Ads 468x60px

Saturday, September 14, 2019

माझा जाहीरनामा - विधानसभा निवडणूक-२०१९

१) मी कायम सर्वांगीण विकासास प्राधान्य देईन मात्र विध्वंसक विकासाला माझा नेहमीच विरोध राहील.
अ) हजारो एकर जमिनीचे वाळवंट करून पुरंदरचा इतिहास-भूगोल बदलणाऱ्या, पर्यावरणाची अपरिमित हानी करणाऱ्या आणि स्थानिक शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्राणपणाने विरोध करील.
ब) शेती उद्योगास आर्थिक स्थैर्य आणि साह्य मिळण्यासाठी जोडधंदा गरजेचा आहे त्यास प्रोत्साहन आणि सहाय्य देण्यासाठी प्रयत्न केले जातील. शेतमाल नाशवंत असल्याने मिळेल त्या किंमतीत विकावा लागतो म्हणून फळप्रक्रिया सारख्या शेतीपूरक लघुउद्योगांना प्राधान्य देऊन शिवारातील मालावर शिवारात प्रक्रिया करून त्याचे आयुर्मान आणि किंमत वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. सिंचन योजना पूर्ण क्षमतेने चालवल्या जातील आणि कोठेही सुडाचे राजकारण न करता सर्वांना योग्य प्रकारे पाणी वाटप केले जाईल.

२) पुरोगामी महाराष्ट्राचा शैक्षणिक आणि सामाजिक वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करीन.
अ) जातीय अस्मितेचे अवडंबर माजवणार नाही,कोणत्याही जातीय कार्यक्रमात हजेरी लावणार नाही आणि जातीच्या नावाने दिलेला पुरस्कार स्विकारणार नाही. जातीव्यवस्था हे भारतीय समाजाचे कधीही न बदलणारे भीषण वास्तव आहे. केवळ आडनावे बदलून/लपवून किंवा आंतरजातीय विवाह करून जातीव्यवस्था संपुष्टात येणार नाही, आंतरजातीय विवाहाने फारतर मुलींची जात बदलेल इतकंच. दुर्दैवाने नजीकच्या काळात तरी जातीयव्यवस्था संपूर्णपणे संपुष्टात येण्याची शक्यता दिसत नसली तरी जातीजातींमधील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दरी सांधून जातिभेदाची दाहकता कमी करण्याचा प्रयत्न करेन.
ब) सर्वांना शिक्षण मिळेल तसेच आर्थिक परिस्थितीमुळे कोणालाही अर्ध्यातून शाळा सोडवी लागणार नाही अशी तजवीज केली जाईल. बसच्या पासला पैसे नाहीत म्हणून अडीचशे-तीनशे रुपयांसाठी कोणासही आत्महत्या करावी लागणार नाही याची काळजी घेईन तसेच शालेय शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करेन.

३) मी राजकारण आणि समाजकारण यांची सरमिसळ करणार नाही.
अ) राज्यशासनाच्या विविध योजना मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहोचवण्याची आणि त्यांची व्यस्थित अंमलबजावणी करण्याची काळजी घेईन. मतदारसंघातील विविध समस्या सभागृहात जबाबदारीने मांडण्याचा प्रयत्न करीन तसेच जनतेच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा सरकारपुढे मांडण्यात येतील. शेतकरी, कामगारवर्गासाठी जाचक वाटणाऱ्या कायद्यात योग्य त्या दुरुस्ती सुचवण्यात येतील.
ब) कोणत्याही खाजगी कार्यक्रमास(लग्न समारंभ, नामकरण विधी, वाढदिवस, मयत, दशक्रियाविधी इ.).  उपस्थित राहणार नाही. सत्कार आणि दोन शब्दाच्या नावाखाली कार्यक्रमास जमलेला जनसमुदायाला रखडवणार नाही. मी मतदारसंघात रक्षाबंधनाला साडी, दिवाळीला फराळ वाटून जनतेच्या आत्मसन्माला, स्वाभिमानाला ठेच पोहचवणार नाही. त्यापेक्षा जीवनमान कसे उंचावेल आणि सणवार साजरा करण्यासाठी कोणाच्याही मेहेरबानीवर अवलंबून रहावे लागणार नाही यासाठी प्रयत्न करेन . तीर्थयात्रा, हळदी-कुंकू समारंभ इ. आयोजित करून लोकांच्या श्रद्धेचा, अस्मितेचा बाजार मांडून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणार नाही.

४)स्त्री स्वावलंबन आणि मानव समतेचा पुरस्कार करेन.
अ) स्त्रीला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीला आणि तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला पुरुषप्रधान संस्कृती बरोबरच तिचे परावलंबित्व जबाबदार आहे, स्रियांना फक्त शिक्षणच न देता शिकवून स्वतःच्या पायावर उभे करणे गरजेचे आहे. स्रिया ज्यावेळी स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करू शकतील त्यावेळीच त्या सक्षम आणि सबल होतील. केवळ कायदे करून त्यांना हक्क आणि सन्मान मिळणार नाहीत. स्रियांना व्यावसायिक शिक्षण,नोकरी आणि उद्योगधंद्यासाठी प्रोत्साहन आणि सहाय्य देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
ब) स्त्रीपुरुष समानता ही संकल्पनाच चुकीची आहे, स्त्री -पुरुषांमध्ये भेदभावच करता येऊ शकत नाही. दोघांनाही जीवन जगण्याचे समान हक्क नैसर्गिकरित्या प्राप्त आहेत, शिवाय जास्तीच्या जबाबदारीसाठी स्रियांना जास्तीचे हक्क आपसूकच मिळायला हवेत. व्यक्तिव्यक्तीत स्त्री-पुरुष, जातीधर्माच्या आधारे भेदभाव करता येणार नाही. मी भेदभाव विरहित, समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करेन.

