शकत नाही. आपण ह्या लोकांना देवत्व प्राप्त करून देतो.त्यांची लार्जर दॅन लाइफ अशी आभासी प्रतिमा निर्माण करतो. कधी ही व्यक्ती राजकीय नेता, प्रसिद्ध अभिनेता, खेळाडू, प्रशासकीय अधिकारी किंवा तथाकथित सामाजिक कार्यकर्ता असू शकतो. कलेचा, कलाकाराचा सन्मान करता करता त्या कलाकारांमधील माणसाचा सन्मान करू लागतो पण आपण हा विचार करत नाही की तो माणूस सन्मान करण्याच्या योग्यतेचा आहे की नाही. पडद्यावर नायकाची भूमिका साकारणारा, भ्रष्ट, अन्याय व्यवस्थेला नडणारा, आपल्या चतुरस्त्र अभिनयाने भूमिका जिवंत करणारा चांगला कलाकार, चांगला माणूस असेलच असे नाही. आपल्या कौशल्याने आपल्या संघाला जिंकून देणारा चांगला खेळाडू माणूस म्हणून चांगला असेलच असे नाही. सातत्याने निवडून येणारा, लोकांना आपण त्यांचा तारणहार आहोत असा भासवणारा लोकप्रिय नेता चांगला माणूस असेल असे नाही. खरंतर नेत्यांनी धर्माचा, अभिनेत्यांनी नशेचा अन् खेळाडूंनी जुगाराचा बाजार मांडला आहे.अभिनय, खेळ, राजकारण हा त्या लोकांचा व्यवसाय, पेशा आहे. कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी त्या व्यवसायाला गरजेची असणाऱ्या कौशल्यात निपुण, निष्णात असणे ही त्या व्यवसायात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे आणि ती साध्य करण्यासाठी काही लोकं जीवतोड मेहनत करतात तर काही लोकांना ती कला अंगभूत जन्मजात स्वरूपात लाभते. ज्यावेळी कलेची देणगी अंगभूत, जन्मजात स्वरूपात लाभते त्यावेळी तिचा दर्जा(क्लास) हा वेगळाच असतो आणि अशा जन्मजात कलाकौशल्याची देणगी लाभलेल्या कलाकाराला, खेळाडूला सर्वसामान्य लोकं देवत्व बहाल करतात.
                     सिनेमाच्या माध्यमातून भ्रष्ट, अन्याय्य व्यवस्थेशी, सरकारशी दोन हात करणारा, सत्यासाठी, न्यायासाठी लढणारा, गुंडांशी दोन हात करणारा, निरपेक्षपणे दीन दुबळ्यांची बाजू घेणारा, त्यांना मदत करणारा, नैतिकची चाड असणारा आणि त्यासाठी प्रसंगी आपल्या प्रियजनांशी उभा दावा मांडणारा (पंगा घेणारा) एखादा अभिनयसम्राट, अँग्री यंग मॅन प्रत्यक्ष जीवनात व्यवस्थेला शरण गेलेला, कुठल्यातरी प्रकरणात अडकलेला आणि त्यातून सुटका व्हावी म्हणून सत्ताधाऱ्यांची तळी उचलणारा एक कणाहीन, लाचार व्यक्ती असतो. दैवी प्रतिभा लाभलेला खेळाडू, गायक, गायिका, साहित्यिक कधीही आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी करत नाही मात्र स्वतःच्या फायद्यासाठी नैतिकता गुंडाळून अधिकचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतो. कधी टॅक्स भरण्यातून सूट मिळवण्यासाठी, कधी सरकारी भूखंड मिळवण्यासाठी, स्वतःच्या संस्थेसाठी निधी मिळवण्यासाठी, पुरस्कार मिळवण्यासाठी, तर कधी आपले अपराध लपविण्यासाठी करत असतो. सत्तेविरुद्ध, व्यवस्थेविरुद्ध बोलून अडचणीत येऊ नये, आपली रोजीरोटी संकटात येऊन नये म्हणून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर, अडचणीवर मूग गिळून गप्प बसणारे सेलिब्रिटी सरकार अडचणीत आल्यावर मात्र सरकारची वकिली आणि जनतेला उपदेशाचे डोस द्यायला तत्पर असतात. सेलिब्रिटींना जर देशातल्या अराजकतेवर एक चकार शब्द उच्चारणारता येत नसेल तर त्यांनी लोकांना उपदेशाचे डोस देऊ नये आणि शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीतही पडू नये. जनता त्यांचा लढा स्वतः लढेल.           
