Ads 468x60px

Saturday, February 14, 2026

माझी भुमिका

                          मी हातावर पोट आणि उद्याची चिंता असलेला नोकरदार आहे. फार काही नसले तरी सध्या स्वाभिमानाने कुटुंब चालवण्याइतकी कमाई मेहनत करून कमवत आहे. नोकरीशिवाय उपजीविकेचा दुसरा मार्ग नसल्याने आणि नोकरीची खात्री नसल्याने भविष्याची चिंता वगळता बऱ्यापैकी स्थिरस्थावर आहे. सर्वकाही ठीकठाक चालले असताना, कसलाही वैयक्तिक रागलोभ नसताना विनाकारण व्यवस्थेविरोधी अन् प्रस्थापितांविरोधी भूमिका घेणे माझ्या अंगलट येऊ शकते. एखाद्याच्या मनात आले तर माझे अस्तित्व क्षणात नाहीसं होऊ शकतं याची मला जाणीव आहे. माझे बहुतेक सर्व आप्तेष्ट, सहकारी या व्यवस्थेला, प्रस्थापितांना अनुकूल आहेत, किंबहुना कट्टर समर्थक आहेत. त्यातील काहींचे या प्रस्थापित व्यवस्थेशी हितसंबंध आहेत अन् ते या व्यवस्थेचे लाभार्थीदेखील आहेत तर बाकीचे बहुसंख्य प्रवाहासोबत वाहवत जात आहेत. मी माझ्या तत्वांना मुरड घालून प्रवाहासोबत चाललो तर मी सुद्धा व्यवस्थेचा लाभार्थी बनू शकतो किंबहुना समर्थकांपेक्षा जास्त लाभ मला मिळू शकतो कारण व्यवस्थेला, सत्तेला प्रश्न विचारलेले आवडत नाही. पण मी या बिघडलेल्या व्यवस्थेला आणि मस्तवाल सत्तेला पूरक भूमिका घेऊ शकत नाही कारण मी माझ्या तत्वांशी तडजोड करू शकत नाही. लोकहिताला बाधा आणणारा लोकानुनय करणं मला जमणार नाही. लोकं काय म्हणतील याची चिंता मी करत नाही, ना मी लोकांच्या मनातून उतरेल याची चिंता करतो. मी माझ्या स्वतःच्या मनातून उतरणार नाही याची काळजी घेतो. सगळ्यांना खुश ठेवावे एवढी सवड आणि आवड मला नाही. सर्वांना खुश करण्यासाठी मला माझ्या तत्वांशी प्रतारणा करावी लागेल. कोणाचे तरी मिंधे होऊन जगण्यापेक्षा हा तत्त्वाने, नितीनियमाने जगण्याचा काटेरी मार्ग मी आनंदाने स्विकारला आहे.मी हा मार्ग निवडला आहे आणि त्यासाठी मल खूप काही सोसावे लागेल हे मान्य आहे. माझ्या आजूबाजूला प्रस्थापित व्यवस्थेशी व्यवस्थित जुळवून घेणारे बहुतेक सर्वजण आहेत त्यामुळे मी सगळीकडे एकटा पडत चाललो आहे पण मी एकटा पडलो तरी हरकत नाही, एकवेळ वेळकाळ पाहून मी दोन पाऊले मागे येईल पण मी माझ्या मार्गावरून बिलकुल ढळणार नाही.

