Ads 468x60px

Sunday, October 27, 2024

लोकशाहीची दिवाळी...

आली आली ही लोकशाहीची निवडणूक,
सज्ज होती सारे, पुन्हा करावया फसवणूक.
सुरू झाली नागरी समस्यांची सोडवणूक.
झाकण्या पाचवर्षाच्या नाकर्तेपणाचे पाप,
खड्ड्याळ रस्त्यांचा करू लागले मेकअप.

आली आली ही लोकशाहीची निवडणूक,
रखडलेल्या फायलींवर खरडल्या सह्या भराभर.
नाजूक, अत्यवस्थ तिजोरीवर दिला डोईजड भार. 
बोलूनचालून गद्दार, अस्तित्व राखण्याची मारामार.
म्हणून ज्यांनी दिला आधार, त्यांच्यावर करती वार.

आली आली ही लोकशाहीची निवडणूक,
चर्चेत राहण्या रोज नवा वाद, नव्या तरकीब.
रातदिन सगळीकडे प्रायोजित बातम्यांचा रतीब.
तिकीटापायी कुणाचे ब्रेकअप, कोणाचे पॅचअप.
कोणी क्षणात बदलले पक्ष, कोणी बदलला बाप.

आली आली ही लोकशाहीची निवडणूक,
वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक ज्यांना संधी नाकारली.
त्यांच्या चारदिवस खाण्यापिण्याची सोय झाली.
फसव्या योजना, आश्वासनांचा भडिमार झाला.
काळ्याचा पांढरा करून, रोकडा व्यवहार केला.

आली आली ही लोकशाहीची निवडणूक,
कधी न दिसणारा साहेब घेऊ लागला गाठीभेटी.
साहेबांच्या प्रचारासाठी, बेरोजगारांची दाटीवाटी.
ज्यांनी केली फसवणूक, झटू लागले त्यांच्यासाठी.
जणूकाही हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या पाठी.

                                                    संतोबा...

Tuesday, October 8, 2024

नसानखवड्यांच्या फोकादाऱ्या

                     तुम्ही शाळा-कॉलेज उभारली नाहीत, शिक्षण संस्था स्थापन केल्या नाहीत. उद्योगधंदे उभारले नाहीत, सहकारी संस्था काढलेल्या नाहीत यामध्ये विशेष असे काही नाही. विधायक कार्य तुमच्या हातून घडणे शक्य नाही कारण विध्वंसकता, कावेबाजपणा तुमच्या डीएनए मध्येच खोलवर रुतून बसलेला आहे. सर्वसामान्य लोकांच्या हातात लेखणी आली, त्यांना अक्षर ओळख झाली, ज्ञान मिळवण्याची साधने उपलब्ध झाली तर आपले श्रेष्ठत्वाचे पितळ उघडे पडेल आणि आपले पिढ्याअन् पिढ्या मोक्याचा जागा मिळवण्याच्या अघोषित आरक्षणास धोका निर्माण होईल म्हणून तुम्ही शेकडो वर्षांपासून बहुसंख्याना शिक्षणापासून वंचित ठेवले. सर्वसामान्यांच्या हाताला रोजगार मिळाला तर ते स्वावलंबी होतील, तुमच्या फुकाच्या वर्चस्वाच्या पालख्या वाहायला फुकटचे भोई मिळणे दुरापास्त होईल. म्हणून कुठल्यातरी भीतीचा बागुलबुवा निर्माण करून, त्यांच्या मनात भीती आणि द्वेष निर्माण करून त्यांच्या हातात काठ्या-लाठ्या, दगडगोटे देणे तुमच्या फायद्याचे होते आणि तेच तुम्ही करत आला आहात. 