                          खरंतर जनमाणसावर प्रभाव पाडणाऱ्या क्षेत्रातील सेलिब्रिटींनी (प्रभावशाली लोकांनी),समाजात वावरताना किमान नैतिकता बाळगावी अशी अपेक्षा असते. जेणेकरून त्यांना आदर्श मानणारी लोकं त्यांच्या वागण्याचा आदर्श घेतील. सरसकट सर्वच सेलिब्रिटी नाही पण किमान ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे आणि त्यांच्या आणि इतरही क्षेत्रातील लोक त्यांना आपला आदर्श मानतात, त्यांची कोणाशी स्पर्धा नाही अशा अद्वितीय प्रतिभा असलेल्या सेलिब्रिटींकडून समाजहिताची भूमिका घेणे अपेक्षित असते. एवढेच काय सरकारचा एखादा चुकीचा निर्णय बदलण्याचा, सरकारची ध्येय-धोरणे सुधारण्याची ताकद अशा सेलिब्रिटींमध्ये असते कारण त्यांना मोठ्या जनसमुदायचे पाठबळ असते पण भारतातील बहुतांश सेलिब्रिटींनी आपआपल्याला क्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलेले असले तरी प्रत्यक्ष राजकीय- सामाजिक जीवनात हे सेलिब्रिटी भयंकर खुजे आहेत. सर्वसामान्य जनता स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध आपापल्या परीने लढत असते पण हे सेलिब्रिटी जनतेसाठी सोडा स्वतःच्या आत्मसन्मासाठी देखील भूमिका घेत नाही एवढे हे लाचार आणि असहाय्य आहेत. त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे, व्यवस्थेला गोत्यात आणू शकणारी आपली भूमिका, आपले विचार जाहिर केले तर होणाऱ्या परिणामाची जाण त्यांना आहे. व्यवस्थेच्या, सत्तेच्या विरोधात गेलो तर प्रवाहाच्या बाहेर पडण्याची भीती आहे कारण सत्तेच्या अन् व्यवस्थेच्या अव्यवस्थेची भलामण करणाऱ्यालाच सत्ता, व्यवस्था पुरस्कृत करते. जे सत्तेची, व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना सत्ता अन् व्यवस्था बहिष्कृत करते. आपण प्रवाहाच्या बाहेर पडू, एकटे पडू अडचणीत येऊ, सगळी प्रतिष्ठा, प्रसिध्दी, पैसा धुळीस मिळू नये म्हणून कायम हा ही चांगला तो ही चांगला अशी सोईस्कर भूमिका घेण्याचा अभिनय ते लीलया पार पाडतात. अमाप पैसा, प्रसिद्धी, लोकांचे पाठबळ, नैतिकतेचे पाठबळ असताना चुकीला चूक म्हणता येत नसेल, अन्यायाला विरोध करता येत नसेल अन् न्यायाची बाजू घेता येत नसेल तर या सेलिब्रिटींची अलौकिक प्रतिभा व्यर्थ आहे. 
                      चित्रपटातून, खेळामधून, गाण्यांमधून आपल्याला क्षणिक आनंददायी अनुभव(फिलगुड फॅक्टर) मिळतो, पण हा क्षणिक आनंददायी अनुभव आपल्या मूलभूत अडचणी सोडवत नाही. ज्या महापुरुषांमुळे आपल्या आयुष्यात चांगला बदल घडला आहे त्यांना आपण कवडीची किंमत देत नाही पण शेळपट सेलिब्रिटींना आपण देवत्व बहाल करतो. कायम चर्चेत, बातम्यात असणारे, चित्रपटगृहाच्या आणि टीव्हीच्या पडद्यावर कायम दिसणारे लोक हळूहळू सेलेब्रिटी बनतात. सध्या त्यात इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्यांची भर पडलेली आहे. ज्या लोकांच्या प्रेमामुळे आपल्याला मानसन्मान, प्रसिद्धी पैसा मिळाला आहे, ज्यांच्यामुळे सगळ्या सुख सुविधा असलेले विशेष जीवन उपभोगतोय त्या लोकांच्या गरजेपोटी ठाम भूमिका घेण्याएवढी हिंमत सेलिब्रिटींमध्ये नसेल आणि ते केवळ प्रवाहाबरोबर वाहवत जाणारे असतील तर अशा शेंदूर लावून देवत्व बहाल केलेल्या सेलिब्रिटी दगडांचा शेंदूर आपण खरवडून त्यांचे पाय मातीचेच आहेत हे सत्य स्विकारला हवे. हे सेलिब्रिटी म्हणजे कोणी दुसरे तिसरे कोणी परग्रहावरची लोकं नसून तुमच्या आमच्या सारखेच सर्वसामान्य लोकं आहेत. त्यांच्याशी आपण आपला संबंध हा त्यांच्या कलेपुरता मर्यादित ठेवावा. त्यांना खास वागणूक देऊन व्हीआयपी संस्कृती वाढू देऊ नये. त्यांच्यासाठी कायदे नियम धाब्यावर बसवून अतिरिक्त लाभ मिळू देऊ नका. या व्हीआयपी संस्कृतीचा आणि त्यांना मिळणाऱ्या विशेषाधिकारांचा, अतिरिक्त लाभांचा त्रास आपल्यालाच होणार आहे, नुकसान आपलेच होणार आहे. या दिखाऊ, कचाकड्याच्या बाहुल्या आपल्यासाठी सेलेब्रिटी नाहीत. आपल्यासाठी लढणारा, अन्याय्य व्यवस्थेला नडणारा, स्वातंत्र्याची, समतेची, न्यायाची चाड असणारा, विवेकवादी समाज घडवणारा व्यक्तीच आपला खरा सेलेब्रिटी आहे.
                                                          संतोबा (संतोष गांजुरे).

