Ads 468x60px

Sunday, December 7, 2025

सत्तासूत्र

                        प्राचीन काळापासून जगभरातील बलाढ्य साम्राज्यांचे सम्राट, हुकुमशहा, भांडवलदार, राज्यकर्ते आपली सत्ता आणि वर्चस्व टिकवण्यासाठी आणि जनतेने आपल्या मनमानी कारभाराविरोधात बंड करू नये यासाठी विविध युक्त्या, तंत्र वापरून जनतेला आपल्या अधिपत्याखाली ठेवत आले आहेत. प्राचीन आणि मोठया असलेल्या रोमन साम्राज्यात(इ.स.पू. २७) भाकरी आणि मनोरंजन ही युक्ती वापरली जायची(Bread and Circuses (Panem et Circenses)). सत्ताधारी जनतेला मोफत अन्नधान्य पुरवत. जनतेसाठी ग्लॅडिएटर लढाया, रथांच्या शर्यती यांसारखे मोठे सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करत. अशा कार्यक्रमांमुळे जनता आपल्या मूलभूत समस्यांपासून विचलित होऊन उदरनिर्वाहासाठी सत्ताधाऱ्यांवर अवलंबून रहात. मोफत अन्नधान्य आणि आर्थिक मदत देऊन जनतेला सत्ताधाऱ्यांचे मिंधे बनवल्यावर त्यांना सत्ताधाऱ्यांची जी हुजुरी करण्याशिवाय पर्याय नसतो. त्याच बरोबर धर्म, जात, प्रदेश आणि सामाजिक वर्गाधारित फूट पाडून आपापसात लढवत ठेवण्याचा फोडा आणि राज्य करा (Divide et impera" (डिव्हाइड एट इम्पेरा)) या युक्तीचा वापर करत रोमन साम्राज्य परकीय प्रांतांमध्ये स्थानिक गटांना एकमेकांविरुद्ध लढवून रोम साम्राज्याविरोधात बंड होऊ न देण्याची काळजी घेत. तसेच कायदेशीर हेराफेरी (Legal Manipulation) ज्यामध्ये सत्ताधारी सत्ता बळकट करण्यासाठी कायद्यात बदल करतात आणि आपल्या समर्थकांना अधिकचा लाभ मिळवून देतात. तसेच प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना लढायची संधी सुद्धा देत नाही, विरोधकांनी जिंकणे तर दूरची गोष्ट. उदाहरणार्थ रोममध्ये नागरिकत्वाचे विशेषाधिकार फक्त काहींनाच दिले गेले. जनतेला लुबाडून आपल्या गोतावळ्याचा हितसंबंध जोपासत फक्त त्यांचीच भरभराट करणारे आणि जनतेची वाताहत करणारे सत्ताधारी जनतेला भुलवण्यासाठी काहीतरी भव्यदिव्य करून त्याचे प्रदर्शन करून जनतेला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. भव्य इमारती, पुतळे, संग्रहालये, सार्वजनिक समारंभ, किंवा शासकीय प्रकल्पांद्वारे आपली शक्ती आणि वर्चस्व दाखवतात, ज्यामुळे जनता त्यांच्यावर प्रभावित होते. इजिप्तमधील पिरॅमिड्स, फ्रान्समधील व्हर्सायचा राजवाडा आणि अनेक देशात उभारलेली भव्य राष्ट्रीय स्मारके,धार्मिक स्थळे भव्यता आणि प्रदर्शनाचे (Spectacle and Grandeur) उदाहरण आहे.            