५)कोणतीही गोष्ट मोफत देण्याचे प्रलोभन न देता, कष्टाचा योग्य तो मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न करीन.
अ) निवडणूकपूर्व अनेकजण अनेक गोष्टी मोफत देण्याच्या घोषणा देत असतात मात्र कोणतीही गोष्ट फुकट मिळत नसते, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्याची वसुली ही केलीच जाते. मी असल्या थिल्लर घोषणा करण्यापेक्षा लोकांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील राहील.
ब) सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून करून तरुण पिढी इथे तिथे सतरंज्या न उचलता स्वतःच रोजगार मिळवून सन्मानाने कुटुंबाचे पालन पोषण आणि गरजा पूर्ण करतील आणि कोणाच्याही मेहरबानीवर विसंबून राहणार नाही.

६)आमदार निधीचा सुयोग्य विनियोग आणि राज्य सरकारच्या योजनांची योग्य अंमलबजावणी.
अ)मतदार संघात बैठका घेऊन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने
मतदारसंघात कोणती महत्त्वाची कामे व्हायला हवीत हे जाणून घेऊन जास्त गरजेची कामे आमदार निधीचा सुयोग्य वापर करून पूर्ण करण्यात येतील.या कामाचा ठेका नातेवाईक, कार्यकर्ते यांना न देता योग्य त्या ठेकेदाराला काम देण्यात येईल.काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा व खर्चाचा तपशील जाहीर करण्यात येईल. मी माझ्या अखत्यारीत येणाऱ्या कामाव्यतिरिक्त इतर(स्थानिक स्वराज्य संस्थांच्या) कामांत हस्तक्षेप करणार नाही आणि त्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार नाही.
ब) राज्य सरकारच्या जास्तीत जास्त योजना राबवण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच मतदारसंघात राबवल्या जाणाऱ्या राज्य सरकारच्या योजनांचे सर्व तपशील - मंजूर निधी, खर्च, योजनेचे फायदे आणि परिणाम इ. सत्य माहिती जाहीर केली जाईल.

७) कृषी पर्यटनास चालना तसेच शहरी नोकरदार आणि ग्रामीण शेतकरी यांच्यामधील गैरसमजाची दरी सांधण्यासाठी प्रयत्न.
अ) शेतकऱ्यांना टॅक्स भरावा लागत नाही, दर निवडणूका आधी कर्ज माफी मिळते, अनेक सवलती,अनुदान आणि नुकसान भरपाई मिळते असे अनेक गैरसमज शेतकऱ्यांबाबत शहरी नोकरदारांमध्ये आहेत. तसेच नोकरदारांना एसीमध्ये आरामात बसून महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो, कंपन्याकडून सर्व सुखसुविधा मिळतात असा समज कष्टकरी वर्गाचा झालेला असतो.
खरंतर हे दोन्ही वर्ग हे शोषित आहेत. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या कष्टाला सीमा नाही, त्या कष्टाचा योग्य मोबदला ही मिळत नाही. त्याप्रमाणेच आता १० ते ५ काम ही नोकरीची संकल्पना कालबाह्य झाली असून रोजची टार्गेट पूर्ण करण्यासाठी दहा-बारा तास काम करावे लागते आणि त्याचा काही वेगळा मोबदला भेटत नाही,त्या कष्टाचा मेवा भलतेच खाऊन जातात. मुलांचे शिक्षण,घराचे हप्ते आणि वाढत्या महागाई तोंड देत कुटुंब चालवण्याची तारेवरची कसरत नोकरदार वर्गाला करावी लागते आहे.
ब) कृषी पर्यटनास प्रोत्साहन देऊन या दोन्ही वर्गातील अदृश्य वैरभाव संपवून सामाजिक ऋणानुबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. जेणेकरून दोन्ही वर्गांना एकमेकांच्या समस्यांची जाणीव तर होईलच शिवाय नोकरदारवर्गास महिन्यातून चार-दोन दिवस का होईना निसर्गाच्या सानिध्यात घालवता येतील, त्याबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या कामात थोडीफार मदत करता येईल. शिवाय स्वकष्टाने पिकवलेले अन्न खाल्ल्याचे समाधान लाभेल. शेतकऱ्यांना देखील थोडा का होईना माल दलालाविना थेट विकता येईल व वाहतूक, दलाली खर्च वाचून चार अधिकचे पैसे मिळतील. मी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना मध्यस्थ, दलालविरहित व्यापार साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न करेन.
                           
                                                                                                     संतोष बबन गांजुरे.
                                                                                     स्वतंत्र उमेदवार- महाराष्ट्र विधानसभा २०१९.

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!