Saturday, August 2, 2025

चांगभलं होता होता

चांगभलं होता होता, स्वप्ने सारी उद्ध्वस्त झाली.
अरे पुन्हा सत्तेतून हटवा, दलालांचे वाली. 

आम्ही पोकळ आश्वासनांची ही, पालखी का वहावी.
जे कधी मिळणार नव्हते, त्याची आस का बाळगावी.
कशी जेलात जाणाऱ्यांची, मंत्रीमंडळी वर्णी लागली.

तोऱ्यात केली त्यांनी, कायदा सुव्यवस्थेची माती.
आम्हांवरी कारवाईची, तलवार कायम लटकती.
आम्ही ते विवेकी, ज्यांना शोषित ही ना वाली.

उभा पक्ष झाला आता भ्रष्ट, गुंडांची बंदिशाला.
जिथे कलंकितांना, मंत्रिपदाचा प्रसाद मिळाला.
कसे हे निष्ठावंत दुर्देवी अन गद्दार भाग्यशाली.

धुमसतात अजुनी मेल्या, वर्णश्रेष्ठत्वाचे निखारे.
अजूनही द्वेष पेरत फिरती, कट्टरतावादी सारे.
आश्वासनेच जन सुरक्षतेची, आम्हाला मिळाली !

तेच जुने डाव पुन्हा टाकती, फिरुनी नवे सत्ताधारी.
तेच गळफास लावती, सिंहासनावरचे नाग विषारी.
आम्ही मात्र पोसत राहतो, त्याच त्या विषवल्ली.