                सत्तेचा खुंटा मजबूत करण्याचे अजून एक प्रभावी तंत्र म्हणजे प्रचारतंत्र (Propaganda). हे तंत्र समाज आणि लोकमानस आपल्या दिशेने वळवण्याचे एक कौशल्यपूर्ण साधन आहे. यामध्ये विशिष्ट विचारधारा, अजेंडा(कार्यसूची) पुढे रेटण्यासाठी आणि लोकांच्या मतांवर आणि विचारांवर प्रभाव पडण्यासाठी हेतुपुरस्सर अर्धसत्य, वाढीव माहिती आणि अफवा पसरवल्या जातात. फक्त आपल्या विचारसरणीला पूरक माहिती देणे, आपल्याविरोधी माहिती टाळणे. विरोधकांवर सातत्याने हल्ला करणे अशा गोष्टी केल्या जातात. याचा उद्देश विशिष्ट विचारसरणी, राजकीय अजेंडा किंवा हितसंबंधांना चालना देणे हा असतो. भीती, देशभक्ती, आनंद यांसारख्या तीव्र अस्मितावादी भावना जागृत केल्या जातात. हा प्रचार वस्तुनिष्ठ नसतो आणि यामध्ये विशिष्ट धारणांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडक तथ्ये सादर केली जातात. तसेच तर्कसंगत प्रतिसाद देण्याऐवजी भावनिक भाषा वापरली जाते आणि जटिल समस्या सोप्या करून सादर केल्या जातात. उद्देश हा की लोकांनी एक विशिष्ट दृष्टिकोन स्विकारावा आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आपल्यासोबत राहावे. या तंत्राचा सर्वात प्रभावी वापर हिटलरने जर्मनीमध्ये केला (गोबेल्स नीती). प्रचारतंत्राचा पुढचा आणि सर्वात प्रभावी भाग म्हणून सम्राट, सत्ताधीश हा ईश्वरी अवतार (non-biological) आहे, त्याला खुद्द देवाने लोकोद्धारासाठी पाठवले आहे असा प्रचार करायचा. आणि तो जे काही करतोय ते दैवी कार्य आहे तो प्रजेला किंवा कोणत्याही मानवी सत्तेला जबाबदार नाही.  त्यामुळे राज्याची कितीही दुरावस्था झाली तरी राजाला ईश्वराचा प्रतिनिधी मानल्यामुळे आपल्याला जे काही भोगावे लागतेय एका उदात्त हेतूसाठी, त्याच्या विरोधात जाणे म्हणजे देवाच्या इच्छेविरुद्ध जाणे अशी भावना जनतेत निर्माण होऊन मोठ्या भक्तिभावाने जनता सर्व भोग भोगत असते आणि राजा राज्य उपभोगत असतो. प्राचीन इजिप्तमध्ये फारोला देव मानले जायचे. मध्ययुगात युरोपात याप्रकारे राजांचा "दैवी हक्क" (Divine Right of Kings) प्रचारला गेला आणि राज्यांनी आपल्या अनियंत्रित राज्यकारभाराचा नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त करून दिले.

              सत्ताधारी आपल्या अधिकारांचा वापर करून आपल्या निष्ठावान समर्थकांना आणि प्रभावी घटकांना जसे की उद्योजक, प्रसार माध्यमे, कलाकार यांना कवडीमोल दराने जमिनी, मोठमोठी कंत्राटे, पुरस्कार, आर्थिक लाभ देऊन त्यांची निष्ठा खरेदी करतात. त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालून त्यांना संरक्षण देतात(Clientelism and Patronage) त्याबदल्यात हे लोक सत्ताधाऱ्यांची तळी उचलून परस्पर हितसंबंध जोपासतात . वैयक्तिक स्तरावर क्लायंटलिझम जबरदस्तीद्वारे देखील केला जाऊ शकतो जिथे नागरिकांना विशिष्ट राजकारणी किंवा पक्षाला मतदान न केल्यास वस्तू किंवा सेवा खंडित करण्याची धमकी दिली जाते. हे सत्तेचे दलाल आपल्या मिळकतीमधील छोटासा हिस्सा सत्कार्यासाठी खर्च करून आपली प्रतिमा उजळवत असतात. शोषित लोकं या सर्वांचा जयघोष करत राहतात त्यांना हे कळत नाही की फक्त त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेचा एक भाग त्यांना परत मिळत आहे आणि शासक आणि सत्तेचे दलाल ते जनतेच्या हिश्यातून घेतल्याशिवाय परत जनतेला देऊ शकत नाही. थोडक्यात ही मूठभर लोकं मणभर मेवा खातात आणि कणभर मेव्याच्या उष्ट्या पत्रावळ्या ढीगभर जनतेच्या वाट्याला येतात.प्राचीन रोममध्ये, सम्राटांनी आपल्या निष्ठावानांना जमिनी आणि विशेषाधिकार दिले. मध्ययुगात सामंतांनी आपल्या समर्थकांना संरक्षण आणि जमिनी दिल्या ही बेकायदेशीर संरक्षण आणि पक्षपाती लाभाची(Clientelism and Patronage ) काही उदाहरणे आहेत.