                        खरंतर मी कोणाच्याच विरोधात नाही. कोणाला विरोध करावा एवढा मी मोठा नाही. व्यवस्थेला, सत्तेला विरोध करण्याएवढी ताकद माझ्याकडे नाही. माझ्या लिहिण्या - बोलण्याने काही बदल होईल याचीही फारशी शक्यता नाही पण मला माझे कर्तव्य पार पाडले पाहिजे. मी व्यवस्थेविरोधी किंवा प्रस्थापितांविरोधी नाही. मला ज्या व्यवस्थेने, ज्या विचारधारेने स्वावलंबी बनवले, आत्मसन्मान मिळवून दिला तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. माझा हा प्रयत्न आयुष्याच्या अखेरीपर्यंत चालू राहील. आपल्याला नैसर्गिकपणे चांगल्या गोष्टींची ओढ असते, चांगले घर, गाडी, मुलांची शाळा, सुरक्षित भविष्य आणि म्हणून दिवसेंदिवस आपण आपले जीवनमान उंचावावे, आपल्याकडे नसलेल्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात म्हणून प्रयत्न करत असतो. आपल्याकडे नसलेल्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात अशी आपली भावना असते तशीच आपल्याला जे मिळाले आहे ते इतरांनाही मिळावे अशीही आपली भावना असते. याच भावनेतून आपल्याला ज्या समाजकल्याणकारी व्यवस्थेचा, विचारधारेचा लाभ झाला आहेत ती टिकावी, तिच्यात अजून सुधारणा व्हावी, तिचा लाभ सर्वांना मिळावा या उद्देशाने मी लिहित असतो, बोलत असतो. मुख्यत्वे या कल्याणकारी योजनांचा उद्देश समाजातील असमानता कमी करणे, गरिबी दूर करणे, शिक्षण-आरोग्य-सुरक्षा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे. शिक्षण, आरोग्यसेवा, पोषण, स्वच्छ पाणी व स्वच्छता सुविधा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या सर्व जनतेला परवडणाऱ्या मोबदल्यात मिळाव्यात हा असतो.  या व्यवस्था सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा कल्याणकारी राज्याकडून (Welfare state) असते. या अपेक्षेची पूर्तता शासन-प्रशासन करत नसेल तर ते करण्यासाठी त्या भाग पाडणे हे समाजातील विवेकशील लोकांचे कर्तव्य आहे.               

              आमच्या पिढ्या अन् पिढ्या शेती, शेतमजुरी आणि तत्सम कष्टाची कामे करण्यात गेल्या. शिक्षण घेतलेली ही माझी पहिलीच पिढी आणि शिकून नोकरी करणारा मी पहिलाच. मी शिकलो म्हणून आज इथपर्यंत पोहचू शकलो. माझा जन्म सरकारी दवाखान्यात झाला, मी जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेतले. पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत माध्यमिक शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पुरंदर ज्युनिअर कॉलेजमधून घेतले. कॉलेजचा पारगाव-सासवड प्रवास राज्य महामंडळाच्या एसटीने केला. पुढचे शिक्षण शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेत घेतले. या सर्व संस्थांच्या नाममात्र फी मुळे मी शिक्षण घेऊ शकलो. या सर्व संस्था होत्या म्हणून मी इथपर्यंत पाहोचलोय, अन्यथा मी आज रोजंदारीवर शेतमजुरी करत असतो. कर्ज आणि हिस्सा वाटपामुळे शेतीचा वारसा माझ्यापर्यंत पोहचलाच नाही त्यामुळे शिकलो नसतो तर आज मला रोजंदारीवर शेतमजुरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. परिस्थिती हलाखीची होती पण मी कोणापुढे कधी हात पसरला नाही. कोणाचे मिंधे होऊन मी जगू शकलो नसतो. आज मी बऱ्यापैकी स्थिरस्थावर आहे आणि कित्येक वर्षापासून मला एसटी ने प्रवास करण्याची गरज पडली नाही, तसेच सरकारी दवाखान्यात जाण्याचीही आवश्यकता पडली नाही. माझा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातो. तरीही मी एसटी, सरकारी दवाखाने, मराठी शाळा व अशाच अनेक व्यवस्था, संस्था याबद्दल मी एवढ्या पोटतिडकीने का बोलतो असा प्रश्न अनेकांना पडतो. आज मला या गोष्टींची गरज नाही म्हणून दुसऱ्या कोणालाच त्या गोष्टीची गरज नाही असे नाही. मोफत शिक्षण, परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था यासारख्या काही कल्याणकारी योजनांचा लाभ आमच्या पिढीला झाला. तो लाभ सध्या शिक्षणापासून आणि सर्व पायभूत सुविधांपासून वंचित असलेल्यांना व्हावा ही माझी मनापासूनची इच्छा आहे. खरंतर आमच्या पिढीला या व्यवस्थेचा लाभ मिळाला या व्यवस्था परिपूर्ण नव्हत्या किंबहुना मोडकळीस येऊ लागल्या होत्या पण म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार त्याप्रमाणे या संस्थानी आम्हाला आधार दिला आणि त्या आधारे आम्ही आमचे भवितव्य घडवले. खरंतर या मोडकळीस आलेल्या व्यवस्था सुधारणे आवश्यक होते, पण ते न होता या व्यवस्था संपुष्टात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.                       