अशी कशी ज्याने त्याने ठेवली, बुद्धी गहाण?
असे कसे हे जहागिरदार, सत्तेस गेले शरण?
कशी लाचार शहेनशहांनी, पत्करली ही दलाली?.
                                       संतोबा ...

Wednesday, July 16, 2025

नतद्रष्ट

सारं आहे तोट्यात दाखवून, विका सर्व.
असा हा नवभारत, अन् असे हे विकासपर्व.
घोटाळेबाज दल्ले, राजरोस लुबाडती खर्व.
अन् आम्हाला केवळ, वांझोट्या गोष्टींचा गर्व.

दीन दुबळ्यांना झोडपणे, हे असे त्यांचे शौर्य.
अन् अन्यायाविरुद्धचा लढा वाटे त्यांना कौर्य.
जनतेस लावी देशोधडीला, एवढेच त्यांचे कार्य. 
कोहळा घेऊन आवळा देणे, हे त्यांचे औदार्य.

साऱ्या घोटाळ्यांचे, गाडीभर पुरावे यांच्या संग्रही.
नोटीशी पाठवून त्यांना, सोबत घेण्या हे आग्रही.
व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या संकल्पी हे निग्रही.
जे जे त्यांच्या विरोधात, ते सारे देव,धर्म,देशद्रोही.

कुबेरा श्रीमंत करण्या, ठेवती सारं काही गहाण.
काबाडकष्ट करणाऱ्याच्या वाट्यास, येई मरण. 
राक्षसी सत्ता, गडगंज संपत्तीपुढे होती सारे शरण.
पडद्या-मैदानावरचे सारे वाघही, घालती लोटांगण.

गतकाळाची ओढ यांना, नको भविष्याची पायाभरणी.
बेजबाबदार सारे,  फलद्रूप होईना यांची एकही करणी.
निष्फळता लपविती, गात गतअग्रणीच्या नावे रडगाणी.
कायदे बदलून नितीभ्रष्ट होती पावन, करण्या मनमानी.
                                       संतोबा ....

Sunday, June 22, 2025

आधारवड

मी कर्ता, मीच करविता, मी साऱ्यांचा भाग्यविधाता. 
आसमानी,सुलतानी संकटी, मी संकटमोचक विघ्नहर्ता. 

कष्टकऱ्यांचा नेता मी, भांडवलदारांचा सारथी मी. 
सर्वांच्या यशातील वाटा मी, असा आहे मी असामी.

चेहरा माझा पुरोगामी, प्रतिगाम्यांचाही आधार मी.  
दोन्ही दगडी पाय माझा, पडद्यामागचा सुत्रधार मी.

अगम्य माझ्या चाली अन् लवचिक माझी विचारधारा.
दोन्हीकडे ऊठबस माझी. संकटी जो मी त्याच्या आधारा.  

अकल्‍पित माझ्या भूमिका, कधी कोणाला देतो टाळी.
घडो काहीही कुठेही, साऱ्यांना वाटे माझीच ही खेळी.

आपले साऱ्यांशीच सख्य, नाही कोणाशी कसले वैर.
न बोलल्या शब्दांबाहेर जो माझ्या, नाही त्याची खैर.

सत्तेच्या सारीपाटापायी, अलत्याभलत्यांशी लावतो पाट.
वेळोवेळी, भल्याभल्यांना दाखवतो मी कात्रजचा घाट.

रुजवली मी जी विषवल्ली, भिडे तिचा फास माझ्या गळा. 
उद्ध्वस्त केली तरुणाई तिने, मनी फुलवला द्वेषाचा मळा.

निकराच्या लढाईत, डाव जिंकताना तह मी केला.
बेरजेच्या राजकारणात, विश्वास मात्र वजा झाला.

कमावला नावलौकिक, तरी पाठ सोडेना खंजीर. 
वैऱ्यास सामील झाले सांगाती, तोडून नात्यांची जंजीर.     


                                                       संतोबा...