                           कमी खटाटोपी करून, जनतेला टोपी घालणारी आणि जनतेची मती गुंग करणारी राजसत्तेची अन् धर्मसत्तेची युती ही सत्ता राखण्याची सगळ्यात जालीम युक्ती आहे. या दोहोंचा परस्पर संबंध हा मानवी इतिहासातील एक गुंतागुंतीचा, दीर्घकालीन चाललेला मुद्दा आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातील नाते हे एकमेकांना मजबूत करण्यासाठी असते. धर्मसत्ता राजसत्तेला नैतिकता, वैधता प्राप्त करून देते तर राजसत्ता धर्मसत्तेला राजाश्रय मिळवून देते. पाखंडी धर्ममार्तंडांना राजाश्रय मिळाला की जनतेच्या भावना बोथट करण्याचे काम करत असतात. धर्ममार्तंड धर्माचा वापर जनतेला भ्रमात ठेवण्यासाठी करतात. धर्मसत्ता पाप-पुण्य, स्वर्ग-नरक यांच्या भीतीने जनतेवर मानसिक वर्चस्व गाजवतात, ज्यामुळे लोक स्वतंत्र विचार करू शकत नाहीत आणि सत्ताधाऱ्यांच्या शोषणाला बळी पडतात. जनतेला भ्रमात ठेवून त्यांचे अधिकार हिरावले जातात, विकास रोखला जातो आणि सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांचा वापर केला जातो. जनतेची धार्मिक श्रद्धा सत्तेच्या समर्थनासाठी वापरली जाते. धर्ममार्तंड आणि राज्यकर्ते धर्माच्या, धर्म वाचवण्याच्या, वाढवण्याच्या गोष्टी करतात पण त्या धर्मातील लोकं वाचवण्याच्या, त्यांचा उत्कर्ष करण्याच्या गोष्टी करत नाहीत. मध्ययुगात युरोपात कॅथलिक चर्च आणि राजसत्तेची युती होती. इटलीमध्ये पोप पायस ११ आणि मुसोलिनी यांची युती होती, ज्यात चर्चने मुसोलिनीच्या हुकूमशाही राजवटीला पाठिंबा दिला आणि ज्यूंविरोधी कायद्यांना अप्रत्यक्ष संमती दिली. जागतिक स्तरावर, धर्माचा दुरुपयोग अतिरेकवाद वाढवण्यासाठी होतो, ज्यात राजकीय नेते धार्मिक भाषेचा वापर करून आपले अजेंडे पुढे रेटतात.

               कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या संस्थाचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी, जनतेत भीती निर्माण करण्यासाठी करतात. शासनाला अडचणीत आणणाऱ्या घटकांना नेस्तनाबूत करण्यासाठी या संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या संपत्तीवर टाच आणली जाते, त्यांच्या स्थावर मालमत्ता जमिनीदोस्त केल्या जातात, त्यांची सगळी कृत्ये बेकायदेशीर ठरवून त्यांना तुरुंगात डांबले जाते. प्राचीन अ‍ॅसिरियन साम्राज्याने निष्ठुरपणे दडपशाहीद्वारे लोकांना आपल्या अधिपत्याखाली ठेवले होते. राज्यकर्ते शिक्षणातून आपल्या विचारसणीचा प्रसार करून जनतेच्या विचारावर नियंत्रण ठेवतात आणि त्यांना आपल्या बाजूला वळवतात.  प्राचीन स्पार्टामध्ये तरुणांना सैनिकी प्रशिक्षण आणि विचारसरणी शिकवली जायची. आधुनिक काळात काही देश पाठ्यपुस्तकांद्वारे इतिहासाची हेराफेरी करून आपल्या सोईस्कर इतिहास शिकवतात. याशिवाय कोणी बंडखोरी करू नये म्हणून अशा लोकांवर पाळत ठेवली जाते. जगभरातील सर्वच सरकारांच्या गुप्तचर यंत्रणा मजबूत असतात त्या परकियांवर पाळत ठेवतातच अंतर्गत विरोधक आणि विवेकवादी लोकांवर देखील पाळत ठेवतात. खरंतर जगभरातले सर्वच हुकुमशहा क्रूर असले तरी प्रत्यक्षात ते खूप घाबरट असतात. विरोधकच काय पण आपल्या समर्थकाबद्दल पण त्याच्या मनात शंका असते.