                        ज्या गोष्टींची लाज वाटायला पाहिजे ती अभिमानाने सांगताना केवळ कोडगेपणा असून भागत नाही तर कमालीचा नीचपणा अंगी असावा लागतो. हा नीचपणा तुमच्यात पिढ्याअन् पिढ्या वारश्याने चालत आला आहे आणि आता तो नीचपणाचा वारसा तुमच्या डीएनए मध्ये घट्ट रुतून बसला आहे त्यामुळे त्याला कितीही वेगळा करायचे म्हणलं तरी तसे करता येणार नाही. पाताळयंत्रीपणा, कावेबाजपणा करून संपूर्ण समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हातभार लावणाऱ्या अनेक थोर युगपुरुषांस संपविण्यात आपला हातखंडा आहे, शिवाय त्यांच्या मृत्यूंचे सोहळे करून त्यात युगपुरुषांच्या अनुयायांनाच आनंदाने ढोल बडवायला भाग पाडायचे याची पायाच्या अंगठ्याने गाठ मारायची कला आपल्याला चांगलीच अवगत आहे. आता कुठे तुमच्या काही अनुयायांना तुमचे नैतिक अधःपतन झालंय असे वाटतेय पण तुमच्या अंगी नैतिकता कधीच नव्हती. तुम्ही पोट फुगवून बैल बनण्याचा प्रयत्न करणारा अहंकारी बेडूक आहात याची जाणीव अनेकांना होतीच. खरंतर तुम्ही जेवढे स्वतःला अभिजन असल्याचे ढोल बडवता तेवढे तुम्ही बुद्धिमान नाहीत. केवळ कंपूशाहीच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला तुमच्या क्षेत्रात स्पर्धकच निर्माण होऊ न दिल्याने तुम्ही इतरांच्यापेक्षा वरचढ आहात हे बहुसंख्यांच्या मनावर बिंबवण्यात यशस्वी झालात, तुमचा कावा ओळखण्यात बहुसंख्य कमी पडले म्हणून तुमची चलती आहे.       

                        तुम्हां लोकांना दुसऱ्यांच्या भल्याचे काम करता येत नाही म्हणून तुम्ही चांगले काम करणाऱ्या लोकांची बदनामी करत त्यांच्या कामात उणेपणा आणण्याचा प्रयत्न करता. पिढ्यानपिढ्या तुम्ही अशी कटकारस्थाने करत अनेक थोर लोकांची खोट्या थापा मारून बदनामी केली पण तुमच्या खोट्या कांगाव्याने, कपटीपणामुळे त्यांची प्रतिमा अजूनच उजळली. तुम्हालाच त्यांची बदनामी करणे अंगलट आली. थुंकून चाटण्यात तुमच्या इतका तरबेज कोणी नाही. बदनामी करून त्यांना नामोहरम करता येत नाही म्हणून नाईलाजाने तुम्ही तुमच्या फायद्यासाठी वरकरणी त्यांचा उदोउदो करता. त्या थोर व्यक्तीविरोधात छुपी कुजबुज मोहीम राबवून, वादग्रस्त वक्तव्ये करून जनमाणसांच्या मनात संभ्रम निर्माण करता. कोणीतरी आपल्या जातकुळीतील त्या क्षेत्रातील बुजगावणे पुढे आणत व राईचा पर्वत करत त्या बुजगावण्यामुळेच ती व्यक्ती थोर होऊ शकली अशी आवई उठवता व त्या बुजगावण्याला थोर आदर्श म्हणून समाजच्या माथी मारण्याचे पातक करता. तुम्हाला तुमचे दिखाऊ धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय वर्चस्व अबाधित ठेवायचे असते त्यामुळे तुम्ही त्या वर्चस्वाला आव्हान निर्माण होऊ न देण्याची पुरेपूर काळजी घेता.  

                   कटकारस्थानाशिवाय तुम्हाला देशद्रोहाची, धर्मद्रोहाची वाटण्याचा प्रमाणपत्र वाटण्याचा छंद आहे पण खरे देशद्रोही समाजद्रोही, धर्मद्रोही तुम्ही आहात.देव, देश, धर्माच्या तुमच्या सोईच्या व्याख्या करून बहुसंख्य जनतेला मानसिक गुलामगिरीत ढकलण्याच्या दांडगा अनुभव तुम्हाला आहे. प्रत्येक पांढरपेशा क्षेत्रात कंपुशाही करत आपली मक्तेदारी अबाधित ठेवण्यासाठी बहुजनांना अज्ञान, अंधश्रध्देच्या जोखडाखाली पर्यायाने दारिद्र्यात ठेवण्याचा समाजद्रोहीपणा तुम्ही केला. जेव्हा परकीय सत्ता भारतावर राज्य करत होत्या तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी खर्डेघाशी केली, हेरगिरी केली एवढंच काय आताही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही हेरगिरी केल्याची उदाहरणे आहेत. देवाधर्माचेही तुम्हाला सोयरसुतक नाही, तुमच्या फायद्यासाठी आणि पोटापाण्यासाठी देवाधर्माचा वापर केला, बहुजनांना सेवा आणि स्वतःला मेवा अशी देवाधर्माची पद्धतशीर मांडणी केली. अपवादात्मक काही तरी चांगले कार्य तुमच्याकडून झाले असले तरी ते कधी निर्हेतुक, निरपेक्ष नव्हते, त्याआडून काहीतरी साध्य करण्याचा डाव होता. तुमच्या विकृत विचारसरणीमुळे जनभावनेचा उद्रेक होऊन तुमच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ नये म्हणून अपवादात्मक चांगले दिसणारे कार्य तो उद्रेक शमविण्यासाठी, रागाचा निचरा करण्यासाठी सेफ्टी व्हॉल्व म्हणून काम करण्यासाठी होते.