Saturday, June 14, 2025

जागृती

मत आमचे, ईव्हीएम तुमची.
देश आमचा, सत्ता तुमची.
राज्य आमचं, राजकारण तुमचं.
दरबार आमचा, कारभार तुमचा. 
निष्ठा आमची, प्रतिष्ठा तुमची.

सातबारा आमचा, शिक्का तुमचा.
पिकं आमची, दर तुमचा.
कष्ट आमचे, कर तुमचा.
फास आम्हाला, घास तुम्हाला.
उपाशी आम्ही, तुपाशी तुम्ही.

योजना आमच्या, लालफित तुमची.
हतबल आम्ही, बलवान तुम्ही.
अस्वस्थ आम्ही, आश्वस्त तुम्ही. 
हाल आमचे, व्यवस्था तुमची.
खड्डेखुड्डे आम्हाला, पायघड्या तुम्हाला.

धर्म आमचा, बंधने तुमची. 
सेवा आमची, मेवा तुमचा. 
श्रद्धा आमची, धंदा तुमचा.
तिजोरी आमची, किल्ली तुमची.
घाव आम्हाला, भाव तुम्हाला. 

जुलमी राजवट, निर्दयी व्यवस्था तुमची.
ती उद्ध्वस्त करण्याची ताकद आमची.
देव,देश,धर्माच्या बाजारीकरणाचे हस्तक तुम्ही.
तथ्य जाणून सत्यशोधन करणारे मस्तक आम्ही.
क्षणभंगुर वर्चस्ववाद तुमचा, शाश्वत समता आमची.

                                            संतोबा...

Sunday, May 4, 2025

पुरंदर विमानतळ - शासन प्रशासनाची मनमानी

             या लोकांच्या हातात तलवारी, बंदूका नाहीत, या लोकांनी कोणावरही आक्रमण केलेले नाही. मग एवढा फौजफाटा कशासाठी?. एवढा फौजफाटा त्यांना रोखण्यासाठी तैनात करावा लागण्याइतपत हे लोक डेंजर - धोकादायक आहेत का?. हे लोक आपल्या अस्तित्वासाठी हक्कासाठी एकत्र आले आहेत. आपली मालकी हक्काची घरे, शेतजमीन, संसार वाचवण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देणे गुन्हा आहे का?. दुपारच्या रखरखत्या उन्हात वृद्ध, महिला, असाह्य शेतकऱ्यांवर आपण गुन्हेगारांवर कारवाई करतोय अशा प्रकारे अमानुष लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने केला गेला?. आपल्या हक्काची जाणीव असलेला व्यक्ती सत्ताधाऱ्यांसाठी धोकादायक असतो. सत्ताधारी एकवेळ गुन्हेगारांना सोडतील पण आपल्या हक्काची जाणीव असलेल्या व्यक्तीला कदापी सोडणार नाहीत. सात-आठ वर्षापासून चाललेल्या या संकटाच्या धसक्याने बाधीत गावातील काही व्यक्ती दगावल्या आहे. थोडाबहुत शिल्लक असलेला निसर्ग ओरबाडून, भूमिपुत्रांवर जबरदस्तीने परागंदा व्हायला भाग पाडण्याच्या प्रयत्न करणारी ही मोगलाई कोणाच्या भल्यासाठी आहे. भांडवलदारांचे हितसंबंध आणि दलालांचे लागेबांधे कष्टकरी बळीराजाच्या जीवावर बेतले आहेत. हा प्रकल्प करण्याची निकड आणि तो इथेच करण्याचा हट्ट का आहे?.