                   समाजातील सुस्थापित, प्रस्थापित वर्गाचा कल्याणकारी योजनांना(Welfare scheme)विरोध असतो. केवळ आपण कर भरतो म्हणून शासन लोककल्याणकारी योजना चालवत असते असा सुस्थापित,प्रस्तापित वर्गाचा गोडगैरसमज असतो. दुसरे असे की समाजातील गरीब कष्टकऱ्यांची मुले शिकली तर आपल्या मुलांना भविष्यात स्पर्धा निर्माण होईल तसेच कष्टाच्या कामासाठी आपल्याला कवडीमोल भावात कामगार मिळणार नाहीत अशी संकुचित वृत्ती या सुस्थापित, प्रस्थापित वर्गाची असते. त्या संकुचित, प्रस्थापित वर्गाने थोडा उदारमतवादी दृष्टिकोन स्विकारला पाहिजे. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, आपण स्थिरस्थावर आहोत म्हणजे सर्व ठीकठाक आहे असे होत नाही. आपल्याला सर्व सुखसुविधा मिळत असल्यातरी सुरक्षित, सुसंस्कृत, सुशिक्षित सामाजिक वातावरण आपण विकत घेऊ शकत नाही. हे सामाजिक वातावरण निर्माण करावे लागते, त्यासाठी समाजातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दरी सांधावी लागते. समाजात पराकोटीची विषमता असेल तर तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो गुन्हेगारी वाढीस लागते. समाजातील गुन्हेगारीचा फटका याच तथाकथित प्रस्थापित वर्गाला जास्त बसतो. आपल्याला सामाजिक सुरक्षितता, स्वातंत्र्यता मिळावी म्हणून तरी समाजातील सर्व घटकांना संधी मिळू द्यावी त्यास विरोध करू नये. पायभूत दुरावस्थेचा बळी कोणीही होऊ शकतो. खराब रस्त्यामुळे कोणाचाही अपघात होऊ शकतो, भेसळयुक्त अन्नपदार्थ, औषधे यांना कोणीही बळी पडू शकतो. आज व्यवस्थेच्या दुरावस्थेला बळी पडणारा कोणीतरी दुसरा आहे म्हणून असंवेदनशीलता दाखवू नका. उद्या आपण बळी पडल्यावर आपणही इतरांसाठी दुसरा कोणतीतरी असू शकू याचे भान ठेवून या सर्व शासकीय, प्रशासकीय, सामाजिक व्यवस्था सुधाराव्यात म्हणून प्रयत्न करायला हवेत. आपल्या आवडीचा, आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा राजकीय नेता आहे, प्रशासकीय अधिकारी आहे. आपल्या आवडत्या विचारसरणीचे शासन - प्रशासन आहे म्हणून त्यांच्या चुकांवर पांघरूण घालू नये. आपल्या व्यक्तीस्वातंत्र्याला, स्वायत्ततेला, संपत्तीला, सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या, आपल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणाऱ्या शासन प्रशासनाला आपण जाब विचारला पाहिजे, त्यांना जोरदार विरोध केला पाहिजे. सत्याची, न्यायाची बाजू घेता आली पाहिजे. कोणत्याही गोष्टीने प्रभावित न होता चुकीला चूक म्हणत विरोध करावा आणि चांगल्याला चांगले म्हणत समर्थन करावे अशी सर्वांची भूमिका असावी अशी माझी भूमिका आहे.            