                  कंपुशाहीचा फायदा घेत प्रशासनाला हाताशी धरून, समाजावर प्रभाव पाडणाऱ्या माध्यमांना, व्यक्तींना कुठल्याशा गोष्टीचा लाभार्थी बनवून त्यांना आपल्या अंकित करून त्या कणाहीन, मिंध्या लोकांकडून स्वतः चे गुणगान गाऊन घेऊन स्वतःची प्रतिमा उजळवण्याची कला सोडली तर तुमच्याकडे उपद्रवमूल्याशिवाय दुसरं काही नाही. अगदी तुम्ही ज्यात स्वतःला निष्णात समजता त्या फोकादाऱ्या करताना देखील तुम्ही सेल्फ गोल करता आणि तुमचा मतलबी गोतावळा मास्टरस्ट्रोक म्हणून उर बडवून घेत असतो. तुमचे समाजाला देशोधडीला लावण्याचे ईप्सित साध्य करण्यासाठी तुम्ही सतत वादग्रस्त बोलून तुम्ही जनमाणसाचा मनाचा अंदाज घेता व त्यावर काही तीव्र प्रतिक्रिया आली तर दुसऱ्याची मेलेली मढी उकरून सारवासारव करण्याचा प्रयत्न करता. तुमचा दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ शोधताना स्वतःच्या  डोळ्यातील मुसळाचे मोठ्या तोऱ्यात समर्थन करण्याचा निर्लज्जपणा वादातीत आहे. तुम्ही स्वतः काहीही चांगले करणार नाही आणि दुसरा काहीतरी करत असेल तर त्याच्या कामात खोडा घालणार. तुमच्यासारखा नसानखवडा जगात सापडणार नाही. विरोधक सोडा स्वतःचा सहकारी तुम्हाला वरचढ ठरेल अशी शक्यता निर्माण झाली तरी तुम्ही त्यांचा पध्दतशीरपणे काटा काढता. लक्षात ठेवा जे जे तुम्ही इतरांसोबत बरं वाईट केलेय ते सारं उलटून तुमच्याकडे येणार हे निश्चित, हा कर्मसिद्धांत आहे आणि तो कोणालाही चुकला नाही. तुम्ही सुधारण्यापलीकडे गेला आहात त्यामुळे तुमच्या सुधारण्याची बिल्कूल अपेक्षा नाही. म्हणतात ना अति तेथे माती, तुम्ही वेगाने अति करण्याच्या टोकावर पोहचताय, सध्या आम्ही तुम्ही त्या टोकावर पोहचण्याची वाट पहातोय. बाकी कार्य तुमचे कर्मच करेल.

                                                            संतोबा...

Sunday, October 6, 2024

माझा मार्गदर्शक महाराष्ट्र

माय मराठी, असे माझी प्रेमळ माऊली.

काय वर्णावी, अमृताहुनी गोड तिची बोली.

सदा सर्व क्षेत्रात अग्रेसर, हा महाराष्ट्राचा वसा.

लाभला त्यास, कर्तुत्ववान थोरामोठ्यांचा वारसा. 


छत्रपती शिवबा, आपल्या सर्वांचा राजा.

गुण्यागोविंदाने नांदे, सुखी तयाची प्रजा.

स्थापले स्वराज्य, भेद नसे जातीधर्माचा.

शून्यातून विश्व निर्मिले, आदर्श स्वकर्माचा.


हाती घेऊनिया, शुभ्र खडू अन् काळा फळा.

जोतिबासावित्रीने उघडल्या सर्वांसाठी शाळा.

गरीब, अस्पृश्य अन् स्त्रियांचा करण्या उद्धार.

सोशिले कित्येक घाव, प्रसंगी सोडले घरदार.


राजाश्रय मिळाला, शिक्षण, शेती, उद्योगास.   

लाभला असा, राजर्षी शाहू लोकराजा जनतेस.

कायदे जनहिताचे, सक्तीचे अन् मोफत शिक्षण.

शोषितांस प्रवाही आणण्या, दिले त्यांस आरक्षण.


स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा केला पुरस्कार.

बाबासाहेबांनी दिला सर्वांस संविधानाचा आधार.

शुद्रातिशुद्रास मिळे, मानवी जगण्याचा अधिकार.

संविधानच मार्गदर्शक, त्याआधारे चाले कारभार.


                                             संतोबा...

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!