                    गेल्या सात-आठ वर्षात एकदाही कोणाला निर्हेतुकपणे येथील भूमिपुत्रांशी सल्लामसलत करायची गरज वाटली नाही. जे आले ते केवळ प्रकल्पाची वकिली करण्यासाठी आले. कोणीही आम्हाला विकासाचे गाजर दाखवू नका, बळीराजाची, भूमिपुत्रांची कोणाला किती फिकीर आहे त्याचे कौतुक आम्हाला सांगू नका आणि आमच्या भल्याचा बाजारगप्पाही मारू नका, तुम्हाला आमची किती काळजी आहे ते आम्ही जाणतो. शेतीमाल परदेशी निर्यात करता येईल ही थाप मारण्यापूर्वी शेतीसाठी मुबलक वीज,पाणी याची व्यवस्था केली आहे का? बोगस बियाणे, बोगस रासायनिक खते, बोगस तणनाशक, बोगस कीटकनाशके यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय प्रयत्न केले आहेत का?. आणि सर्वात महत्वाचे आम्ही भूमिहीन झाल्यावर शेती कुठे आणि कशी करणार? अंतराळात शेती करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे का?. तुमच्या पोकळ आश्वासनाने आमच्या पुढील जगण्याची कठीण आव्हाने संपणार नाहीत. ज्यांचा शेती हा धर्म अन् कर्म आहे त्यांच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. त्याचबरोबर अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर घटकांचाही हा प्रश्न आहे. या संकटाची जाणीव त्यांनाही होणे गरजेचे आहे आणि हा लढा त्यांचाही व्हायला हवा. 

                   या ब्रह्म राक्षसापुढे निसर्ग मूक आहे आणि भूमिपुत्र हतबल आहे. निसर्गावर बुलडोझर चालवून तुम्ही तो उद्ध्वस्त कराल पण निसर्ग सर्वशक्तिमान आहे तो तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. निसर्गाचा आणि भूमिपुत्रांचा तळतळाट तुमच्या सर्वनाशास कारणीभूत ठरेल एवढा अन्याय करू नका. या प्रकल्पाची झळ फक्त बाधित भूमिपुत्रांना बसणार नाहीतर आजुबाजूच्या सर्वांनाच बसणार आहे. पैशाच्या जोरावर साऱ्याच गोष्टी विकत घेता येत नाही, नैसर्गिक साधनस्रोत मर्यादित आहेत. आधीच पाण्याची विजेची टंचाई आहे. पाणी आणि विजेसाठी उद्योगधंद्यांना प्राथमिकता दिली जाते आणि शिल्लक राहिल्यावर शेतीसाठी. त्याचप्रमाणे विकासाच्या पंचपक्वानांवर भांडवलदार आणि दलाल ताव मारतील आणि सर्वसामान्यांच्या वाट्याला उष्ट्या पत्रावळी येतील. या प्रकल्पाला संपूर्ण जिल्ह्यातील लोकांनी विरोध करणे गरजेचे आहे. आज शहरात रहदारीचा प्रश्न भेडसावत आहे, जगात रहदारीच्या बाबतीत पुणे चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्याबरोबरीने वर्षागणिक येथील प्रदूषण आणि तापमान वाढत आहे. शहरात लोकांनी कोटीमध्ये किंमत असलेले फ्लॅट घेतले आहेत पण पायभूत सुविधांचा बोजवारा वाजला आहे आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, निर्भेळ अन्न कितीही पैसे देऊन विकत मिळणार नाही आणि पर्यायाने निरोगी शरीर आणि आरोग्यही मिळणार नाही. 

                हा निसर्ग भकास करून होणारा विकास भांडवलदार आणि दलाल वगळता कोणाच्याही फायद्याचा नाही. त्यामुळे सर्वांनी आपआपल्यापरीने विरोध आणि घटनेचा निषेध करायला हवा. सध्या चाललेला भूमिपुत्रांचा तीव्र विरोध जर दुर्दैवाने शासनप्रशासनाने बळजबरीने चिरडला तर पुढे होणारा विध्वंस कोणालाही थांबवता येणार नाही. वेळ निघून गेल्यानंतर उपरती होऊन काहीही फायदा होणार नाही. आणि कोणी कितीही प्रामाणिक प्रयत्न केले तरी त्याची भरपाई होऊ शकणार नाही. आज जे हा प्रकल्प राबवण्यासाठी झटत आहेत तेही कोणाचे ना कोणाचे प्यादे आहेत, त्यांना तात्पुरता फायदा होईल पण कधी ना कधी त्यांनाही पश्चात्ताप करायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. जे प्रकल्पाचे समर्थन करत आहेत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा. त्यांनी तात्पुरता फायद्याच्या विचार न करता शाश्वत फायद्याचा विचार करायला हवा. परक्यांना आपल्या उरावर बसू देऊ नका, येणाऱ्या पिढ्यांचा विचार करा. त्यांच्यासाठी काहीतरी वारसा जपून ठेवा. आपल्याच गावात, तालुक्यात त्यांना उपरे म्हणून कोणाच्या हाताखाली हमाली करायची वेळ येऊ देऊ नका. 