               या अशा अनेक युक्त्या वापरून सत्ता टिकवता येत पण यशस्वी होता येईलच असे नाही. त्यामुळे चोहोबाजूंनी अपयशी ठरल्यानंतर आपल्या अपयशाचे खापर कोणावर तरी फोडावे लागते, कोणाला तरी जबाबदार धरावे लागते त्यासाठी बाह्यशत्रू आणि अंतर्गत विरोधकांना बळीचा बकरा बनवले जाते (Scapegoating and External Enemies). राज्यकर्ता आपल्या नाकर्तेपणासाठी, अपयशासाठी स्वतःला जबाबदार न धरता त्या अपयशासाठी कारणीभूत नसलेल्या एखाद्या व्यक्तीला, समुदायाला, पक्षाला जबाबदार धरतो आणि त्यांच्यावर सतत टीका करत राहतो. असल्या टीकेमुळे त्याला त्याच्या अपराधीपणाच्या भावनेपासून सुटका मिळते आणि समाधानाची भावना मिळते ही एक प्रकारची मानसिक संरक्षण यंत्रणा आहे (psychological defense mechanism). सर्व गोष्टींत अपयशी ठरल्यामुळे हतबल झालेला वांझोटा सत्ताधारी आपली प्रतिमा संवर्धन करण्यासाठी पॉवर डायनॅमिक्सचा खेळ खेळतो. ज्याने खरोखर चांगले कार्य केले आहे त्यांच्यापेक्षा आपण कसे वरचढ आहोत हे भासवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. तो त्या पूर्वसुरी व्यक्तीची बदनामी करतो, त्याची प्रतिमाभंजन करण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतः नकारात्मक, विध्वसंक वृत्तीचा असल्यामुळे त्याला सकारात्मक, रचनात्मक काम करता येत नाही. त्यामुळे त्या थोर पूर्वसुरीच्या प्रत्येक गोष्टीला, कार्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःला एवढा असुरक्षित समजतो की आपण सर्वोच्चपदी विराजमान असताना आपल्याच मंत्रिमंडळातील कनिष्ठमंत्र्याच्या कार्याचे श्रेय स्वतः कडे घेतो, कामाची उद्घाटने स्वतः करतो. बाकी सर्वांना नामधारी बनवतो जेणेकरून त्याच्यापेक्षा कोणी मोठा दिसू नये आणि तसे झाल्यास अशा आपल्याच  नेत्याचे, मंत्र्याचे पद्धतशीर खच्चीकरण करतो. स्वतःची लायकी नसताना प्रत्येक गोष्टीत आपले नसलेले ज्ञान पाजळून आपल्या पदाचा प्रतिष्ठा पणाला लावतो. सर्व व्यवस्था उद्ध्वस्त झाल्यानंतर, वाताहत झाल्यानंतर जनतेला आपल्यासोबत एकत्र ठेवण्यासाठी विशेषतः निवडणुकीच्या काळात देशात अतिरेकी हल्ले, देशावर परकीय आक्रमण, युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करून लोकांच्या मध्ये राष्ट्रवादाची भावना प्रबळ करून आणि त्याचा फायदा सार्वत्रिक निवडणुकीत घेतो.

                           अशा अनेक युक्त्या हजारो वर्षांपासून सत्ता टिकवण्यासाठी, वर्चस्व राखण्यासाठी वापरल्या जात आहेत पण या युक्त्या अद्यापपर्यंत कालबाह्य झालेल्या नाहीत. नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन संशोधन याचा वापर करून या युक्त्या अजून प्रभावी बनवल्या जात आहेत आणि नवनवीन युक्त्यांची त्यात भर पडली जात आहे. या बलाढ्य सैतानी शक्तीपुढे सर्वसामान्य लोकांनी हतबल होऊन त्यांचे गुलाम होऊन राहायचे हा एकमेव पर्याय आहे का?. या सर्व युक्त्या निष्फळ करण्यासाठी एकमेव प्रभावी मार्ग म्हणजे बहुसंख्य जनतेने आपली सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवणे. अर्थातच याची जाण वर्चस्ववाद्यांना आहे म्हणून ते कधीच जनतेला त्यांच्या सद्सदविवेकबुद्धीचा वापर करण्याची संधी मिळू देत नाही. योग्य शिक्षणाने लोकांना चांगल्या - वाईटाची पारख करता येते, आपला उत्कर्ष करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याची जाणीव होते म्हणून सर्वप्रथम ते शिक्षणाचा बट्ट्याबोळ करतात. जनतेला कायम कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त, वांझोट्या गोष्टीत अडकून ठेवतात, एक चांगले, सुरक्षित जीवन जगण्यासाठी जनतेला सतत संघर्ष करायला लावतात. सर्व लोककल्याणकारी योजनांचा, पायाभूत सुविधांचा बोजवारा उडवून जीवनावश्यक गोष्टींसाठी जनतेला सरकारचे मिंधे होण्यासाठी भाग पाडतात. यावर एकमेव उपाय म्हणजे समाजातील विवेकवादी लोकांनी सातत्याने जनतेला सत्य, वास्तविक तथ्ये, सरकारच्या प्रत्येक कृती मागचा कार्यकारण भाव समजावून जनजागृती करत राहणे आवश्यक आहे. कोणी सत्तेचा अमर पट्टा घेऊन आलेला नाही. बदल ही एकमेव चिरंतन गोष्ट आहे फक्त तो बदल आधीच्याच मार्गाने जाणार नाही याची काळजी सर्वांनीच घेणे गरजेची आहे. 

                                                                                                                                संतोबा.

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!