                          आपल्या सर्वांची भूमिका समता, न्याय आणि मानवतेची असावी, यातच सर्वांचे खरे कल्याण आहे.देश किंवा राज्यात अराजकता, यादवी किंवा अन्याय माजला तर तेथील कोणतीही व्यक्ती खऱ्या अर्थाने सुरक्षित राहू शकत नाही. मूठभर लोकांच्या हातात सर्व साधनसंपत्ती केंद्रित होऊ देऊ नये; कोणत्याही क्षेत्रात त्यांची मक्तेदारी निर्माण होऊ देऊ नये. मक्तेदारी आली की संपूर्ण समाज हतबल होतो आणि ही हतबलता म्हणजेच एक प्रकारची गुलामीच ठरते. यासाठी सत्तेचे आणि संपत्तीचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे. सर्वांना समान संधी मिळाल्या तर जास्तीत जास्त लोकांची क्रयशक्ती वाढेल, वैयक्तिक विकासाबरोबरच देशाच्या प्रगतीला प्रत्येकजण हातभार लावू शकेल.चांगले शिक्षण, शुद्ध पिण्याचे पाणी, निर्भेळ आणि पौष्टिक अन्न, सुदृढ आरोग्यव्यवस्था, सुरळीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सर्वसामान्यांना सुरक्षित वाटेल अशी अंतर्गत सुरक्षा व्यवस्था, दर्जेदार पायाभूत सुविधा त्याचबरोबर शुद्ध हवा ही सर्वांची सामायिक गरज आहे आणि आपण सार्वजनिक संसाधनांचा वापर करतो त्यामुळे हे सर्व व्यवस्थित असावे ही आपली सामूहिक गरज आणि जबाबदारी आहे. नैसर्गिक संसाधनांचे जतन करावे; कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी त्यांचा नाश होऊ देऊ नये. हे सर्व साध्य करण्यासाठी समाजाने सतत जागृत राहिले पाहिजे. सत्ताधारी, प्रशासन किंवा उत्तरदायी घटकांना त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्यांबाबत (Key Responsibility Areas) प्रश्न विचारावेत. अनियमितता आढळली तर कायदेशीर कारवाईसाठी पुढाकार घ्यावा. व्यवस्थेला न घाबरता, प्रश्न विचारत राहावे. आपल्या व्यक्तीस्वातंत्र्य, स्वायत्तता, संपत्ती आणि सुरक्षिततेला धोका पोहोचवणाऱ्या किंवा मूलभूत हक्कांची पायमल्ली करणाऱ्या शासन-प्रशासनाला जोरदार विरोध आणि जाब विचारणे आवश्यक आहे. निवडक (सिलेक्टीव) कोणाला मदत करून, त्याला उपकृत करून आयुष्यभर उपकारच्या ओझ्याखाली ठेवणारी, अनैतिक मार्गाने रॉबिनहूड पद्धतीची मदत करणारी व्यवस्था नाकारून त्याऐवजी अशी परिसंस्था (इकोसिस्टम) विकसित करण्याचा प्रयत्न आहे जी सर्वांना आवश्यक सुविधा निरपेक्षपणे (कोणाच्या मेहरबानीशिवाय) उपलब्ध करेल, प्रत्येकाला त्यांच्या कौशल्यानुसार संधी देऊन स्वावलंबी बनवेल. अशी परिसंस्था विकसित व्हावी, ती टिकावी आणि सतत वृद्धिंगत होत जावी ही माझी मनापासूनची इच्छा आणि भूमिका आहे. सर्वांनी यासाठी एकत्र येऊन प्रयत्न केले तरच हे शक्य होईल म्हणून मी जिथे मांडता येईल तिथे, जशी मांडता येईल तशी माझी भूमिका मांडत असतो. 

                                                               संतोबा...   

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!