                  शेवटी शासन प्रशासनाला विनंती आहे, हा भूमिपुत्रांवरचा जुलमी अत्याचार त्वरित थांबवावा. हा बळजबरीचा विकास त्यांच्या माथी मारू नका. तुमची विकासाची तळमळ ज्यांना अशा विकासाची आवड आहे त्या ठिकाणी दाखवा. या भूमिपुत्रांच्या स्वातंत्र्याची, सार्वभौमत्वाची, हक्काची, न्यायाची बूज राखा. त्यांच्या आत्मसन्माला, मानवीहक्कांना ठेच पोहचेल असे दुष्कृत्य करू नका. छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मभूमीचा दैदिप्यमान वारसा तसेच जी आय मानांकन असलेला अंजीर, सीताफळ, डाळिंब, वाटाणा इत्यादी दर्जेदार फळांची, माळव्याची निर्यात करणाऱ्या भूमीचा वारसा त्यांना जपू द्या. खरंतर या मातीच्या कर्तृत्वाचा दैदिप्यमान इतिहास अन् वारसा जपण्याचे कर्तव्य केवळ येतील भूमिपुत्रांचेच नाहीतर भारत देशातील सर्व विवेकवादी देशप्रेमींचे आहे, एवढा जाज्वल्य इतिहास असताना तुम्ही हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करून गद्दारीचा शिक्का तुमच्या भाळी लागण्याचे पाप घेऊ नका, तुमच्या येणाऱ्या शेकडो पिढ्यांना हा गद्दारीचा शिक्का नाईलाजाने मिरवावा लागल्यावर ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहतील काय?. 

                                  संतोबा (संतोष गांजुरे)...

Wednesday, April 2, 2025

गद्दार

सशाचे काळीज अन् सिंहाची माझी डरकाळी,
खबरदार, जर कोणी हसाल अन् वाजवाल टाळी.

आहे बेनामी जरी, तरी झोंबते आहे मज हे विडंबन.
लख्ख माझी बेईमानी, कसे करू मी तिचे खंडन.

दलाली अन् खंडणी मागणं, अजीर्ण झाले मज खाणं.
टिका करणं, दोष देणं, हे एवढेच आता माझे रडगाणं.

पोसल्या पिढ्या ज्याने, लाथाडले मी ते ताट.
अनाजीशी साठगाठ, ही समृद्धीची वाट सुसाट.

करकरीत चलनी कागदावरी जडली माझी प्रीती.
टीचभर नोटीशीच्या कागदाने, भरली मनी भीती.

गाफील ठेऊनी स्वकीयांना, असंगाशी संग केला.
वेळ बदलता, कावेबाजाने केसाने गळा कापला. 

बोगस कर्तुत्वाची, दिखाऊ पताका भिडवली आभाळी,
तरी दिसे बेदखल होण्याची, चिंता माझ्या कपाळी.

वाढीव माझे कर्तृत्व अन् वाढीव माझे कार्यकर्ते.
गद्दारीचा शिक्का भाळी, आता बाकी काय उरते.

मिळाली संधी नेतृत्वाची, ज्या भूमीचा वारसा शूरवीरांचा.
लाभली सारी पदं, पण उरलो केवळ म्होरक्या गद्दारांचा.                         

                                           संतोबा...
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!