आईचा सासर-माहेरचा कष्टाचा प्रवास हा निरंतर चालू होता. मी थोडासा मोठा झालो, थोडंफार कळायला लागले होते. आई व मी नानांसोबत(आजोबा) आजोळीच (गुळवेवस्ती) असायचो. वडिल घरी आले की मी समजून जायचो की शेतात काहीतरी काम असेल म्हणून ते आईला कामासाठी बोलावण्यासाठी आले असणार. आईसुद्धा विनातक्रार, निमूटपणे आवरून निघायची. गुळवेवस्तीवरून शेत जवळपास अडीच तीन किलोमीटर होते. संध्याकाळी दिवस मावळतीला निघाला की परतीला निघायचं, शेतापासून थोडं पुढे आले की मुख्य डांबरी रस्त्यापासून एक पायवाट फुटायची गुळवे वस्तीकडे जाणारी. आईची पावले आपोआप वा नाईलाजने त्या पायवाटेने पुढे जायची. मला ही फाटाफूट नको वाटायची पण नाईलाज असायचा. मी ही गुमान आईच्या मागे चालू लागायचो.
कधी कामाचा जास्त ताण असला तर मात्र चार आठ दिवस वडिलांकडे रहायला भेटायचं पण काही ना काही कारणांमुळे वाद ठरलेला असायचा. एवढी सगळी कामे निःस्वार्थीपणे करून आई एकटी पडायची. मला हा अन्याय सहन नाही व्हायचा पण माझे काही चालण्यासारखं नव्हतं. माझी मात्र घालमेल व्हायची
आईवरचा अन्याय कधी डोळ्यांनी पाहिला आहे कधी आईकडून ऐकला आहे. बऱ्याचदा वडिलांनी आईवर हात उचलला होता. खूप चीड यायची पण आठ-दहा वर्षाचा मी काय करू शकणार होतो. मला वाटायचं आईची बाजू घ्यावी पण आईचे म्हणणं असायचं भाडणं आमची आहेत आमचं आम्ही बघून घेऊ तू मध्ये पडू नको. मला परिस्थिती किंवा कष्टाचे कधीच काही वाटले नाही पण घरात शांती समाधान असावं असं नेहमी वाटायचं.
आईच्या वाटयाला सुख ना माहेरी वाट्याला आले ना सासरी. कामासाठी वडील आईला हक्काने बोलवायचे पण तिची जबाबदारी घेण्याची त्यांना कधी गरज वाटली नाही. कधी माळवं वा इतर काही विकून थोडेफार पैसे आलेत आणि त्यातील काही पैसे आईला दिलेत असे कधीच झाले नाही. आपल्या नवसासायासाने झालेल्या एकुलत्या एक मुलाला शाळेत काय पाहीजे पुस्तक,कपडे कशाची कधी चिंता केली नाही. वडिलांनी सणावारालाच काय कधीच आईला साडी घेतलेली मला आठवत नाही. आईकडे सणावारासाठी, कुठे जाण्यायेण्यासाठी बऱ्यापैकी असलेली एखाद दुसरी साडी असायची इतर वेळेस मात्र आईला कायम धडप्याची साडी वापरावी लागायची(दोन फाटक्या साड्यांचा चांगला भाग जोडून तयार केलेली साडी) एकदा असेच सकाळी वडील घरी आले होते, आई स्वयंपाक करत होती. ते आईशी दीनवाणे होऊन काहीतरी बोलत होते, मी बाहेर खेळत होतो. आईने मला बोलावून घेतले व मोठ्या बहिणीच्या लग्नात आत्यांनी कानपिळ्याला मला दिलेली सोन्याची अंगठी वडिलांना द्यायला सांगितली. मला ती अंगठी फार आवडली होती, मी अंगठी हरवेन म्हणून आईने मला ती कधी घालू दिली नव्हती. त्यानंतर माझ्या लग्नापर्यंत मी कधी सोन्याचे कोणतेही आभूषण(अंगठी, चैन इ.) वापरलं नाही.
माहेरीही शेतीची सारी कामे आईच करायची, फार गरज असेल तर वारंगुळा करून कामे केली पण कधी रोजाच्या माणसांकडून कामे करून घेतली नाही. इथेही कांद्यासारखं नगदी पीक असले की विक्री आणि हिशोब मामांकडेच असायचा. आईने इतर माळवं, भाजीपाला सासवडला नेऊन विकला तर तेवढे पैसे मात्र आईकडे रहायचे. मामां आठ-पंधरा दिवसांनी किंवा जेव्हापण यायचे तेव्हा माझ्यासाठी न विसरता खाऊ आणत असत, तसेच दिवाळीला फटाके, सामान आणायचे. आई आणि आजोबा दोघेही तापट त्यामुळे कधी-कधी छोट्या गोष्टींवरून वाद व्हायचा याची तक्रार आजोबा मामांकडे करायचे त्यावेळी मामा आईने इथेच राहण्यात कसा फायदा आहे हे नानांना पटवून द्यायचे. नानांचा माझ्यावर खूप जीव होता, आई माझ्यावर रागावलेली त्यांना अजिबात खपत नसे. मी सुट्टी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेत जायला घाबरत असे, त्यावेळी शाळेत सोडण्याची आणि बाईंना सांगण्याची जबाबदारी नाना पार पाडायचे.
दादांचा आणि आजीचाही माझ्यावर फार जीव होता, दोघांचेही वय झाले होते. कधी कधी दोघेही काठीच्या आधाराने काठी टेकवत मला भेटायला यायचे. माझ्या जन्मानंतर आजी मला पदराआड लपवून ठेवायची, मी झोपलोय अशी थाप आजी मारायची पण मला पाहण्याची कोणाची इच्छा आजीने पुरी होऊ दिली नाही. न जाणो कोणाची नजर लागायची. अगदी हेल (पाण्याची कमतरता असल्याने बाळंतिणीच्या घरी पाणी भरण्याची परंपरा) घालणार्या स्रियांना पण मला पाहू देत नसे. त्यामुळे त्या नाराज व्हायच्या पण आजीबाईंनी त्यांची कधी पर्वा केली नाही.दादांच्या वंशाला वारस हवा या अट्टहासापायी वडीलांना नाईलाजाने दुसरे लग्न करावे लागले होते. एकंदरीत चित्र पाहता या सर्वांपुढे आईचा निभाव लागणार नाही, शिवाय ज्या अट्टहासापायी लग्न केले ती जमीन पण शिल्लक राहील की नाही याची चिंता त्यांना होती व त्यामुळेच आहे तेवढी जमीन माझ्या नावावर करून घे असे ते आईला म्हणायचे पण काय कसे करायचे हे दोघांना ही माहिती नव्हते व पुढे खरंच असे होईल एवढे त्यावेळेस वाटले नव्हते. मी सहावीत असताना आजोबा तीन-साडेतीन हजार घेऊन आले होते व माझ्या नावावर टाकायचे म्हणून मला घेऊन गेले मात्र वय कमी असल्यामुळे खाते उघडता आले नाही व माझी शाळेच्या एका सॅकवर बोळवण झाली होती. आज मी पस्तिशी पार आहे आणि अद्याप वारसा म्हणून माझ्याकडे अजूनही काही नाही उलटपक्षी गेल्या आठ-नऊ वर्षांपासून विनाकारण कोर्ट-कचेरीत पाण्यासारखा पैसा ओतावा लागत आहे.
0 प्रतिक्रिया:
Post a Comment